औरंगजेब पाहताक्षणीच दासीच्या प्रेमात पडला, पण ही प्रेम कहाणी अधुरीच राहिली...

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

आपल्यापैकी बऱ्याच जणांना औरंगजेब म्हणजे कट्टर आणि धर्मांध बादशाहा म्हणून माहीत आहे.

मात्र पहिल्याच नजरेत एका दासीच्या प्रेम पडलेला हा औरंगजेब बादशहा तिच्या प्रेमाखातर दारूही प्यायला निघाला होता. बादशाहा या दासीच्या प्रेमात पडला तेव्हा त्याचं वय 35 वर्ष होतं.

या गोष्टीची सुरुवात होते, औरंगाबादच्या सुभेदारीवर निघताना...औरंगजेबला दुसऱ्यांदा दख्खनचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. औरंगाबादला जाताना वाटेत बुऱ्हाणपूर हे शहर लागतं.

आज हे शहर मध्यप्रदेश राज्याच्या ताप्ती नदीच्या उजव्या तीरावर वसलंय. याच ठिकाणी औरंगजेबाची आई मुमताजचा मृत्यू झाला होता. तिचं ताजमहालमध्ये दफन करण्यापूर्वी बुऱ्हाणपूर मध्ये दफनविधी करण्यात आला होता.

ब्रोकेड, मलमल आणि सिल्कसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात औरंगजेबाची मावशी सुहेला बानो राहत होती. तिचा विवाह मीर खलील खान-ए-जमान याच्याशी झाला होता. आपल्या मावशीला भेटायचं म्हणून औरंगजेब बुऱ्हाणपूरमध्ये उतरला. मात्र इथंच तो पहिल्या नजरेत प्रेमात पडला.

मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्यांच्या 'गुबार-ए-खातीर' पुस्तकात नवाब शम्स-उद-दौला शाहनवाझ खान आणि त्याचा मुलगा अब्दुल हयी खान यांनी लिहिलेल्या 'मासर-अल-उमरा' या पुस्तकाचा संदर्भ देत काही गोष्टी लिहिल्या आहेत.

त्याप्रमाणे, 'औरंगजेब बुरहानपूरातील जैनाबादच्या 'आहू खाना' बागेत फिरत होता. त्याचवेळी औरंगजेबाची मावशी तिच्या दासींसोबत बागेत फिरायला आलेली असते.

यात एक दासी होती, जी कमालीची सुंदर मोहक आवाजाची गणिका होती. या सर्व दासी एकामागून एक तिथंच असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली जमा झाल्या. त्या आंब्याच्या झाडाला आंबे लगडले होते. तिथंच असलेल्या शहजाद्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. त्या दासीने हळूच उडी मारून एक आंबा तोडला.

औरंगजेबाच्या मावशीला त्या दासीचं हे वागणं आवडलं नाही. तिने तिला लागलीच झापलं. यावर औरंगजेबाकडे एक कटाक्ष टाकत ती दासी पुढं गेली. तिच्या या नजरेनं औरंगजेबाला घायाळ केलं. आणि औरंगजेब तिथंच तिच्या प्रेमात पडला.'

औरंगजेबाचं चरित्र लिहिणारे हमीदुद्दीन खान या घटनेचं वर्णन थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात. "ते घर औरंगजेबाच्या मावशीचंच असल्याने दासी पडद्यात नव्हत्या. आणि तशी फारशी काळजीही घेतली नव्हती. त्यामुळे औरंगजेबही काही न कळवता घरी आला. तिथंच जैनाबादी नावाची दासी झाडाची फांदी पकडून गुणगुणत होती. तिचं खरं नाव हिराबाई असं होतं."

आणि औरंगजेब भोवळ येऊन पडला...

तिला पाहताच औरंगजेबाचा स्वतःवरचा ताबा सुटला. तो तिथंच मटकन खाली बसला आणि त्याला भोवळ आली. ही बातमी त्याच्या मावशीपर्यंत पोहोचली. ती अनवाणी पायाने धावत औरंगजेबाजवळ पोहोचली. तिनं त्याला मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागली. तीन चार तासानंतर औरंगजेबाला शुद्ध आली.

मावशीने त्याला विचारले, "हा कसला आजार आहे?' तुझ्यासोबत यापूर्वी असं काही झालंय का?"

तिच्या या प्रश्नावर औरंगजेब शांतच होता. त्यानं उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, "मी जर तुला आजार सांगितला तर तू तो बरा करशील का?"

