शरद पवार, मुलायम सिंहांनी जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यापासून रोखलं होतं...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुनील गाताडे, व्यंकटेश केसरी
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी मराठीसाठी
गोष्ट एप्रिल 1999 ची आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे दुसरे सरकार 13 महिन्यात कोसळले होते. 1996 साली वाजपेयींची पंतप्रधान म्हणून तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी नेमणूक केल्यावर त्यांचे ते पहिले सरकार अवघे 13 दिवस टिकले होते.
"तेरा दिवसांचे नवल" अशी त्याची खिल्ली देखील काँग्रेसने उडवली होती. 1999 साली सोनिया गांधी आणि जयललिता यांची दिल्लीच्या आलिशान अशा अशोक हॉटेलमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांच्या टी-पार्टीत भेट झाली आणि वाजपेयींचे सरकार फक्त एका मताने गडगडले होते.
त्यानंतर राजधानीत जंगी खलबते सुरू झाली. त्यावेळचे मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजीत यांनी सोनिया गांधींना काँग्रेसने सरकार स्थापन केले तर डावे पक्ष त्यांना पाठिंबा देतील असं आश्वासन दिलं.
सुरजीत यांचे काँग्रेसेतर आणि भाजपेतर पक्षात जबर वजन त्यामुळे मुलायम सिंग यादव यांच्यासारखे नेते आपल्या बरोबर येतील अशी काँग्रेसची अटकळ.
तेव्हा काँग्रेस अध्यक्ष बनून सोनियांना एक वर्ष होऊन गेले होते आणि त्या राजकारणातील डावपेचांना नवख्या होत्या. इंदिरा गांधींची सून ही पण राजकारणात काही कमी नाही असा प्रचार काँग्रेसींनी चालवला होता.
अर्जुन सिंह हे सोनियांचे खास सल्लागार मानले जात होते. नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले काँग्रेस नेते असा त्यांचा लौकिक होता आणि दहा जनपथचे अघोषित चाणक्य बनायचा त्यांचा बेत होता.
सोनिया 1999 साली पंतप्रधान झाल्या असत्या तर भारताच्या इतिहासाला कदाचित वेगळी कलाटणी मिळाली असती. पण इतिहासाला ते मंजूर नव्हते.
त्यांना रोखण्यासाठी ऐनवेळी दोन दिग्गज नेते पुढे आले आणि पंतप्रधान होण्याचे सोनिया गांधींचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. ते दोन नेते म्हणजे मुलायम सिंह यादव व शरद पवार हे होत.
मुलायम सिंह त्यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते तर शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते.
काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला साजेसे असे वर्तन त्यांच्याशी पी. जे. कुरियन आणि अजित जोगी यांच्यासारखे काही सोनियासमर्थक करत होते. सभागृहात अथवा बाहेरही शरद पवारांना विरोध करत होते. पण आपले नशीब फळफळणार अशी पवारांना आशा होती.
महाराष्ट्रात सेना-भाजप सरकार सत्तेत असूनदेखील त्यांच्या नाकावर टिच्चून जवळजवळ 40 पक्षांचे खासदार पवारांनी निवडून आणून दिल्ली दरबारी आपला दरारा निर्माण केला होता.
वाजपेयी सरकार पाडण्यासाठी पवार यांनी पडद्याआडून भाजपला पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत असलेल्या बहुजन समाज पक्षाला ऐनवेळी फोडले होते.
मायावती यांच्यासह बसपचे पाच खासदार होते. एका सदस्याचाही पाठिंबा किती महत्त्वाचा हे ते सरकार एका मताने कोसळले त्यावरून कळते. पवारांनी हे काम इतके गुपचूप केले होते कि भल्याभल्या भाजप नेत्यांना आणि मंत्र्यांना हे कसे काय घडले ते कळलेच नाही.
भाजप विरोधात भाजपेतर पक्ष 1996 साली लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र आले आणि वाजपेयींना 13 दिवसात आपले सरकार गुंडाळावे लागले. कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हते (272 खासदार) आणि बाबरी मशीद पाडल्यावर भाजपसोबत जाण्यास कोणी तयार नव्हते. 'वाजपेयी चांगले पण भाजप वाईट' असा समज काँग्रेसला फायदेशीर ठरत होता.
