एकनाथ शिंदे आणि गटाला ‘पालापाचोळा’ म्हणून उद्धव ठाकरेंना काय दाखवून द्यायचंय?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

उद्धव ठाकरेंची 'सामना'ला दिलेल्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग आज (26 जुलै) प्रसिद्ध झाला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव थोडफार बोलले होते. कधी समोरुन प्रश्न न घेता झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये, कधी शिवसेनेच्या पदाधिका-यांसमवेत झालेल्या बैठकांमध्ये. पण त्यापेक्षा विस्तारानं, हातचं राखून न ठेवता, समोरुन बंडखोरी केलेला गट रोज नवनवे गौप्यस्फोट करत असतांना त्याला उत्तरं ठाकरेंकडून अपेक्षित होती.

पण थोड्याफार फरकानं ते अगोदर बोलले आहेत तेच, किंवा आदित्य ठाकरे सभांमध्ये आणि संजय राऊत पत्रकार परिषदांमध्ये सध्या बोलत आहेत तेच नव्या शब्दांमध्ये, स्वत:च्या शैलीमध्ये उद्धव ठाकरे बोलले. उत्तरादाखल जे प्रश्न आज त्यांनी विरोधकांना विचारले, ते यापूर्वीही त्यांनी विचारले आहेत. नवे नव्हते.

या मुलाखतीच्या टीझर मध्ये 'गौप्यस्फोट' असा शब्द मोठ्यानं लिहिण्यात आला होता. पण किमान आजच्या पहिल्या भागामध्ये तर नवा गौप्यस्फोट, नवी माहिती, तपशील उद्धव ठाकरेंनी दिले नाही. कदाचित उद्या प्रकाशित होणा-या मुलाखतीच्या दुस-या भागात ते असतीलही.

पण दुसरीकडे उद्धव यांनी शिवसेनेमध्ये एवढी पडझड झाली, त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित झाल्या

पण आजच्या मुलाखतीत त्यांचा मूड आक्रमक होता, नमतं घेण्याचा नव्हता. बॉडी लँग्वेज सुद्धा स्थिर होती, गडबडल्यासारखी नव्हती. अर्थात कोणत्याही कसलेल्या अनुभवी राजकारणा-या अशा काळात असं असावंच लागतं. पण शिंदे गट, भाजपा यांच्यावर टीका करतांना त्यांनी शब्दांना अडवलं नाही.

मुलाखतीच्या या पहिल्या भागाची जर फोड केली तर कोणत महत्वाचे मुद्दे आणि त्यांचे अर्थ पाहता येतील?

'पालापाचोळा' आणि 'सडलेली पानं'

एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता तो म्हणजे की उद्धव एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणणार? एक मुद्दा नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी शिंदे यांचं नाव एकदाही या मुलाखतीत घेतलं नाही. त्यांच्या बंडानंतरच्या एकाही भाषणात त्यांनी ते घेतलेलं नाही आहे. या बंडाचं, त्याच्या परिणामांचं महत्व कमी करण्यासाठी उद्धव यांनी ठरवून घेतलेला हा निर्णय दिस्तो आहे.

त्यांनी प्रत्यक्ष नाव घेतलं नाहीच, पण काही विशेषणं नक्की वापरली. अनेकदा शिंदेंचा उल्लेख त्यांनी 'पालापाचोळा' असा केला. एके ठिकाणी ते 'सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत' असंही म्हणाले. शिवसेनेच्या डिक्शनरीमध्ये वेगळा असलेला 'गद्दार' हा शब्द त्यांनी वापरला नाही (जो आदित्य ठाकरे वारंवार वापरत आहेत), पण त्यांनी शिंदेंना उद्धेशून विश्वासघात करणारे मात्र म्हटलं.

"राजकीय वादळ आल्याचा आभास निर्माण केला जात आहे. वादळ आलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो उडतोय. तो पालापाचोळा एकदा बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्की येणार आहे" किंवा "ठाणेकर सूज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे, तो म्हणजे ठाणेकर नाहीत. शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना हे नातं या पालापाचोळ्याला तोडता येणार नाही," अशा वाक्यांमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंकडे 'पालापाचोळा'चा रोख जातो.

याचा उद्देश स्पष्ट आहे की, शिंदेंचं महत्व शिवसैनिकांमध्ये आणि मतदारांमध्ये कमी करण्याचा प्रयत्न अशा उल्लेखानं उद्धव ठाकरे करत आहेत. बाळासाहेबांनी भुजबळ, राणे, राज यांच्या बंडांनंतर अशी रणनीति वापरली होती. त्यात आपल्या समर्थकांना एक संदेश असतो. नाव न घेता असा उल्लेख करणं यातून हा उद्देश कसा साध्य होतो हे पाहण्यासाठी काही काळ जावा लागेल.

पण शिंदें हे कसे आपल्यानंतर नंबर दोन होते, त्यांच्याकडे कशी महत्वाची खाती दिली होती, तरीही कसा विश्वासघात झाला हे ठाकरे या मुलाखतीत पुन्हा एकदा सांगतात. जी बंडखोरांची 'हिंदुत्व' वा 'राष्ट्रवादीचा जाच' ही कारणं आहेत ती खरी नसून सत्तेसाठी हे कसं केलं गेलं हे ठसवण्याचा उद्धव यांचा प्रयत्न आहे. तो इथे परत दिसतो.

