You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॅक वॉटर : 200 रुपये लीटर असलेलं 'काळं पाणी' खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे?
- Author, राजेश पेडगडी
- Role, बीबीसी तेलुगू
काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. तिच्या हातात 'ब्लॅक वॉटर' असलेली एक बाटली होती.
'काळं पाणी' भरलेली ती बाटली पाहून तिथं उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकाने या बाटलीमध्ये विशेष असं काय आहे हे विचारल्यावर काजलनं म्हटलं, "हे चांगलं पाणी आहे, एकदा पिऊन बघ तुम्हालाही आवडेल."
पुढं एकाने तिला 'ती कधीपासून हे पाणी पिते आहे,' असं विचारलं. त्यावर काजलने आपण बऱ्याच दिवसांपासून हे पाणी पीत असल्याचं सांगितलं.
अभिनेत्री श्रुती हसननेही 'ब्लॅक वॉटर' पीत असल्याचा एक व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता.
तिने 'ब्लॅक वॉटर'ने भरलेला ग्लास हातात घेऊन व्हीडिओ तयार केला होता. त्यात ती म्हणते, "मला जेव्हा 'ब्लॅक वॉटर'बद्दल समजलं तेव्हा मला ते थोडं नवीन वाटलं. खरं तर हे पाणी काळं नाहीये, याला 'अल्कलाईन वॉटर' म्हणजे 'क्षारयुक्त पाणी' म्हणतात. याची चव साध्या पाण्यासारखीच असते."
आता फक्त काजल अग्रवाल किंवा मग श्रुती हसन हे 'ब्लॅक वॉटर' पितात असं नाही. हे पाणी पिणाऱ्या अभिनेत्रींची यादी भली मोठी आहे. यात मलायका अरोरा, उर्वशी रौतेला आणि बॉलिवूडच्या अनेक ख्यातनाम अभिनेत्री सामील आहेत.
ब्लॅक वॉटर नेमका प्रकार काय आहे?
ब्लॅक वॉटर म्हणजे 'अल्कलाइन वॉटर' किंवा 'क्षारयुक्त पाणी' किंवा मग त्याला 'आयोनाइझ वॉटर' असंही म्हटलं जातं.
एव्हिडन्स बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन (EBCAM) म्हणते, की जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर घामाचं उत्सर्जन होतं. पण हे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवले जातात.
इबीसीएम पुढं असंही म्हणते की, या पाण्याचा जेव्हा उंदरावर प्रयोग करून पाहण्यात आला तेव्हा त्यात दिसून आलं की, अल्कालाईन पाण्यामुळे शरीराचं वजन प्रमाणात राहतं. यामुळे चयापचय क्रिया सुधारते.
दुसरीकडे काही कंपन्या दावा करतात की, सातपेक्षा जास्त पीएच असलेल्या या 'ब्लॅक वॉटर'मुळे स्किन एजिंग (वृद्धत्व) कमी व्हायला मदत होते. या दाव्याला खरं ठरवेल असा कोणताही पुरावा इबीसीएमच्या संशोधकांना त्यांच्या रिसर्चमध्ये अजूनतरी सापडलेला नाही.
या पाण्यात कोणते घटक असतात?
आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असतं. शरीरातील सर्व अवयव आणि आपली शरीरांतर्गत यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी पुरेशा प्रमाणत पाणी पिणं आवश्यक असतं.
पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात, तर दुसरीकडे शरीराचं तापमान नियंत्रित राहावं, आपल्या अवयवांना खनिजांचा पुरवठा व्हावा किंवा मग आपण जे अन्न खातो ते नीट पचावं यासाठी पाणी आवश्यक असतं.
'ब्लॅक वॉटर' विकणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे की, या सर्व प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे कार्यरत राहाव्या म्हणून ब्लॅकवॉटरमध्ये 70 हून अधिक प्रकारची खनिजं मिसळण्यात आली आहेत. यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखी खनिज आहेत. तसेच प्रत्येक कंपनीच्या पाण्यात वेगवेगळे घटक देण्यात आले आहेत.
या कंपन्या दावे करतात त्याप्रमाणे चयापचय क्रिया सुधारण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, ऍसिडिटी कमी करण्यासाठी, तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे.
