तेजस्वी यादव : क्रिकेटर ते किंगमेकर, नितीशकुमारांना पुन्हा मुख्यमंत्री करणाऱ्या नेत्याची गोष्ट

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव
    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी हिंदी

नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आणि आता त्यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ घेऊन बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. नितीश कुमार यांनी आज (9 ऑगस्ट) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Presentational grey line

बिहारचे दोन तरुण चेहरे...30 वर्षांचे तेजस्वी यादव आणि 38 वर्षांचे चिराग पासवान. तेजस्वी यादव यांना क्रिकेटपटू बनायचं होतं, मात्र क्रिकेट विश्वात ते फारसे गाजले नाहीत. चिराग पासवान यांना अभिनेता व्हायचं होतं, पण अभिनयाच्या क्षेत्रात त्यांची कारकीर्द घडली नाही.

आता दोघांकडे त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा आहे आणि त्याच्याच आधारे ते नेता बनले आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, बिहार निवडणूक: तेजस्वी यादव यांच्या सभेला इतकी गर्दी का उसळत आहे?

रोहन गावसकर यांच्याकडे वडील सुनील गावसकर यांच्या क्रिकेटचा वारसा होता, मात्र ते क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडवू शकले नाहीत. राजकारणात मात्र वैयक्तिक कामगिरीचा विषय लोकशाहीतून गायब झाला आहे. त्यामुळेच कदाचित नेता होणं हे क्रिकेटर बनण्याइतकं अवघड नाहीये.

आपल्याला क्रिकेट खेळण्याची आवड एवढी होती की नववीनंतर आपण शिक्षणच सोडलं, असं तेजस्वी सांगतात.

तेजस्वी यांचं क्रिकेट प्रेम

सबा करीम यांनी तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वर्षं 2001 होतं. लालू प्रसाद यादव बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. सबा करीम आणि राम कुमार क्रिक्रेटसंबंधी काही चर्चा करण्यासाठी लालू यादव यांच्या घरी गेले होते.

सबा करीम आणि राम कुमार यांनी बिहारमधील प्रतिभावान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळावं या दृष्टिनं लालू यादव यांच्यासमोर काही प्रस्ताव ठेवले.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Ashok Kumar

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव काही वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायचे

सबा करीम सांगतात, "लालूजींनी आमचं म्हणणं लक्ष देऊन ऐकलं. आमच्या प्रस्तावांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गप्पांदरम्यान त्यांनी आपल्या मुलाची, तेजस्वीची ओळख करून दिली. तेव्हा तेजस्वी 10-12 वर्षांचे असतील. लालूजींनी म्हटलं की, हा माझा धाकटा मुलगा आहे. त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. त्याच्याकडेही जरा लक्ष द्या.

आम्ही 2002 साली पाटणामध्ये एक कँप आयोजित केला होता. या कँपसाठी शंभर मुलांची निवड करण्यात आली होती. या शंभर जणांमध्ये तेजस्वी यादवही होते. लालू यादव यांनी आम्हाला त्याला मदत करायला सांगितलं होतं. लालू तेजस्वीच्या क्रिकेटच्या आवडीकडे गांभीर्यानं पाहत होते."

सबा करीम सांगतात की, तेजस्वीकडे क्रिकेटचा वारसा नव्हता, पण खेळण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना फार काळ खेळता आलं नाही आणि राजकारणाकडेच त्यांना परतावं लागलं.

सबा सांगतात की लालूंनी त्यावेळी आपल्याला तेजस्वीची बॅट दाखवली होती आणि कोणत्या बॅटनं खेळलेलं चांगलं याबद्दल सल्लाही विचारला होता.

लालू प्रसाद यादव यांच्या या भेटीबद्दल राम कुमार सांगतात, "तेजस्वी तेव्हा शाळकरी मुलगाच होता, मात्र त्याचा क्रिकेटबद्दलचा सेन्स खूप चांगला होता. आम्ही दोघंही तेजस्वीशी बोललो. क्रिकेटबद्दल त्याच्याशी गप्पा मारल्या. लालूजींनी आम्हाला त्याला क्रिकेट शिकवण्याबद्दल सांगितलं होतं."

