'अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्रावर सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष'- चंपतराय

    • Author, अनंत झणाणे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, अयोध्येहून

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांनी सोशल मीडियावर एक छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे.

हे अवशेष राम मंदिराच्या बांधकामाच्यावेळेस केलेल्या खोदकामात सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांनी ट्वीट केलं आहे, 'श्रीरामजन्मभूमीवर केलेल्या खोदकामात सापडलेले प्राचीन मंदिराचे अवशेष. यात अनेक मूर्ती आणि स्तंभ समाविष्ट आहेत.'

9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने राम मंदिराच्या बांधकामातील सर्व अडथळे दूर झाले.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मुसलमानांना पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते, ज्या जागेवर ते एक मशीद बांधू शकतील. ही जमीन अयोध्या शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूर नावाच्या गावात देण्यात आली.

आम्ही धन्नीपूर गावात गेलो आणि मशीद बांधकाम कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे आणि अयोध्येमधील राम मंदिराचे बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

धन्नीपूर अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत

धन्नीपूरमध्ये आम्ही तिथले केअरटेकर सोहराब खान यांना भेटलो. त्यांनी आम्हाला जमीन दाखवली आणि म्हणाले, "ही ५ एकर जमीन आहे. ही सर्व जमीन ट्रस्टच्या मालकीची जमीन आहे. बांधकाम केवळ बांधकाम नकाशामुळे थांबले आहे. या नकाशाला विकास प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. ही मंजुरी मिळण्यात 'ना हरकत प्रमाणपत्रा'शी संबंधित काही समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परवानगी लवकरच मिळेल, अशी आशा आहे.

कागदावरील योजनेनुसार, 23 हजार 507 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीवर एक मशीद, एक रुग्णालय, त्याचे बेसमेंट, एक संग्रहालय आणि एक सर्व्हिस ब्लॉक बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयाची क्षमता 200 खाटांची असेल, मशिदीमध्ये 2 हजार व्यक्ती एका वेळी नमाज अदा करू शकतील आणि संग्रहालय 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असेल आणि ते संग्रहालय मौलवी अहमदुल्ला शहांना समर्पित असेल.

या जमिनीवर आधीपासूनच एक मजारही अस्तित्वात आहे.

जमिनीच्या वास्तुरचनेचे चित्र व नकाशा तयार करून अयोध्या विकास प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आला. पण कोव्हिडमुळे सुरुवातीला समस्या निर्माण झाली. त्यानंतर प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी विचारणा करण्यात आली. आता अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ट्रस्टने द्यायचे आहे. या एक आव्हान हे आहे की, या 5 एकर जमिनीवरील रस्ता 4 मीटर रुंद आहे आणि तो अजून रुंद करण्याची आवश्यकता आहे. या दिशेने काम सुरू करण्यात आले आहे.

धन्नीपूरमध्ये या प्रकल्पासाठी कशा प्रकारे निधी पुरविण्यात येत आहे?

या बांधकामासाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन मस्जिद ट्रस्टकडे आतापर्यंत फक्त 35 लाख रुपये जमा झाले आहेत. इस्लाममध्ये असे म्हटले जाते की, त्या भागातील लोक मशिदीचे बांधकाम करतात आणि फाउंडेशनचे म्हणणे आहे की, काही व्यक्ती मशिदीसाठी निधी देण्यासाठी पुढे आल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे मोठे क्राउड-फंडिंग करण्यात आलेले नाही.

पण दोन महिन्यांपूर्वी फारुखाबादमध्ये निधी संकलित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि 10 लाख रुपये संकलित करण्यात आले होते. ट्रस्टचे म्हणणे आहे की, बांधकामासाठी सर्व परवानग्या मिळाल्यानंतर संपूर्ण भारतातून निधी गोळा करण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात येत आहे.

धन्नीपूरमधील हे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. यासाठी 300 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णालयाचा एक भाग, मशीद आणि सांस्कृतिक केंद्र आणि वातावरण बदल लक्षात घेत एक हरित पट्टा समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात फक्त रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम होईल. यासाठी 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ट्रस्टला आशा आहे की, प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. महिला व लहान मुलींचे कुपोषण व त्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्याची विशेष सुविधा या रुग्णालयात असेल आणि सामुदायिक स्वयंपाकघरात संतुलित आहार मिळेल.

ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांना आशा आहे की, "पुढील दोन आठवड्यांमध्ये परवानगी मिळेल आणि त्यानंतर बांधकाम सुरू होईल."

संग्रहालय हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असेल. ट्रस्टची धारणा आहे की, राम मंदिराचे आंदोलन आणि त्याच्याशी संबंधित घटनांमुळे समाजात फाळणीचे वातावरण होते.

