अरुण गवळीला जन्मठेप झाली, ते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण काय होतं?

अरुण गवळी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अरुण गवळी
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आमदाराला थेट जन्मठेप होणं, तशी फार दुर्मिळ घटना. पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना घडली आणि नुसती जन्मठेप नाही, तर ती एका राजकीय नेत्याच्या हत्येतली शिक्षा म्हणून सुनावलेली जन्मठेप होती.

हा आमदार होता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्यानं ज्याची हत्या केली ते राजकीय नेते होते शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर.

अरुण गवळी मुंबई-महाराष्ट्रासह भारताला परिचित आहे, तो गुन्हेगारी जगतातील त्याच्या क्रूरकर्मांमुळे. मुंबईतल्या गुन्हेगारी जगतात ज्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं वर्चस्व होतं, त्याचवेळी दुसरीकडे अरुण गवळीच्या दगडी चाळीचंही वर्चस्व वाढलं होतं.

दाऊद भारताबाहेर पळून गेला, मात्र अरुण गवळी पोलिसांच्या तावडीत सापडला, तो एका राजकीय हत्येमुळे.

हत्या कधी आणि कशी झाली?

2 मार्च 2007 चा दिवस. संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते. मुंबईतील घाटकोपरमधील मोहिली व्हिलेजचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर दिवसभरातले कामं संपवून संध्याकाळी घरात टीव्ही पाहत बसले होते. असल्फा व्हिलेजमधील रुमानी मंझीलच्या चाळीत ते राहत.

मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कमलाकर जामसांडेकरांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता. त्यालाही आता थोडा काळ लोटला होताच आणि जामसांडेकर नगरसेवक म्हणून त्यांच्या कामाला लागले होते.

कमलाकर जामसांडेकरांच्या पत्नी कोमल काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्यामुळे घरात मुलगा, मुलगी आणि भाची होती. जामसांडेकरांची भाची मनाली हिरे किचनमध्ये काम करत होती आणि मुलगी सायली शाळेची बॅग भरत होती.

कोमल कमलाकर जामसांडेकर

फोटो स्रोत, Facebook/Koma Kamlakar Jamsandekar

फोटो कॅप्शन, कमलाकर जामसांडेकर आणि कोमल जामसांडेकर

चाळीचा परिसर असल्यानं घराबाहेर नेहमीसारखी लोकांची ये-जा होती. तितक्यात घराबाहेरच्या या गर्दीत दोन मोटरसायकल येऊन थांबल्या आणि चार लोक उतरले. त्यातील एक व्यक्ती जामसांडेकरांच्या घराकडे चालत येऊन घरात शिरला. घरात शिरताच त्याने आपल्याकडील पिस्तुलाने जामसांडेकरांवर गोळीबार सुरू केला. गोळीबार अगदी जवळून म्हणजे पॉईंट ब्लँक रेंजवरून करण्यात आला होता.

या गोळीबाराने किचनमध्ये काम करत असलेली भाची मनाली हिरे धावत बाहेर आली. कमलाकर जामसांडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर कुणीतरी पोलिसांना कळवलं आणि पोलीसही तातडीनं तिथं पोहोचले.

मात्र, पोलीस पोहोचायच्या आत संध्याकाळच्या गर्दीचा फायदा घेत जामसांडेकरांवर गोळीबार करणारे चौघे आरोपी फरार झाले.

इकडे जामसांडेकर बेशुद्ध पडले होते. रक्तानं माखलेल्या कमलाकर जामसांडेकरांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोवर जामसांडेकरांनी जीव सोडला होता. डॉक्टरांनी कमलाकर जामसांडेकरांना मृत घोषित केलं.

कमलाकर जामसांडेकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते. राजकीय व्यक्तीची दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येनं मुंबई हादरली.

यानंतर या हत्येचा तपास सुरू झाला. मात्र, पोलिसांच्या हाती सुगावा लागत नव्हता. मात्र, जो सुगावा लागला तो इतका मोठा की, त्यातून पुढे आलेली माहिती पुन्हा एकदा हादरवणारी होती. कारण या हत्येचे धागेदोरे पोहोचले होते, एका आमदरापर्यंत आणि गुन्हेगारी विश्वाच्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीपर्यंत.

बंदुकीचा तुकडा सापडला...

