महात्मा गांधीजींच्या उपोषणावर चर्चिल म्हणाले होते की, 'गांधी अजून मेले नाहीत का?'

फोटो स्रोत, ROLI BOOKS
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1931 सालची ही गोष्ट. लंडनमध्ये गोलमेज परिषद भरणार होती. महात्मा गांधींही या परिषदेत हजर राहणार होते. गांधीजी लंडनच्या दौऱ्यावर आले म्हटल्यावर ब्रिटनचे राजे जॉर्ज पंचम यांनी त्यांना चहापानासाठी निमंत्रित केलं.
गांधीजीही आपलं धोतर पंचा आणि चप्पल अशा वेशात राजवाड्यावर हजर राहिले. गांधीजींचा असा वेश पाहून अख्या ब्रिटनची जनता आश्चर्य व्यक्त करू लागली.
या समारंभानंतर गांधीजींना कपड्यांवरून काही प्रश्न विचारण्यात आले. यात एक प्रश्न असा होता की, सम्राटासमोर अशा कपड्यात जाणं योग्य होतं का? यावर गांधीजी स्मितहास्य करून म्हणाले, "सम्राटाने घातलेले कपडे आम्हा दोघांसाठी पुरेसे होते."
याआधी अगदी सहा महिन्यांपूर्वी, जेव्हा महात्मा गांधींनी व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली होती तेव्हाही ते याच पोशाखात गव्हर्नमेंट हाउसमध्ये गेले होते.
गांधीजींच्या कपड्यांवर टीका करताना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की, "विलायतेतून बॅरिस्ट्री पास झालेला माणूस आता देशद्रोही फकीर झालाय. हा व्यक्ती अशाच कपड्यात व्हाइसरॉयच्या घरात जातो हे धोकादायक आणि घृणास्पद आहे. हा व्यक्ती ब्रिटिश सरकार विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ चालवतो आणि नंतर सम्राटाच्या प्रतिनिधींशी समझोत्याच्या वाटाघाटी करतो."
जॉर्ज पंचम यांच्या भेटीनंतर महिनाभरातच गांधीजींना अटक झाली
गांधीजी गोलमेज परिषदेहून जेव्हा मुंबईला परतले तेव्हा हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर उभे होते.
डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स त्यांच्या 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकात लिहितात, "गांधी बंदरावर स्वागतासाठी आलेल्या लोकांना उद्देशून म्हणाले की, मी रिकाम्या हाताने परतलोय. भारताला पुन्हा एकदा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करावी लागेल.
"सम्राटाच्या राजवड्यावर जाऊन चहापान केलेल्या गोष्टीला एक आठवडाही उलटला नसेल गांधीजी परत सरकारी पाहुणे बनले होते. पण यावेळी मात्र येरवडा जेलमध्ये," असं फ्रीडम मिडनाईटमध्ये लिहिलं आहे.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
पुढची तीन वर्षं गांधीजी तुरुंगात येत जात राहिले. तर तिकडे लंडनमध्ये मात्र चर्चिल गांधीजींबाबत काहीबाही बोलत राहिले, "गांधीला आणि तो ज्यासाठी लढतोय त्या प्रत्येक गोष्टीला चिरडलं पाहिजे."
भारताला स्वातंत्र्य द्यावं म्हणून चर्चिलवर जेव्हा दबाव आला तेव्हा ते म्हटले की, "भारतामधील ब्रिटिश साम्राज्य अस्ताला जावं म्हणून सम्राटाने मला पंतप्रधान बनवलेलं नाही."
1942 मध्ये ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून स्टॅफोर्ड क्रिप्स भारतात पोहोचले. त्यावेळी गांधीजींच्या प्रस्तावावर निर्णय देताना ते म्हटले होते की, "ही योजना एखाद्या बुडणाऱ्या बँकेच्या नावाने काढलेला पोस्ट-डेटेड चेक आहे."
यावर त्यांनी क्रिप्सला संगितले की, "तुमच्याकडे दुसरी कोणती योजना नसेल तर तुम्ही पुढच्या जहाजाने तुमच्या देशात परतू शकता."
8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनात गांधीजींनी अगदी आवेशपूर्ण भाषण केलं होतं जे कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध होतं. ते म्हणाले होते की, "आम्हाला त्वरित स्वातंत्र्य हवंय. आजच रात्री. शक्य असल्यास पहाट उजडण्याच्याही आधी."
