रॉजर बिन्नी: निवडसमितीच्या बैठकीत मुलाचं नाव आलं की बाहेर पडणारे सदस्य

रॉजर बिन्नी, बीसीसीआय, क्रिकेट

फोटो स्रोत, THE HINDU

फोटो कॅप्शन, रॉजर बिन्नी

80च्या दशकात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या मांदियाळीत सामील रॉजर बिन्नी आता सर्वशक्तीशाली बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत.

आज मुंबईत बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रॉजर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. अध्यक्षपदाचा अर्ज भरलेल्या बिन्नी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचीच शक्यता आहे.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव संतोष मेमन यांनी या वार्षिक बैठकीत सहभागी न होणं आणि प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी बिन्नी यांच्याकडे सोपवलं जाणं, यातून त्यांचं अध्यक्ष होणं उपचारापुरतं उरलं होतं.

बीसीसीआय निवडणुकीत कोणाची पदाधिकारी म्हणून निवड व्हावी यासंदर्भात गेल्या आठवड्यात दिल्लीत चर्चेच्या अनेक फेऱ्या रंगल्या. यामध्ये अध्यक्ष म्हणून बिन्नी यांच्या नावावर एकमत झालं.

ब्रिजेश पटेल यांच्या पाठिंब्यामुळे बिन्नी यांचं अध्यक्ष होण्याला बळकटी मिळाली आहे.

विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची अध्यक्ष म्हणून आणखी कार्यकाळ मिळावा अशी इच्छा होती. पूर्व विभागाकडून कोणीही सलग अध्यक्षपद भूषवलेलं नाही. यामुळे सौरवच्या नावाला पसंती मिळाली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना सलग दोन कार्यकाळ काम करण्याची अनुमती दिली होती.

या नियमाचा फायदा फक्त बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना मिळेल.

1983 विश्वचषकाचे हिरो होते बिन्नी

तृणमूल काँग्रेसने गांगुली यांना अध्यक्षपदावरून हटवलं जाण्याच्या कारवाईला राजकीय रंग दिला आहे.

सौरव गांगुली यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्याने त्यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात आलं.

पण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की भाजपमध्ये प्रवेश केलेला नसतानाही गांगुली यांनी अध्यक्षपदाची तीन वर्ष अर्थात संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला आहे.

गांगुली यांच्या जागी विराजमान होणारे बिन्नी भारताच्या विश्वविजयी मोहिमचा अविभाज्य घटक होते. 1983 विश्वचषकात भारतातर्फे सर्वाधिक विकेट्स बिन्नी यांच्या नावावर होत्या. बिन्नी यांनी त्या स्पर्धेत 18 विकेट्स पटकावल्या होत्या.

20 जून 1983 रोजी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातली त्यांची कामगिरी विसरता न येण्यासारखी आहे.

स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी भारताला त्या सामन्यात विजय अनिवार्य होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 247 धावांची मजल मारली. यामध्ये बिन्नी यांनी 21 धावांचं योगदान दिलं.

रॉजर बिन्नी, बीसीसीआय, क्रिकेट

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR

फोटो कॅप्शन, कपिल देव, सुनील गावस्कर, सय्यद किरमाणी, रॉजर बिन्नी

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाचा डाव 129 धावातच आटोपला. भारताने 118 धावांनी दणदणीत विजय मिळवला. बिन्नी यांनी त्या सामन्यात 29 धावात 4 विकेट्स घेतल्या. मदनलाल यांनीही चार विकेट्स घेतल्या होत्या.

केवळ विश्वचषक नव्हे तर 1985 मध्ये झालेल्या वर्ल्ड सीरिज चॅम्पियनशिप स्पर्धेतही बिन्नी यांनी दिमाखदार कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत बिन्नी यांनी 17 विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं.

बिन्नी दर्जेदार अष्टपैलू खेळाडू होते. परंतु ते बहुतांश अशा काळात खेळले जेव्हा वेगवान गोलंदाजाचा उपयोग नव्या चेंडूची चमक घालवण्यापुरता केला जात असे. चेंडू जुना झाला की फिरकीपटूंकडे सोपवला जात असे.