'वीरेंद्र सहवागसारखी बॅटिंग'

राम कुमार सांगतात, "सुरुवातीला आम्ही पाटण्यात क्रिकेट शिकवायला सुरूवात केली. एका अरुंद गल्लीत ट्रेनिंग सुरू केलं, तिथंच नेट लावलं. पण नंतर लक्षात आलं की मुलामध्ये क्षमता आहे. त्याला खेळाची चांगली समज आहे. बॅटिंग आणि बॉलिंगसाठी आम्ही जे तंत्र सांगायचो, तो ते चटकन शिकायचा.

त्याच्यात एक चमक होती. तेजस्वीमध्ये वेगानं सुधारणा होत होती. तेव्हा आम्हाला वाटलं की, आता खुल्या मैदानात खेळायला हवं. त्यामुळे आम्ही त्याला बाहेरच्या इतर क्रिकेटपटूंसोबत मिक्स-अप करायला लागलो. त्यानंतर लोकांनी गर्दी करायला सुरूवात केली. कारण लोकांना कळलं होतं की, तेजस्वी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे."

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वीरेंद्र सेहवाग

राम कुमार सांगतात की, 2003 साली तेजस्वी दिल्लीला शिफ्ट झाला. तिथे नॅशनल स्टेडिअममध्ये प्रॅक्टिसला सुरूवात केली. दिल्लीला गेल्यानंतर त्याला अजून एक्सपोजर मिळालं.

तेजस्वीला वीरेंद्र सहवागसारखी बॅटिंग करण्याची इच्छा होती.

तेजस्वी यादव यांचे अजून एक कोच अशोक कुमार सांगतात, "तेजस्वी टीम प्लेअर होते. वैयक्तिक खेळ करून दाखवण्यासाठी उतावीळपणा नाही करायचे. दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये खेळण्याची संधी त्यांना दोन वेळा मिळाली. ते उत्तम खेळाडू होते. पण सगळं काही लवकर होत नाही.

जे लोक तेजस्वीच्या क्रिकेटची टिंगल करतात, त्यांना क्रिकेटची समज नाही, असं मला वाटतं. मी एक उदाहरण देऊन सांगतो. झारखंड रणजी टीमचे कॅप्टन राजीव कुमार राजा होते. राजीव सहा डावांमध्ये चांगला खेळ करू शकले नाहीत. मात्र पुढच्याच सीझनमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. तेजस्वींनी रणजी ट्रॉफीतला एक सामना आणि विजय हजारे ट्रॉफीचे दोन सामने खेळले होते. त्यात ते फार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पण केवळ एवढ्या खेळाच्या आधारे त्यांचं मूल्यमापन करणं चुकीचं ठरू शकतं."

अशोक कुमार सांगतात की, तेजस्वी दिल्ली अंडर-19 मध्येही खेळले होते आणि त्यांनी एकदा 62 चेंडूंत 100 धावा केल्या होत्या. ते अतिशय शिस्तबद्ध खेळाडू होते. तेजस्वी यांनी भलेही पदवीचं शिक्षण घेतलं नाही, पण ते क्रिकेट नीट समजून घेऊन शिकले. त्यांनी क्रिकेटसाठी परिश्रम घेतलं होतं. कोणतीही गोष्ट समजून उमजून घेण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. दिल्लीला आल्यानंतर तेजस्वी डीपीएस आरके पुरममध्ये शिक्षण घेत होते."

अशोक कुमार 2010 साली झारखंड प्रीमियर लीगचे कोच बनले. तेजस्वी जमदेशपूर जांबाज टीममध्ये सहभागी झाले. पण तिथं ते फार काही करू शकले नाहीत.

तेजस्वींची लालू प्रसादांसोबत तुलना

संध्याकाळची वेळ... विपिन राम पाटण्यातल्या स्टेट गेस्ट हाऊसमध्ये एका खुर्चीवर बसून लालू प्रसाद यादव यांचे जुने व्हीडिओ पाहत आहेत. व्हीडिओ पाहताना ते हसताहेत.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Ram Kumar

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव

त्याचवेळी बिहारच्या एका वरिष्ठ पत्रकारासोबत आम्हीही तिथे पोहोचतो. व्हीडिओमध्ये लालूंचा आवाज ऐकून आमच्यासोबत आलेल्या एका ज्येष्ठ पत्रकारानं हसत हसत म्हटलं, "का जी, तुम्हाला नोकरी नितीश कुमारांनी दिली आणि व्हीडिओ लालू यादवांचा पाहत आहात.

