फॉक्सकॉन-वेदांताः उदय सामंतांचा इशारा- 'अडीच वर्षांत महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. अडीच वर्षांत महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार - उदय सामंत

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

फॉक्सकॉन प्रकल्पासह रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अभियंता दिनानिमित्त डोंबिवली सॅटर्डे क्लबमार्फत आयोजित राज्यस्तरीय उद्योजकता परिषदेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार, असा इशारा दिला आहे.

गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात किती प्रकल्प राज्याबाहेर गेले, याची यादी आज (15 सप्टेंबर) जाहीर करू, असं सामंत यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

2. वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात, फडणवीसांकडून आभार

वेदांता-फॉक्सकॉनचं प्रकल्पावरून वाद सुरू असतानाच वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात होईल, अशी घोषणा केली आहे.

अनिल अग्रवाल यांच्या या ट्वीटनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले तसेच विरोधकांवर निशाणाही साधला.

अनिल अगरवाल यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू."

ते पुढे म्हणाले, "मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असं करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करत आहेत."

"माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा," अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

3. देवाची परवानगी घेऊनच भाजपमध्ये प्रवेश केला - दिगंबर कामत

"काँग्रेस सोडणार नाही, अशी शपथ घेतली होती, पण आता देवाची परवानगी घेऊनच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे," असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केलं आहे.

गोव्यात बुधवारी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतरानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिगंबर कामत यांनी काँग्रेस कधीच सोडणार नाही, अशी शपथ घेतली होती.

याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर उत्तर देताना ते म्हणाले, "मी महालक्ष्मी मंदिरात काँग्रेस सोडणार नाही, अशी शपथ घेतली होती. पण त्यानंतर आता मी देवाशी बोललो. मंदिरात एक प्रक्रिया आहे, ज्यानुसार पुजारी शिवलिंगावर फुल अर्पण करतात. फुल अर्पण केल्यानंतर देवानेच मला भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत."

ते पुढे म्हणाले, "काँग्रेसमध्ये आता नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. 'भारत जोडो'ला काहीही अर्थ नाही, कारण काँग्रेस राहिलीच नाही. मला न विचारता एलओपीच्या पदावरून हटवण्यात आलं होतं." ही बातमी ई-सकाळने दिली.

4. सौरव गांगुली, जय शाह जोडीचा कार्यकाळ 2025 पर्यंत वाढणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढण्यास सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या (BCCI) घटनेत दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी दिली असून त्याचा लाभ गांगुली-शाह जोडीला मिळेल.

2019 मध्ये सौरव गांगुली आणि जय शाह यांनी बीसीसीआयची सूत्रे हातात घेतली होती.

कोर्टाच्या निर्णयामुळे दोघांना 2025 पर्यंत बीसीसीआयचं कामकाज सांभाळता येऊ शकेल.

यापूर्वी, बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसाठी विरामकाळाच्या बंधनकारक होता. पण या नियमातून सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला.

यामुळे भारतीय क्रिकेटमधल्या पदाधिकाऱ्यांना आता सलग 12 वर्षे प्रशासनात राहता येईल. ही बातमी आजतकने दिली.

5. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं 84 टक्के काम पूर्ण

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

शिवडी येथून सुरू होणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी बुधवारी (14 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, "मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा 22 किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल."

"आगामी काळात लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रीत केले जाणार असून याद्वारे संबंधित परिसराचा सुनियोजितपणे विकास होईल." ही बातमी लोकसत्ताने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)