You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जे जे रुग्णालयात सापडलेल्या या भुयारात नेमकं काय दडलंय?
मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये एक ब्रिटीशकालीन बोगदा सापडलाय. पाणीगळतीची तक्रार सोडवण्यासाठी काम सुरू असताना हा बोगदा सापडलाय.
ज्या इमारतीत हा बोगदा सापडलाय, तिथं पूर्वी मॅटर्निटी वॉर्ड होता. वेळप्रसंगी सुरक्षित ठिकाणी जाता यावं यासाठी अशाप्रकारे भुयाराची निर्मिती केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
जे.जे. हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे सांगतात की, "दोन इमारती आहे. त्यामध्ये एका इमारतीत डिलिव्हरी वॉर्ड होता. तिथं प्रसूती व्हायची आणि भुयाराचं जे दुसरं टोक आम्हाला मिळालंय, ते महिलांचा आणि लहान मुलांचा वॉर्ड होता.
"या दोघांना कनेक्ट करून त्याखाली हे भुयार आहे. पुरातत्व विभागानं आम्हाला दिशा दाखवली, तर इथं काय होत होतं ते आम्हालाही कळेल. आम्हाला ही नवीनच गोष्ट लक्षात आली आहे."
दरम्यान, दुसऱ्या इमारतीला जोडणारा भुयारी मार्ग अद्याप सापडलेला नाहीये.
निवासी वैद्यकीय अधिकारी अरुण राठोड सांगतात की, "बाहेरच्या बाजूला आम्हाला व्हेंटिलेर्टर्ससारखे दोन स्ट्रक्चर दिसले. त्यांना जवळून बघितल्यास लक्षात आलं की, ते एका लाडकी फळीनं बंद करण्यात आले आणि त्याच्या पाठीमागे एक लोखंडी जाळी बसवण्यात आलेली आहे.
"लाकडी फळी काढल्यावर आम्ही टॉर्चच्या साहाय्याने आत पाहिलं तर लक्षात आलं की, त्या व्हेंटिलेटर्सच्या बाजूलाच भिंत आहे आणि थोडं आतमध्ये गेल्यावर त्या भिंतीला एक छिद्र आहे."
जे.जे. हॉस्पिटलनं जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती कळवली आहे.
पुरातत्व विभागाकडून यावर अधिक संशोधन केलं जाईल, अशी अपेक्षा हॉस्पिटल प्रशासनाला आहे.
जेजे हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं आणि मुंबईतलं प्रतिष्ठित रुग्णालय आहे. या रुग्णालयाला 175 वर्षं झाली आहेत. महाराष्ट्र सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या या रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणाच्या सोयीसुद्धा उपलब्ध आहेत. ब्रिटिशांनी 1826 मध्ये हे रुग्णालय सुरू केलं होतं.
तिथे सतत रुग्णांची गर्दी असते. आता या भुयारामुळे आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं रंजक असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)