सुरतमध्ये अँम्बुलन्समधून बनावट 25 कोटी रुपये जप्त

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा घेतलेला आढावा.

1. सुरतमध्ये अँम्बुलन्समधून 25 कोटी रुपये जप्त

सुरतमध्ये पोलिसांनी 25 कोटी रुपयांच्या बनावट नोटा अँब्युलन्समधून जप्त केल्या आहेत. ही माहिती सूरतचे पोलीस अधीक्षक हितेश जोयसर यांनी दिली आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर ही अँब्युलन्स थांबवण्यात आली. तपासणी केल्यावर 2000 च्या खोट्या नोटांचे 1290 पाकिटं जप्त करण्यात आले. अमर उजालाने ही बातमी दिली आहे.

या नोटांचं निरीक्षण केलं असता त्यावर रिझर्व्ह बँकेऐवजी रिव्हर्स बँक लिहिल्याचं आढळून आलं आहे. हैदराबादमध्येही 1.24 कोटी रुपये असेच जप्त करण्यात आले होते.

2. ज्ञानवापी मशीद प्रकरणाला 'राष्ट्रीय महत्त्व'- कोर्ट

ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिर वादात ज्या जागेवर मुस्लीम आणि हिंदू धर्माच्या लोकांनी पूजेच्या अधिकाराचा दावा केला आहे त्या जागेबाबत एक व्यक्तिगत शपथपत्र दाखल करण्याचा आदेश पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. बार अॅन्ड बेन्च वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

न्या. प्रकाश पाडिया म्हणाले की हे राष्ट्रीय पातळीवरचं प्रकरण आहे आणि 1991 पासून प्रलंबित आहे. म्हणून महासंचालकांनी या आदेशाचं पालन करावं असं न्यायालयाने म्हटलं आहे.

महासंचालक सध्या आजारी असून त्यांना सक्तविश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे या संदर्भात अतिरिक्त वेळ मागून घेतला आहे. या आधीचं प्रतिज्ञापत्र अतिशय त्रोटक असल्याचं न्यायालयाचं मत आहे.

3. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस

मुंबई महापालिका कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना 22 हजार 500 रुपये; तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं.

पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसंच अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली. सकाळ ने ही बातमी दिली आहे.

'कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे, पण चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,' असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना 'आनंदात दिवाळी साजरी करा, पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,' असं आवाहन केलं.

4. केरळ उच्च न्यायालयाने PFI ला ठोठावला 5.2 कोटींचा दंड

केरळच्या राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 23 सप्टेंबरला संप पुकारला होता. हा संप बेकायदेशीर होता. या संपाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं होतं. त्याची नुकसानभरपाई म्हणून केरळ उच्च न्यायालयाने PFI या संघटनेला 5.2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. PFI ही संघटना या संपात सहभागी झाली होती. या संघटनेच्या सचिवांना हा आदेश दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

न्या. ए.के. जयशंकरन नाम्बियार आणि न्या. मोहम्मद सीपी यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार PFI च्या सचिवांना या बेकायदेशीर संपाशी निगडीत सर्व खटल्यांमध्ये मुख्य आरोपी करण्याचे आदेश दिले आहेत.

5. अभिजित बांगर ठाणे महापालिकेचे आयुक्त

सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. 44 सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या.

ठाणे पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर नवी मुंबई आयुक्तपदी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

वल्सा नायर-सिंह यांची गृहनिर्माण, मनीषा म्हैसकर (मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदाबरोबरच मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त कार्यभार), प्रदीप व्यास (आदिवासी विकास), प्रवीण दराडे (पर्यावरण), हर्षदिप कांबळे (उद्योग), मिलिंद म्हैसकर (उत्पादन शुल्क व नागरी उड्डयण), संजय खंदारे (आरोग्य), अश्विनी जोशी (वैद्यकीय शिक्षण), सौरभ विजय (पर्यटन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तुकाराम मुंढे यांचीही (आयुक्त, आरोग्य ) बदली करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)