You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तुम्हाला बापाचे विचार विकणारी टोळी म्हणायचं का?' एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. 'तुम्हाला बापाचे विचार विकणारी टोळी म्हणायचं का?' एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (21 सप्टेंबर) गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
'राज्यात बाप पळवणारी टोळी सक्रिय आहे का,' असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'तुम्हाला बापाचे विचार विकणारी टोळी म्हणू का? आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे आहोत.' असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे शिवसेनेच्या विविध राज्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
"9 मंत्र्यांनी सत्ता सोडून हा निर्णय का घेतला? देशातील हे अनोखं उदाहरण होतं की आम्ही सत्तेचा त्याग केला. शिवसेना आणि भाजपनं सोबत निवडणूक लढवली. बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून प्रचार केला. लोकांपुढे हिंदुत्वाची भूमिका मांडली. लोकांनी युतीला कौल दिला होता. त्यामुळे आमचं सरकार स्थापन व्हावं असं लोकांना वाटत होतं." असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
2. महाराष्ट्रात सर्वाधिक महिला मद्यपी धुळे जिल्ह्यात तर पुरुष मद्यपी गडचिरोली जिल्ह्यात
महाराष्ट्रात मद्यपान करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढली आहे. तसंच राज्यात सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर मद्यपी पुरुष गडचिरोली जिल्ह्यात आहेत अशी माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे.
तरुणी आणि महिलांच्या दारूच्या व्यसनामध्ये धुळे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून व्यसनाची टक्केवारी 38.2 टक्के एवढी आहे तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून 34.7 टक्के एवढं दारूच्या व्यसनाचं प्रमाण आहे.
गडचिरोलीनंतर भंडारा, गोंदिया, वर्धा हे विदर्भातील तीन जिल्हे आघाडीवर आहेत. तर महिलांमध्ये धुळ्यानंतर गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
विशेष म्हणजे वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही तिथे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्याचं या अहवालातून उघड झालं आहे.
3. स्टँड अप कॉमेडियन रोहन जोशीची 'ही' पोस्ट वादात
विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबरला निधन झालं. ही बातमी समोर येताच देशभरातून त्यांच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं. परंतु स्टँड अप कॉमेडियन रोहन जोशी यांची पोस्ट मात्र वादात अडकली.
रोहन जोशी यांनी अतुल खत्री यांच्या पोस्टवर एक कॉमेंट (प्रतिक्रिया) केली होती.
अतुल खत्री यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं, 'आरआयपी राजूभाई' तुम्ही अनेकांना प्रेरणा दिली. तुम्ही जेव्हा व्यासपीठावर जायचा तेव्हा तुफान फटकेबाजी करायचा. तुम्हाला पाहून लोकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य यायचं. भारतीय स्टँड अप कॉमेडी क्षेत्राचं आज मोठं नुकसान झालं.'
या पोस्टवर रोहन जोशी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, 'आपण कोणालाही गमावलं नाहीय. कर्म असोत, रोस्ट असो किंवा बातम्यांमध्ये येणं असो. राजू श्रीवास्तव यांनी नवीन कलाकारांना शिव्याशाप देण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना कलाप्रकार समजायचा नाही म्हणून तो आक्षेपार्ह वाटायचा. त्यांनी काही चांगले विनोद केले असतील पण त्यांना कॉमेडीची ताकद किंवा कुणाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी केलेलं काहीही कळालं नाही. तुम्ही सहमत नसला तरीही.'
या कॉमेंटवरून रोहन जोशी यांना श्रीवास्तव यांच्या चाहत्यांनी ट्रोल केलंय. 'त्यांच्याविषयी असं आक्षेपार्ह लिहून तुम्ही प्रसिद्ध झालात हेच त्यांनी कमवलं आहे,' अशा शब्दात चाहत्यांनी रोहन जोशी यांच्यावर टीका केली आहे. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.
ट्रोलिंगनंतर रोहन जोशी यांनी आपली कॉमेंट हटवल्याचं दिसून येतं. तसंच कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्यावर आज (22 सप्टेंबर) दिल्ली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
4. पीएम केअर फंडच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांची नियुक्ती
केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडच्या विश्वस्तपदी उद्योगपती रतन टाटा यांची नियुक्ती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने नुकतीच यासंदर्भात माहिती जाहीर केली.
रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाय, पीएम केअर फंडच्या सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली आहे.
यात कॅगचे माजी अध्यक्ष राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती आणि इंडिया कॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद शहा यांची निवड करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (20 सप्टेंबर) पीएम केअर फंडचे नवीन विश्वस्त मंडळ आणि सल्लागार समितीसोबत चर्चा केली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
समितीच्या नवीन सदस्यांमुळे पीएम केअर फंडच्या कामकाजाला व्यपक दृष्टीकोन मिळेल असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
5. इंग्लंडमध्ये भारतीय महिला संघाचा विक्रम, हरमनप्रीतची 143 धावांची खेळी
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने धमाकेदार कामगिरी केली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरने 143 धावांची खेळी करत 88 धावांनी इंग्लंडचा पराभव केला.
भारतीय संघाने पाच विकेट गमावत 333 धावा केल्या. तर इंग्लंडचा संघ 247 धावांवर ऑल आऊट झाला.
भारताने इंग्लंडमध्ये केलेला आजपर्यंतचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये भारताची धावसंख्या 281 होती. त्यामुळे भारतीय महिला संघाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.
हरमनप्रीतने नाबाद 143 धावांची खेळी केली आणि 26 वर्षं जुना विक्रम मोडला.
याआधी 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॅबी हॉकलीने 117 धावा केल्या होत्या. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
हरमनप्रीतनं नाबाद 143 धावांची खेळी करत इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधील सर्वोच्च धावसंख्येचा 26 वर्ष जुना विक्रम मोडलाय.
त्याच्याआधी 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॅबी हॉकलीनं 117 धावा केल्या होत्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)