हे ऐकल्यानंतर विपिन राम मोबाईलवर सुरू असलेला व्हीडिओ बंद करतात, "सर, लालूजींना पाहून जुन्या गोष्टी आठवल्या. खूप हसू येतं. नोकरी नितीश कुमारांनी दिली, पण हसू तर लालूजींचं भाषण ऐकूनच येतं.

विपिन राम स्टेट गेस्ट हाऊसमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री बनण्याच्या आधीपासूनच रूम सर्व्हिसचं काम करत होते. पण तेव्हा त्यांची नोकरी कायम नव्हती आणि त्यांचा पगार 1700 रुपये होता. नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर विपिन नोकरीत कायमस्वरुपी झाले आणि त्यांना दर महिन्याला 26 हजार रुपये पगार सुरू झाला.

विपिनशी जेव्हा एकटयानं गप्पा मारल्या, तेव्हा त्यांनी म्हटलं, "सर, मी लालूजींसाठी खूप काम केलंय. अगदी त्यांचे हात-पाय पण दाबले आहेत. लालूजी म्हणायचे- अरे विपिनवा, हाथ पैर दबाओ. खरंतर नोकरी नितीश कुमारांनीच दिली. जर लालूजींनी दिली असती तर माझ्या कुटुंबाची परिस्थिती अजून चांगली झाली असती. बराच काळ सतराशे रुपयांमध्येच भागवायचो."

विपिन सांगतात, "तो लालूजींचा काळ होता. त्यांच्या घराचा दरवाजा गरीबांसाठी कधीच बंद झाला नाही. त्यांची मुलं क्रिकेट खेळायची तेव्हा आम्ही बॉलिंग करायचो. पण आम्हाला ते कधी बॅटिंग द्यायचे नाहीत. आजही आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो तर तेजप्रताप ओळखतात. पण तेजस्वी ओळखत नाहीत."

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव

लालू यादव यांनी भलेही विपिन राम यांना नोकरी दिली नसेल, पण जुन्या आठवणींनी ते आजही भावूक होतात. पण लालू यादव यांची मुलं त्यांच्यासारखी नाहीत, अशी तक्रारही ते करतात.

अनेक लोक तेजस्वी यादवांमध्ये त्यांच्या वडिलांची, लालू यादव यांची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणाऱ्यांना निराशेलाच सामोरं जावं लागतं आणि मग ते लोक म्हणतात, की लालू यादवांसारखं दुसरं कोणी असू शकत नाही.

पण मुलामध्ये वडिलांचं व्यक्तिमत्त्व शोधणं कितपत योग्य आहे?

याबद्दल बोलताना आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी सांगतात की, मुलाची वडिलांशी तुलना करणं हे फारसं न्याय्य नाहीये.

ते म्हणतात, "कोणी माझी तुलना माझ्या वडिलांबरोबर, रामानंद तिवारी यांच्यासोबत केली तर मी म्हणेन की , मी त्यांच्या पायाची धुळीसमानही नाहीये. माझा मुलगा माझ्याहून वेगळा आहे. गांधींच्या मुलाची तुलना त्यांच्यासोबत करता येणार नाही.

त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन कसं करता हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचा जास्त परिणाम मुलांवर होतो. तेजस्वीचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे आणि त्याची राजकीय जडणघडण अजून सुरू आहे. त्यामुळे त्यांची लालूप्रसाद यादव यांच्यासोबत तुलना कशी होऊ शकते?"

विपिन राम म्हणतात की, लालूंच्या काळात त्यांच्या घराचा दरवाजा कधी बंद व्हायचा नाही, तर दुसरीकडे तेजस्वींना भेटणं इतकं सोपं नसल्याचंही ते सांगतात.

