बायकोची हत्या धार्मिक कारणावरून की घरगुती भांडण विकोपाला गेल्यामुळे?

मुंबईच्या टिळकनगर भागात पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की आमची मुलगी तिच्या सासरचे रितीरिवाज पाळत नव्हती त्यातून हे नवरा बायकोचे भांडण झाले आणि हत्या झाली.

पण पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे की ही 'हत्या घरगुती वादातून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. याचा धार्मिक तणावाशी संबंध नाही.'

मुंबईतील टिळकनगर भागात मुस्लिम पतीने आपल्या हिंदू पत्नीची गळा चिरून हत्या केलीय. ही घटना 26 सप्टेंबरला (सोमवारी) संध्याकाळी घडली.

पोलिसांनी 36 वर्षीय इक्बाल शेखला पत्नी रूपाली चंदनशिवेच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपालीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की मुस्लीम रितीरिवाज पाळत नाही, बुरखा घालत नाही, घटस्फोट आणि मुलाचा ताबा मागते या रागातून इक्बालने रूपालीची हत्या केली.

तीन वर्षांपूर्वी इक्बाल आणि रुपालीचा आंतरधर्मीय प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्याकाही महिन्यांपासून पतीशी पटत नसल्याने रुपाली वेगळी रहात होती.

कधी घडली घटना?

ही घटना घडली सोमवारी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास पूर्व मुंबईच्या चेंबूर भागातील टिळकनगर परिसरात.

तीन वर्षापूर्वी इक्बाल आणि रूपालीचं लग्न झालं. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. पण, गेल्याकाही महिन्यांपासून रूपाली आणि इक्बालमध्ये अनेक कारणांवरून खटके उडत होते. त्यामुळे रूपाली वेगळी रहात होती.

26 सप्टेंबरला (सोमवार) संध्याकाळी इक्बाल रूपाली रहात असलेल्या परिसरात गेला. त्यांच्यात जोरदार भांडण झालं. रूपालीने घटस्फोटाची मागणी केली. त्याचसोबत दोन वर्षाच्या मुलाची कस्टडी मागितली. त्यामुळे वाद विकोपाला गेला. त्यानंतर इक्बालने भररस्त्यात रूपाली वर चाकूने वार करून पळ काढला.

पोलिसांच्या माहितीनुसार, "रूपालीच्या हत्येची माहिती शेजाऱ्यांनी रूपालीच्या कुटुंबीयांना दिली. रूपालीची बहीण आणि इतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. रूपाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रूपालीच्या मानेवर आणि हातावर वार करण्यात आले होते."

रूपालीला उपचारांसाठी मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रूपालीचा मृत्यू झाला.

बुरखा घालण्यास नकार दिल्याने झाली रूपालीची हत्या?

20 वर्षीय रूपाली चंदनशिवे आणि इक्बालचं आंतरधर्मीय लग्न झालं होतं. लग्नानंतर रूपालीने आपलं नाव बदलून झारा असं ठेवलं होतं.

या घटनेबाबत माहिती देताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास राठोड सांगतात, "मृत मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की रूपालीवर मुस्लिम समाजाचे रितीरिवाज पाळण्याचा आणि बुरखा घालण्याचा दबाव टाकण्यात येत होता. पण, रूपाली तसं करत नव्हती."

बुरखा घालण्यावरून आणि मुस्लिम रितीरिवाज पाळण्यावरून रूपाली, इक्बाल आणि त्याच्या कुटुबीयांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे गेल्याकाही महिन्यांपासून रूपाली वेगळी रहात होती.

विलास राठोड पुढे सांगतात, "26 सप्टेंबरला इक्बालने रूपालीला फोन केला. त्यांचं भांडण झालं. रूपालीने घटस्फोट मागितला. मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. या रागातून इक्बालने रूपालीची हत्या केली असा मृत मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे."

पोलिसांनी इक्बालला अटक करून कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने इक्बालची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल काळे म्हणाले, "घरगुती वादातून ही हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा लव्ह-जिहादशी काही संबंध नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)