एकनाथ शिंदे औरंगाबाद दौरा : 'मुख्यमंत्र्यांचं भाषण कशाला ऐकायचं? सकाळी 7 पासून आलो होतो'

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, सिल्लोडहून.
औरंगाबाद ते सिल्लोड हे जवळपास 70 किलोमीटरचं अंतर. एरव्ही धुळीनं माखलेल्या या मार्गावर रविवारी (31 जुलै) एकदम जल्लोषाची झळाळी होती.
जागोजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले होते. एरव्ही शहरांतील चौकांत दिसणारा पोलीस बंदोबस्त यावेळी मात्र किलोमीटरमागे दिसत होता.
काही मिनिटांचं अंतर कापलं की लोक मोठ्या संख्येनं एकनाथ शिंदेंना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले दिसत होते.
त्यातील बहुतेकाच्या हातात मोबाईल होते. जणू त्यांना एकनाथ शिंदेंना त्यात टिपायचं होतं.
फुलंब्री समोरील पाल फाट्यावरही लोकांची अशीच गर्दी जमली होती. तिला सारून आम्ही पुढे गेलो तर गाड्यांचा ताफा रस्त्याच्या एका बाजूला उभा दिसला.
इथंच आमची भेट विष्णू काळे यांच्याशी झाली. ते फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज इथले रहिवासी. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ते आले होते.
विष्णू काळे शेती करतात. त्यांच्याकडे 1 एकर 30 गुंठे एवढी जमीन आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यातून काय अपेक्षा आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यानं शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत जाहीर केली पाहिजे. आमच्याकडे गेले काही दिवस रोज पाऊस चालू आहे. त्यामुळे कपाशीचं पूर्ण नुकसान झालंय.
"1800 रुपये तर नुसते कपाशीची बॅग आणायला लागले. खत-यूरिया आणि बाकी खर्च वेगळा धरा. पण पीक तर डुबून गेलंय. दहा हजार पाण्यात गेले. वावरात औतच चालत नाही, इतकं पीक सडून गेलंय."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
बोरगाव अर्जहून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी 5 गाड्या आल्या होत्या. जवळपास 80 जण त्यात होते.
यापैकीच एक असलेले मिथू सुस्ते. शेतीचा विषय निघाल्यावर ते बोलायला लागले, "आमच्या मकात पोटऱ्याइतकालं पाणी आहे. 1 एकर मका आहे, सगळी पाण्यात आहे. निंदता येत नाही की औत हाणता येत नाही."
फुलंब्री सोडून आम्ही पुढे निघालो तरीही तेच चित्र कायम होतं. जागोजागी लोक मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी गर्दी करून उभे होते.
मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात जवळपास 100 गाड्या होत्या. त्यांचा व्हीडिओ काढण्यासाठी तरुण मोबाईल हातात धरून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रमुख चौकांमध्ये जेसीबी तैनात करण्यात आल्या होत्या.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोडला पोहचले. तिथं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिथून ते थेट सिल्लोड मतदरसंघातील सहकारी सूत गिरणीच्या उद्घाटनाला निघून गेले.
आम्ही सभेच्या स्थळी पोहोचले तर तिथं प्रचंड गर्दी दिसून आली. नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात ही सभा आयोजित करण्यात आली होती. तिथल्या छतांवर बसून लोक शिंदे यांची वाट पाहत होते.
पाऊस आल्यास लोकांची तारांबळ होऊ नये म्हणून सभास्थळी वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
सभास्थळी मागच्या बाजूला नितीन सौदागर (28) बसले होते. सावखेडा गावचे नितीन मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी आले होते.
राज्यातील सत्ताप्रयोगाविषयी एक तरूण म्हणून काय वाटतं असं विचारल्यावर ते म्हणाले, "ते राजकारण आहे. आम्ही सत्तार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री कसे दिसतात, ते पाहण्यासाठी मी आलोय."
मराठवाड्यात बेरोजगारी ही समस्या असून गावातील इतर मित्र शेतीच करतात, असंही त्यांनी सांगितलं.
एव्हाना सभेच्या व्यासपीठावरून स्थानिक नेत्यांची भाषणं सुरू झाली होती. दुसरीकडे अनेक जण मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. जवळ जाऊन बघितलं तर संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्याच्या बातम्या ते बघत असल्याचं दिसून आलं.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
अब्दुल सत्तार हे सलग तीन वेळापासून सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. व्यासपीठावरील स्थानिक नेत्यांच्या भाषणात त्यांचं नाव सातत्यानं घेतलं जात होतं.
सभास्थळी आणि एकूणच सिल्लोडच्या रस्त्यावर हिंदू-मुस्लीम बांधवांची संख्या सारख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती.
सभेच्या ठिकाणी काही मुस्लीम तरुण मागच्या बाजूनं उभे होते.
