मोरबी दुर्घटना : ओरेवा कंपनीच्या मॅनेजर्सवर कारवाई, 9 जण अटकेत, सुप्रीम कोर्टानं घेतली दखल

मोरबी पूल

फोटो स्रोत, BIPIN TANKARIA

बीबीसी हिंदी
  • गुजरातच्या मोरबी शहरात माच्छू नदीवर बनलेला झुलता पूल कोसळला.
  • या दुर्घटनेत आतापर्यंत 141लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • दुरुस्तीसाठी सहा महिने बंद असलेला हा पूल 28 ऑक्टोबरलाच पुन्हा खुला झाला होता.
  • सणाच्या सुट्या आणि रविवार यांमुळे पुलावर प्रचंड गर्दी होती.
  • एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.
  • या प्रकरणी आता सुप्रीम कोर्ट 14 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे.
बीबीसी हिंदी

मोरबी इथल्या मच्छू नदीवरील दुर्घटनेप्रकरणी गुजरात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. राजकोटचे पोलीस महासंचालक अशोक यादव यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.

भारतीय दंड विधानच्या कलम 304, 308 आणि 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांची नावं खालीलप्रमाणे आहेत. 1. दीपकभाई नवीन चंद्र पारेख (वय 44)- ओरेवा कंपनीचे मॅनेजर

2. दिनेश भाई मनसुख भाई दवे- ओरेवा कंपनीचे मॅनेजर

3. मनसुख भाई वालजी टोपिया (वय 59)- तिकीट क्लार्क

4. मदेभाई लाखा भाई सोलंकी- तिकीट क्लार्क

5. प्रकाश भाई लालजी भाई परमार- ब्रिज रिपेअरिंग कॉन्ट्रॅक्टर

6. देवांग भाई प्रकाश भाई परमार (वय 31) ब्रिज रिपेअरिंग कॉन्ट्रॅक्टर

7. अल्पेश गोहिल- सेक्युरिटी गार्ड

8. दिलीप गोहिल- सेक्युरिटी गार्ड

9. मुकेश भाई चौहान- सेक्युरिटी गार्ड

शिवाय या प्रकरणी आता सुप्रीम कोर्ट 14 नोव्हेंबरला सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टातले वकील विशाल तिवारी यांनी या संदर्भात एक जनहित याचिका दाखल केली आहे. जी सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतली आहे. यामध्ये तिवारी यांनी या घटनेच्या न्यायालयीन चैकशीची मागणी केली आहे. तसंच विरोधी पक्षांनीही या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

मोरबीची सोमवारची सकाळ

गुजरातच्या मोरबी नदीवर रोज जशी सकाळ असते, तसं वातावरण सोमवारी (31 ऑक्टोबर) नव्हतं. सोमवारी सकाळी इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख होतं.

मोरबी नदी

फोटो स्रोत, AFP

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळून आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी म्हटलं, "या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली. 6.45 पर्यंत बचावकार्याला सुरूवात झाली होती."

त्यांनी पुढे सांगितलं, "मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने मोरबी येथे पोहचले आणि त्यांनी इतर व्यवस्था पाहिली. काही तासातच विविध दलाच्या 200 हून अधिक लोकांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन केले. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली."

मोरबी मदत कार्यं

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/Shutterstock

बीबीसी प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा आणि तेजस वैद्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि बचावकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

एनडीआरएफचे डीआयजी (ऑपरेशन) मोहसीन शाहिदी यांनी बचाव कार्याची माहिती देताना सांगितलं, "आतापर्यंत 132 मृतदेह बाहेर काढले आहेत. रविवारी रात्री स्थानिकांनी आणि प्रशासनाने 170 हून अधिक लोकांना वाचवलं आहे."

