तांबे-थोरात विरुद्ध पटोले : महाराष्ट्र हे कॉंग्रेससाठी अजून एक 'राजस्थान' तर होणार नाही ना?

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी सोमवारी एक ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं: 'आज सकाळी सकाळी फोन आला, "ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे?" आता काय उत्तर देऊ कप्पाळ?' पाटील यांच्या या ट्वीटमागे जरा मिश्किलपणा असेलही, पण गांभीर्य अधिक आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसमधली अंतर्गत स्थिती चिंता करण्यासारखी आहे.
जेव्हापासून 2014 मध्ये राज्यातली आणि केंद्रातलीही सत्ता हातून गेली आहे, कॉंग्रेसमध्ये सर्वदूर सुंदोपसुंदी माजली आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेसची मुळं रुजली असल्यानं आणि संस्थानांसारखे स्वत:चे जिल्हे वा तालुके काही जुन्या नेत्यांनी राखल्यामुळे लोकसभेला जशी वाताहत झाली तशी विधानसभेला झाली नाही.
2014 आणि 2019 मध्ये कॉंग्रेसनं टिकून राहण्याएवढ्या जागा मिळवल्या आणि 'महाविकास आघाडी'तून काही काळ सत्तेत पुनरागमनही केलं. पण तरीही महाराष्ट्र कॉंग्रेसची अवस्था अनेक गटांमध्ये विभागलेलीच राहिली.
पण आता सुरु झालेल्या सत्यजित तांबे-बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले यांच्या वादानं राज्यात कॉंग्रेस कशी दुभंगलेली आहे हे स्पष्टच समोर आलं आहे.

एका बाजूला राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला मिळालेला प्रतिसाद आणि विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या आलेल्या दोन जागा अशा जमेच्या बाजू असतांनाही, प्रदेशाध्यक्षांबद्दलच्या नाराजीच्या या प्रकरणानं कॉंग्रेस महाराष्ट्रात अधिक खोलात चालली आहे का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
"विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे," असं गेल्या अनेक दिवसांच्या वादादरम्यानही शांत असलेल्या बाळासाहेब थोरातांनी आता म्हटलं आहे.
ते जरी 'यावर बाहेर बोलण्याच्या मताचा' मी नाही असं ते पुढे म्हणाले असले तरीही हे पेल्यातलं वादळ ठरण्यची शक्यता नाही.
नजीकच्या इतिहासातली उदाहरणं
जेव्हा विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असतांनाच राधाकृष्ण विखे पाटील 2019 च्या निवडणुकीअगोदर भाजपामध्ये गेले होते कॉंग्रेसवर नामुष्की ओढवली होती. पण तरीही त्यानंतर कॉंग्रेसनं विधानसभा निवडणुकीत आपल्या बहुतांश जागा वाचवल्या.

फोटो स्रोत, Balasaheb thorat/twitter
बाळासाहेब थोरातांकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यानंतर कॉंग्रेस सत्तेत परतल्यावर सगळं स्थिरस्थावर होण्याची अपेक्षा होती.
पण तेव्हाही गटबाजीच्या चर्चा पक्षात होत्याच. अंतर्गत गट किंवा स्पर्धा हे काही कॉंग्रेसला नवीन नाही. अलिकडच्या काळात मराठवाड्यात देशमुख आणि चव्हाण, अहमदनगरमध्ये थोरात आणि विखे, मुंबईत कामत, निरुपम, कृपाशंकर, देवरा असे गट ही काही ठळक उदाहरणं.
कधी हे मतभेद चव्हाट्यावर येऊन पक्षाला त्याचा फटका बसणं हे मागंही झालं आहे. सध्याच्या परिस्थितीत हे पक्षाला परवडणारं आहे का?
नाना पाटोलेंनी जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही पक्षातल्या आणि आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं असं म्हटलं गेलं. पुढे अध्यक्ष कोणी होऊच शकलं नाही आणि सत्तांतराच्या काळात याचा फटका आघाडीला बसला.
जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या अगोदर विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या तेव्हा कॉंग्रेसचा मुंबईतला पहिल्या पसंतीचा उमेदवार पडला.
कॉंग्रेसचीच मतं फुटली, फिरली हे उघड गुपित होतं. त्याचा एक अंतर्गत अहवालही केंद्रीय नेतृत्वाला दिला गेला. पण त्यावर काहीही कारवाई अद्याप झाली नाही. शिवसेनेतल्या फुटीमुळे सगळं लक्ष तिकडे वळालं.
जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासमताचा ठराव आला तेव्हा वरिष्ठ नेत्यांसह काही आमदारांचं मतदानाला सभागृहात वेळेवर न पोहोचणं अनेकांच्या नजरेत आलं होतं. त्यानंतरही त्यामागच्या राजकारणाची चर्चा रंगली होती.