पण स्वातंत्र्याची पहाट होण्यापूर्वीचं गांधींना अटक करण्यात आली.
गांधीजींना पुण्यातल्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं
यावेळी इंग्रजांनी गांधीजींना तुरुंगात न डांबता आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं. आगा खान पॅलेस पुण्यापासून पाच मैलांवर होता. या दोन मजली पॅलेसमध्ये नऊ मोठे शयनकक्ष होते. मुख्य इमारतीच्या बाजूला 70 एकराचे अंगण होते ज्यात 12 माळी काम करायचे.
गांधींच्या अटकेनंतर, आर्देशर एडुलजी केटली यांना पॅलेस जेलचे इंचार्ज म्हणून नेमण्यात आलं.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
1932 मध्ये गांधीजींना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथेही केटली इंचार्ज म्हणून काम करत होते. यावेळी पॅलेसचे इंचार्ज म्हणून त्यांच्या मदतीला 76 पोलीस तैनात करण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात महादेव देसाई यांच तुरुंगातच निधन झालं. महादेव देसाई गांधीजींचे स्वीय सहायक होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना कस्तुरबा म्हणाल्या होत्या की, "देसाईंच्या निधनामुळे बापूंनी आपला उजवा आणि डावा हात गमावला आहे."
गांधींनी 21 दिवस उपोषण करण्याचा निर्णय घेतला
तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांमुळे गांधी खूप व्यथित झाले होते. या वृत्तपत्रात म्हटलं होतं की, "गांधींनी ब्रिटिशांच्या शत्रू राष्ट्रांशी संगनमत केलं आहे. सरकारने तर असं ही म्हटलं होतं की, गांधीजींच्या अटकेमुळे जो हिंसाचार उसळला होता त्याला तेच जबाबदार आहेत."

फोटो स्रोत, ROLI BOOKS
या आरोपांमुळे दु:खी झालेल्या गांधींनी व्हाईसरॉय लिनलिथगो यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी 9 फेब्रुवारीपासून 21 दिवस उपोषण करणार असल्याचं सांगितलं.
लिनलिथगो यांनी गांधींना उत्तरादाखल पत्र पाठवलं. त्यात ते म्हणतात की, "राजकीय कारणांसाठी उपोषण करणे याकडे मी राजकीय ब्लॅकमेलिंग म्हणून पाहतो. त्यामुळे हे उपोषण नैतिकदृष्ट्या कधीही न्याय ठरू शकत नाही."
याआधी जेव्हा-जेव्हा गांधींनी उपोषण केलं, तेव्हा तेव्हा त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. मात्र यावेळी लिनलिथगो आणि चर्चिल यांचे हेतू थोडेसे वेगळे होते.
चर्चिलने दिल्लीत एक नोटीस पाठवली. या नोटिशीत म्हटलं होतं की, "जर गांधींना उपाशी राहून मरायचं असेल तर त्यांना याचं स्वातंत्र्य आहे."
आर्थर हर्मन आपल्या 'गांधी अँड चर्चिल द एपिक रायव्हलरी द डिस्ट्रॉयड द एम्पायर अँड फोर्ज्ड अवर एज' या पुस्तकात लिहितात, "गांधींनी उपोषण सुरू करण्याआधी दोन दिवस सरकारने त्यांना तुरुंगातून बाहेर पडण्याची ऑफर दिली होती. सरकारी प्रस्तावानुसार ते उपोषण करू शकतात. तसेच त्यांना जिथं जायचं असेल तिथं ते जाऊ शकतात. पण उपोषण संपल्यानंतर त्यांना आगाखान पॅलेसमध्ये परतावं लागेल. गांधींनी मात्र ही ऑफर नाकारली."
गांधींचं उपोषण हे चर्चिलच्या नजरेत नाटक होतं
गांधीजींनी 9 फेब्रुवारीऐवजी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केलं. यावर मीरा बेन लिहितात, "तिसर्या दिवशी गांधीजींना उलट्या होऊ लागल्या. पाचव्या दिवशी ते खूप अशक्त आणि थकलेले दिसले. त्यांनी गीतेचे पाठ करणंही बंद केलं होतं."