पंतप्रधान मोरबी अपघाताबद्दल बोलताना झाले भावुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरबी अपघाताबद्दल बोलताना भावुक झाले. बनासकांठा जिल्ह्यातील थराड इथे आयोजित विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते, "मोरबी अपघाताने माझे मन अतिशय व्यथित झाले. इतक्या लोकांनी जीव गमावला. हा कार्यक्रम रद्द करावा असंही वाटलं पण तुम्ही जे प्रेम दिलं आहे ते विसरुन चालणार नाही. हे प्रकल्प या भागासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मन घट्ट करून या कार्यक्रमासाठी आलो," असं पंतप्रधानांनी सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी मोरबीला भेट देणार आहेत.

गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली. मोरबी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. राज्य सरकारतर्फे पीडितांची सुटका तसंच उपचार आणि जखमींना मदत पुरवण्याचं काम सुरू आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्यात येत आहे. या घटनेनं प्रचंड दु:ख झालं आहे असं पंतप्रधान म्हणाले.

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं भूमीपूजन होत आहे. मोरबी दुर्घटनेमुळे त्यांनी अहमदाबाद शहरात आयोजित रोड शो रद्द केला.

'पाण्यात पडलो आणि अक्षरक्ष: मृत्यू अनुभवला'

या अपघातातून बचावलेल्या लोकांनी आपले अनुभव सांगितलेत.

'मी आणि माझे दोन पुतणे संध्याकाळी पुलावर फिरायला गेलो. आम्ही पुलाच्या मध्यभागी पोहोचलो, तेव्हा तिथे खूप गर्दी होती. त्यावेळी पूल हलायला लागला आणि नंतर मध्यातूनच तुटला. आम्ही सगळे पाण्यात पडलो. तेव्हा आम्ही अक्षरक्ष: मृत्यू अनुभवला. नशिबाने आम्ही वाचलो,' असं जिगर सोळंकी यांनी सांगितलं.

जिगर सोळंकी, मोरबी, मच्छू नदी
फोटो कॅप्शन, जिगर सोळंकी

मोरबी इथल्या मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत जिगर सोळंकी वाचले पण त्यांच्या पुतण्याची स्थिती गंभीर आहे.

"मी थोडा पोहलो, माझ्या हाताला एक दोरी लागली. तिच्या साह्याने जिवंत राहण्याची धडपड करू लागलो. जलतरणपटू आले आणि त्यांनी मला पाण्याबाहेर काढलं."

बचावकार्यात येत आहेत 'या' अडचणी

एनडीआरएफचे अधिकारी प्रसन्न कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, बचावकार्य करताना पथकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

ते म्हणाले, "इथे पाणी साचलं आहे आणि हे पाणी सांडपाणी आहे. त्यामुळे या पाण्यात शोध घेणं खूप कठीण आहे. आमचे कर्मचारी रात्री लाईट घेऊन पाण्यात उतरले पण तरीही काही दिसू शकलं नाही. आमच्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. आता सकाळच्या वेळेत परिस्थिती बरी असेल अशी अपेक्षा आहे."

एनडीआरएफचे अधिकारी प्रसन्न कुमार
फोटो कॅप्शन, एनडीआरएफचे अधिकारी प्रसन्न कुमार

ते पुढे सांगतात, "आमच्या पाच टीम इथे तैनात आहेत. यात 125 बचाव कर्मचारी आहेत. तसंच जहाजांमधून खोल पाण्यात उतरण्यासाठी आमच्याकडे गोताखोर सुद्धा उपलब्ध आहेत. आवश्यक उपकरणं आहेत."

राजकोटचे जिल्हाध्यक्ष अरुण महेश बाबू यांनी सांगितलं की, "घटनास्थळी एसडीआरएफच्या दोन टीम्स, एनडीआरएफची एक टीम आणि बडोद्याहून आलेली एक टीम आहे. सोबत लष्कर, हवाई दल आणि आपत्कालीन विभाग आणि स्थानिक पथकं तैनात आहेत."

रात्रभर गावकरी बचावकार्यात गुंतले होते

या दुर्घटनेनंतर गावाजवळ एकदम कर्फ्यूसारखं वातावरण आहे. मागे लाउडस्पीकरवरून घोषणा होत आहे की, आता कोणतीही नाव मध्येच जाणार नाही.

