धीरेंद्र ब्रह्मचारी : एक योग गुरू इंदिरा गांधींच्या मंत्र्यांना बदलण्याइतके सामर्थ्यशाली कसे झाले? वाचा-

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
देशाच्या शक्तिशाली पंतप्रधानांचे योग गुरू असल्यानं धीरेंद्र ब्रह्मचारी यांचं चांगलंच राजकीय वजन होतं. त्यामुळंच त्यांना भेटण्यासाठी कायम केंद्रीय मंत्री, नोकरशहा आणि अतिमहत्त्वाच्या लोकांच्या रांगा लागलेल्या असायच्या.
निळ्या टोयोटा कारमधून ते प्रवास करायचे आणि स्वतःच ती कार चालवायचेदेखील. एवढंच नाही तर त्यांच्याकडं अनेक प्रायव्हेट जेटही होते. त्यात 4 सीटर सेसना, 19 सीटर डॉर्नियर आणि मॉल-5 अशा विमानांचा समावेश होता. ब्रह्मचारी स्वतः ही विमानं उडवायचे.
त्यांचा राजकीय प्रभाव एवढा जास्त होता की, ते नाराज झाले तर कोणत्याही अधिकाऱ्याची बदलीदेखील करवू शकत होते. एवढंच काय, मंत्र्यांचे विभाग बदलणंदेखील त्यांना सहज शक्य होतं.
भारताचे माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांनी त्यांचं आत्मचरित्र 'मॅटर्स ऑफ डिस्क्रेशन: अॅन ऑटोबॉयोग्राफी' मध्ये धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा किती दबदबा होता याचा उल्लेख केलाय.
"मी जेव्हा बांधकाम आणि गृहनिर्माण राज्यमंत्री होतो तेव्हा इंदिरा गांधींचे योग गुरू धीरेंद्र ब्रह्मचारी माझ्यावर गोल डाकखान्याजवळ असलेली एक सरकारी जमीन त्यांच्या आश्रमाच्या नाववर करण्यासाठी दबाव निर्माण करू लागले. पण एवढी मौल्यवान सरकारी जमीन त्यांना देण्याचा माझा विचार नव्हता. त्यामुळं मी फाईल पुढं सरकू दिली नाही. अखेर त्यांच्या संयमाचा अंत झाला आणि एका सायंकाळी त्यांनी मला फोन करून धमकी दिली. त्यांचं काम झालं नाही तर माझं डिमोशन करायला लावतील असं म्हणाले," असं गुजराल यांनी आत्मचरित्रात म्हटलंय.
एका आठवड्यानं जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळी, उमाशंकर दीक्षित यांना कॅबिनेट मंत्री बनवून इंदरकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात वरचं स्थान देण्यात आलं.

फोटो स्रोत, HAY HOUSE
"दुसऱ्या दिवशी जेव्हा मी इंदिरा गांधींना स्वामींनी मला धमकी दिल्याचा संपूर्ण किस्सा सांगितला तेव्हा त्या काहीही बोलल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यानंतर उमाशंकर दीक्षित यांनीही धीरेंद्र ब्रह्मचारी यांना जमीन देण्यास नकार दिला. त्याचा परिणाम म्हणजे, काही दिवसांनी त्यांचीही बदली झाली आणि आमच्या जागी त्यांच्या आज्ञेचं पालन करणारे मंत्रीदेखील त्यांना मिळाले होते," असं गुजराल यांनी लिहिलंय.
'योग'च्या पुढची भूमिका
याशिवाय 1963 मध्येही धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री के.एल.श्रीमाळी यांना योग केंद्राच्या अनुदानाच्या नूतनीकरणाची विनंती केली. पण श्रीमाली यांनी त्यांना मागच्या वर्षीच्या अनुदानाचं ऑडिट सादर करण्यास सांगितलं. त्यावर इंदिरा गांधींनी थेट पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसमोर हा मुद्दा मांडला होता.
नेहरू श्रीमालींशीही बोललेही होते, पण तरी त्यांनी ब्रह्मचारींची विनंती मान्य केली नाही. त्यानंतर श्रीमाली यांनी ऑगस्ट 1963 मध्ये कामराज योजनेंतर्गत राजीनामा दिला. पण प्रत्यक्षात त्यांना मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आलं होतं, असं काहींचं मत आहे.