सत्तार शेठ को मंत्री पद मिलेगा क्या, असं विचारल्यावर ते म्हणाले, "अब तो मिलना चाहिये. 10 हजार से ज्यादा लोग आये है."
और मंत्रीपद मिलने के बाद क्या करना चाहिये उन्होने, यावर ते म्हणाले, "मुसलमानों को आरक्षण देना का काम करना चाहिये."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
तेव्हाच मागून काही जणांचा आवाज आला. मुख्यमंत्र्यांना बाहेर स्वागतावेळी बघितलं आहे. आता इथं सभेत ते दिसले नाही तरी चालेल, असं त्यापैकी एक जण म्हणत होता.
एव्हाना 5 वाजले होते. पिंपळगाव पेठहून आलेल्या राजू यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.
"मुख्यमंत्र्यांनी लवकर इथं यावं, नाहीतर पब्लिक निघून जाईल. मग सत्तार शेठचं बॅड इम्प्रेशन पडेल. मुख्यमंत्र्यांना जास्त टाईम लागतोय. 3 वाजता येणार होते मुख्यमंत्री, आता 5 वाजत आहेत."

फोटो स्रोत, @mieknathshinde
थोडं मागे वळून बघितलं तर काही महिला सभास्थळाहून बाहेर पडताना दिसल्या. त्यातला एका आजींना कुठं चालल्या म्हणून विचारलं तर त्या म्हणाल्या, "काहीतरी खाऊन येतो बाळा. खूप भूका लागल्या आम्हाला. इथं पाणी पण नाही प्यायला."
महिलांना बाहेर पडताना बघून व्यासपीठावरून घोषणा करण्यात आली.
"सर्व माता-भगिनींना विनंती आहे की त्यांनी जागेवरच बसून राहावं. तिथंच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. पुढच्या 5 मिनिटांत मुख्यमंत्री महोदय इथं येणार आहेत."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
डिग्रसहून आलेल्या वृद्ध अंजनाबाई हातात पाण्याची रिकामी बाटली घेऊन ती भरण्यासाठी सभास्थळाहून बाहेर पडत होत्या.
इथं पाणी नाही का, असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "कुठं पाणी आहे? आणते आता बाहेरून."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
अंजनाबाई यांच्यासोबत आम्हीही सभास्थळाहून बाहेर पडलो. तर बाहेरही मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
मुख्यमंत्र्यांची वाट पाहत अनेक जण थांबले होते. त्यातले काही जण चहाच्या दुकानासमोर उभं राहून चहा पित होते.
आम्हीही चहाची ऑर्डर दिली.
कधी येणार आहे मुख्यमंत्री? असं विचारताच एक जण म्हणाले, "अहो इथून बोरगाव 20 ते 25 किलोमीटर आहे. इतका लेट असतो का? इतका वेळ बसून काय फायदा झाला? आता सगळी पब्लिक पांगून गेली."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
सभास्थळी परत येताना पुन्हा काही महिला हातात पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडताना दिसल्या.
आत पाणी नाही का, असं विचारल्यावर त्यातल्या एकीनं माझ्या हातातला मोबाईल पाहताच, "हो, आहे पाणी असं उत्तर दिलं."
सभामंडपात आलो तर पुन्हा तीच घोषणा कानावर पडली.
"काहीवेळात मुख्यमंत्री महोदय इथं पोहोचणार आहे. कृपा करून आपले स्थान सोडू नका."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी महिलांचीही मोठी गर्दी जमलेली होती. त्यांच्यासोबत लहान बाळंही होती.
भाषणासाठी आलेल्या पुढच्या स्थानिक पुढाऱ्यानं पुन्हा तीच घोषणा रिपीट केली.
तो म्हणाला, "सीएम साहेबांना ऐकण्यासाठी तुम्ही गेल्या 4 तासांपासून वाट पाहत आहात. ते आता पाचच मिनिटांत इथं येणार आहेत. कृपया जागा सोडू नका."
यानंतर स्थानिक महिला नेत्याचं भाषण सुरू झालं. त्यांनी केलेल्या वक्तव्यानं मात्र माझं लक्ष वेधून घेतलं.
त्या म्हणाल्या, "अनेक महिला पिण्याच्या पाण्यासाठी खुर्चीहून उठताना दिसल्या. पण, महिलांनी याकडे लक्ष द्यावं की, सिल्लोड शहरात एकेकाळी दहा-पंधरा किलोमीटरहून पाणी आणावं लागायचं. आता मात्र तिसऱ्या दिवशी अब्दुल सत्तार साहेबांनी मुबलक पाणी उपलब्ध करून दिलं. तर आपण काही तास बिनापाण्याचं या सभेसाठी थांबू शकत नाही का?"
त्यानंतर पुन्हा एक स्थानिक नेता भाषणासाठी आला आणि म्हणाला, "1 वाजेची वेळ होती. पण साहेबांच्या प्रेमाखातर तुम्ही इथं थांबलात. त्याबद्दल तुमचे आभार."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सभास्थळी आगमन झालं. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. सभास्थळाहून बाहेर पडलेली काही माणसं पुन्हा आत येताना दिसली. मुख्यमंत्री शिंदे व्यासपीठावर येताचा खुर्चीवर उभं राहून लोक त्यांना बघू लागले.