साधं पाणी आणि ब्लॅक वॉटरमध्ये फरक काय?
या फरकाबाबत आहारतज्ज्ञ डॉ. रुथ जयशीला सांगतात की, "आपण दररोज जे पाणी पितो त्यात बऱ्याच खनिजांची कमतरता असते. पण आपल्या शरीराला मात्र त्याची आवश्यकता असते. कधीकधी ते मिळाले नाहीत की आपण अनेक आजारांना बळी पडतो."
त्या पुढे सांगतात, "आपण वॉटर प्युरिफायरचं जे पाणी पितो त्याचा पीएच कमी असतो. त्यात अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीराला बऱ्याचदा लागणारे क्षार आणि जीवनसत्त्वाच्या सप्लिमेंटस बाहेरून घ्याव्या लागतात. अशा लोकांसाठी हे 'ब्लॅक वॉटर' उपयोगी ठरू शकतं. पण रेडीमेड पर्याय नेहमीच चांगले असतील असं नाही."
एखादं अन्न किंवा पेय हे आम्लयुक्त (अॅसिडीक) किंवा अल्कधर्मी (अल्कलाईन) आहे की नाही ते त्या पदार्थाची पीएच व्हॅल्यू ठरवते. याचं रीडिंग 0 ते 14 दरम्यान असतं. जर पीएच व्हॅल्यू 1 असेल तर पाणी जास्त अॅसिडीक असतं, तर पीएच 13 असेल तर पाणी मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त म्हणजे अल्कलाईन असतं.
बऱ्याचदा आपण जे पाणी पितो त्याचा पीएच 6 ते 7 च्या दरम्यान असतो. पण अल्कालाईन पाण्याची पीएच लेव्हल जास्त असते. थोडक्यात आपल्या साध्या पाण्याच्या तुलनेत या 'ब्लॅक वॉटर'ची क्षारता जास्त असते.
"आता पीएच जास्त असला की पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे असा त्याचा सरळधोट अर्थ नसतो. तर त्या पाण्यात कोणत्या प्रकारची खनिजं आहेत त्यावर ते पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही ते ठरतं. आता ही खनिजे शरीरात कशाप्रकारे जातील हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे." असं जयशीला सांगतात.
हे पाणी कोणासाठी उपयुक्त ?
बऱ्याच रिसर्चमध्ये असं दिसून आलंय की, काही विशेष आजारांमध्ये रुग्णांना क्षारयुक्त पाणी देणं फायदेशीर असतं.
उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास, पेप्सिन नावचं एन्झाइम आपल्या पोटातील अॅसिडच्या समस्येसाठी जबाबदार असतं. युनायटेड स्टेट्समधील नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या एका रिसर्च मध्ये आढळून आलंय की, 8.8 पेक्षा जास्त पीएच असलेलं पाणी अशा रुग्णाला दिल्यास त्यांना चक्कर येऊ शकते.
दुसरीकडे जपानच्या ओसाका युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिनच्या तज्ञांनी 2018 मध्ये एक रिसर्च केला होता. त्यात असं दिसलं की, अल्कालाईन पाण्याचं सेवन केल्यास पचनशक्ती वाढते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो.
अमेरिकेच्या थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीत केलेल्या रिसर्चनुसार, साध्या पाण्याऐवजी जर अल्कालाईन पाण्याचं सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह सुरळीत होतो.
पण 'द हेल्थलाईन' नावाच्या एका मेडिकल न्यूज वेबसाईटने या तिन्ही रिसर्चचं विश्लेषण केलं आहे. त्यांनी आपल्या विश्लेषणात म्हटलंय की, हे तिन्ही रिसर्च करताना खूपच कमी लोकांवर प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या रिसर्च मध्ये जे रिजल्ट दिले आहेत त्यासाठी आणखी खोलवर अभ्यास करण्याची गरज आहे.
या 'ब्लॅक वॉटर'चे काही दुष्परिणाम आहेत का?
काही रिसर्चमध्ये या ब्लॅक वॉटरचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून आले आहेत.
