You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संकेत सरगर: चहावाल्याचा मुलगा ते कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक, असा आहे प्रवास
सांगलीतील एका चहावाल्याच्या मुलाने इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं आहे.
संकेत महादेव सरगर असं ही देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूचं नाव आहे. संकेतने 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग खेळात पदकाची कमाई केली.
संकेतच्या या कामगिरीमुळे भारताचं कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदकांचं खातं उघडलं आहे.
संकेतची बहीण काजल सरगर हीसुद्धा खेळाडू आहे. तिने खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर काजलचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील केलं होतं.
संकेत सरगरचे वडील महादेव सरगर एक छोटे व्यावसायिक आहेत. ते सांगली शहरात संजयनगर परिसरात वास्तव्याला आहेत.
लव्हली सर्कल येथे ते चहा आणि भजी विक्रीचा व्यवसाय करतात. शेजारीच त्यांची एक पान टपरीही आहे.
महादेव सरगर यांना तीन मुले असून यामध्ये संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले.
पहाटे पाच वाजल्यापासून सरगर दांपत्य आपल्या गाडीवर दाखल होतात. रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचं हे छोटंसं दुकान चालतं. चहा-भजी विक्रीच्या व्यवसायातून उदरनिर्वाह चालवत त्यांनी मुलांना क्रीडाक्षेत्रात पाठवलं. मोठा मुलगा संकेत, तसंच लहान बहीण काजल या दोघांनाही त्यांनी खेळाचे धडे दिले आहेत.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक दिली. इंग्लंडच्या मध्ये पार पडणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात भारताचा प्रतिनिधित्व करत 55 किलो गटांमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे.
248 किलो वजन उचलत संकेतने कॉमनवेल्थ स्पर्धेतलं भारताला पहिलाच पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या विजयानंतर सांगलीमध्ये सरगर कुटुंब आणि त्याच्या मित्रपरिवारने जल्लोष साजरा केला आहे.नुकतेच हरियाणा या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये संकेतची लहान बहिण काजल सहभागी झाली होती. त्याठिकाणी काजलने सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर तिच्या यशाचीही चर्चा सर्वत्र झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात काजल सरगर हिचं कौतुक केलं होतं. त्यामुळे लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवली आहे.
कुटुंबीयांनी काय म्हटलं?
आम्ही घेतलेल्या कष्टाला माझ्या मुलाने न्याय दिला, अशी प्रतिक्रिया संकेतचे वडील महादेव सरगर यांनी दिली आहे.
पदक जिंकलेल्या खेळाडूचा वडील म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो. ऑलिम्पिकसाठीही त्याचे प्रयत्न चालू आहेत. तो भारतासाठी ऑलिम्पिक पदक पटकावेल, याचा विश्वास वाटतो, असंही महादेव सरगर म्हणाले.
संकेतच्या आई राजश्री यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, "आमच्या मुलाने अत्यंत कष्टातून हे यश मिळवलं. संकेतच्या प्रशिक्षकांचं हे यश आहे. त्यांनी संकेतवर खूप मेहनत घेतली. त्यांना त्याचं श्रेय दिलं पाहिजे."
संकेतची बहीण काजल म्हणाली, "महाराष्ट्राच्या खेळाडूने 50 वर्षांनी कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावलं. माझ्या भावाने ही कामगिरी केली, त्याचा मला अभिमान वाटतो. आमचे प्रशिक्षक मयूर सिंहासने यांचं आम्हाला सहकार्य लाभलं.
लॉकडाऊनमध्ये आम्हाला आर्थिक अडचणी खूप आल्या होत्या. पण तरीही आई-वडिलांनी आम्हाला कोणत्याच गोष्टींची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांच्या मेहनतीचं फळ आम्हाला पदकाच्या रुपाने मिळालं आहे.
प्रशिक्षक मयूर सिंहासने यांनीही संकेतच्या पदकासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "दिग्विजयल वेटलिफ्टिंग स्कूलमध्ये संकेतने सराव केला. त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण त्याला काही दिवसांपूर्वी झालेल्या एका दुखापतीने डोकं वर काढलं होतं. पण प्रतिकूल परिस्थितीतही संकेतने मलेशियन आणि श्रीलंकन खेळाडूंना लढत देत रौप्यपदक पटकावलं. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)