अजात समुदाय काय आहे? 100 वर्षांपूर्वी जात सोडलेली ही माणसं शोधतायेत पुन्हा जाती

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"आमच्या पणजोबांनी जात सोडायला लावली. त्यांचं ऐकून हजारो लोकांनी जाती सोडल्या आणि 'अजात' झाले. पण आज आम्हाला पुन्हा शंभर वर्षांपूर्वीची जात शोधावी लागतेय. पणजोबांचा विचार डोंगराएवढा आहे, पण व्यवस्थेनं आम्हाला पुन्हा जातीकडे वळवलंय."

सुनयना अजात भावनिक होत नि त्याचवेळी व्यवस्थेवर संतापत सांगत होत्या. सुनयना या अजात परंपरेतल्या. पण शिक्षण घेताना जातीचं प्रमाणपत्र आवश्यक बनलं आणि त्यांनी त्यांची शंभर वर्षांपूर्वीची जात शोधून प्रमाणपत्रावर लिहिली, तेव्हा कुठे त्या महाविद्यालयाचा उंबरठा ओलांडू शकल्या.

सुनयना अजात ज्या पणजोबांचा उल्लेख करतात, ते म्हणजे गणपती महाराज. जाती-पाती मोडून माणूस म्हणून जगण्याचा संदेश गणपती महाराजांनी दिला.

'ज्याचा बाप अजात, त्या लेकरा जात

कोठूनी आली जगात, गण्या म्हणे'

असं म्हणत गणपती महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी विदर्भाच्या भूमीवरून जातीव्यवस्थेविरोधात क्रांतिकारी एल्गार पुकारला आणि पन्नास हजारांहून अधिक अनुयायांना जात सोडायला लावून 'अजात' केलं.

मात्र, हे क्रांतिकारी पाऊल सहजसोपं नव्हतं. यासाठी त्यांना जीवघेणे हल्ले सहन करावे लागले, बहिष्कृत व्हावं लागलं, कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागल्या. मात्र, ते डगमगले नाहीत. जातीअंतासाठी त्यांनी तेही सहन केलं.

गणपती महाराजांच्या या कार्याच्या माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीरमध्ये पोहोचलो. गणपती महाराजांचे तिसरी आणि चौथी पिढी अजूनही इथे राहते. त्यांच्याशी बोलून 'अजात'बद्दल जाणून घेतलं.

जात सोडून 'अजात' व्हायला सांगणारे गणपती महाराज

गणपती महाराजांचं मूळ नाव हरी विठोबा भबुतकर. वर्ध्याच्या आर्वीतील कचणूर गावी 2 सप्टेंबर 1885 री त्यांचा जन्म झाला. गणपती महाराज सात वर्षांचे असताना त्यांच्या वडलांचं निधन झालं. त्यानंतर आई त्यांना अमरावतीच्या मंगरुळ दस्तगीरमध्ये घेऊन आली.

या काळात विदर्भात संत केजाजी महाराजांचं कार्य सुरू होतं. ते वारकरी परंपरेशी जोडलेले होते. केजाजी महाराजांजवळ जातीभेदाला स्थान नव्हतं. या केजाजी महाराजांच्या सहवासात गणपती महाराज आले. त्यांचं शिष्यत्व पत्कारलं. गणपती महाराजांच्या पुढील वाटचालीवर केजाजी महाराजांचा प्रभाव दिसून येतो.

कीर्तन-प्रवचन करत भ्रमंती करत असताना गणपती महाराजांना जातव्यवस्थेचं विद्रूप रूप आणि अनिष्ट प्रथा दिसून आल्या. याच दरम्यान त्यांनी जातीपाती मोडण्याचा संकल्प केला नि क्रांतिकारी कार्यास सुरुवात केली.

1887 ते 1945 असा जवळपास 58 वर्षांचा गणपती महाराजांचा जीवनकाळ. यातली पहिली 10-15 वर्षे वगळल्यास पुढे 1940 पर्यंत ते जातीभेद मोडून काढण्यासाठी कार्यरत राहिले.

जवळपास 60 हजारांहून अधिक शिष्यांना त्यांनी जाती सोडून 'अजात' होण्यास प्रवृत्त केलं.

असंच किर्तनासाठी एकदा अचलपूरला गेले असता, त्यांनी पटवी जातीच्या विधवा महिलेशी विवाह केला. या महिलेला सात वर्षांचा मुलगा होता. विधवाविवाहचं समर्थन महाराजांनी स्वकृतीतून केलं. त्यांच्या या कृतीचा विरोध सुरू झाला. मात्र, ते डगमगले नाहीत.