मोरबी पूल
फोटो कॅप्शन, प्रत्यक्षदर्शी

जवळपास 200 हून अधिक स्वयंसेवर पूर्ण वेळ घटनास्थळी उपस्थित होते.

गावकरी अजूनही घाटावर आहेत आणि बचावकार्यात शक्य तितकी मदत करत आहेत.

काल (30 ऑक्टोबर) संध्याकाळपासून अनेक स्थानिक लोक काही न खाता-पिता बचावकार्यात गुंतले आहेत.

पूल

फोटो स्रोत, ANI

या दुर्घटनेत अनेक लहान मुलांनीही प्राण गमावले आहेत. बचावकार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की, त्यांनी जवळपास 20-25 मुलांचे मृतदेह नदीतून काढले आहेत.

विरल भाई दोषी नावाच्या एका गावकऱ्याने सांगितलं की, त्यांनी जे पाहिलं तसं दृश्य आयुष्यात पाहिलं नाहीये. ते रात्रभर नदीतून काढलेले मृतदेह हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदत करत आहेत.

मोरबी पूल

बँकेत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या आणि आरएसएसशी संबंधित असलेल्या दीपेश भानुशाली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आतापर्यंत जवळपास 135 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक लोक बेपत्ता आहेत. काही लोकांच्या कुटुंबियांचे मृतदेह मिळत नाहीयेत. त्यामुळे अजून काही मृतदेह नदीत असल्याचा अंदाज आहे."

या दुर्घटनेत कोणी आपलं पोटचं मूल, कोणी आपला जोडीदार तर कोणी खूप जवळची व्यक्ती कायमची गमावली आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी एका पीडित तरुणाशी संवाद साधला. ही व्यक्ती रविवारी संध्याकाळी आपल्या बहिणीसोबत या पुलावर आली होती.

या पुलावर ते आपल्या बहिणीचा फोटो काढत होते. त्यांना याची किंचितही कल्पना नव्हती की हा तिचा शेवटचा फोटो असणार आहे.

मोरबी पूल
फोटो कॅप्शन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव

फोटो काढत असतानाच अचानक पूल कोसळला. या दुर्घटनेत भाऊ वाचला पण बहिणीचा हात सुटला. हा तरुण काल संध्याकाळपासून सगळीकडे आपल्या बहिणीला शोधत आहे. पण अजूनही ती सापडली नाही.

'मी दोरीने 15 मृतदेह बाहेर काढले'

दुर्घटनेनंतर जवळपास राहत असलेले अनेक लोक मदतीसाठी सरसावले. रमेशभाई जिलरिया तिथेच जवळ होते. पूल कोसळला तिथे जवळच ते राहतात.

बीबीसीचे पत्रकार राकेश अंबालिया यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "मी इथे जवळच राहतो. संध्याकाळी सहा वाजता दुर्घटना घडली. मी लगेच दोरी घेऊन इथे पोहचलो. दोरीच्या सहाय्याने मी जवळपास 15 मृतदेह बाहेर काढले."

मोरबी पूल
फोटो कॅप्शन, प्रत्यक्षदर्शींचा अनुभव

या घटनेनंतरची स्थिती सांगताना ते म्हणाले, "मी आलो तेव्हा 50 ते 60 लोक तुटलेल्या पुलावर लटकत होते. आम्ही या लोकांना वर काढलं. त्यानंतर आम्हाला जसे मृतदेह मिळाले आम्ही ते बाहेर काढले. मृतदेहांमध्ये तीन लहान मुलं होती."

या दुर्घटनेचे साक्षीदार सुभाषभाई सांगतात, "काम संपवून मी आणि माझा मित्र पुलाजवळ बसलो होतो. पूल कोसळल्याचा मोठ्ठा आवाज आला. आम्ही इथे पोहचलो आणि मदत करण्यास सुरुवात केली."

"काही लोक पोहत बाहेर येत होते. तर काही जण बुडत हते. आम्ही सर्वातआधी लहान मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली. पाईपच्या मदतीने आम्ही मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. 8 ते 9 जणांना आम्ही बाहेर काढलं आणि दोन मृतदेह बाहेर काढले."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)