You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक बस अपघात : 'आम्ही बसमध्ये झोपलेलो होतो, त्यांनी आम्हाला खिडकीतून बाहेर काढलं नसतं तर...'
नाशिकमध्ये आज सकाळी (08 ऑक्टोबर) एका खासगी बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितलं की, "पहाटे सव्वापाचच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. यवतमाळहून मुंबईकडे चाललेली बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात अपघात घडला. यावेळी स्फोट झाला आणि या खासगी बसनं पेट घेतला. यात बसमधील 11 प्रवाशांचा भाजल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला आहे.
"स्थानिक नागरिकांनी जखमी लोकांना रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. मयत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे."
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा अपघात झाला आहे. यवतमाळहून मुंबईकडे ही खासगी बस चालली होती. दरम्यान या बसला आग लागली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
प्रवासी काय म्हणाले?
या बसमध्ये प्रवास करणाऱ्या पूजा गायकवाड या महिला प्रवाशानं सांगितलं की, "आम्ही झोपलेलो होतो. जेव्हा गाडीला आग लागली तेव्हा आम्हाला माहिती पडलं. जी माणसं बघायला आली होती, त्यांनी आम्हाला खिडकीमधून बाहेर काढलं.
वाशीहून बसलेल्या पूजा यांनी पुढे सांगितलं, "आम्ही चार जण वाशिमनरून बसलो होतो. गाडी फुल पॅक होती. आम्ही झोपतच होतो. काय झालं कळालंच नाही."
तर एका स्थानिक नागरिकानं सांगितलं की, "आमच्या घरासमोरच अपघात झाला. यामुळे प्रवासी जळत होते. आम्ही काहीच करू शकत नव्हतो."
मुख्यमंत्र्यांनी केली मदत जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं की,"नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात 11 नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल."
"या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)