राहुल गांधींना 'गांधी' आडनाव कसं मिळालं? ते 'नेहरू' आडनाव का लावत नाहीत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मुरलीधरन काशिविश्वनाथन
- Role, बीबीसी तमिळ
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसदेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना पंतप्रधान मोदींनी 'नेहरू आडनाव लावायला लाज वाटते का?' असा प्रश्न राहुल गांधींना विचारला होता. गांधी परिवार नेहरू हे आडनाव का लावत नाहीत?
गुरुवारी संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले, "कोणत्याही कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर ते (काँग्रेस) चिडतात. ते इतके महान व्यक्ती होते तर मग त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास भीती वाटते का? नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते का?"
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "देवाने या देशाला वाचवायला हवं. एका अत्यंत जबाबदार अशा पदावर बसलेल्या व्यक्तीला देशाची संस्कृती एकतर महिती नाही किंवा समजत नाही. आणि तेच लोक असं बोलतात. आपल्या आईकडचं आडनाव आपण लावतो का? या देशात कोणालाही विचारा."
पंतप्रधान मोदींच्या भाषणाची चर्चा सोशल मीडियावर देखील सुरू आहे.
नेहरू कुटुंबीय त्यांच्या नावामागे नेहरू हे आडनाव लावत नाहीत, हे विधानच मुळात चुकीचं आहे. नेहरू कुटुंबीयांमधील पुरुष आपलं आडनाव नेहरू म्हणूनच वापरतात. नेहरू कुटुंबातील स्त्री वारस त्यांच्या पतीचं आडनाव त्यांच्या नावापुढे वापरतात. इंदिरा गांधींच्या बाबतीतही तेच झालं.
नेहरू घराण्याचा अलीकडचा इतिहास बघायला गेलं तर सुरुवात होते जवाहरलाल नेहरूंच्या आजोबांपासून, गंगाधर नेहरू (1827-1861) यांच्या पासून. त्यांना पानसीधर नेहरू, नंदलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू ही तीन मुलं होती. या तिघांनीही आपल्या वडिलांचं आडनाव पुढे वापरलं.
मोतीलाल नेहरूंना तीन मुलं होती. यात जवाहरलाल हा मुलगा विजयालक्ष्मी आणि कृष्णा अशा दोघी मुली. पुढे जाऊन जवाहरलाल यांनी पुरुष वारसदार म्हणून नेहरू हे आडनाव वापरलं.
तर विजयालक्ष्मी यांनी गुजरातमधील वकील रंजित सीताराम पंडित यांच्याशी विवाह केला आणि पंडित हे आडनाव लावलं. धाकट्या कृष्णाने लग्न होईपर्यंत नेहरू आडनाव वापरलं आणि पुढे गुणोत्तम राजा हदीसिंग यांच्याशी लग्न झाल्यावर त्या 'कृष्णा हदीसिंग' झाल्या.
त्यांना हर्षा आणि अजित अशी दोन मुलं झाली. ते दोघेही आपल्या नावापुढे हदीसिंग हे आडनाव लावतात. विजयालक्ष्मी पंडित यांना एकच मुलगी होती नयनतारा, तिने लग्नानंतर तिच्या पतीचं सेहगल हे आडनाव लावलं.

फोटो स्रोत, Getty Images
आता जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना एकच मुलगी होती इंदिरा. इंदिरा नेहरूंचा जन्म नोव्हेंबर 1917 मध्ये झाला. मोतीलाल नेहरूंनी आपल्या नातीचं नाव त्यांच्या आईच्या, इंद्राणी या नावावरून 'इंदिरा' ठेवलं. जवाहरलाल यांनी आपल्या लेकीच्या नावापुढे 'प्रियदर्शिनी' हे नाव जोडलं.
इंदिरा प्रियदर्शिनी यांनी लग्न होईपर्यंत 'नेहरू' हे आडनाव वापरलं. जहांगीर फरीदुन गांधी आणि रतिमाई यांचं सर्वात धाकटं मूल म्हणजे फिरोज गांधी. ते धर्माने पारशी होते. इंदिरा आणि फिरोज गांधी प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.
फिरोज गांधी यांनी इंदिरांबद्दल आपलं प्रेम वारंवार व्यक्त केलं होतं, मात्र इंदिराजींनी बऱ्याच काळानंतर त्यांना होकार दिला होता. त्यांच्या होकाराने फिरोज यांना आनंद तर झाला मात्र आडनाव हा चिंतेचा विषय समोर आला.