रस्ता वेगळा झाला

पूर्वी आरजेडीमध्ये आणि सद्यस्थितीत भाजपचे खासदार रामकृपाल यादव यांचे पुत्र अभिमन्यु दिल्लीत दोन वर्षं तेजस्वी यांच्यासोबत बिहार सदनात राहीले. त्यावेळी राबडी देवी बिहारच्या मुख्यमंत्री होत्या.

अभिमन्यु आणि तेजस्वी 2002 ते 2004 एकत्र होते. लालू यादव रेल्वेमंत्री झाल्यानंतर तेजस्वी आपल्या वडीलांसोबत सरकारी घरात रहाण्यासाठी गेले.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लालूप्रसाद यादव

तेजस्वी यांच्याबाबत त्यांचा अनुभव काय? तेजस्वी यांनी शिक्षण अर्धवट का सोडलं? तेजस्वी एक नेता म्हणून परिपक्व आहेत? हे प्रश्न आम्ही अभिमन्यु यांना विचारले.

अभिमन्यु म्हणतात, "तेजस्वी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्यासोबत असताना त्यांनी त्याच प्रकारे माझ्याकडे लक्ष दिलं. जीवनातील अनेक चांगले क्षण आम्ही एकत्र जगलो. एकत्र पिच्चर, रेस्टॉरंट, ट्रिप आणि क्रिकेट. येणाऱ्या काळात परिस्थिती अशी बदलेल, की आमच्यातील संवाद कायमचा बंद होईल असं वाटलं नव्हतं."

अभिमन्यु पुढे म्हणतात, "त्यांच पूर्ण लक्ष क्रिकेटवर होतं. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलं नाही. क्रिकेटसाठी ते सर्वांत जास्त वेळ देत असत. एक नेता म्हणून त्यांना अजून खूप काही करायचं आहे. लालू यादव स्वत: संघर्षकरून नेता बनले होते. मात्र, तेजस्वी यांना केलेलं बरच काही मिळालं आहे. लालूजी संघर्ष करून लोकनेते बनले. दुसरीकडे तेजस्वी त्यांच्या आसपासच्या लोकांनी घेरून गेले आहेत. तेजस्वी यांनी शिक्षण पूर्ण केलं असतं तर ते जास्त चांगले नेते बनले असते."

तेजस्वी आणि अभिमन्यु

अभिमन्यु आणि तेजस्वी यांचे अत्यंत चांगले असलेले संबंध आता खूप खराब झाले आहेत.

रामकृपाल यादव हे लालू यादव यांचे अत्यंत निष्ठावान होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाटलिपुत्र लोकसभेच त्यांना आरजेडीकडून तिकीट हवं होतं. मात्र, लालू यादव यांची मुलगी मीसा भारती यांना तिकीट मिळालं. अभिमन्यु म्हणतात, माझ्या वडीलांसाठी हा खूप मोठा धक्का होता.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लालूप्रसाद यादव

अभिमन्यु म्हणतात, "ही गोष्ट फक्त लोकसभेच्या तिकीटाची नव्हती. तर, सन्मानाची होती. राबडीदेवी या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील तर मला काहीच हरकत नाही, असं माझ्या वडीलांनी सांगितलं होतं. आरजेडीसाठी माझ्या वडिलांनी स्वत:ला झोकून दिलं होतं. लालू यादव यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं.

मग, खासदार बनण्याची इच्छा का नसावी? माझ्या वडिलांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्यामागे फक्त तिकीट एक कारण नाही. त्यांचा अपमान झाला. आणि ही गोष्ट सहन करण्यापलीकडे होती. मी वडिलांना सांगितलं होतं, ज्याठिकाणी सन्मान मिळत नाही. त्याठिकाणी रहाण्याचा काहीच अर्थ नाही."

अभिमन्यु यांचं लग्न 2017 मध्ये झालं. या लग्नासाठी लालू यादव यांना आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. पण, ते आले नाहीत.

अभिमन्यु सांगतात, "मी तेजस्वी यांना आमंत्रण पाठवलं नव्हतं. याआधी सुद्धा माझ्या बहिणीच्या लग्नात ते आले नव्हते. त्यानंतर त्यांना आमंत्रण पाठवण्याचा काहीच संबंध नव्हता."