जातनिर्मुलनाचा 'अन्नकाला'

अनिष्ट रुढींना विरोध करतानाच गणपती महाराजांनी मुळावरच घाव घातला. आपल्या अनुयायांना जाती सोडायला सांगितल्या. यासाठी त्यांनी काही कार्यक्रमांची सुरुवात केली.

लोकांना जाती बाजूला सारून एक व्हायला लावण्यासाठी गणपती महाराजांनी अन्नकाला सुरू केला.

कोणी-कोणा जात पुसू नये आता

ठेवूनिया चित्ता माजी याद

मनुष्याची होय मनुष्य जात

असं म्हणत समाजाला लागलेला अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्यासाठी त्यांनी सामूहिक भोजनाची नवी पद्धत शोधून काढली. 'अन्नकाला' असं त्यास नाव दिलं.

25 जुलै 1923 मध्ये पहिल्यांदा गणपती महाराजांनी मंगरुळ दस्तगीरमध्ये अन्नकाला केल्याचे संदर्भ सापडतात.

वर्ध्यातल्या निमगावचे पाटील माधवराव सबाने या महाराजांच्या शिष्यानं या अन्नकाल्याचं आयोजन केलं होतं.

गावागावावरून शिदोऱ्या मागवल्या गेल्या आणि एकत्रित करून तो काला पृथ्वीराज कनोजे या ब्राह्णण समाजातील व्यक्तीने सेवन केला. नंतर हजारो लोकांनीही सेवन केला. यामागचा हेतू असा होता की, कुणाही जातीपातीचा माणूस असो, तो अस्पृश्य नाही.

गणपती महाराजांच्याच शब्दात अन्नकाल्याबाबत सांगायचं तर -

आपुल्या गावात हा काला, होऊच नाही पाहिजे दिला

घातक विप्र वर्णाला, दिसून राहिला काला हा

मग ब्राह्मण मानहिन, वर्ण होऊन राहिल

तर्की धुर्त बुवाला म्हणू, मार मारून पिटून

द्यावा बाहेर काढून, गावातून बुवा तो

पुढे गणपती महाराजांनी अनेक ठिकाणी अन्नकाला केला. रसुलाबाद, हिंमतपूर वातोडा अशा असंख्य ठिकाणी. आजही म्हणजे जवळपास 100 वर्षे हा अन्नकाला सुरू आहे.

'कुणी विचारतं विधवा हाय काय, कुणी म्हणतं बौद्ध हाय काय'

गणपती महाराजांनी स्त्रियांसंबंधी मांडलेले विचारही आज 100 वर्षांनंतर अप्रूप वाटणारे आहेत.

स्त्रियांनी शिक्षण देत, नाही कपटी जन

याचे सांगती कारण, चित्त देऊन ऐकणे

ज्ञानवान स्त्रिया होतील, पतीसंगे भांडतील

सम अधिकार मागतील, त्यांना ते पडतील देणे

अशा शब्दात गणपती महाराजांनी स्त्रियांसंबंधी भाष्य केलं. स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे, मंगळसूत्र घातलंच पाहिजे असं नाही, अशा अनेक काळाच्या पुढच्या भूमिका मांडल्या.

अजात परंपरा मानणाऱ्या आणि गणपती महाराजांनी सांगितलेला संदेश पाळणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असली, तरी आजही काहीजण चिकाटीनं विचार पुढे नेतायत.

अजात झालेले कुठल्याही रंगाचे नाहीत, ते पाण्यासारखे निर्मळ आहेत, म्हणून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे, असं महाराजांनी आवाहन केलं होतं. मंगरूळ दस्तगीरच्या शीला निमकर महाराजांचा हा संदेश आजही पाळतात. मात्र, त्यांना अनेक प्रश्नांना सामोरंही जावं लागतं.

शीला निमकर म्हणतात की, "पांढऱ्या रंगाची साडी नेसल्यावर नि गळ्यात मंगळसूत्र नसलेलं पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं. कुणी म्हणतं, विधवा आहे का, कुणी म्हणतं, बौद्ध आहे का, कुणी म्हणतं, जास्तच शिकलीय वाटतं."

असे क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या गणपती महाराजांचा तत्कालीन राजकीय, सामाजिक संघटना नि व्यक्तींशीही संबंध आला. त्यातल्या एक-दोन घटनांनाच तर आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण तिथेही महाराजांची पुरोगामी भूमिका स्पष्टपणे दिसून येते.