फोटो स्रोत, facebook
आजही अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांची नावं ते भाजपाच्या वाटेवर आहेत असं सांगितलं जातं. राहुल यांच्या यात्रेदरम्यान हे भाजपाप्रवेश होतील असे कयास लावले जात होते. ते प्रत्यक्षात झालं नाही तरीही त्यात तथ्य नाही असंही कोणी म्हटलं नाही.
कॉंग्रेसमधली ही अंतर्गत धुसफूस सत्यजित तांबे प्रकरणात बाहेर आली. वरिष्ठ नेतेच एकमेकांना कसं शंकेनं बघतात हेही समोर आलं. सत्यजित तांबेंनी उमेदवारीवरुन केलेले आरोप, त्याला बाळासाहेब थोरातांनी एका प्रकारे दिलेला दुजोरा आणि नाना पटोलेंच्या गटानं दिलेली प्रत्युत्तरं यामध्ये कॉंग्रेसचं आतलं चित्र बाहेर आलं.
कॉंग्रेसमध्ये पिढ्यांपासून असणाऱ्या एका घराण्याबद्दल असं होणं थांबवता आलं असतं का? हे प्रकरण आता कुठपर्यंत जाईल?
'कॉंग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नाही हे सिद्ध झालं'
अशा प्रकारचे वादंग कॉंग्रेसला नवीन जरी नसले तरी ज्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांची एकमेकांबद्दलची मतं व्यक्त करण्यात आली ते पक्षाला या स्थितीत अनावश्यक अडचणीच्या स्थितीत घेऊन जाण्याची शक्यता आहे.
"यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रत्येक पक्षांतर्गत अशा गोष्टी असतात. खूसपूस चाललेलीच असते. ती तशी भाजपामध्येही आहे. पण त्यासोबतच शिस्तही असते. ती कॉंग्रेसमध्ये मोडली गेली आहे. कॉंग्रेसमध्ये सगळं चव्हाट्यावर येतं आहे. त्याचा परिणाम पक्षावर नक्कीच निगेटिव्ह होईल," असं राजकीय पत्रकार आणि कॉंग्रेसचं राजकारण जवळून बघणारे सुधीर सूर्यवंशी म्हणतात.

फोटो स्रोत, Nana Patole
पण सुधीर सूर्यवंशी जो दुसरा मुद्दा मांडतात तो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रीय पातळीवर कॉंग्रेससाठी जास्त चिंतादायक आहे. तो मुद्दा राहुल गांधी यांच्याबद्दल आहे.
"बाहेर असं दिसतं आहे 'भारत जोडी यात्रे'नंतर की राहुल गांधी कष्ट करतात, पण हे इथले नेते काय करतात, तर एकमेकांशी भांडत बसतात. राहुल यांची प्रतिमा सुधारून जर पक्षसंघटनेत जर असं होत असेल तर त्याचा उपयोग काय? त्यासाठी राहुल यांना हस्तक्षेप करावा लागेल. या भांडणांनी कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची होईल. पब्लिक परसेप्शनही खराब होऊ शकतं," सूर्यवंशी म्हणतात.
"या सगळ्या प्रकरणानं एक सिद्ध झालं की कॉंग्रेसमध्ये काही आलबेल नाही हे. चव्हाण, पटोले, थोरात अशा कुरघोड्या चालूच होत्या, पण हे जास्त झालं. यानं गांधीच्या यात्रेमुळे जवळ आलेले तरुण लांब जातील. अजून एक म्हणजे स्थानिक पातळीवर हे सगळं सांभाळून नेण्याची प्रगल्भता नेतृत्वामध्ये दिसत नाही," सूर्यवंशी आपलं निरिक्षण नोंदवतात.
पण प्रदेशाध्यक्ष असलेल्या पटोलेंकडेच अधिक जबाबदारी जाते का? यावर सूर्यवंशी यांच्या मते दोन्ही बाजूंकडनं काही गोष्टी कमी पडल्या.
"सत्यजित तांबेंनीही त्यांच्या अन्याय झाला असं वाटत असलं तरीही तो चव्हाट्यावर आणणं किती योग्य आहे? त्याचा परिणाम त्यांच्या राजकारणावरही होईलच. बाळासाहेब थोरातांनीही सुरुवातीलाच काही न बोलल्यामुळे प्रकरण अधिक अवघड झालं. त्याच वेळेस बोललं असतं तर चांगलं झालं असतं," सूर्यवंशी म्हणतात.
'सुंभ जळाला तरी पिळ जात नाही'
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते गेल्या काही काळामध्ये जे एकामागोमाग एक घटना पक्षांतर्गत घडल्या त्यातून कॉंग्रेसमध्ये गडबड आहे ते दिसतच होतं. आता ते वाद जाहिरपणे समोर आले.

फोटो स्रोत, BALASAHEB THORAT TWITTER
"नाना पटोलेंच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल जरा राग आहेच. विधानसभा अध्यक्षपदाचा ज्या प्रकारे राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडीत पण नाराजी होती. आताच्या निवडणुकीवेळेस नागपूरची जागा जाहीर करण्यात त्यांनी खूप वेळ लावला. शेवटी तिथल्या जबाबदारी असलेल्या नेत्यांनी परस्पर नाव जाहीर करुन टाकलं. अमरावतीचा उमेदवार जाहीर करायलाही वेळ लागला. दुसरीकडे पटोले आणि त्यांच्या गटाला वाटतं की जुने सगळे नेते बोटचेपी भूमिका घेतात. त्यालाही काही आधार आहे. त्यामुळे असे प्रश्न अंतर्गत आहेतच," देशपांडे म्हणतात.
पण देशपांडे यांना वाटतं की महाराष्ट्र कॉंग्रेसच्या या गोंधळात केंद्रीय नेतृत्वसुद्धा जबाबदार आहे आणि त्यांना आता फार उशीर करुन चालणार नाही.
"सत्यजित तांबेंच्या प्रकरणात केंद्र पण जबाबदार आहे. त्यांनी योग्य वेळेस जाहीर भूमिका घ्यायला हवी होती. इतकं होऊनही कॉंग्रेसचा सुंभ जळाला पण पिळ गेला नाही असंच म्हणावं लागेल. आता इतक्या लगेच काही प्रश्न सुटणार नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आत सगळं सोडवावं लागेल," देशपांडे म्हणतात.
आता सगळ्यांचच लक्ष दिल्लीकडे असेल की राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे काय निर्णय घेतात आणि कधी घेतात. नाहीतर महाराष्ट्र ही कॉंग्रेससाठी राजस्थानसारखी अजून एक जखम होऊन बसेल.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