कमलाकर जामसांडेकरांची भाची मनाली हिरेंनी जामसांडेकरांच्या हत्येप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम कासार यांच्या नेतृत्त्वात घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचे फोटो काढले. तिथं पोलिसांना बंदुकीचा तुकडाही सापडला.

यानंतर तपासाला सुरुवात झाली. यादरम्यान पोलिसांनी प्रताप गोडसे, अजित राणे, प्रकाश सावला, सुभाष उपाध्याय, पंकज कोठारी, मोहम्मद सैफ मोहिद्दीन फारूकी आणि बदरेआलम बद्रुद्दीन फारुकी यांना अटक केली.

अरुण गवळी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

कमलाकर जामसांडेकरांच्या शवविच्छेदन अहवलात आढळलं की, त्यांच्या डोक्यात गोळ्या घुसल्या होत्या. तसंच, बंदुकीच्या गोळ्यांवरून ही बंदूक 12 बोअर कंट्री मेड हँडगन आहे हेही समोर आलं.

तपासाअंती पोलिसांनी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आणि त्यात सहा जणांना आरोपी म्हणून नोंदवलं.

आरोपपत्र दाखल करेपर्यंत पोलिसांचा तपास झाला, मात्र थेट सुगावा लागत नव्हता. आणि तो सुगावा लागला, तो एका गुप्त माहितीतून.

तुटलेल्या ट्रिगरनं लागला हत्येचा सुगावा

कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणाचा पहिला सुगावा मुंबई पोलिसांना हत्येच्या वर्षभरानंतर म्हणजे 2008 साली लागला.

26 एप्रिल 2008 ला पोलीस निरीक्षक सांडभोर यांना माहिती मिळाली की, काळबादेवीच्या ज्वेलरी शॉपमध्ये काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार मग पोलिसांनी सापळा रचला आणि या सापळ्यात 26 एप्रिल 2008 ला हॉटेल गोविंदराममधून दुपारच्या सुमारास पोलिसांनी विजय गिरी, अशोककुमार जयस्वाल, नरेंद्र गिरी आणि अनिल गिरी यांना ताब्यात घेतलं.

या अटक केलेल्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बंदूक सापडली. या बंदुकीचं ट्रिगर तुटलं होतं. ताब्यात घेतलेल्यांपैकी अशोककुमार जयस्वाल, विजय गिरी आणि नरेंद्र गिरी हे जामसांडेकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांमधील होते.

बंदूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

नंतर क्राइम ब्रांचच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी जप्त पिस्तूल कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येत वापरल्याची कबुली दिली. तसंच, तुटलेलं ट्रिगर घटनास्थळी फेकल्याची माहितीही दिली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी जप्त केलेला मुद्देमाल तपासला. त्यांना तुटलेलं ट्रिगर मिळालं आणि कमलाकर जामसांडेकर हत्येच्या तपासाला वाऱ्याचा वेग मिळाला. कारण जामसांडेकरांची हत्या याच आरोपींनी केल्याचा सबळ पुरावा मुंबई क्राईम ब्रांचच्या हाती लागला होता.

कमलाकर जामसांडेकरांवर गावठी कट्ट्यानं गोळ्या झाडल्याची विजय गिरीने माहिती दिलीय, असं क्राईम ब्रांचनं सेशन्स कोर्टात सांगितलं. तत्कालीन तपास अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात की आम्हाला संशयित शूटर्स मिळाले होते.

अरुण गवळीपर्यंत धागेदोरे कसे पोहोचले?

कमलाकर जामसांडेकर यांच्यावर गोळ्या झाडणारे पोलिसांच्या हाती लागले होते. पण हत्येची सुपारी कुणी दिली? याचं कोडं अजूनही उलगडलेलं नव्हतं.

अटकेतील आरोपींच्या चौकशीतून दोन नवी नावं पुढे आली, ती म्हणजे प्रताप गोडसे आणि अजित राणे. यातील प्रताप गोडसे हा अरुण गवळीचा राजकीय पक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता होता, तर अजित राणे हा अखिल भारतीय सेनेचा नेता होता. या अजित राणेने 2007 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत कमलाकर जामसांडेकरांविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जामसांडेकरांनी अजित राणेचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता.

यानंतर पोलिसांनी प्रताप गोडसेला ताब्यात घेतलं. त्यानंतर या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडेने दिल्याचं समोर आलं. सुर्वे स्थानिक बांधकाम व्यवसायिक, तर साहेबराव भिंताडे जामसांडेकरांचे माजी सहकारी होते.