त्यामुळे 1996 चीच पुनरावृत्ती 1999 साली होईल व भाजपेतर पक्ष काँग्रेसला पाठिंबा देतील अशी अटकळ मनाशी बांधून सोनिया गांधी या एकट्याच राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना भेटायला गेल्या त्यावेळी त्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नव्हत्या.
"आमच्याकडे 272 आहेत," आणि अजून काहींचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे असा दावा त्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी नवीन सरकार बनवण्यासाठी सोनियाना थोडा वेळ दिला.
त्यावेळी अर्जुन सिंग या जुन्याजाणत्या नेत्याला सरकार बनवण्याच्या बाबत माहिती देण्याकरता काँग्रेसने उतरवले. त्या दिवसात सततच्या भडीमाराला उत्तर देताना "आमच्याकडे स्थलांतरित पक्षी (migratory birds) येतील' असा त्यांनी गौप्यस्फोट केला.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसने 1996 ला गैर भाजप पक्षांना बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे जनता दलाचे एच. डी. देवेगौडा पंतप्रधान झाले व त्यानंतर इंद्रकुमार गुजराल.
ता हे सारे पुरोगामी पक्ष आपल्याला पाठिंबा देतील अशी खुणगाठ मनाशी बांधून त्या राष्ट्र्पती भवनात पोहोचल्या व 272 खासदारांच्या पाठिंब्याचा दावा केला... आणि त्यानंतर नवा इतिहास लिहिला गेला.
अननुभवी सोनिया गाफील राहिल्या आणि काँग्रेसकडे 'स्थलांतरित' होतील असे पक्षी उडून गेले, उडून लावले गेले. यात सिंहाचा वाट जॉर्ज फर्नांडिस यांनी उचलला होता.
गांधी -नेहरू परिवाराचे विरोधक असलेल्या फर्नांडिस यांचा प्रभाव मुलायम यांच्यावरही पडू लागला आणि मुलायम हे विदेशी मूळ असलेल्या व्यक्तीच्या पंतप्रधान होण्याला विरोध करू लागले.
त्यावेळी फर्नांडिस आणि मुलायम सिंह दोघेही दिल्लीतल्या कृष्ण मेनन मार्गावर राहत असत. फर्नांडिस यांनी केलेल्या शिष्टाईने इतिहास बदलला.

फोटो स्रोत, Getty Images
कसलेले मल्ल असलेल्या मुलायम सिंह यांचा धोबीपछाड काँग्रेसला अस्मान दाखवून गेला.
त्यानंतर शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित केला.
पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांनी तो उचलला. मुलायम सिंह उत्तर प्रदेशचे तर शरद पवार हे महाराष्ट्राचे. दोघेही जनाधार असलेले नेते. राजकारणात रापलेले, पंतप्रधान पदाचे उघड दावेदार! ते सोनिया गांधीना पंतप्रधान म्हणून स्वीकारणे केवळ अशक्य होते.
सोनियानिष्ठांनी हे दोघेही भाजपवाले, संघवाले म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. पण ते दोघेही ना कधी भाजपप्रणित आघाडीत गेले ना त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
मुलायम सिंह यांना काँग्रेस आणि सोनियांनी कधी माफ केले नाही. 2004 ते 14 या काळात काँग्रेस-प्रणित संयुक्त प्रगतिशील आघाडी केंद्रात सत्तेत असताना समाजवादी पक्षाचे समर्थन सोनियांनी घेतले. पण त्यांच्या पक्षाला मनमोहन सिंग सरकारात अजिबात सहभागी करून घेतले नाही.
पवारांनी काँग्रेस सोडली, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला पण त्यानंतर काही महिन्यातच त्यांचा पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस बरोबर 15 वर्षे सरकारमध्ये राहिला व ते स्वतः केंद्रात 10 वर्षे मनमोहन सिंग सरकार मध्ये कृषिमंत्री राहिले.
शरद पवारांना सोनिया गांधी यांनी विश्वासात घेतले असते तर, राष्ट्रपतींना भेटताना त्यांना सोबत घेतले असते तर त्या पंतप्रधान झाल्या असत्या का? असे प्रश्न मनात येतात पण इतिहासाला जर तर मान्य नसते हेच खरे.
(या लेखातील मतं ही लेखकांची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