'विदर्भाचा जोतिबा'

डिसेंबर 1925 मध्ये अखिल भारतीय ब्राह्मणेतर अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनाला डॉ. पंजाबराव देशमुख आणि कोल्हापूरचे राजे छत्रपती राजाराम महाराज उपस्थित होते. तसंच, स्वातंत्र्य चळवळीत काम करणारे समाजसुधारकही हजर होते. या अधिवेशनाचं अध्यक्षपद गणपती महाराजांना मिळालं होतं.

गणपती महाराजांच्या कार्याला पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी 'विदर्भातील खरा जोतिबा' असं त्यांना म्हटलं होतं.

जातीभेद संपवण्यासाठी गणपती महाराजांनी केलेल्या कार्यामुळे नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी गणपती महाराजांचा सुवर्णजडित अंगरखा, मुकुट आणि पंचा देऊन सन्मान केला होता.

पुढे मंगरूळ दस्तगीरमध्ये 9 ते 11 नोव्हेंबर 1929 असे तीन दिवस 'वर्‍हाड - मध्य प्रांत बहिष्कृत परिषद' झाली. त्यावेळी तिथेही गणपती महाराज प्रमुख पाहुणे होते.

याच परिषदेच्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या दिवशी गणपती महाराजांनी हजारो बहुजनांना एकत्र करून स्वत:च्या मालकीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांचा प्रवेश घडवला. गणपती महाराजांच्या कार्यामधील हे एक क्रांतिकारी पाऊल मानलं गेलं.

या बहिष्कृति परिषदेला खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण डॉ. आंबेडकर कलकत्त्याला असल्यानं त्यांनी कलकत्त्यातील अस्पृश्यांचे नेते विराटचंद्र मंडल यांना पाठवलं. या परिषदेत अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी ठराव मंजूर केले.

त्यावेळच्या ठरवांची प्रत गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज भबुतकरांनी अजूनही जपून ठेवलंय. त्यातील मंजूर मुद्दे वाचल्यानंतर गणपती महाराजांचं कार्य काळाच्या किती पुढचं नि तत्कालीन स्थितीत किती क्रांतिकारी होतं, हे पटतं.

स्वातंत्र्य आधी समाजसुधारणा आधी?

एकीकडे गणपती महाराजांची समाजसुधारणेचं काम सुरू असताना समांतर पातळीवर भारतात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्त्व महात्मा गांधींकडे होतं. गणपती महाराजांनी या चळवळीतल्या चर्चांची दखल आपल्या रचनांमध्ये घेतलेली दिसून येते.

महात्मा गांधींबद्दल गणपती महाराजांच्या मनात आदर दिसून येतो. त्यांच्या रचना याला दुजोरा देतात.

गांधी महात्मा विख्यात, त्याचे ऐसे आहे मत

येऊ द्या लोकहो अंमलात, चित्त, वित्त लावूनी

मग अध्यात्म स्वराज्य धनी, रहाल होऊनी सर्वही

ज्यांची होऊन वित्त शुद्धी, वरली पर होत बुद्धी

महात्माजीचे मत, जे आणतील अंमलात

त्यांना सहज स्वहीत, दिसू तुरत लागेल

मुख्य गांधी महात्माकी, अवतारी फिरून लोकी

लोका करा म्हणतो एकी, मळ नेकी वाढाया

एकीकडे गांधींबद्दल मनात आदर असला, तरी स्वातंत्र्य आधी की स्वराज्य आधी, या वादात गणपती महाराज समाजसुधारणेच्या बाजूने उभे राहिलेले दिसतात.

अस्पृश्यता निवारण, झाली पाहिजे पूर्ण

ही एक मोठी अडचण, स्वराज्य रोखून बैसली

किंवा

जाती नष्ट झाल्यावाचून, न होय एकीकरण

एकीकरणावाचून, स्वराज्य ते प्राप्त कैसे

या रचनांमध्ये गणपती महाराजांची स्वातंत्र्याआधी समाजुधारणा झाली पाहिजे, ही भूमिका स्पष्टपणे दिसते.

तत्कालीन राजकीय मुद्द्यांवर आपल्या अनुयायांना मार्गदर्शनही गणपती महाराजांनी केलं.

100 वर्षांपूर्वी इतके क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या गणपती महाराजांना विरोध झालाच नाही असं नाही. अनेकदा तर जीवघेणे हल्लेही झाले.

