'...तर अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळेल' - उज्ज्वल निकम #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. '...तर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल'- उज्ज्वल निकम
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यात सत्तांतरानंतर पहिलीच निवडणूक होत आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगात पोहोचला आहे. अशावेळी या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार उतरवला तर शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत बोलताना कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हटलं की, "या पोटनिवडणुकीत शिंदे गटानं आपला उमेदवार दिला तर निवडणूक आयोगापुढे पेच निर्माण होऊ शकतो. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला गेला तर आयोग चिन्ह गोठवू शकतं."
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळू शकते, अशी शक्यता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातून शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमदेवारी दिली आहे. शिंदे - फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणुकीमध्ये भाजप आपला उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे.
2. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेला सुरूवात
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे.
ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, रश्मी ठाकरे यांचं नवरात्रीतील शक्तीप्रदर्शन याद्वारे एकनाथ शिंदेंना ठाण्यात शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरु आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/FACEBOOK
दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 9 ऑक्टोबरला सभा घेणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी ही सभा पार पडेल. या सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे.
महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनेच होणार आहे.
साम टीव्हीने ही बातमी दिली आहे.
3. RSS मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडत आहे- सुप्रिया सुळे
आरएसएस मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
"भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक म्हणून आरएसएसला ओळखलं जातं. त्यांना महागाई वाढली आहे हे मान्य करायचं नाही आहे. त्या सगळ्यांनी यासंदर्भात झोपेचं सोंग घेतलं आहे. महागाईवर बोललो तर समाजात अंतर पडायला लागतं असं म्हणतात. मात्र समाजात अंतर आम्ही पाडलं नाही, आरएसएस मार्गदर्शक असलेला भाजपने समाजात अंतर पाडले आहे," असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

फोटो स्रोत, @SUPRIYASULE
खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (3 ऑक्टोबर) बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यामध्ये शिरसुफळ गावात असलेल्या शिरसाई मंदिरात जाऊन सुप्रिया सुळे यांनी शिरसाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.
"शिंदे- फडणवीसांनी सत्ता ओरबाडून घेतली आहे. सत्तेत आलेल्यांना जनतेची सेवा करायची नाही. पालकमंत्रीदेखील आपल्या जिल्ह्याचे नाहीत. मात्र सगळं असलं तरीही विकासकामे झाली पाहिजे," असं म्हणत त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
4. नॅशनल हेराल्ड प्रकरणी डी. के. शिवकुमारांना ईडीचे समन्स
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली 'भारत जोडो यात्रा' कर्नाटकात पोहोचली आहे. 3 ऑक्टोबरला या पदयात्रेचा कर्नाटकात चौथा दिवस होता.
ही यात्रा कर्नाटकात असतानाच अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना समन्स बजावलं आहे. नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी हे समन्स बजावल्याचे सांगण्यात येत आहे.

फोटो स्रोत, TWITTER
7 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी डी. के. शिवकुमार यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी सांगितलं,
"एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मला या प्रकरणाबाबात काहीच माहिती नाही. चौकशीवेळी ईडी अधिकाऱ्यांनी माझ्या ट्रस्ट आणि भावाकडून यंग इंडियाला देण्यात आलेल्या पैशांबद्दल विचारलं."
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
5. 'या' भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
राज्यात पावसाचो जोर काहीसा कमी झालाय. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडतोय, तर मान्सूनने देशातील आणखी काही भागांमधून काढता पाय घेतला.
मान्सूनने आता उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा बहुतांशी भाग, मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग, उत्तराखंड, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातून मान्सून परतला आहे. या भागांमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे.
अॅग्रोवनने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








