You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्स, डाकू आणि भूतांच्या कहाण्या; विस्मरणात गेलेल्या B ग्रेड चित्रपटांची दुनिया
- Author, चेरिलॅन मोलन, मेरिल सबॅस्टियन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"या चित्रपटांमधील प्रत्येक दृश्य एकतर तुमच्या मनाला पटेल, हृदयाला भिडेल किंवा कंबरेखालचे संवाद तरी त्यामध्ये हमखास असायचे."
सध्या बॉलिवूडमधील B ग्रेड चित्रपटांबाबत एक डॉक्यु सिरीज बनवत असलेले दिलीप गुलाटी बोलत होते. यावेळी त्यांनी ही डॉक्यु सिरीज बनवण्यामागचं कारणही समजावून सांगितलं.
बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांच्या छायेखाली झाकोळले गेले आहेत. हे चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये, अतिशय कमी वेळेत बनवण्यात येत असत.
या चित्रपटांत बहुदा अनोळखी कलाकार काम करत. वेगवान पटकथा, चटकदार संवाद, भडक दृश्यं आणि सेक्स यांचा या चित्रपटांमध्ये भरणा असे.
नव्वदच्या दशकात हे चित्रपट पाहण्यास लोकांची प्रचंड गर्दी उसळायची. पण 2004 पर्यंत ही इंडस्ट्री ठप्प झाली.
अॅमेझॉन प्राईम या OTT चॅनलवर सिनेमा 'मरते दम तक' नावाची एक डॉक्युसिरीज प्रदर्शित झाली आहे.
यामध्ये बॉलिवूडचे B ग्रेड चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा, त्यातील महत्त्वाचे चेहरे, या चित्रपटांचा उगम आणि ऱ्हास या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे.
विनोद तलवार, जे नीलम, किशन शाह आणि दिलीप गुलाटी - ज्यांचे असे चित्रपट हिट ठरले, त्यांना याबाबत एक विशिष्ट बजेट, टाईमलाईन देऊन त्यांच्याच शैलीत ही डॉक्युसिरीज बनवण्यास सांगण्यात आलं आहे.
हे चारही दिग्दर्शक अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर आपल्या क्षेत्रात परत येत आहेत. जुन्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना घेऊन ते तात्काळ कामाला लागत लागतात. ते या गोष्टींमध्ये मग्न असताना शो त्या सगळ्या गोष्टी टीपतो. यादरम्यान प्रेक्षकांना नव्वदीच्या दशकात पुन्हा नेलं जातं, अशी या शोची थीम आहे.
या डॉक्यु सिरीजमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या काही जुन्या चित्रपटांचे काही भागही पाहावयास मिळतील.
त्यामध्ये मौत के पीछे मौत, कुंवारी चुडैल, मैं हूं कुंवारी दुल्हन अशा चपखल शीर्षके असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, त्यावेळी हे सगळे चित्रपट एकाच सेटवर चित्रित केले जायचे.
दिग्दर्शक हे स्वतःच कधी कधी कला दिग्दर्शक, वेशभूषा कलाकार म्हणून काम करायचे. आवश्यकता भासल्यास चित्रपटातील अभिनयही ते करत.
अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटांचं नाव देण्यात सर्जनशीलतेचा वापर केला जाई.
दिग्दर्शकाच्या सुपीक डोक्यात वेगळं काही सुचलं, की दृश्य तात्काळ बदललं जायचं.
कधी-कधी, काही दृश्यांमध्ये मोठमोठ्या बॉलिवूड ताऱ्यांनाही घेतलं जायचं. त्यांना दिवसाच्या शूटनुसार रोखीने दिले जायचे.
B ग्रेड चित्रपट क्षेत्रात कांती शाह नामक एक निर्माते होते. तेसुद्धा सिनेमा मरते दम तक या डॉक्युसिरीजचा भाग आहेत.
गोविंदा, मिथुन चक्रवर्ती आणि धर्मेंद्र यांना बी ग्रेड चित्रपटांमध्ये कसं वापरण्यात यायचं, हे त्यांनी सिरीजमध्ये सांगितलं आहे.
या चित्रपटांमध्ये निषिद्ध असं काहीही नव्हतं. कधी कधी यामध्ये एखादी कठोर महिला डाकू तिच्या गँगमध्ये मालिश करणाऱ्या पुरुषाची भरती करायची. तर कधी लिंग बदलणारं भूत घरातील मोलकरणीसोबत सेक्स करताना दिसायचं. या चित्रपटांमध्ये सगळं काही समान पातळीवर असे.
