नवरात्र 2022: मुंबईच्या दांडियात यंदा काय राजकारण रंगतंय?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईच्या राजकारणात यंदाच्या मोसमात अनेक रंग आले आहेत. अगदी जवळ आलेली महापालिका निवडणूक हे त्याचं मुख्य कारण. मुंबईच्या निवडणुकीतली मुख्य लढाई ही शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच असणार आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या गटानं आणि त्यांच्याशी जवळीक वाढवलेल्या राज ठाकरेंच्या 'मनसे'नं त्याचा प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.

अनेक प्रकारे चाली या खेळाडूंकडून रचल्या जात आहेत. पण वरवर दिसणा-या आणि बोलल्या जाणाऱ्या राजकारणापेक्षाही अनेक प्रकारे निवडणुकीअगोदर आपला प्रभाव सिद्ध करण्याचे प्रयत्नही होत आहेत. त्यातलाच एक प्रयत्न यंदाच्या नवरात्री महोत्सवात आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या गरबा-दांडियाच्या उत्सवांमध्येही दिसतो आहे.

जसं गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांपैकी जास्तीत जास्त मंडळं आपल्याकडे खेचून घेण्याच्या पक्षांचा प्रयत्न असतो, तसंच लगेचच येणाऱ्या नवरात्रोत्सवातही असतो. प्रश्न श्रद्धेचा तर आहेच, पण दांडियात मोठ्या संख्येनं येणा-या तरुणाईला आपल्या बाजूनं खेचण्याचाही असतो. ही मंडळं, त्यांचे कार्यकर्ते राजकीय पक्षांसाठी त्या त्या भागामध्ये प्रभाव निर्माण करतात.

त्यामुळेच कोरोनामुळे दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर होत असलेल्या नवरात्रोत्सवात राजकीय पक्षांनी मोठी उडी मारलेली पहायला मिळते आहे. दांडियाच्या निमित्तानं वेगळ्या प्रकारचं राजकारणही मुंबईमध्ये पहायला मिळतं आहे.

भाजपाचा 'मराठी' दांडिया

नवरात्रीत खेळला जाणारा दांडिया ही गुजरातची परंपरा. पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतही आणि इतरही अनेक राज्यांमध्ये,शहरांमध्ये गरबा-दांडियाची कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. पण यंदा निवडणुकीच्या धामधुमीत या दांडियाच्या निमित्तानं मराठी कार्डही खेळलं जातं आहे आणि तेही भाजपाकडून.

मध्य-मुंबई,शिवसेनेचा अनेक वर्षं गड आहे, तिथं भाजपानं यंदा मराठी दांडियाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. अवधूत गुप्ते, नंदेश उमप सारखे सेलिब्रिटी गायक यामध्ये चेहरा असणार आहेत. मुंबईभर सगळीकडे या मराठी दांडियाची मोठी जाहिरात केली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी आणि अमराठी मतं महत्वाची आहेत. मराठी मतं ही पारंपारिकरित्या शिवसेनेकडे आणि काही 'मनसे'कडे जातात अशी धारणा आहे. पण भाजपाची मदार बहुतांशी अमराठी मतांवर आहे. मुंबईच्या उपनगरांतल्या अमराठीबहुल भागांमध्ये अधिक मतं गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांना सातत्यानं मिळत आलेली आहेत. पण तरीही यंदा महापालिकेवर सत्ता मिळवायचीच असा निश्चय केलेल्या भाजपाला मराठीबहुल मतांमध्येही आघाडी घ्यायची आहे.

शिवसेनेकडे असणा-या पारंपारिक मराठी मतदारांमध्ये यंदा पक्षातल्या फुटीनंतर निर्माण झालेल्या शिंदे गटाकडून आणि राज यांच्या अलिकडच्या सभांनंतर आक्रमक झालेल्या 'मनसे'कडून अधिक हिस्से निर्माण असं म्हटलं जातं आहे. साहजिक आहे की याचा तोटा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसेल. पण केवळ या गृहितकावर भाजपा थांबली आहे असं दिसत नाही. त्यासाठीच मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी दांडिया उत्सव यावर्षी घेतला जातो आहे असं म्हटलं जात आहे.