याचप्रकारे वित्त आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष एन.के.सिंग यांनी तपासकर्त्यांना असंच काही सांगितलं होतं. एन.के.सिंग यांचे वडील टी.के. सिंग यांनी धीरेंद्र ब्रह्मचारींना जमीन मिळवून देण्यात मदत केली नाही म्हणून, त्यांनी माझ्या वडिलांना काढून टाकल्याची फुशारकी धीरेंद्र ब्रह्मचारी मारायचे, असं त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
टी.के.सिंग तेव्हा वित्तसचिव होते. त्यांचे पुत्र एन.के.सिंग हेदेखील उच्च पदावर पोहोचले होते.
ब्रह्मचारी यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1924 रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात झाला. सुरुवातीला त्यांचं नाव धीरेंद्र चौधरी होतं. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि लखनऊजवळच्या गोपाळखेडामध्ये महर्षी कार्तिकेय यांच्याकडून योगाचे धडे घेतले.
नेहरू-इंदिरा दोघांनाही योगाची शिकवण
धीरेंद्र 1958 मध्ये दिल्लीला पोहोचले. इंदिरा गांधींसोबत त्यांची पहिली भेट काश्मीरमधील शिकारगडमध्ये झाली होती, असं यशपाल कपूर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितलं होतं.
कॅथरीन फ्रँक यांनी इंदिरा गांधींचं चरित्र लिहिलंय.
"ब्रह्मचारींनी आधी नेहरूंना योग शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांसह अनेक नेते त्यांचे अनुयायी बनले. 1959 मध्ये त्यांनी विश्वायतन योग आश्रमाची स्थापना केली. त्याचं उद्घाटन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं," असं त्यांनी लिहिलंय.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
कॅथरीन यांच्या मते, या आश्रमाला शिक्षण मंत्रालयाकडून मोठं अनुदान मिळायचं. स्वामींना गृहनिर्माण मंत्रालयाकडून जंतर-मंतर रोडवर एक सरकारी बंगलाही देण्यात आला होता.
"इंदिरांनी 17 एप्रिल 1958 रोजी मला लिहिलं होतं की, त्यांनी आता योगाला गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली आहे. एक अत्यंत सुंदर योगी मला योग शिकवतात," असं इंदिरा गांधींची जवळची मैत्रीण असलेल्या डोरोथी नॉर्मन यांनी त्यांच्या 'इंदिरा गांधी: लेटर्स टू अॅन अमेरिकन फ्रेंड' या पुस्तकात लिहिलंय.
"वास्तविक पाहता त्यांचे (धीरेंद्र ब्रह्मचारीचे) रूप आणि आकर्षक पिळदार बांधा यांकडे सगळेच आकर्षित होतात. पण त्यांच्याशी बोलणं ही जणू एकप्रकारची शिक्षा असते. ते अत्यंत अंधश्रद्धाळू व्यक्ती आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.
कधीही वापरले नाहीत ऊबदार कपडे
ज्येष्ठ पत्रकार दिलीप बॉब यांनी 'इंडिया टुडे'मध्ये 30 नोव्हेंबर 1980 मध्ये प्रकाशित झालेल्या 'स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी, द कॉन्ट्रोव्हर्शियल गुरू' या लेखात स्वामी हे सहा फूट एक इंच उंचीचे आणि पिळदार शरीरयष्टीचे व्यक्ती असल्याचं वर्णन केलं होतं. त्यांनी शरीरावर केवळ एक पातळ वस्त्र गुंडाळलेलं असतं, असं त्यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या हातात कायम एक चामड्याची पांढरी बॅग असायची. ती काहीशी लेडिज बॅगसारखी वाटायची, असंही त्यांनी यात लिहिलं होतं.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
"ते अनंत अंतर्विरोध असलेले व्यक्ती आहेत. ते एक संत आहेत, ज्यांचे अनेक चेहरे आहेत. त्यांच्याकडे कोणतंही सरकारी पद नाही, पण त्यांच्याकडं अशी शक्ती आहे. ते असे स्वामी आहेत जे अत्यंत मान-सन्मान आणि ऐटीत राहतात. ते असे योग गुरू आहेत, ज्यांची पोहोच थेट पंतप्रधानांपर्यंत आहे. लोक त्यांना घाबरतात, पण त्यांचा आदरही करतात," असं बॉब यांनी लिहिलं होतं.
धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी कधीही ऊबदारकपडे परिधान केले नाहीत. अगदी श्रीनगरमधील थंडी असो किंवा मॉस्कोमध्ये शून्य अंशाखालील तापमान असो. धीरेंद्र कायम शरीरावर केवळ एक सुती कापड गुंडाळलेले असायचे.
"त्यावेळी अंदाजे 60 वर्षे वय असूनही त्यांचं वय हे 45 वर्षांपेक्षा एकही दिवस जास्त वाटत नव्हतं," असं दिलीप बॉब यांनी लिहिलंय.
भारताचे 'रासपुतिन'
इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले नटवर सिंह यांच्या मते, "स्वामींनी मला योग शिकवला होता. त्यांना त्यांचं काम माहिती होतं. त्यांनी चार-पाच महिन्यांत माझा दमा पूर्णपणे बरा केला होता."
सरकारी टीव्ही दूरदर्शनवर दर बुधवारी त्यांचा योगाचा एक कार्यक्रम असायचा. त्यामुळं त्यांना देशभरात लोकप्रियता मिळाली होती. 70 च्या दशकात ब्रह्मचारी संजय गांधींचे निकटवर्तीय आणि पर्यायानं गांधी कुटुंबातील सदस्यांपैकी एक बनले होते.
"ब्रह्मचारी हे एकमेव असे पुरुष होते, जे योग शिकवण्याच्या बहाण्यानं इंदिरा गांधींच्या खोली एकटे ये-जा करू शकत होते. इंदिरा गांधींबरोबरच्या वाढत्या जवळीकतेमुळं त्यांना भारताचे 'रासपुतिन' म्हटलं जाऊ लागलं होतं," असं कॅथरीन फ्रँक यांनी इंदिरा गांधींच्या आत्मचरित्रात लिहिलंय.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
पण इंदिरा गांधींचे मित्र असलेले, पीडी टंडन यांनी कॅथरीन फ्रँक यांचं वर्णन हे केवळ अफवा असल्याचं म्हणत स्पष्टपणे नकार दिला होता.
"जवाहरलाल नेहरू यांनीच ब्रह्मचारी यांना त्यांच्या मुलीला म्हणजे इंदिराजींना योग शिकवण्यास सांगितलं होतं. तसंच कधी-कधी ते स्वतःदेखील ब्रह्मचारीकडून योगाचे धडे घ्यायचे," असं त्यांचं म्हणणं होतं.
आणीबाणीदरम्यान वाढली ब्रह्मचारी आणि इंदिरा गांधींची जवळीक
आणीबाणीदरम्यान इतर लोकांबाबत जस-जसा इंदिरा गांधींचा अविश्वास वाढत गेला, तस-तसा त्यांच्यावर ब्रह्मचारी यांचा त्यांच्यावरील प्रभावही वाढत गेला.
"इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना नुकसान पोहोचवण्याची इच्छा असणाऱ्यांबाबत बोलून ब्रह्मचारी इंदिरा गांधींची भीती वाढवत राहिले. आधी ते शत्रू कशाप्रकारे त्यांच्या विरोधात यज्ञ किंवा तंत्र करून अलौकिक शक्तींद्वारे त्यांना त्रास देण्याचं षड्यंत्र रचत आहेत, याबाबत सांगायचे. नंतर तेच विविध यज्ञ आणि मंत्रांच्या सहाय्याने त्यावर तोड काढण्याची कल्पनाही त्यांना सांगायचे," असं पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींच्या चरित्रात लिहिलंय.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
पुपुल जयकर पुढं लिहितात की, "इंदिरा गांधी केवळ याबाबतीतच त्यांचे सल्ले ऐकायच्या असं नाही, तर अनेक राजकीय मुद्दयांवरही त्या त्यांचे सल्ले घेत होत्या. यात ब्रह्मचारींचा स्वार्थ असू शकतो याची कल्पनाही त्यांच्या मनात येत नसे."
