You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनुष्यबाण चिन्हासंबंधी कागदपत्र सादर करण्यास ठाकरे गटाला मिळाली 'इतक्याच' दिवसांची मुदत...#5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1.निवडणूक आयोगानं ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांचा वेळ देण्यास नकार दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरेंना केवळ 15 दिवसांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती.
त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार दिला आहे. ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे.
त्या आधी राज्यातील सत्तासंघर्षावर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टापाठोपाठ निवडणूक आयोगातही उद्धव ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याचं चित्र आहे.
2.गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ - केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "गरिबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचं 5 लाख कोटींचं कर्ज माफ," असं म्हणत निशाणा साधला आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय, "पहिल्यांदा तांदूळ-गव्हावर टॅक्स लावण्यात आला. कोणत्याच सरकारने याआधी असं क्रूर पाऊल उचललं नाही. केंद्र सरकारची अशी काय अवस्था झाली? सरकारी शाळेत फी घेतली गेली तर अर्ध्याहून अधिक मुलं निरक्षर राहतील. गरीब माणसं कुठून आणतील पैसे? उपचारासाठी काय करणार?
"केंद्र सरकारचा हा सगळा पैसे नेमका जातो कुठे? यांनी सरकारी पैशांनी आपल्या मित्रांची कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. कर्ज माफ नसतं केलं तर देशाची अशी अवस्था झाली नसती."
3. अर्थव्यवस्था ढासळत असताना राजकारण्यांनी आश्वासनांची खैरात करणं चिंताजनक - सर्वोच्च न्यायालय
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांकडून लोकांना मोफत दिल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सुविधा ही एक गंभीर समस्या असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. तसेच, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचं देखील न्यायालयाने नमूद केलं आहे.
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
निवडणुकांच्या काळात अशा प्रकारे राजकीय पक्षांकडून मतदारांना भुलवणाऱ्या घोषणा केल्या जाण्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश रमण्णा यांनी ही टिप्पणी केली.
4. नटून-थटून ऑफिसला आल्या आणि लाच घेताना सापडल्या
रक्षाबंधनाचा सण आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी त्या अगदी नटून थटून सजून कार्यालयात आल्या, पण काही वेळातच कार्यालयातच पाच हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या.
त्यामुळे कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी भावना चौधरी यांच्यावर नटलेल्या अवस्थेतही तोंड लपवण्याची वेळ आली. रक्षाबंधनाला भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी त्यांच्याच हातात बेड्या पडल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली.
चौधरी या आरोग्य उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. तक्रारदारानं भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज केला होता. तो पुढील वर्षी निवृत्त होणार असल्याने त्याला ही रक्कम मिळणार होती. त्यातील 90 टक्के रक्कमेतील 6 लाख 72 हजार रूपये मंजूर करण्यासाठी चौधरीनी 10 हजाराची लाच मागितली. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली.
5. 'देशाला काळी जादूसारख्या गोष्टी सांगून काळी कृत्यं लपवू नका'
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'काळी जादू' विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी अंधश्रद्धेच्या गोष्टींचा उल्लेख करत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नये अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने 'काळी वस्त्रे' परिधान करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'काळी जादू' असं केलं आहे. काँग्रेसने कितीही 'काळी जादू' करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली. द हिंदूनं ही बातमी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील महागाई, बेराजगारी दिसत नाहीये का? अशी विचारणा राहुल गांधींनी केली आहे.
"पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावू नका आणि देशाला काळी जादूसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून आपली काळी कृत्यं लपवू नका," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)