यावर त्याची मावशी आनंदाने म्हणाली, "तू उपचारांचं बोलतोयस पण मी तुझ्यासाठी माझे प्राणही त्यागीन."

यानंतर औरंगजेबाने घडला प्रकार मावशीला सांगितला. हे ऐकून ती गप्प झली. शेवटी औरंगजेब म्हणाला, "तू माझ्या प्रश्नांचीच उत्तर देत नसशील तर माझ्यावर उपचार कसे करणार"

यावर त्याची मावशी म्हणाली, "मी तुझ्यासाठी स्वतःचा त्याग करीन! पण तुला माझा नीच नवरा माहीतच आहे. तो एक भयंकर माणूस आहे. तो आधी हिराबाईला ठार करील आणि नंतर माझा जीव घेईल. त्याला सांगूनही काही फायदा होणार नाही. त्या बिचाऱ्या हिराबाईचा यात हकनाक बळी जाईल."

यावर औरंगजेब म्हणाला, "तुझं पटतंय मला. मी इतर प्रयत्न करून पाहतो."

सूर्य मावळायला आल्यावर औरंगजेब आपल्या घरी आला. त्याने त्या दिवशी काहीच खाल्लं नाही. त्याने त्याचा विश्वासू मुर्शिद कुली खानला बोलावून त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. यावर खान म्हणाला की, "माझ्या जीवाच्या बदल्यात माझ्या गुरूंच काम होणार असेल तर मी नक्कीच ते पूर्ण करीन."

पहिल्याच नजरेत प्रेमात पडला

औरंगजेबाने यावर उत्तर दिलं की, "तू माझ्यासाठी जीव द्यायलाही तयार होशील याची मला कल्पना आहे. मात्र यातून माझी मावशी विधवा होईल आई माझं मन तसं करण्यासाठी धजावत नाहीये. तसंच कुराणात सांगितल्याप्रमाणे, धार्मिक कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला अशी खुली हत्या करता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं आपण खान-ए-जमानशी बोलून बघू."

मुर्शिद कुली खानने खान-ए-जमानला सर्व हकीगत सांगितली. त्यावर खान-ए-जमान म्हणाला, "औरंगजेबाला माझा सलाम सांगा. मी याचं उत्तर त्याच्या मावशीकडे देईन."

खान-ए-जमानने आपल्या पत्नीला सांगितलं की, हिराबाईच्या बदल्यात औरंजेबानच्या जनानखान्यातली चित्राबाई पाठवून दयायला सांग.

इतिहासकार जदुनाथ सरकार या गोष्टीशी सहमत नाहीत. लेखक रवी राणा म्हणतात की, या घटनेच्या तपशिलांमध्ये बरीच मतभिन्नता आढळते. पण एक गोष्ट म्हणजे, साधा सरळ आणि धार्मिक प्रवृत्ती असलेला औरंगजेब पहिल्याचं नजरेत प्रेमात पडला होता याविषयी सर्वांमध्ये एकवाक्यता आढळते.

गजेंद्र नारायण सिंह यांच्यानुसार, औरंजेबाचं तारुण्यातलं प्रेम आणि इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्यानुसार औरंगजेबाच्या एकमेव प्रेमाचं नाव होतं हिराबाई. ती एक काश्मिरी हिंदू होती. तिच्या आईवडिलांनी तिला बाजारात विकलं होतं. खान-ए-जमानच्या दरबारात ती नाचगाणं करायची.

'मसर-अल-उमराह' मध्ये म्हटलंय की, औरंगजेबाने आपल्या मावशीच्या मिनतवाऱ्या करून हिराबाईला मिळवलं होतं. 'एहकाम-ए-आलमगिरी' नुसार, औरंगजेबाने जेव्हा मावशीकडे हिराबाईची मागणी केली तेव्हा त्याच्या मावशीने बदल्यात चित्राबाईची मागणी केली आणि ही देवाणघेवाण झाली.

जदुनाथ सरकार म्हणतात की, हिराबाईला 'जैनाबादी महल' देण्यात आला होता. सम्राट अकबराच्या काळापासून शाही जनानखान्यात ज्या महिला राहायच्या त्यांची नाव बाहेर जाहीर करता यायची नाहीत. त्यांना एकतर त्यांच्या जन्मस्थानावरून किंवा शहराच्या देशाच्या नावावरून ओळखलं जायचं.

प्रकरण शहाजहानपर्यंत पोहोचलं

त्यामुळे जेव्हा हिराबाई औरंगजेबाच्या जनानखान्यात आली तेव्हा तिला 'जैनाबादी महल' म्हणून ओळखलं गेलं.