कस्टम ड्युटी न भरता आयात केले विमान
ब्रह्मचारी यांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यावर असलेल्या प्रभावाचा वापर करून संपत्ती कशाप्रकारे जमवली होती, याचा उल्लेख शाह आयोगाच्या रिपोर्टमध्ये होता.
"इंदिरा गांधींवर जोपर्यंत पीएन हक्सर आणि काश्मीर गटाचा प्रभाव होता, तोपर्यंत ब्रह्मचारी यांचं फार काही चालत नव्हतं. पण जस-जसा संजय गांधींचा प्रभाव वाढू लागला तसा स्वामींचा इंदिरा गांधींवरील प्रभावदेखील वाढत गेला. 1976 मध्ये आणीबाणीदरम्यान त्यांनी सरकारकडं अमेरिकन विमान कंपनीकडून 4 सीटर एम-5 विमान खरेदी करण्याची परवानगी मागितली. त्यांना ती परवानगी मिळालीदेखील," असं कॅथरीन फ्रँक लिहितात.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
कॅथरीन यांच्या पुस्तकानुसार, "या विमानावर कोणतंही आयात शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी आकारण्यात आली नव्हती. एवढंच नाही तर त्यांना काश्मीरमध्ये विमानासाठी खासगी धावपट्टी तयार करण्याची परवानगीही देण्यात आली. त्यामुळं संरक्षणासंबंधीच्या अनेक नियमांचं उल्लंघन झालं. कारण हे ठिकाण पाकिस्तानी सीमेपासून अत्यंत जवळ होतं."
सर्व आरोप मागे घेतले
1977 मध्ये निवडणुकांत इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी काश्मीरमध्ये अपर्णा आश्रमचा दौरा केला. त्यावेळी त्यांना त्याठिकाणी एक भव्य इमारत आढळली. त्याठिकाणी संगमरवरी फरशी होती आणि अगदी राजेशाही पद्धतीनं तिथं सजावट होती. याठिकाणी चार बाथरूम आणि दहा टेलिफोन होते.
नंतर शाह कमिशननं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, "आश्रम परिसर हा ऐटीत जीवन जगण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या चैनीच्या सुविधा पुरवण्यासाठी तयार करण्यात आला होता. श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांच्या हॉलिडे होमसारखा हा आश्रम तयार केला होता, असं वाटत होतं."
पण 1980 मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीनंतर सत्ते पुनरागमन केलं त्यानंतर धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या विरोधातील सर्व आरोप मागं घेण्यात आले होते.

फोटो स्रोत, VAKILSS, FEFFER & SIMON LTD
"ते पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या निवासस्थानातील एक महत्त्वाचा भाग बनले होते. अनेकदा गांधी कुटुंबाबरोबर जेवणाच्या टेबलवर ते दिसू लागले होते. पण त्यांना जेवण्याची योग्य पद्धत माहिती नव्हती, शिवाय ते खूप जास्त जेवायचे. 60 वर्षे वय असूनही ते अत्यंत आकर्षक आणि पिळदार शरीरयष्टीचे होते," असं कॅथरीन फ्रँक लिहितात.
"जनता सरकार इंदिरा गांधी आणि संजय गांधींच्या मागे लागलं होतं त्यावेळी धीरेंद्र ब्रह्मचारी त्यांच्याबरोबर ठामपणे उभे होते, यासाठी संजय गांधी त्यांचं कौतुक करायचे. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या, त्यावेळी त्यांना याचा पुरस्कारही मिळाला. त्यांच्या विरोधातील सर्व आरोप मागे घेतले. जप्त केलेलं त्यांचं विमानही त्यांना परत देण्यात आलं होतं," असं भारतातील प्रसिद्ध अध्यात्मिक बाबांवरील 'गुरू' हे पुस्तक लिहिणाऱ्या भवदीप कंग यांनी लिहिलंय.
संजय गांधींच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर धीरेंद्र ब्रह्मचारी म्हणाले होते की, "संजय खूप चांगले पायलट होते, पण मी त्यांना हवेत जास्त कलाकारी दाखवू नका असं सांगितलं होतं."
नंतर संजय गांधींचा अंत्यसंस्कारही धीरेंद्र ब्रह्मचारींच्या देखरेखीखालीच झाला.
