नरेंद्र मोदींचं वागणं मद्यपीसारखं झालंय-प्रकाश आंबेडकर #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. नरेंद्र मोदींचं वागणं दारुड्यासारखं झालंय- प्रकाश आंबेडकर

माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. काल 20 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे असं मत मांडलं. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

ते म्हणाले, " रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी म्हटलंय की अंदाधुंद पद्धतीने तुम्ही सरकारी मालमत्ता विकत आहात. हे देशाच्या हिताचं नाही.

माझ्या भाषेत सांगायचं झालं, तर दारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तर तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो. रिझर्व्ह बँकेने त्याला आता पुष्टी दिली आहे."

2. ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; ग्रीन-वेड चमकले

कॅमेरुन ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांच्या झंझावाती खेळींच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी20 लढतीत 4 विकेट्सनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचा डोंगर उभारला.

सलामीवीर के.एल.राहुलने 55 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 46 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

या पायावर हार्दिक पंड्याने 30 चेंडूत 71 धावांची वेगवान खेळी करत कळस चढवला. त्याने 7 चौकार आणि 5 षटकारांसह ही खेळी सजवली. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन एलिसने 3 तर जोश हेझलवूडने 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना 145/5 अशी स्थिती होती. मात्र यानंतर मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिडने जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कॅमेरुन ग्रीनने 30 चेंडूत 61 धावांची खेळी केली. वेडने 21 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली. टीमने 14 चेंडूत 18 धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे अक्षर पटेलने 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या मात्र त्याला बाकी गोलंदाजांची साथ मिळू शकली नाही.

61 धावा, एक विकेट आणि 2 झेलांसाठी ग्रीनला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच 23 सप्टेंबरला नागपूर इथे होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

3. मविआच्या काळात किती कंपन्या गेल्या त्याची यादी जाहीर करणार- शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद अजूनही वाढत जाण्याच्या दिशेनेच प्रवास करत आहे. दोन्ही गट, त्यांचे कार्यकर्ते आणि नेते संधी मिळेल तेथे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे सभा घेऊन महाविकास आघाडी, ठाकरे गटावर टीका केली आहे. या भाषणात त्यांनी सर्व विरोधकांचा समाचार घेतला. मविआ सरकारच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या बाहेर गेल्या याची यादीच जाहीर करू असा इशाराही शिंदे यांनी दिला. मविआच्या काळात थेट दाऊदची पाठराखण केली गेल्याचा आऱोप करत त्यापेक्षा मोदींचा हस्तक होणं चांगलं असंही शिंदे या भाषणात म्हणाले. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

4. मुंबईत कोरोनाचे एका दिवसात 120 नवे रुग्ण

मुंबईत 21 सप्टेंबर रोजी दिवसभरात 120 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या 11 लाख 49 हजार 235 वर पोहोचली आहे.

दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 19 हजार 726 वर पोहोचली आहे. दिवसभरात 192 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 11 लाख 28 हजार 573 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 936 सक्रिय रुग्ण आहेत.

काल राज्यात 550 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 772 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 79,63,854 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.

5. पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी करा- भातखळकर

पत्राचाळ प्रकरण आता अधिकच गूढ होत चालले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.

याबद्दल लिहिण्यात आलेले पत्र भातखळकर यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केले आहे. मराठी माणसाला बेदखल करण्यासाठी या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा काय संबंध होता याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत व्हावी असं त्यांनी यात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत जवळपास दोन महिन्यांपासून अटकेत आहेत.

19 सप्टेंबर रोजी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)