6 वाजून 20 मिनिटांनी अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेतला.
ते म्हणाले, "माझी विनंती आहे की आता कुणाचाही सत्कार घेतला जाणार नाही. सकाळपासून लोक इथं बसले आहेत."
सत्तारांच्या या एकाच वाक्यानंतर सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
पुढे सत्तार म्हणाले, "केवळ 5 दिवसांत आपण एवढा मोठा कार्यक्रम घेतला. त्यामुळे कदाचित व्यवस्था करण्यात कमी पडलो असेल. खूप लोक जमले म्हणून थोडा त्रास झाला असेल."
सत्तार यांचं भाषण सुरू झालं. तंबाखू-गुटखा खाऊन भाषण ऐकणारी तरुण मंडळी मागे येऊन पचापचा थुंकताना दिसत होती.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
सत्तारांनी मतदारसंघातील विकासकामांचा पाढा त्यांच्या भाषणात ऐकवला. आदित्य ठाकरेंनी तिकडे राजीनामा द्यावा मी सिल्लोड मतदार संघाचा राजीनामा देतो, असं ते म्हणाले.
त्यानंतर नुकतेच शिंदे गटात सामील झालेल्या अर्जुन खोतकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली.
6 वाजून 53 मिनिटांनी पुन्हा लोक सभामंडपातून बाहेर पडायला लागले.
त्यापैकी एकाला विचारलं तर ते म्हणाले, "मी मोढा गावाहून आलोय साहेब. एसटीनं आलोय. आता घरी जायला गाडी भेटायला पाहिजे म्हणून चाललोय."
यानंतर माजी मंत्री सुरेश नवले यांच्या भाषणाला सुरुवात झाली.
संध्याकाळी सात वाजता टाकळी गावाहून आलेली मंडळी बाहेर पडायला लागली.
मुख्यमंत्र्यांचं भाषण बाकी आहे अजून, असं म्हणताच त्यांनी उत्तर दिलं, "कशाला ऐकायचं मुख्यमंत्र्यांचं भाषण? आम्ही सकाळच्या 7 वाजेपासून इथं आलोय."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
यानंतर व्यासपीठावरून पुन्हा तीच घोषणा करण्यात आली. "आता फक्त 5 मिनिटे. जास्त वेळ नाही लागणार."
7 वाजून 7 मिनिटांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाषणासाठी उभे राहिले.
त्यावेळी अब्दुल सत्तारांचे काही कार्यकर्ते मागे आले. जे लोक मागे बसले आहेत, त्यांनी पुढे येऊन बसा. कारण पुढे खुर्च्या खाली झाल्या आहेत, अशी विनंती ते करत होते.
एव्हाना सव्वा सात झाले होते. बाहेर पडणाऱ्या महिलांचं प्रमाण हळूहळू वाढत होतं.
तितक्यात अब्दुल सत्तारांनी हातात माईक घेत म्हटलं, "पुढे दोन-तीनशे खुर्च्या खाली आहेत, मागे उभे असलेल्यांनी इथे येऊन बसा पटकन. मुख्यमंत्र्यांचं भाषण होईपर्यंत कुणीही हलणार नाही. माझं सगळीकडे लक्ष आहे."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
शेवटी 7 वाजून 20 मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणाला सुरुवात केली. तरीही लोक बाहेर पडतच होते.
एवढा वेळ आपली वाट पाहणाऱ्या लोकांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं, "अब्दुल सत्तार यांनी काम केलं म्हणून सकाळपासून तुम्ही इथे बसलेले आहात."
7 वाजून 53 मिनिटाला मुख्यमंत्र्यांचं भाषण संपलं. सभास्थळाहून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.
"आजपर्यंत कधीच एवढी गर्दी झाली नाही. लोक एकनाथ शिंदेंना पाहायला आले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या पोराला चॅलेंज करणारा हा माणूस आहे तरी कोण हे लोकांना पाहायचं होतं," अशी चर्चा सभास्थळाहून बाहेर पडणारी मंडळी करत होती.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
सभास्थळ सोडताना माझ्या डोक्यात मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करतील, या अपेक्षेनं आलेले बोरगावचे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी होते.
या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय दिलं? तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये या निर्णयाचा पुर्नउल्लेख आणि मराठवाडा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचं आश्वासन.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आम्ही सिल्लोडहून औरंगाबादकडे यायला निघालो. रस्त्यात पोलिस तसेच उभे दिसून आले.
हातात मोबाईलची टॉर्च लावून ते आपली ड्यूटी निभावत होते. मुख्यमंत्र्यासंहित इतरांनाही घरी जाण्यासाठी वाट मोकळी करून देत होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