आणि ट्रस्ट त्या वारशाला संग्रहाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याची इच्छा आहे. म्हणूनच हे संग्रहालय इंग्रजांना हरविणारे अवधचे मौलवी अहमदुल्ला शहा यांना समर्पित करण्याची योजना आहे. त्यांनी लखनौमधील चिनहटमध्ये झालेल्या युद्धाचे नेतृत्व केले होते.

ट्रस्ट: मंदिर आणि मशिदीच्या बांधकामाची तुलना योग्य नाही

मशिदीचे बांधकाम आणि त्याच्याशी संबंधित आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आम्ही इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन मस्चि ट्रस्टच्या लखनऊ येथील कार्यालयातही गेलो होतो.

ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन यांनी सांगितले, " सर्वात आधी मी हेच म्हणेन राम मंदिर आणि देण्यात आलेली ही पाच एकर जमीन यांची तुलना करणे योग्य नाही. राम मंदिर आणि त्याच्याशी संबंधित तयारी खूपच मोठी आहे आणि नोव्हेंबर 2019 नंतर सांगितले गेले की ही पाच एकर जमीन मिळेल."

" आणि त्याच्या वर्षभरानंतर या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार झाला. राम मंदिरासाठी जे अभियान सुरू आहे किंवा जो उत्साह पाहायला मिळतो तो या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी एक धर्मादाय पातळीचे रुग्णालय उभे करणे हा आमचा हेतू आहे. आणि मशिदी साठी जमीन दिलेली आहे. त्यामुळे ती तर होणारच आहे. आणि 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आम्ही एक संग्रहालय बांधणार आहोत."

धन्नीपूरचे केअरटेकर सोहराब खान यांना आम्ही विचारले की, धन्नीपूरसुद्धा अयोध्येप्रमाणेच भाविकांसाठी एक तीर्थस्थळ होऊ शकेल का ? त्यावर ते म्हणाले, "अनेक जण हा प्रश्न विचारतात. मीडियावालेसुद्धा विचारतात आणि या भागातील लोकही विचारतात. किंवा बाहेरून कोणी आला तरी हेच विचारतो की, सरकारकडून इथल्या विकासासाठी काय केले जात आहे. अयोध्या शहरात विकास गंगा वाहत आहे, त्या गंगेचा एक प्रवाहसुद्धा या ठिकाणी नाही."

आयोध्या प्रमाणे या ठिकाणी सुद्धा लाखो लोक येतात का? केअरटेकर सोहराब खान म्हणाले की लाखो लोक अजून तरी येत नाही. पण या ठिकाणी पाहण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी लोक येत राहतात."

धन्नीपूरच्या रहिवासी आशा राम यादव यांची धारणा आहे की, "चांगल्या गोष्टी होत आहेत, रुग्णालय होणार आहे, मशिद होणार आहे, किंवा जे काही होईल त्यानंतर बाहेरची माणसे कमी येतील पण गावाचा विकास होईल. सगळे चांगला विचार करत आहेत. कोणीही वाईट विचार करत नाही. वाईट विचार का करावा. यामुळे कोणाचे नुकसान होते का? नाही होत ना? वाचनालयाने कोणाचे नुकसान होते का? नाही ना. या सगळ्यात वाईट काय आहे?"

धन्नीपूरबद्दल अयोध्येतील मुसलमान काय म्हणतात?

धन्नीपूरविषयी अयोध्येतील मुसलमान काय विचार करतात याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही अयोध्येतील छोटी कोठिया भागात पोहोचलो. तिथे आमची भेट बाबरी मशीद खटल्यामध्ये याचिकाकर्ते असलेल्या इक्बाल अन्सारी यांच्याशी झाली.

ते म्हणाले, "जी पाच एकर जमीन मिळाली आहे, खटल्यामध्ये जेवढे लोक समाविष्ट होते, त्यांचे आता या जमिनीशी काहीही देणे-घेणे नाही. ती जमीन सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला मिळाली आहे. त्या जमिनीवर ते त्यांना हवे ते बांधू शकतात. कारण न्यायालयाने निकाल दिला आहे. आम्ही त्या निकालाचा सन्मान राखतो. ज्यांना मशीद बांधायची आहे, त्यांनी ती बांधावी. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही."

जवळच्या दुकानात बसलेल्या 62 वर्षीय शफीउल्ला यांनी सांगितले की, "मशिदीसाठी जमीन देण्यात आली. पण आम्ही अजून ती पाहिलेली नाही."

त्यांना जागासुद्धा माहीत नव्हती. पण आम्ही त्यांना धन्नीपूरबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, "हो, धन्नीपूरमध्ये जमीन मिळाली आहे. पण त्या जमिनीसंदर्भात वाद आहे किंवा इतर काही आहे, हे माहीत नाही."

शफीउल्लाह यांना ती जमीन पाहण्याची इच्छा आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, तिथे काहीही होत नाही, असे त्यांच्या कानावर आले आहे.

