विराट कोहलीच नव्हे तर या 6 खेळाडूंनाही मानसिक आरोग्याच्या समस्येतून जावं लागलं होतं...

"त्या महिनाभरात मी माझ्या बॅटला हातचं लावला नाही. मागच्या दहा वर्षांत असं कधी घडलं नव्हतं. हा सगळा दिखाऊपणा आहे, असं मला वाटायला लागलं. तुझ्यात ते कॅलिबर आहे तुझ्यात ती इन्टेसिटी आहे, हे मी स्वतःलाच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तेच माझं शरीर म्हणत होतं की आता थोडं थांब, माझं मन म्हणत होत की, तुला विश्रांतीची गरज आहे, थोडा ब्रेक घे."

"मी मानसिकदृष्ट्या खंबीर आहे, असं लोकांना वाटायचं. पण प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात. तुम्हाला ती मर्यादा माहीत असायला हवी नाहीतर गोष्टी अनहेल्दी होऊन जातात. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो हे सांगायला मला आता काहीच वाटत नाही. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात असं ढोंग करणं कधीही वाईट."

मागच्या काही दिवसांपूर्वी स्टार स्पोर्ट्सवर विराट कोहलीची मुलाखत दाखवण्यात आली. भारतातील एक यशस्वी खेळाडू आपल्या मेंटल हेल्थच्या इश्यूविषयी बोलताना ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मागच्या दहा वर्षांपासून विराटने क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. क्रिकेटचे अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर जमा आहेत. क्रिकेटच्या पिचवर त्याची बॉडी लँग्वेज आक्रमक राहिली आहे. किंबहुना मैदानावरही तो तशाच फॉर्ममध्ये दिसलाय.

मात्र मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. एवढंच काय तर, त्याला पाहिल्यासारखे रन जमवता येत नाहीयेत म्हणून सोशल मीडियावर लोक त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला देत होते.

मला असा शेवट अपेक्षित नाही - साक्षी

खेळाडूंना कधी कधी खेळातील खराब प्रदर्शनामुळे तर कधी दुखापतीमुळे मानसिक समस्येला सामोरं जावं लागतं. पण यावर भारतात कधीच उघडपणे बोललं जातं नाही. एवढंच काय तर प्रोफेशनल लेव्हलवर मिळणाऱ्या मदतीबद्दलही कोणी चकार शब्द काढत नाही.

कुस्तीपटू असलेल्या साक्षी मलिक सोबतसुद्धा असंच काहीसं घडलं होतं. 2016 मध्ये साक्षीने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आणि ती रातोरात स्टार बनली. सगळीकडे फक्त तिच्याविषयीच्याच चर्चा सुरू होत्या. पण हळूहळू तिचा खेळ खराब होऊ लागला.

तिला 16-17 वर्षांच्या सोनम मलिककडून चार पराभव पत्करावे लागले. 2020 च्या ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली नाही. तिला एकही पदक मिळवता आलं नाही.

बीबीसीशी बोलताना साक्षी सांगते, "मागची दोन वर्षं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. मी भारताच्या टीममधील स्थान गमावलं होतं. पण माझ्या बाजूने मी पूर्ण मेहनत घेत होती. मला थोडं डिप्रेशन आलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी मला सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागली.

माझ्यात खूप निगेटिव्हिटी आली होती. त्यातून बाहेर पडायला मला मदत झाली. सायकोलॉजिस्टने मला सांगितलं की तू रोज डायरी लिही, मला ज्या ज्या अडचणी यायच्या ते मी त्या डायरीत उतरवायला लागले. हळूहळू माझं लिखाण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह व्हायला लागलं. माझ्यात आत्मविश्वास वाढला आणि मला असा शेवट अपेक्षित नाहीये हे समजलं. मला काहीतरी केलं पाहिजे असं वाटू लागलं."

'खेळाडूंना मानसिक दृष्ट्या दुर्बल मानलं जातं...'

20 वर्षांची पॅरा-बॅटमिंडनपटू असलेली पलक कोहलीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2019 मध्ये तिला बोन मॅरो एडेमा झाला आणि तिचं खेळणं थांबलं.

ती सांगते, या काळात मी मानसिक तणावाखाली होते. यातून बाहेर पडण्यासाठी मला माझ्या कोचने मदत केली.

ती पुढे सांगते, "मी प्रॅक्टीसला जायचे तेव्हा माझे कोच असलेले गौरव खन्ना मला डायरी लिहायला सांगायचे. त्यांनी त्या डायरीचे दोन भाग करून एका बाजूला पॉझिटिव्ह तर एका बाजूला निगेटिव्ह गोष्टी लिहायला सांगितल्या. नंतर जेव्हा मी ती डायरी वाचली तेव्हा त्यात पॉझिटिव्ह गोष्टींची यादी मोठी असल्याचं मला दिसलं. तेच निगेटिव्ह गोष्टींची यादी तितकीशी मोठी नव्हती. वेळ गेल्यावर गोष्टी नीट होतील असं वाटून मी त्या डिप्रेशनमधून बाहेर आले."

