ट्रान्सवुमन रुपा आणि ट्रान्समॅन प्रेमच्या लग्नाची गोष्ट

- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
रुपा टाकसाळ आणि प्रेम लोटलीकर या पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड भागात राहणाऱ्या जोडप्याने आयुष्यात एक नवी सुरूवात केलीये.
रुपा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करते. तर प्रेम हा तिथेच ग्रीन मार्शल म्हणून काम करतो. दोघंही नोकरी करुन आपला संसार उभा करतायत. तसं पाहायला गेलं तर ही कोणत्याही सर्वसामान्य जोडप्याची गोष्ट वाटते. पण रुपा आणि प्रेम यांची जोडी विशेष आहे.
रुपा ही ट्रान्सवूमन आहे. तर प्रेम हा ट्रान्समॅन आहे. या दोघांची एकत्र येण्याची कहाणीही वेगळी आहे.
वर्षभरापूर्वी रुपा आणि प्रेमची ठाण्यात ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या एका प्रशिक्षणादरम्यान भेट झाली. तिथल्या ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता एकमेकांच्या साथीने ते बुरसटलेल्या समाजमान्यतांना छेद देतायत.

रुपा आणि प्रेमने 27 जुलैला पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. पण लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कुटूंब, समाज, रुढी- परंपरा या सगळ्यांशी संघर्ष करावा लागला. रुपा मुळची बुलडाणा जिल्ह्यातली तर प्रेम हा मुळचा कल्याणचा.
'एका साडीवर घराबाहेर पडले'
रुपाने घरीच राहून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे.
रुपा सांगते, "मी घरात सर्वांत मोठी. स्वतःला आधी स्वीकारणं महत्त्वाचं असतं. मी मनाने स्त्रीच होते. एक दिवस घरातून फक्त एका साडीवर बाहेर पडले. पुढचे पंधरा दिवस खडतर होते. बाजार मागून मी बस स्टॅंडवर झोपायचे. नंतर मला तृतीयपंथियांमधल्या गुरु परंपरेविषयी कळलं. मी माहूरला आले. तिथे गुरुंच्या छायाखाली राहू लागले. बाजार मागायचे. पण एखाद्याने जर नाही पैसे दिले तर तिकडे परत कधीच फिरकले नाही. असंच थोडे थोडे पैसे गोळा करुन मी लहानशी जागा घेतली.
सार्वजनिक शौचालयाचं परमिट मिळालं. ते चालवायला लागले. हे सगळं करत असताना सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या, कागदपत्रं जुळवली. माझं एक घरं बांधलं. मी नेहमी घर कामात रमायचे. बाजार मागून झाल्यावर सरळ घरी येऊन घरातली कामं करायचे. पण माझ्याच कम्युनिटीतल्या लोकांच्या त्रासामुळे मला माझं घर सोडावं लागलं."

फोटो स्रोत, Ashish Kumar
आयुष्यातल्या या कटू अनुभवातून गेल्यावर रुपाने गुरु परंपरेत राहायचं नाही असं ठरवलं. आणि ती पोटापाण्याच्या शोधात पुण्यात आली. रुपा सांगते, "सुदैवानं चांगल्या लोकांशी माझी इथं ओळख झाली आणि मला स्वतःच्या पायावर ऊभं राहायला त्यांनी मदत केली."
पुण्यात आल्यावर तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्यासाठी अनाम प्रेम या संस्थेने तिला मदत केली.
तृतीयपंथी परंपरेतून बाहेर पडून नोकरी मिळवणं हे आव्हानात्मकच होतं. पण रुपा सांगते की, "अनाम प्रेम मुळे मला या कामात खूप मदत झाली. काही नोकरीच्या संधी मिळाल्या. जे काम हातात आहे ते सचोटीने करायचं."

तिने एका एनजीओमध्ये समुपदेशक म्हणून नोकरी केली. तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी असलेल्या फ्री क्लिनीकमध्येही नोकरी केली आहे. यामुळे आपणही स्वबळावर जगू शकतो असा विश्वास तिला मिळाला.
31 वर्षांच्या रुपाने ब्यूटी पार्लरचा कोर्स केलाय. तिला शिवणकामंही येतं.
'सर्जरीनंतर मला दाढी यायला लागली'
प्रेम कल्याण मधल्या एका चाळीत राहायचा.
"मी आधीपासूनच टॉमबॉयसारखा राहायचो. मुलासारखे कपडे घालायचो. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना मला मुलासारखं बघायची सवय होती. मी जेव्हा लिंगबदलाची सर्जरी करायचं ठरवलं, तेव्हा हळूहळू घरच्यांच्या मनाची तयारी केली. सर्जरीनंतर मला दाढी यायला लागली तेव्हा आजूबाजूचे लोक विचारू लागले. तेव्हा त्यांना सांगितलं की, माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होतोय का? मग काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता नाही. त्यांनीही समजून घेतलं."
प्रेम २९ वर्षांचा आहे. त्याने कॉमर्समधून पदवी घेतली आहे. त्यानंतर मुंबईतच एका सीए फर्ममध्ये नोकरी केली. त्यानंतर तोही ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठीच्या फ्री क्लिनीकमध्ये नोकरी करत होता. तिथल्या प्रशिक्षणाच्या दरम्यानच त्याची रुपाशी ओळख झाली.

