अवयवदानः हिंदू-मुस्लीम कुटुंबांमध्ये असं तयार झालं रक्ताचं नातं

- Author, सेराज अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या दीड वर्षातली ही गोष्ट... अफसर अली नामक गृहस्थ आजारपणामुळे मेरठच्या न्यूटिमा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आले होते.
संबंध वर्षभर ते आजारपणाने हैराण झाले होते. चेकअपनंतर समजलं की त्यांची एक किडनी (मूत्रपिंड) निकामी झालीय आणि त्यांच्याकडे किडनी ट्रान्सप्लांटशिवाय कोणताच उपाय शिल्लक नाहीये.
यावर त्यांच्या भावाने, अकबर अली यांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या किडनी मॅच झाल्या नाहीत.
अशीच परिस्थिती मोदीनगरच्या अंकुर नेहराची होती. अंकुरची किडनीसुद्धा निकामी झाली होती. त्याच्या आईने, अनिता यांनी अंकुरला किडनी द्यायचं ठरवलं पण त्यांची किडनी मॅच झाली नाही. पण नशिबाने दोन्ही कुटुंबांना एकत्र आणलं.
डॉक्टरांनी सांगितलं की, अनिता यांची किडनी अफसर यांच्या किडनीशी मॅच होते, ते अंकुरला त्यांची किडनी दान करू शकतात.
अफसर आणि अंकुरचे कुटुंबीय सांगतात की, शेजाऱ्यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं.
बीबीसीशी बोलताना रुग्ण अफसर अली सांगतात, "गावातील लोकांना आश्चर्य वाटलं. तुम्ही मुस्लीम आहात आणि ते हिंदू आहेत असं ते म्हणत होते."
अनेकांनी त्यांना किडनी दान न करण्याचा सल्लाही दिल्याचं ते सांगतात. पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

ते सांगतात, "हिंदूंनी मुस्लिमांना आणि मुस्लिमांनी हिंदूंना मदत करावी आणि हीच खरी मानवता आहे."
लोकांची पर्वा केली नाही
दरम्यान, मोदीनगरमध्ये राहणाऱ्या नेहरांनाही असेच प्रश्न विचारले जात होते. अंकुर सांगतो, "हिंदू आणि मुस्लीम वेगवेगळे आहेत हे संपूर्ण देशभरात सुरुय."
तो सांगतो की, दोन्ही कुटुंबीयांनी असं पाऊल उचलण्याचं धाडसच कसं केलं? म्हणून लोकांच्या आश्चर्याला पारावर उरला नव्हता.
अंकुर सांगतो, "आपल्या शरीराचा तर कोणता धर्म नाहीये, त्यांना हिंदू आणि मुस्लीम याची माहिती पण नसेल. या गोष्टी तर आपण तयार केल्यात."

अंकुरची आई अनिता देखील सांगतात की, धर्म वेगळा आहे म्हणून मला कसलीही चिंता वाटली नाही. ते मुस्लीम आहेत आणि आम्ही हिंदू आहोत याचा एक टक्काही फरक मला पडला नाही.
त्या पुढे म्हणतात, हिंदू-मुस्लीम असा भेदभाव फक्त राजकीय हेतूने प्रेरित झालेला असतो. ज्यांच्याकडे खूप सारे पैसे असतात तेच लोक हिंदू मुस्लीम असलं राजकारण करत असतात.
सरकारी अधिकारीसुद्धा आश्चर्यचकित झाले. अफसर अली सांगतात, त्यांनी आम्हाला विचारलं की, कोणत्या दलालामार्फत तर तुमची भेट झाली नाही ना?
यावर अफसर अली त्या अधिकाऱ्यांना म्हणाले की, "कोणत्या दलालाकरवी नाही तर आमची भेट हॉस्पिटलच्या माध्यमातून झाली."
नऊ तासांच्या या ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले न्यूटिमा हॉस्पिटलचे डॉ. संजीव कुमार गर्ग सांगतात की, रुग्ण कोणत्या धर्माचा आहे याने मला काही फरक पडत नाही. आम्हाला माहीत होतं की, ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. पण ते ऑपरेशनसाठी नक्की ऐकतील हे आम्हाला माहीत होतं. कारण या रुग्णांना बराच त्रास सुरू होता, आठवड्यातून दोन दोन वेळा डायलिसिस करावं लागायचं."
डॉ. गर्ग सांगतात की, दोन्ही कुटुंबांतील आहाराच्या सवयींमधील फरकामुळे शंका होत्या. म्हणजे मांसाहार आणि शाकाहार केल्यामुळे किडनीवर काही परिणाम होईल का अशी भीती त्यांना होती. यावर डॉक्टर गर्ग यांनी कुटुंबीयांना सांगितलं की, किडनी मॅच होणं खूप महत्त्वाचं असतं आणि या प्रकरणात तसं घडलंय.
ऑपरेशनच्या आधी..
या किडनीने त्याला नवजीवन दिल्याचं अंकुर सांगतो. ऑपरेशनपूर्वी त्याला बऱ्याच अडचणी यायच्या. तो सांगतो, "माझ्या फुफ्फुसात पाणी भरलं होतं, त्यामुळे मला झोप लागायची नाही."
अफसर अलींना सुद्धा अशाच अडचणींना सामोरं जावं लागायचं. त्यांचा मुलगा मोहम्मद अनस सांगतो की, " त्यांना सतत ताप यायचा, ते अशक्त झाले होते. त्यांना सारखंच दवाखान्यात न्यावं लागायचं. एकदा तर ते काही दिवसांसाठी आयसीयूमध्ये होते."

आता ऑपरेशन होऊन जवळपास एक महिना उलटलाय. अफसर अली आणि अंकुरच्या तब्येतीत सुधारणा जाणवू लागलीय. आजारी असतानासुद्धा अंकुरने कायद्याची पदवी मिळवलीय. आता त्याला पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय.
अंकुर सांगतो की, "मी आजारी असताना मला माझा भाऊ खांद्यावर घेऊन शाळेच्या पायऱ्या चढायचा. या काळात माझ्या बऱ्याच परीक्षा चुकल्या."
अंकुरच्या आणि अफसर अलीच्या कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचा ऋणानुबंध तयार झाल्याचं अंकुर सांगतो. "त्यांनी जे केलंय ते आपले सख्खेसुद्धा करणार नाहीत, त्यांच्याशी माझं रक्ताचं नातं तयार झालंय."
अफसर अली सांगतात, "मला देवाने दाखवलेल्या मार्गावर चालायचं आहे. लोकांना मदत करायची आहे."
ते सांगतात, अकबर तर आजही कोणाला मदत लागली तर मदत करायला तयार असतो. जर कोणाला एखाद्या डोळ्याची गरज असेल तर मी तो ही द्यायला तयार आहे.

अमरोहातील मखदुमपूर सोडताना बीबीसीच्या प्रतिनिधीला एक बातमी समजली. त्याच परिसरातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
त्याला बऱ्याच वर्षांपासून किडनीशी संबंधित आजार होता. तो डायलिसिसवर होता.
ही बातमी ऐकताच अफसर अली यांचा मुलगा खालिद म्हणतो, "देवाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत, त्यांनी आम्हाला अंकुरच्या कुटुंबाशी भेट घालून दिली याबाबत आम्ही देवाचे आभारी आहोत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