व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत जे भारतीय सदस्य होते त्यांनी गांधीजींना सोडण्यासाठी व्हाइसरॉयवर दबाव आणायला सुरुवात केली. मात्र लिनलिथगो यांनी आपला हेका सोडला नाही.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
गांधीजींचं उपोषण सुरूच होतं. आता उपोषणाचा दुसरा आठवडा सुरू होता त्याच काळात कार्यकारी परिषदेत असणाऱ्या एमएस अॅनी, सर होमी मोदी आणि नलिनी रंजन सरकार यांनी निषेध म्हणून आपापल्या पदांचा राजीनामा दिला.
त्यावेळी कॅसाब्लांका इथं मित्र राष्ट्रांची परिषद भरली होती आणि चर्चिल त्या परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. पण तरीही त्यांना गांधींच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्यात येत होती. थोडक्या चर्चिल गांधीजींवर लक्ष ठेऊन होते.
आर्थर हर्मन लिहितात, "गांधीजींचे उपोषण म्हणजे रस्त्यांवरची नाटकं आहेत अशी चर्चिल यांची समजूत होती. भलेही भारतीयांच्या दृष्टीने गांधीजी मोठे असतील पण चर्चिल यांची मतं वेगळीच होती. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती फील्ड मार्शल जॅन स्मट्स यांनी चर्चिल यांना गांधीजींच्या हेतूंविषयी सावध केलं होतं. चर्चिल यांच्या मनात स्मट्सबद्दल खूप आदर होता.
"त्यांचे विचारही मिळते जुळते होते. पण गांधींबद्दल त्यांची मत वेगळी होती. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना स्मट्स यांचा गांधीजींशी संबंध आला होता, त्यामुळे त्यांनी चर्चिल यांना सांगितलं होतं की तुम्ही गांधींना हलक्यात घेऊ नका. पण चर्चिल यांनी त्यांच्या इशाऱ्याची चेष्टा केली," हर्मन लिहितात.
गांधींची प्रकृती बिघडली
19 फेब्रुवारी रोजी सुशीला नय्यर त्यांच्या डायरीत लिहितात, "कालचा उपोषणाचा आठवा दिवस होता. या काळात गांधीजींची तब्येत फारच बिघडली होती. दिवसभर त्यांचं डोकं दुखत होतं. डोकं दुखून दुखून आता फुटेल असं त्यांना वाटत होतं. त्यांनी बोलायचं बंद केलं, ऐकणं पाहणंही बंद केलंय."
दुसर्या दिवशी दुपारपर्यंत ते ठीक होते. मात्र दुपारनंतर त्यांची अस्वस्थता परत वाढली. ते डोळे मिटून बेडवर निपचित पडून होते. त्यांचा आवाज धीमा झाला होता. आता एका कुशीवरून वळायची किंवा मग पाय पसरायची ताकदही त्यांच्यात उरली नव्हती.
20 फेब्रुवारी रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सीचे सर्जन जनरल गांधीजींना बघायला आले आणि तेव्हा ते म्हणाले की, गांधीजींचा शेवट आता जवळ आलाय.
21 फेब्रुवारीला दिल्लीत महत्वाच्या लोकांची एक बैठक भरली. त्यांनी व्हाईसरॉयला अपील करत म्हटलं की, "गांधीजी जिवंत राहिले तर शांतता आणि सद्भावना वाढीसाठी मार्ग मोकळा राहील असं आम्हाला वाटतं. पण ब्रिटिशांच्या कैदेत जर त्यांचा मृत्यू ओढवला तर गोष्टी बदलतील, लोकांमध्ये वैरभावना वाढेल."

फोटो स्रोत, ROLI BOOKS
हा प्रस्ताव ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना टेलिग्रामद्वारे पाठवण्यात आला.
यावर चर्चिल यांनीही लागलीच उत्तर धाडलं. ते आपल्या उत्तरात म्हणतात की, "गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना ज्या कारणासाठी अटक करण्यात आली आहे त्याची त्यांना माहिती देण्यात आली आहे. स्वतःची ही परिस्थिती ओढवण्यामागे खुद्द गांधी जबाबदार आहेत."