तेजस्वी यांनी रामकृपाल यादव यांच मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही? यावर बोलताना अभिमन्यु म्हणतात, त्याकाळी तेजस्वी पक्षात फार सक्रीय नव्हते. सर्वकाही लालू यादव यांच्या हातात होतं. अभिमन्यु, आजही यादव कुटुंबीयांशी त्यांचे असलेले संबंध आठवतात. पण, काही गोष्टी न बोलताच राहून जातात.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Abhimanyu

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव आणि अभिमन्यू

2019 च्या एप्रिल महिन्यात आम्ही रामकृपाल यादव यांच्या इंटरव्हू केला. आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये होतो. पलंगाच्या समोर भिंतीवर लालू आणि राबडी यांचा फोटो टांगण्यात आला होता.

तुम्ही फक्त यांचा फोटो का लावलाय? या प्रश्नाचं उत्तर देताना रामकृपाल यादव भावुक झाले. ते म्हणाले, माझ्या हृदयात त्यांची जागा कायम आहे आणि पुढेही राहणार.

तेजस्वी यांचं राजकारण

2015 साली राघोपुरमधून तेजस्वी यादव विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार झाले. ही त्यांची पहिली निवडणूक होती.

त्यावेळी नीतीश कुमार आणि लालू यादव यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. निवडणुकीत त्यांच्या युतीचा विजय झाला आणि पहिल्यांदा आमदार बनलेले तेजस्वी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.

दोन वर्षंही उलटली नसतील. नीतीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी केली आणि 16 महिन्यातच तेजस्वी यांना उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर विधानसभेत ते विरोधीपक्षनेते बनले.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Abhimanyu

फोटो कॅप्शन, लालूप्रसाद यादव

काही महिन्यांच्या या राजकीय वाटचालीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले. आयआरसीटीसी जमीन घोटाळ्यात त्यांना ऑगस्ट 2018 मध्ये जामीन मिळाला.

हे प्रकरण पाटण्यातील तीन एकर जमीनीचं आहे. या ठिकाणी मॉल प्रस्तावित होता. लालू यादव यांच्यावर आरोप आहे की त्यांनी 2006 साली रेल्वेमंत्री असताना एका खासगी कंपनीला हॉटेल चावण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याबदल्यात त्यांना महागडा प्लॉट मिळाला.

सीबीआयच्या माहितीनुसार, ही जमीन पहिल्यांना एका आरजेडी नेत्याच्या पत्नीच्या नावावर करण्यात आली. त्यानंतर अत्यंत कमी किंमतीत राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना ही जमीन देण्यात आली.

नीतीन कुमार यांनी या प्रकरणी तेजस्वी यादव यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केली. मात्र त्यांनी असं केलं नाही. लालू यादव यांनी भाजपवर त्यांना फसवण्याचा आरोप केला होता.

या पूर्ण प्रकरणात तेजस्वी यादव यांचं नाव षडयंत्र रचणारा म्हणून आहे. तेजस्वी यांच्या म्हणण्यानुसार, ते खूप लहान असताना त्यांना जमीन मिळाली होती.

नीतीश कुमार यांनी याच आरोपांचा आधार घेत आरजेडीसोबतची युती तोडून टाकली होती.

तेजस्वी पुढारलेले आहेत?

2018 मध्ये एका मुलाखती दरम्यान आम्ही तेजस्वी यादव यांना तुम्ही आंतरजातीय विवाह करणार का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणाले, लग्न आई-वडीलांच्या मनाप्रमाणे होते. ते जिथे सांगतील तिथेच लग्न होईल.

नंतर पुढे मात्र 2021 मध्ये तेजस्वी यांनी रेचल गोडिनो यांच्याशी प्रेमविवाह केला.

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव

अनेकवेळा मुलायम सिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्यासोबत तेजस्वी यांची तुलना केली जाते. काही लोक मानतात की अखिलेश त्यांच्या वडीलांपेक्षा समजदार आणि हिंमती आहेत.