चित्रपट संशोधक असीम चंदावर यांनी याविषयी बोलताना 'खूनी ड्रॅकुला' नामक चित्रपटाची आठवण काढली.
ते म्हणतात, "या चित्रपटामध्ये एक पिशाच्च (व्हॅम्पायर) झोपडपट्टीतून फिरतो. दरम्यान, तो उघड्यावर आंघोळ करणार्या महिलेसोबत सेक्सही करतो.
"मुख्य प्रवाहातील चित्रपटातही कधी कधी भूत लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवताना दिसत असतील, पण ते एकांताच्या ठिकाणी किंवा किमान बाथटबमध्ये दिसायचे.
मात्र, B चित्रपटांच्या दिग्दर्शकांना त्यांच्या प्रेक्षकांचं वास्तव माहित होतं. त्यामुळेच कदाचित त्यांनी ते पडद्यावर दाखवताना मागे-पुढे पाहिलं नाही."
हे चित्रपट दाखवणारी सिनेमागृहे इतकी भरलेली असायची की लोकांना बसण्यासाठी जादा खुर्च्या जोडाव्या लागायच्या.
चित्रपटांचे प्रेक्षक हे प्रामुख्याने देशातील कामगार वर्गातील होते. हातगाडी, रिक्षा, टॅक्सी चालक, रस्त्यावरचे पथारी विक्रेते, ग्रामीण भागातून मोठ्या शहरात येऊन कमी वेतनावर राबणारे रोजंदारी मजूर यांचा त्यामध्ये समावेश होता.
आपल्या अंधकारमय जीवनातून काही वेळ सुटकेचा मार्ग त्यांना या चित्रपटांमधून मिळायचा.
काही तासांसाठी का होईना, उत्तेजक, रोमांचक दृश्यांमध्ये ते सिनेमागृहात स्वतःला विसरून जायचे.
'सिनेमा मरते दम तक' डॉक्यु सिरीजमध्ये अशा चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना कराव्या लागलेल्या संघर्षावरही लक्ष वेधण्यात आलं आहे.
या चित्रपटांशी नाव जोडलं गेलेल्या लोकांना मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये काम मिळणं कठीण व्हायचं. तसंच चित्रपटांचा सेन्सॉर बोर्डशी संघर्ष व्हायचा तो वेगळाच.
पुढे, चित्रपट वितरकांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार निर्मात्यांवर अधिक जोखमीच्या दृश्यांसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. परंतु सेन्सॉर बोर्ड त्याला मान्यता देणार नसल्यामुळे काही दिग्दर्शकांनी त्याची फिल्म वेगळी ठेवली. स्क्रिनिंगसाठी ही वेगळी फिल्मच प्रत्यक्षात चालवली. त्याला बिट्स इनसर्ट करणं असं संबोधलं जायचं.
अशाच एका चित्रपटात भावंडांच पात्र साकारणाऱ्या व्यक्तींमध्ये लैंगिक संबंधांचा भाग समाविष्ट करण्यात आला, तेव्हा तर याचा कळसच झाला.
या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली. यानंतर मात्र पोलिसांनी अशा चित्रपटांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. 2004 पर्यंत शेकडो लोकांची रोजीरोटी हिरावून B ग्रेड चित्रपट उद्योग संपुष्टात आला.
आज B ग्रेड चित्रपटांचा सुवर्णकाळ संपला तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत. चित्रपटांचे चाहते, विविध ग्रुप, मीम्स, स्पूफ आणि विनोद यांच्यामार्फत त्यांचं स्मरण करत असतात.
याशिवाय, B ग्रेड चित्रपटांनी पोस्टर आर्टला सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. भडक शीर्षकांचा वापर प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यासाठी चपखलपणे व्हायचा.
चित्रपट अभ्यास विभूषण सुब्बा यांच्या मते, B ग्रेड चित्रपट हे त्यांच्या चित्रविचित्र चातुर्य, विलक्षण गुणवत्ता आणि सौंदर्यशास्त्र या गोष्टीमुळे वेगळ्या धाटणीचे ठरतात. विशिष्ट कोपऱ्यातच त्यांची जागा असली तरी त्या छोट्याशा जागेतही त्यांची लोकप्रियता टिकून होती, ते एक वेगळ्या कल्चरचा भाग होते, हे नाकारून चालणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)