फोटो स्रोत, Getty Images
'इंदिरा : द लाइफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी' या पुस्तकाच्या लेखिका कॅथरीन यांना इंदिराजींच्या मैत्रिण शांता गांधी यांना याबद्दल सांगितलं होतं की, "इंदिराने लग्न करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी तिला भीती होती की, नेहरू कुटुंब फिरोजचं व्यक्तिमत्त्व संपवून त्यांना नेहरू कुटुंबाचा भाग बनवेल."
पण, तसं काहीच घडलं नाही. इंदिरा आणि फिरोज गांधी यांनी 1942 मध्ये विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांनी इंदिराजींनी 'गांधी' हे आडनाव लावायला सुरुवात केली. पुढे 20 ऑगस्ट 1944 रोजी राजीव या त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. यावेळी जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते.
जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगात असताना आपल्या नातवासाठी बरीच नावं सुचवली होती. पण नाव न ठेवता बरेच दिवस निघून गेले.
नेहरू आपल्या लेकीला इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "राजीवरत्न हे नाव (इंदिराजींना हवं असेल तर) ठेवूया. हवं असल्यास बिरजी हे नाव जोडू शकतो. नेहरू हे आडनाव लावण्याबद्दल तुझा काय विचार आहे? नेहरू-गांधी अशी दोन आडनावं असावी असं मला वाटत नाही. ती चांगली वाटणार नाहीत, त्याऐवजी नेहरू चांगलं वाटेल."

फोटो स्रोत, Getty Images
नेहरूंना पुत्र नसल्यामुळे वंशपरंपरागत आडनाव कायम ठेवण्यासाठी आपल्या नातवाने आपलं आडनाव वापरावं अशी नेहरूंची इच्छा असावी असं कॅथरीन फ्रँक म्हणतात. पण इंदिरा गांधींनी मात्र मुलाचं नाव राजीवरत्न बिरजीस नेहरू गांधी असं लिहिलं.
'राजीव' या नावाचा अर्थ आहे कमळ. इंदिराजींच्या आईच्या 'कमला' या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं. 'जवाहर' म्हणजे अलंकार. त्याच्या संदर्भात 'रत्न' हा शब्द जोडला. बिरजी आणि गांधी ही नावं फिरोज गांधीच्या घराण्यातील होती. पण पुढे जाऊन राजीव गांधी हेच नाव राहिलं, तर दुसऱ्या मुलाचं नाव संजय ठेवलं. आणि गांधी हे आडनाव कायम झालं.
नंतर राजीव यांच्या पत्नी सोनिया आणि मुलं राहुल, प्रियंका यांनी 'गांधी' हे आडनाव लावलं. संजय गांधींच्या पत्नी मनेका आणि त्यांचा मुलगा वरुण यांनीही 'गांधी' हेच आडनाव लावलं. आता प्रियंका गांधींचं लग्न झालं असून त्या आपल्या पतीचं वड्रा है आडनाव लावतात. त्यांची मुले देखील हेच आडनाव लावतात. तर दुसऱ्या बाजूला वरुण गांधींच्या मुलीलाही गांधी हेच आडनाव दिलं गेलंय.
मग 'नेहरू' हे आडनाव कोण लावत नाही?
तर नेहरू घराण्यातील पुरुष वंशज नेहरू हे आडनाव आजही लावतात. मोतीलाल नेहरू यांचे बंधू नंदलाल नेहरूंचे पणतू आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण नेहरू असतील किंवा नंदलाल नेहरूंचे पुत्र ब्रिजलाल नेहरू आणि त्यांचे पुत्र सुनील नेहरू, निखिल नेहरू, ब्रजकुमार नेहरू असतील, सर्वचजण नेहरू आडनाव लावतात.
नेहरू हे इंदिराजींच्या माहेरचं आडनाव होतं तर गांधी हे त्यांच्या पतीचं आडनाव आहे. त्यामुळे इंदिराजींपासून सुरू होणार्या त्यांच्या वंशजांनी गांधी हे आडनाव वापरण्यास सुरुवात केली. नेहरूंना मुलगा असता तर त्यांच्या वारसांनी नेहरू आडनाव वापरलं असतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









