नारायण राणे म्हणतात, उद्धव ठाकरे जगातला सर्वात 'ढ' माणूस #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...

1. उद्धव ठाकरे जगातला सर्वात 'ढ' माणूस- नारायण राणेंची टीका

महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच शिवसेनेतील ठाकरे-शिंदे गट, तसंच भाजपा यांच्या संबंधातील कडवटपणा आता स्पष्ट होऊ लागला आहे.

भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये झालेल्या सभेत अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली होती.

भाजपाचे वरिष्ठ नेते तसेच राज्यातील इतर नेते, शिंदे गट, राज ठाकरे यांची शेलक्या शब्दांत संभावना उद्धव ठाकरे यांनी केली. आता त्याला भाजपा आणि शिंदे गट, मनसे तशाच पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल 22 सप्टेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. टाइम्स नाऊने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, "मुंबई महानगरापालिका धुतली यांनी, मुंबईकरांचं शोषण केलं याने. एवढ्या वर्ष महानगरपालिका यांच्याकडे. पण यांनी मुंबई बकाल केली. बेस्टमध्ये वेळेत पगार नाही, महानगरापालिकेत पगार नाही. डबघाईला आणल्या दोन्ही संस्था. काही येत नाही याला. हा जगातला 'ढ' माणूस आहे. एवढा 'ढ' माणूस मी पाहिला नाही. दोन वाक्यं सांगितली की, उद्धवजी हे बोला हा.. पण हा बोलतो काही तरी भलतंच. सगळी दुसऱ्याकडून कामं करुन घेतली याने. त्यामुळे मोदी वगैरेंवर बोलू नको. तुला जड जाईल, तू नखाएवढा पण नाही."

उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पुढे म्हणाले, "काय तर म्हणे कोथळा काढणार.. तू काढणार का कोथळा? आमच्यासारखे लोक हे अजून जिवंत आहेत भाजपमध्ये. वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तर जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही. या पुढे वाकड्या नजरेनं पाहिलं आणि कोणालाही भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या कोणत्या व्यक्तीच्या केसाला जराही धक्का लागला ना तर तू महाराष्ट्रात फिरुनच दाखव."

2. खाद्यतेलाचे दर घसरले

खाद्यतेलाचे दर प्रत्येक किलो-लीटर मागे 20 ते 30 रुपयांनी कमी झाले आहेत. नवरात्र, दसरा आणि पुढे दिवाळी तोंडावर असताना सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

यामुळे 15 लीटर-किलोच्या तेलाच्या डब्यावर 300 ते 600 रुपयांची घट झालेली आहे.

काही महिन्यांपासून तेलाचे दर वाढलेले होते. मात्र आता देशात तेलबियांचे वाढलेले उत्पादन, मागणीपेक्षा आवक जास्त तसेच जागतिक बाजारपेठेत पुरवठा वाढल्यामुळे तेलाचे दर कमी झाले आहेत.

इंडोनेशिया आणि मलेशियाने पाम तेलाचे उत्पादन वाढवल्यामुळेही दर कमी झाले आहेत. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.

3. छापेमारी का केली? पुरावे द्या- प्रकाश आंबेडकर

एनआयएने 22 सप्टेंबर रोजी देशभरात अचानक पीएफआय या भारतविरोधी कारवाईचा आऱोप असलेल्या संघटनेवर छापेमारी करुन मोठी कारवाई केली. या छापेमारीमुळे देशभरात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही कारवाई करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना आव्हान दिलं आहे.

ते म्हणाले, "या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि आपण जे कागदपत्रे गोळा केलेले आहेत, ती नेमकी कोणती आहेत? त्यांच्याकडे किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या 24 तासात लोकांसमोर मांडावं."

ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.

4. गौतम अदानी-उद्धव ठाकरे यांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर विविध क्षेत्रातील देश-विदेशातील पाहुणे आल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. मात्र बुधवार 21 सप्टेंबर रोजी झालेल्या एका भेटीमुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चाही झाली.

महानगरपालिकेच्या निवडणुका तसेच राज्यामधील सत्तांतरानंतर झालेल्या या भेटीने हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे.

फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

5. चंद्रपूरमध्ये तेलशुद्धीकरण कारखाना- हरदीपसिंह पुरी

नाणार, जैतापूर, बारसू प्रकल्प अजूनही प्रत्यक्षात आले नसले तरी विदर्भात तेलशुद्धीकरणाचा कारखाना येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनीच त्याचं सुतोवाच केलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरी यांची पक्षाकडून नियुक्ती झाली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

चंद्रपुरात 20 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार असल्याचं पुरी यांनी म्हटलं आहे.

पेट्रोलियम खात्याने 252 पासून 400 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक रिफायनिंग क्षमता वाढविल्याची माहिती देत मागच्या राज्य सरकारने रत्नागिरी येथील प्रकल्प रखडविल्याची टीका त्यांनी केली.

क्षमता वाढविण्याच्या याच प्रयत्नात आता 20 दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू असं आश्वासन पुरी यांनी दिले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात फक्त चंद्रपूर या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले.

भाजपाने या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं असून त्याची जबाबदारी हरदीपसिंह पुरी यांच्याकडे दिली आहे.

त्यासाठी पुरी तेथे तीन दिवसांच्या मुक्कामाला आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)