तिथूनच जाणाऱ्या 25 वर्षीय परवेझ आलमलासुद्धा धन्नीपूरविषयी फार माहिती नव्हती. पण आम्ही धन्नीपूरचे नाव घेतले तेव्हा ते म्हणाले, "धन्नीपूरचे नाव बातम्यांमध्ये ऐकले आहे. धन्नीपूरमध्ये मशिदीसाठी जमीन मिळाली आहे. बांधकाम नकाशाला अजून मंजुरी मिळालेली नाही, एवढेच ऐकले आहे."

राम मंदिराचे बांधकाम जोमात सुरू आहे

किती वेगाने सुरू आहे राम मंदिराचे बांधकाम?

दुसरीकडे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या औपचारिक वेबसाइटवर असलेल्या अॅनिमेशन व्हिडियोमधून मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या बांधकामात कितपत प्रगती झाली आहे आणि पुढील लक्ष्य काय आहे हे समजते.

  • जानेवारी 2021 मध्ये मंदिराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू झाले.
  • मार्च 2021 मध्ये खोदकाम पूर्ण झाले.
  • एप्रिल 2021मध्ये पायाभरणीचे काम सुरू झाले.
  • सप्टेंबर 2021मध्ये पायाभरणीचे काम पूर्ण झाले.
  • सप्टेंबर 2021मध्ये टॉवर क्रेन लावण्यात आली.
  • सप्टेंबर 2021मध्ये राफ्टचे काम सुरू झाले.
  • नोव्हेंबर 2021मध्ये राफ्टचे काम सुरू झाले.
  • नोव्हेंबर 2021 मध्ये कोनशीला लावण्याचे काम सुरू झाले.
  • मार्च 2022 मध्ये कोनशीला लावण्याचे काम पूर्ण झाले.
  • जानेवारी 2022 मध्ये मंदिराचे खांब लावण्याचे काम सुरू झाले.
  • त्यानंतर बीमचे दगडही लावण्यात आले.
  • मंदिराचे छत व घुमटाचे काम ऑगस्ट 2023मध्ये पूर्ण होईल.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार मंदिराची उंची 141 फुटांवरून वाढवून 161 फुट झाली आहे आणि डिझाइनमध्ये अजून तीन घुमटांची भर घालण्यात आली आहे आणि खांबांची संख्या 160 वरून 366 झाली आहे.

राम मंदिरासाठी साधारण किती खर्च अपेक्षित आहे?

राम मंदिरासाठी येणाऱ्या खर्चाबाबत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांचे म्हणणे आहे, "देवाचे घर, राजा-महाराजांचे घर जेव्हा तयार होते, तेव्हा त्याची किंमत कोणाला माहीत असते?

राम तर राजांचा राजा आहे. आम्ही खर्चाचा विचार करणे सोडून दिले आहे. तरी, साधारण 1800 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. कदाचित जास्तसुद्धा होऊ शकतो किंवा कमीही लागू शकतो. गणित निरर्थक आहे."

मंदिरनिर्माणाचे काम कितपत पूर्ण झाले आहे?

चंपत राय यांनी सांगितले, "इंजिनीअरिंगच्या कामात टक्केवारीला काही अर्थ नाही. पण एकूण कामाचा विचार केला तर साधारण 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. दगडांचे कोरीव काम पूर्ण झाले आहे. फक्त इन्स्टॉलेशन करणे बाकी आहे."

"प्रत्येक गोष्ट मंदिराचा हिस्सा आहे. प्लिंथ टाकून झाली आहे. प्लिंथ म्हणजे मंदिराचा चबुतरा. त्यावर दगडांचे आठ स्तर लावण्यात आले आहेत. खूप काम झाले आहे. आणि पुढच्या वर्षी तळमजला पूर्ण होईल. पूर्ण म्हणजे 350 फुट लांब आणि २५० फुट रुंद आणि 20 फुट उंच असा मजला असेल. खूप मोठे काम आहे."

मंदिरासाठी दगड किती लागले आणि ते कुठून आणले आहेत?

याबद्दल चंपत राय म्हणतात, "खुर्ची उंच करण्यासाठीचा दगड ग्रॅनाइट आहे. तो तेलंगणा व कर्नाटकमधून येत आहे. 17 हजार दगड येत आहेत. एका दगडाचा आकार पाच. फुट लांब, अडीच फुट रुंद, तीन फुट उंच आहे. आणि ग्रॅनाइटची खुर्ची लावल्यानंतर जे मंदिराचे दगड आहेत, ते राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बन्सीपूर गावातील डोंगरांमधून आणले आहेत. तो फिकट गुलाबी रंगाचा दगड आहे. त्याला बलुआ दगड असे म्हणतात आणि मकरानाचा पांढरा संगमरवर आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)