संजय गांधींशी जवळीक
सफदरजंग रोडवरील इंदिरा गांधींच्या बंगल्यात धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा प्रभाव वाढवण्यात संजय गांधींचं मोठं योगदान होतं.
रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' या पुस्तकातही याबाबत लिहिलंय. "त्या काळी असं म्हटलं जात होतं की, लांब केस असलेले धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी आधी इंदिरा गांधींचे योगशिक्षक म्हणून त्यांच्या घरात प्रवेश केला, पण नंतर त्यांच्या आवडत्या मुलाच्या मदतीनं, ते दीर्घकाळ तिथं टिकून राहिले."
1979 मध्ये निखिल चक्रवर्ती यांनी त्यांच्या 'मेनस्ट्रीम' या पत्रकात स्वामींना संजय गांधी गटातील महत्त्वाचे सदस्य म्हटलं होतं. 1977 मध्ये इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या तेव्हा एकेकाळी त्यांचे नीकटवर्तीय राहिलेले, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री डीपी मिश्र सर्वात आधी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले होते.

फोटो स्रोत, HAY HOUSE
"डीपी मिश्र यांनी मला सांगितलं होतं की, इंदिराजींशी खासगीत बोलणं अगदीच अशक्य बनलेलं होतं. कारण संजय आणि धीरेंद्र हे वारंवार खोलीमध्ये घुसायचे," असं इंदर मल्होत्रा यांनी इंदिरा गांधींच्या आत्मचरित्रात म्हटलंय.
धीरेंद्र आणि संजय दोघांनाही विमानं उडवण्याची आवड होती. स्वामींनी संजय गांधींच्या मारुतीच्या कारखान्यात तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांच्या मॉल- 5 विमानाचा वापर संजय उड्डाणाच्या अभ्यासासाठी करायचे. याच विमानानं ते अमेठी आणि रायबरेलीला निवडणूक प्रचारासाठी जायचे.
मेनका यांना घराबाहेर काढताना उपस्थित होते ब्रह्मचारी
मुलाच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींचं धीरेंद्र ब्रह्मचारींवरचं अवलंबित्व अधिक वाढलं. खासगी बाबींमध्येदेखील ते इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासू बनले होते.
"एका कौटुंबिक वादानंतर जेव्हा इंदिरा गांधींनी त्यांची सून मेनका गांधी यांना घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी साक्षीदार म्हणून तिथं थांबावं अशी त्यांची इच्छा होती. मेनका आणि त्यांच्या बहिणीबरोबरच्या भांडणादरम्यान जेव्हा गोष्टी इंदिरा गांधींच्या हाताबाहेर गेल्या, तेव्हा त्या जोरानं रडू लागल्या. त्यानंतर धीरेंद्र ब्रह्मचारी यांना त्यांना खोलीच्या बाहेर न्यावं लागलं होतं," असं खुशवंत सिंग यांनी 'ट्रुथ, लव्ह अँड लिटिल मेलिस' या आत्मचरित्रात लिहिलंय.
"ब्रह्मचारी यांच्याकडं एक मोठा बंगला होता. त्यात काळ्या गायींचा एक कळप होता. या गायींचं दूध औषधी गुण असलेलं असतं, असं त्यांचं मत होतं," असंही खुशवंत सिंगांनी लिहिलंय.

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS
पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या विश्वायतन योगाश्रममध्ये केंद्रीय मंत्री, राजदूत, नोकरशाह आणि व्यावसायिक त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावून असायचे.
राजीव गांधींनी यांनी केलं दूर
इंदिरा गांधींच्या जीवनाच्या अंतिम काळात धीरेंद्र ब्रह्मचारी यांचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात झाली होती. खरं म्हणजे, राजीव गांधींच्या उदयाबरोबरच ब्रह्मचारी यांचं पतनही सुरू झालं होतं.
"ब्रह्मचारी आणि राजीव गांधी एकमेकांपासून अगदी विपरित होते. ब्रह्मचारी जुगाड करणारे होते आणि पारदर्शक नव्हते. पाश्चात्य जीवनाशी त्यांचा दूरपर्यंत संबंध नव्हता. इंदिराजींच्या घरात स्वामींची उपस्थिती राजीव गांधींना कधीही आवडली नाही. त्यामुळं त्यांना जेव्हा ब्रह्मचारी यांना बाजुला करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी जराही उशीर केला नाही," असं कॅथरीन फ्रँक यांनी लिहिलंय.