पाण्यासोबत ग्लुकोज दिल्याचा संशय
13 फेब्रुवारी रोजी चर्चिलने लिनलिथगो यांना एक पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात की, "माझ्या ऐकण्यात असं आलंय की, गांधींनी उपवास करण्याचं ढोंग करून पाण्यासोबत ग्लुकोज घेतलं आहे. तुम्ही याची पडताळणी करू शकता का?"
लिनलिथगोने यांनी याची पडताळणी केल्यावर हे खोटं असल्याचं उत्तर पाठवून दिलं. गांधीजींची तब्येत ढासळत असताना तिकडे चर्चिलही गंभीर आजारी पडले होते आणि हा एक विचित्र योगायोग होता.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
अल्जीयर्सहून परतल्यानंतर आठवडाभरात त्यांना सर्दीचा त्रास सुरू झाला. 16 फेब्रुवारीला त्यांना खूप ताप आला. दुसऱ्या दिवशी त्यांचा एक्स-रे काढला असता त्यांच्या फुफ्फुसावर डाग दिसला. त्यांना न्यूमोनिया झाल्याचं निदान झालं होतं.
त्यावेळी चर्चिल 70 वर्षांचे होते आणि या वयात न्यूमोनिया होणं गंभीर समजलं जातं. 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत चर्चिल काम करण्याच्या मनस्थितीत नव्हते.
गांधीजींच्या ढासळत्या तब्येतीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनीही चिंता व्यक्त केली होती. तशा आशयाची तार त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्रिटीश राजदूत लॉर्ड हॅलिफॅक्स यांच्याकडे पाठवली होती. मात्र यावर चर्चिल यांनी आपला नकार कळवत म्हटलं होतं की, "गांधींविरुद्ध ज्या उपाययोजना केल्या आहेत त्यात ब्रिटिश सरकार कोणत्याही परिस्थितीत बदल करणार नाही."
आजारपणातही चर्चिल यांचा गांधींच्या उपोषणावर डोळा
उपोषणाच्या तेराव्या दिवशी म्हणजेच 23 फेब्रुवारीला गांधीजींची तब्येत खूपच ढासळली.
सुशीला नय्यर या तेराव्या दिवसाबद्दल लिहितात की, "गांधीजींना पाणी बघून मळमळ होऊ लागली. त्यांची नाडी धिम्या गतीने सुरू आहे. ते आता जवळपास बेशुद्धावस्थेतचं आहेत."
तर दुसरीकडे चर्चिल आजारी असतानाही गांधींच्या उपोषणावर लक्ष ठेवून होते. अधून मधून त्यांच्या मनात गांधीजींविषयी एक प्रश्न यायचा तो म्हणजे "गांधींचा मृत्यू कधी होणार?"

फोटो स्रोत, ROLI BOOKS
25 फेब्रुवारी रोजी चर्चिल यांनी ब्रिटनच्या सम्राटाला एक लांबलचक पत्र लिहिलं. त्याच्या शेवटी ते म्हणतात, "हे ढोंगी गांधी अजूनही जिवंत आहेत. मला तर शंका आहे की, त्यांनी केलेलं उपोषण खरं तरी असेल का?"
24 फेब्रुवारी रोजी चर्चिल यांचा ताप उतरला. त्याच दिवशी त्यांनी अमेरिकेचे नेते हॅरी हॉपकिन्स यांना पत्र लिहिलं होतं. त्यात ते म्हणतात की, "मला आता बरं वाटतंय आणि गांधींनाही बरं वाटतंय."
मार्टिन गिल्बर्ट लिहितात, "चर्चिल लिनलिथगो यांना पत्र पाठवून म्हणतात की, बुलेटिन्सवरून तर असं दिसतंय की, गांधी नक्कीच वाचले आहेत. त्यांना एखाद्या हिंदू डॉक्टरने पाण्यातून ग्लुकोज दिल्याची दाट शक्यता आहे."
गांधींनी उपोषण सोडलं म्हणून चर्चिल नाराज झाले
चर्चिलने फील्ड मार्शल स्मट्स यांना 26 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय की, "गांधींचा मरायचं हेतू होता असं मला जराही वाटत नाही."

फोटो स्रोत, ROLI BOOKS
या उपोषणात गांधींच वजन 20 पौंडांनी कमी झालं होतं. पण दुसऱ्या दिवशी ते शांत झोपले.