डॉ. बाळ पदवाड लिखित 'समाजसुधारक गणपती महाराज' या पुस्तकातील माहितीनुसार, गणपती महाराजांवर विषप्रयोग करण्यापासून लाठीकाठ्यांच्या मारहाणीपर्यंत हल्ले झाले. मात्र, या सगळ्यांतून महाराज बचावले. विशेषत: विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश दिल्याच्या घटनेनंतर ब्राह्मणवर्गात गणपती महाराजांबद्दल संतापाची भावना होती.

गणपती महाराजांचे नातू श्याम महाराज भबुतकर सांगतात की, पुढे 1940 नंतर गणपती महाराज काहीसे अज्ञातवासातच गेले. ते सार्वजनिक जीवनापासून दूर गेले. तसेच त्यांना शारीरीक आजारांचे त्रासही सुरू झाले आणि यातच 1945 साली गणपती महाराजांचं मंगरूळ दस्तगीरमध्ये निधन झालं.

100 वर्षांनंतर पुन्हा जातीकडे...

गणपती महाराजांचे नातू-पणतू आजही मंगरूळ दस्तगीर गावी राहतात. इथं गणपती महाराजांची समाधी, मंदिर (ज्याला कचेरी म्हटलं जातं), विठ्ठल मंदिर आणि राहतं घर आहे. त्यांची जपणूक भबुतकर आणि निमकर कुटुंबीय, तसंच अजात परंपरा मानणारे लोक करतात.

मात्र, मूळ प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, गणपती महाराजांनी सांगितलेल्या विचारांचं काय? कारण 100 वर्षांपूर्वी जात सोडून हे सगळे अजात झाले खरे, मात्र आता आपली व्यवस्था त्यांना पुन्हा जात शोधायला भाग पाडतेय.

1990-95 नंतर 'कास्ट व्हॅलिडिटी'ला महत्त्व प्राप्त झाले आणि नोकरी-शिक्षणामध्ये जातीला महत्त्व आलं. पर्यायानं 'अजात' झालेले अनेकजण मूळ जातीकडे वळू लागले.

मंगरूळमध्ये राहणारे मंगेश भबुतकर सांगतात की, "माझ्या आईला सरपंचपदासाठी उभं राहायंच होतं, पण तिथं जात प्रमाणपत्र लागतं. मग आम्ही आमची मूळ जात 'माळी' शोधून काढली आणि 100 वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांच्या आधारे तसं जातप्रमाणपत्र बनवलं."

असंच काहीसं सुशील भबुतकरांचं झालंय. त्यांना पोलीस भरतीत जायचं होतं, तिथंही जात प्रमाणपत्र लागतं. आधीच्या जातप्रमाणपत्रावर जातीच्या पुढे 'अजात' लिहिलं होतं, आता नव्या जातप्रमाणपत्रावर त्यांनी मूळ जात शोधून 'माळी' करून घेतलंय. त्यासाठी त्यांनी कोतवाल बुकापासून सगळे कागदपत्र शोधून काढावे लागले.

हे सांगत असताना सुशील आणि मंगेश या दोन्ही भावांचे डोळे पाणवतात.

हेच गणपती महाराजंच्या पणती आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनयना आजातही म्हणतात. त्या भावनिक होत म्हणतात की, "मी आमच्या कुटुंबातील पहिली पदवीधर. मला जात प्रमाणपत्र तयार करताना लिहून द्यावं लागलं की, मी अजात नाहीय. हे लिहून देताना किती जड गेलं असेल याचा विचार करा. आम्हाला गणपती महाराजांनी मोठा विचार दिला, पण ते आम्हाला व्यवस्था पुढे नेऊ देत नाहीय."

सुनयना अजात खंत व्यक्त करत म्हणतात की, "आपलं सरकार ना गणपती महाराजांचं साहित्य प्रकाशित करत, ना गणपती महाराजांना महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करत. विचार जोपासायला मदत नाही, पण गणपती महाराजांचा महापुरुषांच्या यादीत तरी समावेश करावा, एवढीच इच्छा आहे."

कोणी-कोणा जात पुसू नये आता

ठेवूनिया चित्ता माजी याद

मनुष्याची होय मनुष्य जात

असं गणपती महाराज म्हणून गेले खरे, पण आपलं सरकार जात सोडलेल्या या लोकांना जात विचारून जातीच्या चौकटीत अडकवू पाहतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)