कोमल कमलाकर जामसांडेकर

फोटो स्रोत, Facebook/Koma Kamlakar Jamsandekar

फोटो कॅप्शन, कोमल जामसांडेकर आणि कमलाकर जामसांडेकर

सेशन्स कोर्टाने आरोपींना शिक्षा ठोठावताना आदेशात म्हटलंय की, "पोलीस चौकशीत सदाशिव सुर्वेंचा जामसांडेकरांशी जागेवरून वाद सुरू होता. त्यामुळे सुर्वेंनी साहेबराव भिंताडेंसोबत संगनमताने या हत्येचं षडयंत्र रचलं."

नाव न घेण्याच्या अटीवर क्राइम ब्रांचचे अधिकारी पुढे सांगतात की, "जामसांडेकर यांच्या हत्येसाठी सुर्वे आणि भिंताडे यांनी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांच्याशी संपर्क केला. प्रताप गोडसे आणि अजित राणे गवळी टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला होता. राजकीय वैमनस्यामुळे सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी कमलाकर जामसांडेकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती."

अरुण गवळीचा नेमकी भूमिका काय होती?

प्रताप गोडसे आणि अजित राणे यांनी सुपारी घेतल्यानंतर जामसांडेकरांची हत्या रचण्याच्या या कटात अरुण गवळीचा प्रवेश झाला.

तपास अधिकारी सांगतात, "प्रताप गोडसे अरुण गवळीच्या दगडी चाळीतील कार्यालयात संदीप गांगणला भेटला. संदीप अखिल भारतीय सेनेच्या दगडी चाळीतील कार्यालयाचा प्रमुख होता. त्यांनी संदीप गांगणला पैसे आणले असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांची भेट अरुण गवळीचा अत्यंत विश्वासू सुरेश पाटीलसोबत झाली."

यानंतर या नाट्यात अरुण गवळीचा प्रवेश झाला. सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे दगडी चाळीत येऊन अरुण गवळीला भेटले. अरुण गवळी त्यावेळी भायखळा मतदारसंघाचे आमदार होते.

मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल आरोपपत्रानुसार, अरुण गवळीला कमलाकर जामसांडेकरांची हत्या करण्यासाठी 30 लाख रूपये दिले. अरुण गवळींनी काम होईल असा विश्वास सुर्वे आणि भिंताडे यांना दिला.

अरुण गवळी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अरुण गवळी

जामसांडेकरांच्या हत्येसाठी शूटर्स प्रताप गोडसेने आणले होते. पण हत्येचा शेवटचा आदेश अरुण गवळीने दिला होता. त्यामुळे क्राइम ब्रांचच्या टीमने अरुण गवळीला 21 मे 2008 दगडी चाळीतून अटक केली. त्यावेळी अरुण गवळी मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता.

त्यानंतर सदाशिव सुर्वे आणि भिंताडे यांनादेखील अटक करण्यात आली. 27 जुलै 2008 ला मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींना मकोका म्हणजेच महाराष्ट्र ऑर्गनाईड क्राइम कंट्रोल अॅक्ट लावला.

सेशन्स कोर्टामध्ये खटल्यादरम्यान अरुण गवळीच्या वकिलांनी त्याच्यावर असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. मात्र, तो दावा न्यायालयाच्या पटलावर टिकू शकला नाही आणि अरुण गवळी आणि इतर 11 जणांना दोषी ठरवलं.

गवळीला जन्मठेपेची शिक्षा

कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर सबळ पुराव्याअभावी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी या तीन आरोपींना दोषमुक्त केलं.

अरुण गवळी

फोटो स्रोत, CRISPY BOLLYWOOD

फोटो कॅप्शन, अरुण गवळी

या प्रकरणात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी हे प्रकरण दुर्मिळात दुर्मीळ आहे असे नमूद करत, दोषी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी केली. मात्र, सरकारचा हा दावा न्यायालयाने फेटाळला. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.

सेशन्स कोर्टाच्या या शिक्षेविरोधात अरुण गवळीने हायकोर्टात अपील केलं. पण हायकोर्टानेही अरुण गवळी आणि इतर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी सदाशिव सुर्वे याचा साल 2012 मध्ये तुरुंगातच मृत्यू झाला.

अरुण गवळी सध्या नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगतो आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)