क्षमतेच्या तुलनेत बिन्नी भारतासाठी अतिशय मर्यादित खेळले. त्यांनी खूप साऱ्या टेस्ट आणि वनडेत भारतासाठी खेळायला हवं होतं. त्यांनी केवळ 27 टेस्ट आणि 72 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.

ही गोष्ट खरी की बिन्नी यांच्याकडे वेग नव्हता. पण चेंडू स्विंग करण्यात त्यांचं विशेष प्राविण्य होतं. याबरोबरीने ते अतिशय उत्तम फलंदाजी करत असत. हे सगळं पाहता त्यांना आणखी संधी मिळायला हवी होती.

मुख्य फलंदाज तंबूत परतल्यानंतर सय्यद किरमाणी यांच्या साथीने संघाला संकटातून बाहेर घेण्यात त्यांची हातोटी होती.

भारतासाठी टेस्ट खेळणारे पहिले अँग्लो इंडियन

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर 1979 मध्ये बिन्नी यांनी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं.

भारतासाठी खेळणारे ते पहिले अँग्लो इंडियन खेळाडू होते. बिन्नी स्कॉटिश वंशाचे भारतीय आहेत.

रॉजर बिन्नी, बीसीसीआय, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉजर बिन्नी पत्नी आणि मुलगा स्टुअर्टसमवेत

नैसर्गिक प्रतिभा लाभलेले क्रीडापटू असं बिन्नी यांचं वर्णन केलं जातं. शाळेत असताना बिन्नी फुटबॉल आणि हॉकी खेळत असत.

एवढंच नव्हे तर अॅथलेटिक्समध्ये भालाफेकही करत असत. त्यांनी ठरवलं असतं तर या खेळातच कारकीर्द घडवू शकले असते.

भालाफेकीत कनिष्ठ वयोगटात खेळताना त्यांनी राष्ट्रीय विक्रमही रचला होता. क्रिकेटमध्ये गोलंदाजी चांगलं करत असल्यामुळे त्यांनी क्रिकेटची निवड केली.

निवडसमिती सदस्य म्हणून कामगिरी

2012 मध्ये बिन्नी यांची बीसीसीआयच्या वरिष्ठ निवडसमितीपदी नियुकती झाली. त्या काळात त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी भारतासाठी खेळण्याच्या शर्यतीत होता. त्यावेळी बिन्नी यांच्यावर पक्षपाताचा आरोप होत असे.

त्यावेळी बिन्नी यांनी एक अनोखा मापदंड प्रस्थापित केला. निवडसमितीच्या बैठकीत जेव्हाही स्टुअर्ट बिन्नीचं नाव येत असे तेव्हा रॉजर बिन्नी बैठकीतून बाहेर जात असत.

खेळतानाच्या काळात गुंडप्पा विश्वनाथ यांच्याशी बिन्नी यांची खास दोस्ती. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.

रॉजर बिन्नी, बीसीसीआय, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉजर बिन्नी यांनी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं.

बिन्नी यांनी निवडसमिती सदस्य होण्याच्या बरोबरीने प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलं. 2000 मध्ये भारताच्या U19 संघाचे ते प्रशिक्षक होते.

भारताने त्यावेळी जेतेपदावर नाव कोरलं होतं. या स्पर्धेतूनच मोहम्मद कैफ, युवराज सिंह यांच्यासारखे खेळाडू समोर आले आणि चमकलेदेखील. हेच खेळाडू पुढे भारतीय संघाचा आधारस्तंभ झाले.

निवृत्त झाल्यानंतरही बिन्नी यांचं खेळाशी असलेला ऋणानुबंध कमी झाला नाही. आशियाई क्रिकेट परिषद वेगवेगळ्या देशांमध्ये क्रिकेटच्या प्रसाराचं काम करते. बिन्नी या संघटनेचे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून विविध देशात जाऊन युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असत.

बिन्नी दर्जेदार क्रिकेटपटू असण्याच्या बरोबरीने उत्तम माणूसही आहेत. त्यांची प्रतिमा निष्कलंक आहे. लोढा समितीच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या निवडसमितीत असताना त्यांच्यावर हितसंबंध जोपासल्याचा आरोप झाला. त्यांनी तात्काळ निवडसमिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)