सुशीला त्या दिवशी आपल्या डायरीत लिहितात की, "गांधींना आज सकाळी थोडं बरं वाटत होतं. त्यांचा आवाज थोडा बरा वाटलं. त्यांनी विश्रांती घेतल्यामुळे प्रसन्न दिसत आहेत."
21 दिवसांनंतर गांधींनी उपोषण सोडले
3 मार्च रोजी कस्तुरबांनी गांधीजींना एक ग्लास संत्र्याचा रस दिला. 21 दिवस मीठाचं पाणी आणि अधून मधून लिंबू किंवा मोसंबीचा एक दोन थेंब रस पिऊन गांधीजी तग धरून होते. या दिवसांत त्यांचं मनोबल यत्किंचितही खचलं नाही.
स्वतःवर लादलेल्या यातना त्यांनी सहन केल्या. पण या बातमीमुळे चर्चिल यांना अजिबात आनंद झाला नाही.
त्यांनी व्हॉईसरॉय लिनलिथगोला टेलिग्राफ करून म्हटलं की, "हा दुष्ट म्हातारा आपल्या खोट्यानाट्या उपोषणानंतर अजूनच चांगला झाला आहे."
बंगालमध्ये दुष्काळामुळे लाखो लोक मरण पावले
विशेष म्हणजे इकडे गांधीजींच उपोषण सुरू होतं आणि तिकडे बंगालमध्ये भयाण दुष्काळ पडला होता. लाखो लोक अन्नपाण्यावाचून तडफडून मरत होते.
बर्मामध्ये (आजचा म्यानमार) ब्रिटनचा पराभव झाला होता. त्यामुळे तिथून मिळणारा तांदूळ बंद झाला होता. बंगालचं सरकार या संकटाला तोंड देण्यासाठी तयार नव्हते.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
ऑक्टोबर 1942 मध्ये पूर्व बंगालच्या किनारी भागात एक प्रचंड मोठं समुद्री वादळ आलं. या वादळात हजारो लोकांचा बळी गेला होता. किनारपट्टी लगत 40 किलोमीटर पर्यंतचं भाताचं पीक नष्ट झालं होतं.
ख्रिस्तोफर बेली आणि टिम हार्पर त्यांच्या 'फॉरगॉटन आर्मीज फॉल ऑफ ब्रिटीश एशिया 1941-1945' या पुस्तकात लिहितात,
"ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कलकत्त्यात दर महिन्याला सरासरी 2000 लोक मृत्यमुखी पडायचे. परिस्थिती अशी होती की, ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिक चित्रपट पाहून जेव्हा थिएटरच्या बाहेर यायचे तेव्हा रस्त्यावर भुकेने तडफडून मृत्यू झालेल्या लोकांची प्रेत असायची. आणि गिधाड कावळे या मृतदेहांवर चोची मारताना दिसायचे."
बंगालच्या दुष्काळाकडे दुर्लक्ष
व्हाईसरॉय व्हॉव्हेल यांनी बंगालच्या दुष्काळाची हकीकत चर्चिल यांच्या कानावर घातली आणि अन्नधान्य पाठवून देण्याची विनंती केली. तेव्हा चर्चिलने मुद्दामहून भुकेल्या बंगालचं धान्य महायुद्धात लढणाऱ्या ब्रिटीश सैनिकांकडे वळतं केलं.

फोटो स्रोत, ROLI BOOKS
भारतात असणारं अतिरिक्त अन्नधान्य श्रीलंकेत पाठवण्यात आलं. तर ऑस्ट्रेलियातून जी गव्हाने भरलेली जहाज आली होती, ती भारतीय बंदरांवर न थांबवता मध्यपूर्वेत पाठवण्यात आली.
अमेरिका आणि कॅनडाने भारताला अन्न पाठवण्याची ऑफर दिली पण तीही नाकारण्यात आली.
व्हाइसरॉय व्हॉव्हेल यांनी दुष्काळग्रस्त बंगालसंबंधी माहिती देणारी एक तातडीची तार चर्चिल यांना पाठवली होती. मात्र चर्चिलने त्याकडे दुर्लक्ष तर केलंच पण जेव्हा बंगालचा मृत्यूचा आकडा वाढतोय याची माहिती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चर्चिलला दिली तेव्हा ते रागाने म्हणाले की, "गांधी अजून मेले नाहीत का?"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