हवा तसा जोडीदार मिळावा आणि लग्न करावं अशी दोघांची इच्छा होतीच. त्यांच्या मनातही जोडीदाराविषयी काही अपेक्षा होत्या.
रुपा सांगते, "माझा जोडीदार कसा असावा याची कल्पना माझ्या डोक्यात होती. बरेच तृतीयपंथी लग्न करतात. मला नोकरी करणारा जोडीदार हवा होता. माझ्या कमाईवर अवलंबून असणारा नको होता. संसारात दोघांचाही सहभाग हवा असं वाटायचं."
प्रेमला मात्र कधी ट्रान्सवुमनसोबत लग्न करेन असं वाटलं नव्हतं. "रुपा वेगळी आहे. तिच्याकडे बघून मला वाटलंच नाही की ही ट्रान्सवूमन आहे. ती प्रोफेशनल आहे. त्यातूनच आमची मैत्री झाली. आणि नंतर 6 महिन्यांनी मी तिला प्रपोज केलं."
'30 ट्रान्सजेंडर कामात रूजू'
रुपा आणि प्रेम एकमेकांना भेटले तेव्हा ती पुण्यात राहत होती आणि प्रेम मुंबईत. त्यामुळे लग्न केलं तर एका शहरात असावं आणि दोघांनाही नोकरी असावी, असं त्यांना वाटायचं.
पिंपरी चिंचवड पालिकेने ट्रान्सजेंडर व्यक्तींना रोजगार मिळावा यासाठी स्वतंत्रपणे धोरण आखलं. यामुळे रुपा सिक्युरिटी गार्ड म्हणून तर प्रेम ग्रीन मार्शल म्हणून एप्रिलमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत रुजू झाले.
एकाच शहरात, एकाच ठिकाणी नोकरी मिळाल्यामुळे दोघांच्या लग्नातला एका मोठा अडसर दूर झाला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी या पुढाकाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलंय. या कर्मचाऱ्यांसाठीच्या पेन्शन योजनेचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या विकासासाठी 2022-2023 मधील पालिकेच्या बजेटमध्ये 24 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एप्रिल- मे महिन्यांपासून पालिकेत कंत्राटी स्वरुपात त्यांना नोकरी देण्याचं धोरण सादर करण्यात आलं.
त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी बोलणं सुरु केलं. त्यांच्या मिटींग झाल्या आणि चर्चेनंतर या धोरणाने आकार घेतला.
1 जुलै रोजी जवळपास 30 ट्रान्सजेंडर व्यक्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने वेगवेगळ्या पदांवर रुजू झाले. काही सुरक्षारक्षक, काही ग्रीन मार्शल तर काही पालिकेच्या उद्यान व्यवस्थापनात काम करु लागले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र कक्षही बनवण्यात आला आहे.
कायद्यामुळे जगणं सोपं झालं
प्रेम आणि रुपाने आळंदीमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. यावेळी त्यांचा मित्र परिवार आणि सहकारी उपस्थित होते. दोघांच्याही कुटुंबातील कोणीही लग्नाला आले नाहीत.
कुटुंबियांचा विरोध हळूहळू मावळेल याची खात्री दोघांनाही वाटतेय. आणि ते मूल दत्तक घेण्याचाही विचार करतायत. रुपाचं तर आश्रम काढण्याचं स्वप्नं आहे.

फोटो स्रोत, PCMC
LGBTQIA+ संदर्भातल्या कायद्यांमध्ये आता थोडा बदल होतोय. त्यामुळे सकारात्मक फरक पडलाय, असं प्रेमला वाटतं.
प्रेम म्हणतो "कायदे बदल्यामुळे समाजात जागृती आली आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचतेय. कायदाच वेगळं मानत नाही तर बाकीच्यांनी वेगळं का मानावं? ज्या सोयी सुविधा सरकारकडून नागरिकांना दिल्या जातात त्या या घटकांनासुद्धा मिळाव्यात. अजूनही कित्येक ट्रान्समेन पुढे येत नाहीत. जर तुम्हीच स्वतःला स्वीकारलं नाही तर जग कसं स्वीकारेल? आणि स्वतःची ओळख दाखवली नाही तर ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी असलेल्या योजनांचा फायदा कसा मिळेल?"
महानगरपालिकेच्या एका धोरणामुळे रुपा आणि प्रेमसारख्या ट्रान्सजेंडर व्यक्तींना आत्मविश्वासाने जगण्याचं बळ मिळतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