फोटो स्रोत, DHIRENDRA MEMORIAL FOUNDATION
संजय गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक सहकारी ब्रह्मचारी यांच्या विरोधात उभे ठाकले होते.
"कमलनाथ यांनी तर सार्वजनिकरित्या म्हटलं होतं की, जर कोणी पंतप्रधानांबरोबर संलग्न असल्याचा प्रचार करत असेल, तर त्याचा काहीतरी स्वार्थ नक्कीच असेल," असं पुपुल जयकर यांनी लिहिलंय.
दूरदर्शनवरील योग शिकवण्याचा त्यांचा कार्यक्रम कारण न देता अचानक बंद करण्यात आला, त्यावरून त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचा आणखी एक इशारा मिळाला होता.
पंतप्रधान निवासस्थानी प्रवेश बंद
"दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांना प्रवेश दिला नाही. सगळीकडं ही बातमी पसरली की, राजीव गांधींनी ब्रह्मचारीला बाजुला सारण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रह्मचारीमुळं इंदिरा गांधींची बदनामी होता कामा नये, अशी राजीव यांची इच्छा होती," असं 'इंदिरा अ पॉलिटिकल अँड पर्सनल बायोग्राफी' मध्ये इंदर मल्होत्रा यांनी लिहिलंय.
स्वामींनी इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा अखेरचा प्रयत्न केला होता. इंदिरा गांधींचा अंत्यसंस्कार केला जात होता, तेव्हा त्यांचं पार्थिव ठेवलेल्या चबुतऱ्यावर ब्रह्मचारी पोहोचले होते.

फोटो स्रोत, Getty Images
पण राजीव गांधींच्या निर्देशांवरूनच धीरेंद्र ब्रह्मचारी यांना सर्वांच्या नकळत तिथून खाली उतरवण्यात आलं आणि अंत्यसंस्कार होईपर्यंत पुन्हा तिकडं फिरकूही दिलं नाही, असं म्हटलं जातं.
धीरेन्द्र ब्रह्मचारी यांच्यावर विदेशी शस्त्र बाळगणे आणि विक्री करणे या प्रकरणी एक खटलाही दाखल झाला होता.
त्यानंतर दिल्लीत सफदरजंग विमानतळाचा मोफत वापर करणाऱ्या ब्रह्मचारी यांच्याकडून त्यासाठीचं शुल्क मागितलं जाऊ लागलं.
त्यानंतर त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. त्यांच्या आश्रमातील कर्मचाऱ्यांनी संप केला आणि पगार वाढवण्यासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करायला सुरुवात केली.
विमान दुर्घटनेत मृत्यू
संजय गांधींप्रमाणेच धीरेंद्र ब्रह्मचारी यांचं निधनही जून महिन्यात विमान दुर्घटनेत झालं होतं. त्यावेळी ते शंभर एकराच्या एका भूभागाचं हवाई सर्वेक्षण करत होते. काही काळापूर्वीच त्यांनी आश्रमाच्या विस्तारासाठी या जमिनीची खरेदी केली होती.
त्यांच्या पायलटनं त्यांना खराब हवामानामुळं उड्डाण न करण्याचा सल्ला दिला होता. पण ब्रह्मचारी यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही. मानतलाईमध्ये लँडिंगच्या प्रयत्नातच त्यांचं विमान झाडांमध्ये कोसळलं.
त्यांच्या मृत्यूनंतर 'न्यूयॉर्क टाइम्स'नं त्यांच्यावर तीन पॅराग्राफचा एक लेख प्रकाशित केला होता. अध्यात्माच्या शक्तीच्या आधारे सत्ता उपभोगणारे धीरेंद्र ब्रह्मचारी हे काही पहिलेच व्यक्ती नव्हते.
मात्र, त्यांच्या आधी एखाद्या संन्याश्यानं एवढ्या दीर्घकाळासाठी आणि एवढ्या विश्वासासह राजकीय पटलावर स्वतःची छाप सोडली नव्हती, हेही तेवढंच खरंय.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