पण प्रत्येक खेळाडूला अशी मदत मिळतेच असं नाही. वरीष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली हे मागच्या अनेक दशकांपासून क्रीडा पत्रकारिता करत आहेत. खेळाडूंना येणारं मानसिक दडपण त्यांनी अगदी जवळून पाहिलंय.

विजय लोकपल्ली कोणत्याही खेळाडूचं नाव न घेता त्यांच्या दडपणाविषयी सांगतात,

"मी बऱ्याच खेळाडूंना अशा मानसिक तणावात पाहिलंय. हे खेळाडू दडपण झेलताना अस्वस्थ होतात. त्यांना असं वाटतं की, त्यांच्यामुळेच मॅच हातातून गेली आहे. यासाठी ते स्वतःला जबाबदार धरतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. याआधी तर टीमच्या अधिकाऱ्यांना सांगण्याची देखील सोय नव्हती.

जर तसं सांगितलं तर तो खेळाडू दबाव झेलू शकत नाही म्हणून त्याला टीमच्या बाहेर ठेवलं जायचं. मग हे खेळाडू विचारात गुंग व्हायचे, आणि त्यांच्या कामगिरीवर याचा परिणाम व्हायचा. भले हीहे खेळाडू लोकांच्या समोर आले नसतील, पण मी त्यांना तुटताना पाहिलंय."

परफॉर्मन्स सोडून इतरही अनेक दबाव...

विराट कोहली जेव्हा मेंटल हेल्थविषयी बोलला तेव्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं. मेंटल हेल्थ आणि खेळाडूची कामगिरी या दोन्हीही व्यापक गोष्टी आहेत. ही नवी समस्या नाहीये.

उलट भारत आणि भारताबाहेर खेळाडूंच्या डिप्रेशनचे किस्सेच किस्से सापडतील. आता हे डिप्रेशन फक्त त्यांच्या खेळाशीच संबंधित असेल असं नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडितही काही समस्या असू शकतात.

पब्लिक फिगर असल्यामुळे मीडिया सोबतच लोकांच्या नजरा या खेळाडूंवर असतात. पण प्रत्येक खेळाडू मीडिया प्रेशर झेलू शकतो असं नाही. कधी कधी त्यांना या गोष्टीचं दडपण येतं.

नाओमी ओसाकाने 2021 मध्ये फ्रेंच ओपनचा सामना जिंकला. सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषद होणार होती. तिने मात्र या पत्रकार परिषदेत यायला नकार दिला. त्यावर आयोजकांनी कारवाई करू असा इशारा दिला. त्यानंतर वर्ल्ड रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या नाओमी ओसाकाने स्वतःच फ्रेंच ओपनमधून आपलं नाव मागे घेतलं.

यानंतर नाओमीने सांगितलं होतं की, "2018 साली यूएस ओपननंतर मला नैराश्याने गाठलं. जे कोणी मला ओळखतात त्यांना माहीत आहे की मी खूपच इंट्रोवर्ट आहे. सोशल एंग्जाइटी लपवण्यासाठी मी बऱ्याचदा माझ्या कानात हेडफोन्स घालते. भले ही मीडियाचे लोक माझ्या बरोबर चांगले वागतात, पण मला माध्यमांसमोर बोलता येत नाही. मला दडपण येत भीती वाटते."

ब्रेक घेतल्यामुळे दृष्टिकोन बदलला...

बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी मेंटल स्ट्रेसमुळे गेममधून ब्रेक घेतला आहे.

इथं आपण क्रिकेटर असलेल्या बेन स्टोक्सचंच उदाहरण बघू. मागच्या वर्षी इंग्लंड आणि भारतामध्ये टेस्ट सीरिज सुरू होणार होती. हे दोन्ही देश क्रिकेटमधले सुपरपॉवर देश आहेत. आणि तेवढ्यातच एक बातमी आली की बेन स्टोक्स क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतोय. आपली मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी त्याने भारताविरुद्धच्या या मालिकेपासूनही दूर राहणं पसंत केलं.

बेन स्टोक्सने पुन्हा खेळायला सुरुवात केल्यानंतर बीबीसीला मुलाखत दिली होती. त्याने त्यावेळी मनमोकळेपणाने आपल्या गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, अनेक वर्षं त्याला आपल्या गोष्टी मनातच दाबून ठेवायची सवय लागली होती. ज्यामुळे त्याला पॅनिक अटॅक्स यायला लागले. एक दिवस या सगळ्याचा कडेलोट झाला.

बेनच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही घडत होतं. 2020 मध्ये त्याच्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं. मग त्याने वडिलांसोबत राहण्यासाठी ब्रेक घेतला. त्याचवर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं. हे दुःख बेन पचवू शकला नाही, त्याच्या मनावर या गोष्टीचा खोलवर परिणाम झाला.

पुढे टीममध्ये आल्या आल्याच त्याचं बोट तुटलं. पण 2021 मध्ये त्याला घाईघाईतच संघाची कॅप्टनसी सांभाळावी लागली. कोव्हीडनंतर परिस्थिती अचानकच बदलली. बरेच खेळाडू यादरम्यान क्वारंटाईनमध्ये होते.