अखिलेश यांनी आपल्या वडीलांना राजकारणात आव्हान दिलं. अखिलेश यादव यांचं राजकारण वडीलांच्या सावलीतून बाहेर आलं आहे. मात्र तेजस्वी यादव यांच असं नाही.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी म्हणतात, "अखिलेश यादव हिंमती आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यात त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले. त्याचप्रकारचे निर्णय त्यांनी राजकारणात घेतले. अखिलेश यादव यांनी 90 च्या दशकातील पक्षाला 21व्या शतकातील बनवला. ते धर्म, जात यांचं राजकारण करत नाहीत. म्हणूनच अखिलेश यांची टीम पाहिली तर त्यात विविध चेहरे असतात."

तेजस्वी यांच्यात लोक लालू यादव यांना शोधत आहेत. मात्र अखिलेश यादव यांच्यात मुलायम सिंहांना का शोधत नाहीत?

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव

यावर बोलताना वरिष्ठ पत्रकार सुनीता एरॉन म्हणतात, "अखिलेश यादव पाच वर्षं राज्याचे मुख्यमंत्री राहीले आहेत. त्यांनी आल्यानंतर काळानुरूप राजकारण केलं. मेट्रो बांधली, लॅपटॉप दिले, एक्स्प्रेस-वे तयार केला. इंग्रजीच्या विषयावर वडीलांपेक्षा वेगळा विचार घेतला.

तेजस्वी 16 महिने उपमुख्यमंत्री राहिले. पण, पक्षात अजूनही लालू यादव दखल देतात. मला तेजस्वी यादव यांच्यात एक स्पार्क दिसतो. तेजस्वी यांना संधी मिळाली, तर ते स्वत:ला सिद्ध करून दाखवतील. अखिलेश यादव यांनादेखील मुलायम सिंह यांच्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी वेळ लागला होता."

या निवडणुकीत तेजस्वी यांनी दबंग अनंत सिंह, रामा सिंह यांची पत्नी वीणा सिंह आणि आनंद मोहन यांचे पुत्र चेतन आनंद यांना उम्मेदवार बनवलं आहे.

रघुवंश प्रसाद सिंह जिवंत होते तो पर्यंत रामा सिंह यांना पक्षात येण्याला विरोध केला. मात्र आता रामा सिंह आणि त्यांची पत्नी दोघंही आरजेडीमध्ये आहेत.

नेतृत्व तेजस्वी यांना का मिळालं?

सुनीता एरॉन म्हणतात, "तिकीट वाटपाकडे त्यावेळी निवडणुकीसाठी केलेली व्यूहरचना म्हणून पाहिलं पाहिजे. डीपी यादव यांना अखिलेश यांनी तिकीट नाकारलं, मात्र नुकसान झालं नाही. मात्र बिहारमध्ये यादव कुटुंब आपलं निसटलेलं राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत."

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारं कोणीच नाही. मात्र, तेजस्वी यांच्यासमोर त्यांचा भाऊ तेजप्रताप यादव आहे. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत आपल्या समर्थकांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी लालू आणि राबडी यांच्याविरोधात मोहीम उघडली होती.

लालू प्रसाद यादव यांना नऊ मुलं-मुली आहेत. मीसा भारती सर्वांत मोठी मुलगी तर तेजप्रताप सर्वांत मोठा मुलगा आहे. मात्र आरजेडीचं नेतृत्व तेजस्वी यांना का मिळालं?

तेजस्वी यादव, लालू यादव, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव लालूप्रसाद यादवांची परंपरा पुढे चालवणार का?

या प्रश्नाचं उत्तर देताना आरजेडी नेते प्रेमकुमार मणि सांगतात, "तेजस्वी लालू यादव यांच्या आपत्यांपैकी सर्वांत जास्त समजदार आहेत."

ते म्हणतात, "लोकांचं मत आहे की राहुल गांधींपेक्षा प्रियांका गांधी जास्त समजूद्दार आहेत. मात्र, सोनिया गांधी यांनी राहुल मागे पडतील या भितीने प्रियांका यांना जाणून-बूजून मागे ठेवलं आहे. मात्र लालू प्रसाद यादव यांच्याबाबतीत असं नाही. मीसा भारती यांनादेखील त्यांनी संधी दिली. दोन वेळा त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. आता राज्यसभेच्या खासदार आहेत. तेजप्रताप यांचं वागणं लोकांना माहीत आहेच. त्यामुळे तेजस्वी यांची निवड स्वाभाविक होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)