याला अजूनही एक रंग आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर 'हिंदुत्ववादी सरकार आले' अशा प्रकारे दोन्ही गटांकडून वारंवार सांगितले गेले. भाजपानं मुंबईभर हे सरकार आल्यावर 'हिंदू सणांवरचे संकट दूर झाले' अशा केलेल्या जाहिरातीही चर्चेच्या विषय ठरल्या. सणांच्या काळात भाजपा हिंदुत्वाचा हा मुद्दा आत दांडिया आणि नवरात्रोत्सवातही पुढे आणते आहे हे दिसतं आहे. केवळ काळाचौकीचाच नाही तर जवळपास शहरातल्या जवळपास तीनशे दांडिया उत्सवांशी भाजपा जोडली गेली आहे.

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलतांना म्हणाले की ,"भाजपानं सणांच्या माध्यमातून कायमच लोकांपर्यंत पोहोचयला प्राध्यान्य दिलं आहे. यामागे कोणतंही राजकीय कारण नाही. आम्ही या दहा दिवसांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आम्ही स्वत: काही व्यासपीठं उपलब्ध करुन दिली आहेत आणी काही ठिकाणच्या उत्सवात आम्ही सहभागी झालो आहोत."

भाजपा जरी यात राजकारण नाही असं म्हणत असलं तरीही ते कोणापासूनही लपून राहिलेलं नाही आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई दौ-यावर आलेल्या गृहमंत्री अमित शाहांनी मुंबई महापालिकेसाठी 150 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य दिलं आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत 82 सदस्यांपर्यंत येऊन पोहोचलेली भाजपा यावेळेस दांडियांच्या आयोजनातून सगळ्या वॉर्ड्समध्ये आपली पाऊलं घट्ट करू पाहत आहे.

'कमळाबाईच्या दांडियाने मराठी इंचभरही हलणार नाही'

दुस-या बाजूला शिवसेना आणि शिंदे गटामध्येही नवरात्रीच्या उत्सवात चढाओढ दिसते आहे. जेव्हापासून मुंबईत शिवसेनेचा उदय झाला आणि विशेषत: त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला तेव्हापासून शहरातल्या सणांच्या उत्सवांचा संबंध सेनेशी जोडला आहे. अनेक मंडळं, सोसायट्या, तिथले गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव, गरबा यामध्ये पहिल्यापासून सेनेचं वर्चस्व राहिलं आहे. यंदाच्या राजकीय परिस्थितीत त्या वर्चस्वालाही आव्हान दिलं जात आहे.

भाजपाच्या मराठी दांडियाची चर्चा सुरू होताच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून त्यावर कडाडून टीका करण्यात आली. 'सामना'नं म्हटलं,"शिवसेना प्रमुखांनी केलेली शिवसेनेची रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियानं इंचभरही हलणार नाही. शिवसेना शिल्लक आहे म्हणून मराठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. शिवसेनेवर पाठिमागून घातकी वार करणा-यांनी शिवसेनेनेच स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे. गर्वाने मराठीपणाचे कवचकुंडले दिली, आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत."

'मराठी-गुजराती एकत्र येऊ शकतात हा संदेश'

राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते भाजपचा हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न आहे. "सेनेशी प्रामाणिक असलेला मराठी वर्ग आपल्याकडे काहीही करून वळवायचा हा भाजपाचा प्रयत्न दिसतो आहे. हा मराठी वर्ग हा बहुतांशी मध्य मुंबईत लालबाग, परळ या भागात आहे. तो मध्यमवर्गीय चाळीतला मराठी माणूस आहे. सध्याच्या परिस्थितीत हाच तो मराठी मतदार आहे ज्यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना अवलंबून राहू शकते."

"त्यामुळे त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी भाजपाला वाटतं आहे की सण, उत्सव, दांडिया यासारखे उपक्रम कामी येतील. त्यामुळे ते या मतदारांपर्यंत पोहोचतील, मात्र त्यांची मतं मिळतील का हे मात्र पहावं लागेल. त्याचबरोबर मला हेही वाटतं की गुजराती मतं भाजपाला मिळतात आणि त्यांची प्रतिमाही तशी आहे. पण 'मराठी दांडिया' या शब्दप्रयोगातूनही मराठी-गुजराती एकत्र येऊ शकतात हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे,' असं नानिवडेकर म्हणतात.

सध्या मुंबईभर सर्वत्र नवरात्रोत्सवाच्या मंडपांबाहेर राजकीय पक्षांचे फलक लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटानंही जे शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात, तिथे आपले फलक लावले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सेनेनंही सर्वत्र त्यांचे उत्सव नजरेत भरतील असा प्रयत्न केला आहे. या सगळ्यात आणि मराठी दांडियाच्या होणा-या चर्चेमुळे मतदार कोणाकडे कसे जाणार मात्र तूर्तास समजणं अवघड आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)