2017 मध्ये एका नाईट क्लबमध्ये गेल्यावर भांडण करण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. या घटनेनंतर बरेच महिने तो संघाच्या बाहेर होता. 2018 साली त्याला या प्रकरणातून क्लिन चिट मिळाली.

या सगळ्या गोष्टी सांगताना बेन म्हणतो, "मी जेव्हा ब्रेक घेतला तेव्हा तो खूपच निगेटिव्ह पद्धतीने घेतला गेला. त्यानंतर मला अचानकच कर्णधारपद स्वीकारावं लागलं. ब्रेकचा परिणाम माझ्या खेळण्यावर झाला असून मला माझं काम नीट करता येत नाही अशी टीका लोकांकडून ऐकावी लागली.

त्या नाईटक्लबच्या घटनेने माझं आयुष्य बदलून गेलं होतं, माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम झाला होता. हे सगळं मला माझ्या मुलांनाही सांगावं लागेल. मानसिक संतुलन नीट राहावं म्हणून मी ब्रेक घेतला होता, पण मला असं वाटायचं की मला कधीच पुनरागमन करता येणार नाही."

...आणि माझं यश माझ्या डिप्रेशनचं कारण बनलं - बिंद्रा

क्रिकेट असो वा टेनिस नाहीतर मग जिम्नॅस्टिक... सर्वच खेळाडू या दडपणातून गेले आहेत. पण कधी कधी हे दडपण खराब कामगिरीमुळे नाही तर यशाच्या ओझ्यामुळे येतं.

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण मिळवून देणारा अभिनव बिंद्रा या डिप्रेशनवर खुलेपणाने बोलला.

2021 मध्ये तो म्हणाला होता, "जेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या अत्युच्च स्थानावर होतो तेव्हा मला डिप्रेशन आलं होतं. याला तुम्ही विरोधाभासही म्हणू शकता. बीजिंग ऑलिम्पिक गाठण्यासाठी मी सलग 16 वर्षं मेहनत घेतली होती. आणि एक दिवस असा आला की ते यश मी मिळवलं.

मात्र त्यानंतर माझ्या आयुष्यात एकप्रकारचा रितेपणा आला. मला समजत नव्हतं की आता आयुष्यात नक्की काय करायचं आहे. माझी उर्जाचं संपून गेली होती. जीवनात ध्येय नसेल तर जीवन निरर्थक वाटतं. तेव्हा मी प्रोफेशनल लोकांची मदत घेतली."

खेळाडूंवर अनेक प्रकारचं दडपण असू शकतं. यात कामगिरीशी संबंधित, स्वभावाशी संबंधित किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित दडपण असू शकतं. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सिमोन बायल्सनेही मानसिक दडपणामुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतली होती. मेडल जिंकण्याची संधी सुद्धा सोडली.

मनोविकार तज्ज्ञ काय सांगतात?

फक्त फिटनेस नाही तर खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेच आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर मानसिक पातळीवर काम करणंही तितकंच आवश्यक आहे.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांच्याशी बोलताना क्रीडा मनोविकारतज्ज्ञ मुग्धा धामणकर म्हणाल्या, "हल्ली हल्ली खेळाडू या विषयावर ओपनअप व्हायला लागलेत. सिमोन असो नाओमी असो यांच्यासारख्या खेळाडूंनी यावर भाष्य केलंय. आणि या गोष्टीवर खरंतर मी आनंदी आहे.

पण ही गोष्ट फक्त यशस्वी झालेल्या खेळाडूंच्या बाबतीत लागू पडते असं नाही तर नवं पदार्पण करणाऱ्या खेळाडूंनीही आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. जर त्यांना लहान वयातच यासंबंधी ट्रेनिंग मिळायला सुरुवात झाली तर गोष्टी सोप्या होतील. जसं जसं शरीराचा विकास होतो, त्याचप्रमाणे अनुभवातून माणूस शिकत जातो. युवा खेळाडूंना नकारात्मकता, दबाव सहन करावा लागतो, त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं देखील असतं."

मुग्धा सांगतात की, नैराश्यामुळे खेळाडू आपला गेम सोडून देतात. तर काही खेळाडू मानसिक तणाव सहन करत आपला खेळ सुरू ठेवतात.

मेंटल हेल्थ ट्रेनिंग

ऑलिम्पिक चॅम्पियन आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या मीराबाई चानूलाही डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "2016 मध्ये मी खराब कामगिरी केली होती, त्याचा तणाव इतका होता की मला माझं करिअर सोडायचं होतं. पण माझी आई आणि माझ्या कोचने माझं काउंसलिंग केलं, खेळ सोडण्यापासून रोखलं."

यावर क्रीडा मनोविकार तज्ज्ञ असलेल्या मुग्धा सांगतात, "खेळाडूंना लहानपणीच मेंटल हेल्थविषयी शिकवलं पाहिजे. जेणेकरून ते जेव्हा ग्राऊंडवर उतरतील तेव्हा ते त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील. आणि जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा समाज, कुटुंब आणि स्पोर्ट्स सिस्टम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील. साक्षी आणि पलक यांचं उदाहरण आपल्या समोर आहे."

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार सहज शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.

तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)