फिनलंडमधील तुर्कू विद्यापीठाच्या प्रोफेसर मरीना मेर्न यांनी केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलंय की, जर तुम्ही हे पाणी सातत्याने पीत असाल तर तुम्हाला मळमळ, उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. सोबतच तुमच्या शरीरात जे पाणी आहे त्याचा पीएच बदलण्याची शक्यता आहे.
आहारतज्ज्ञ नीता दिलीप यांच्या मते, जास्तं मात्रेत खनिजं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.
"खनिजे आरोग्यासाठी चांगली असतात. पण शरीरात त्याचं प्रमाण वाढलं तर मात्र ती शरीरासाठी अपायकारक ठरतात. यामुळे नव्या रोगांना निमंत्रण मिळू शकतं," असं आहारतज्ज्ञ नीता दिलीप सांगतात.
नीता पुढे सांगतात की, "उदाहरण म्हणून घ्यायचं झालंच तर तुमच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त झालं तर तुम्हाला हायपरक्लेसीमिया होऊ शकतो. तेच लोहाचं प्रमाण जास्त असेल तर हेमोक्रोमॅटोसिस होतो. त्यामुळे आपल्या शरीराला जितकं आवश्यक आहे तितकीच पोषकद्रव्यं घ्यावीत, नाहीतर गंभीर धोके निर्माण होतात."
सेलिब्रिटी या 'ब्लॅक वॉटर'चं सेवन करतात, त्यावर नीता स्पष्ट करतात की, "सेलिब्रेटी 'ब्लॅक वॉटर' घेत जरी असले तरी ते विशेष खबरदारी घेतात. त्यांचे पर्सनल डाएटिशियन असतात. दुसरे वापरतात म्हणून आपण वापरलंच पाहिजे असं काही नसतं. प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगळ्या असतात."
या ब्लॅक वॉटरची किंमत किती?
भारतात जे 'ब्लॅक वॉटर'चे ब्रँड आहेत त्यापैकी Evokus हा सध्या आघाडीचा ब्रँड आहे. ही कंपनी 500 ml च्या सहा बाटल्या 600 रुपयांना विकते आहे.
गुजरातस्थित या कंपनीच्या 'ब्लॅक वॉटर'च्या एका बाटलीमध्ये 32 mg कॅल्शियम, 21 mg मॅग्नेशियम आणि 8 mg सोडियमचं प्रमाण आहे.
'ब्लॅक वॉटर'ची ऑनलाइन विक्री करणारा वैद्य ऋषी नावाचा ब्रँड साध्या पाण्याचीही विक्री करतो. हा ब्रँडच्या 500 ml च्या सहा बाटल्या 594 रुपयांना मिळतात.
म्हणजे या 'ब्लॅक वॉटर'च्या अर्धा लिटरच्या बाटलीमागे तुम्हाला शंभर रुपये मोजावे लागतात.
आता सामान्य माणसं हे पाणी पिऊ शकतात का?
तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे, हे ब्लॅक वॉटर जर कमी प्रमाणात घेत असाल तर कोणताही धोका नाही. मात्र तुमच्या शरीरात ही खनिजं कितपत शोषून घेतली जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
यावर नीता सांगतात, "तुम्ही 'ब्लॅक वॉटर' घ्या, मात्र त्याची शरीराला गरज आहे का? हे तपासलं पाहिजे. कारण आपल्यातल्या प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं किंबहुना त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात."
त्या सांगतात की, तुमच्या शरीराला जर खरोखरच खनिजांची आवश्यकता असेल तर त्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा पर्याय निवडा. यात तुम्ही मोड आलेले कडधान्य, ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करू शकता. यातून मिळणारे घटक शरीरात योग्यरीत्या शोषले जातात.
नीता पुढे म्हणतात, "आपण आपल्या पूर्वजांना कधीही 'ब्लॅक वॉटर' पिताना पाहिलेलं नाही. पण ते आपल्याहीपेक्षा निरोगी होते. आपण त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर निसर्गतः ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या घेणं आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही चांगलंच.
डॉ. जयशीलाही असंच काहीसं सांगतात. त्यांनी 'ब्लॅक वॉटर'ला पर्याय म्हणून लिंबू पाणी, ग्रीन टी, सब्जाचं पाणी, नारळ पाणी अशा सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी सुचवल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)