मसर-अल-उमराहनुसार, "जगापासून अलिप्त असूनही औरंगजेबाच्या नावाची चर्चा सगळीकडे सुरू होती. जैनाबादीच्या प्रेमात तो इतका दिवाना झाला होता की, तो त्याच्या हाताने दारूचे पेले भरून तिला द्यायचा आणि तासनतास तिचं रूप न्याहाळत बसायचा. असं म्हणतात की, एकदा या जैनाबादीने आपल्यावरच प्रेम सिद्ध करण्यासाठी दारूचा प्याला औरंगजेबाच्या तोंडाला लावला होता.

औरंगजेबाने माझी आणि माझ्या प्रेमाची परीक्षा घेऊ नकोस म्हणून विनवण्या केल्या. मात्र जैनाबादी काही ऐकायला तयार नव्हती. तिला औरंगजेबाची अजिबात दया आली नाही. शेवटी औरंजेबाने तो दारूचा प्याला आपल्या ओठांना लावला. इतक्यात तो प्याला जैनाबादीने खेचून घेतला आणि म्हणाली की, मला फक्त आपल्या प्रेमाची परीक्षा घ्यायची होती."

या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या आता शहाजहानपर्यंत पोहचू लागल्या होत्या. किंबहुना घटनांची नोंद ठेवणाऱ्या लोकांपर्यंतही या बातम्या येऊ लागल्या होत्या.

रामानंद चॅटर्जी लिहितात की, औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह याने ही घटना आपल्या वडिलांच्या म्हणजेच शाहजहानच्या कानावर घातली.

यावेळी दारा शिकोह म्हणाला, "या पाखंड्याची हिंमत तर बघा, याने आपल्या मावशीच्या घरातील दासी आणून स्वतःला बरबाद करून घेतलंय."

जैनाबादी 1653 च्या नोव्हेंबर महिन्यात एक महिन्यासाठी औरंगजेबासोबत दौलताबादला गेली होती. 1654 मध्ये तिचा मृत्यू झाला.

मौलाना आझाद लिहितात की, औरंगजेबासाठी हा मोठा धक्का होता. त्याने त्याच दिवशी शिकारीवर जाण्याचा निर्णय घेतला. अशा शोकाच्या प्रसंगी शिकारीवर जाणं योग्य आहे का म्हणत त्याच्या या निर्णयाचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

औरंगजेब शिकार करण्यासाठी महालातून बाहेर पडल्यावर त्याचा सेनापती मीर-ए-अस्कर अकिल खान रझी म्हणाला, अशा दुःखद प्रसंगी जाणं योग्य ठरणार नाही असं आम्हाला वाटतं.

यावर प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबाने एक फारसी शेर ऐकवला आणि म्हटलं की, 'घरात उर बडवून मला शांतता मिळाली नाही, जंगलात जाऊन मनसोक्त रडता येईल.

त्यावर आकील खानच्या तोंडून आपसूकच एक शेर बाहेर पडला. त्याचा अर्थ होता की, 'प्रेम किती जरी सोपं दिसत असलं तरी ते अवघड होतं. विरह खूप कठीण होता मात्र प्रियकराने तो सहज स्वीकारला.'

हा शेर ऐकून औरंगजेब भावूक झाला. त्याने त्याच्या शायरा विषयी विचारलं. त्यावेळी आकील खान म्हणाला की, हा शेर त्या व्यक्तीचा आहे ज्याला आपली गणना शायर म्हणून व्हावी असं वाटतं नाही. त्यामुळे हा शेर आकील खानचा असल्याचं औरंगजेबाला समजलं. त्याने त्याची खूप प्रशंसा केली.

इटालियन प्रवासी आणि लेखक (1639-1717) निकोलाव मनुची लिहितो, "या काळात औरंजेब प्रार्थना करणं पूर्णपणे विसरून गेला होता. फक्त नाचगाणं यातच त्याचे दिवस जायचे. ज्या दिवशी त्या नर्तकीचा मृत्यू झाला त्या दिवशी औरंगजेबाने शपथ घेतली की तो कधीही दारू पिणार नाही आणि गाणंबजावणं करणार नाही."

तो नंतरच्या काळात तर असं म्हणू लागला की, नर्तकीचा मृत्यू झाला हे देवाने त्याच्यावर उपकार केले. तिच्यामुळे मी वाईट नादाला लागलो होतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)