शिवसेना आजारपण आणि बंड यांचा मेळ का घालते आहे?

बंड आता मोडणार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेकडून जो प्रतिहल्ला सुरु झाला त्यात एका गोष्टीचा सातत्यानं उल्लेख होतो, तो म्हणजे उद्धव यांचं आजारपण आणि मुख्यमंत्री असतांना झालेली शस्त्रक्रिया. जेव्हा उद्धव आजारी होते, रुग्णालयात होते तेव्हा संधी साधून त्यांच्याविरुद्ध बंड रचलं गेलं अशी मांडणी सेनेकडून सातत्यानं होते आहे. तेच आजच्या मुलाखतीत परत दिसलं.

जेव्हा संजय राऊत यांनी हा प्रश्न उद्धव यांना विचारला तेव्हा ते म्हणतात की 'मला यावरुन सहानुभूती मिळवायची नाही'.

पण तरीही उद्धव पुढे जाऊन त्या काळाविषयी सांगतात. आलेल्या शारीरिक अडचणींविषयी सांगतात आणि त्यानंतर बंडखोरांवर आरोपही करतात.

"माझे हात-पाय हालत नव्हते, बोटं हालत नव्हते. त्याकाळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजणं मी बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते आणि काहीजण मी तसाच राहावा म्हणून देव पाण्यात घालून बसले होते," उद्धव ठाकरे शिंदेगटाकडे रोख ठेवत या मुलाखतीत म्हणतात.

'जेव्हा माझी हालचाल होत नव्हती आणि पक्षाला सावरण्याची गरज होती, तेव्हा यांच्या या हालचाली होत होत्या' असं म्हणत उद्धव बंडाविरुद्धच्या त्यांच्या उत्तराला भावनिक वळण देतात. त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्येही त्यांनी म्हटलं होतं. आदित्य त्यांच्या भाषणांमध्ये या आजारपणाचा उल्लेख करतात तेव्हाही शिवसैनिकांचा त्याला भावनिक प्रतिसाद मिळतो आहे.

नेत्याप्रति असलेल्या भावना हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बंड आणि आजारपण यांचा एकत्र मेळ या मुलाखतीत परत घातलेला दिसतो.

खरा राग भाजपावरच

आजच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी प्रकर्षानं ठसवण्याचा प्रयत्न केलेली गोष्ट म्हणजे या सगळ्यामागे भाजपा आहे. 'भाजपाला हिंदुत्वात भागीदार नको आहे' असं म्हणत त्यांना शिवसेना संपवायची आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला. भाजपाच्या हिंदुत्वावरून त्यांच्यावर टीका केली.

"त्यांना शिवसेना संपवायची होती. जे शिवसेनेबरोबर ठरवलं होतं, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद, ते केलं असतं तर पाच वर्षांत एकदा तरी भाजपला मुख्यमंत्रिपद मिळालं असतं. आता ही जी तोडफोड केलीये, ती शिवसेना नाहीये. हे करून त्यांना शिवसेना संपवायची आहे," असं उद्धव मुलाखतीत म्हणतात.

पण असं का हे विचारल्यावर म्हणतात, "हिंदुत्वामध्ये वाटेकरी नको असेल. शिवसेनाप्रमुखांनी आतापर्यंत हिंदुत्वासाठी राजकारण केलं, हिंदुत्व मजबूत व्हायला. आता ते जे करताहेत, ते राजकारणासाठी हिंदुत्व करताहेत. हा त्यांच्या आणि माझ्या हिंदुत्वातला फरक आहे."

यावरुन एक उद्धव ठाकरे स्पष्ट करतात की त्यांचा संघर्ष हिंदुत्वासाठी आणि भाजपाविरुद्ध आहे. जी बंडखोरांची मागणी होती की भाजपासोबत जावं आणि अजूनही उद्धव ती मानण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्याला पूर्णविराम देण्याचा उद्धव यांचा या प्रयत्न दिसतो आहे. हिंदुत्वाची भूमिका मी कधीही सोडली नसल्याचा पुररुच्चार ते करत राहतात आणि भाजपाच्या हिंदुत्वातला विरोधाभासही दाखवण्याचा प्रयत्न करतात.

हे मुद्दे उद्धव यांनी यापूर्वीही मांडले आहेत. पण या मुलाखतीत ते पुन्हा आले याचा अर्थ आता एवढाच की बंडानंतरही त्यांनी पाऊल मागे घेतलं नाही असा संदेश त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

इथं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या भात्यातला त्यांचा बाण काढतात जेव्हा ते म्हणतात की मराठी माणूस आणि हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. "मराठी माणसाची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि जी मेहनत शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली होती मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी ती तोडावी-मोडावी यासाठी आपल्याच काही कपाळकरंट्यांकडून प्रयत्न केला जातोय," ठाकरे म्हणतात.

मराठी आणि हिंदुत्व हे शिवसेनेच्या राजकारणाचे दोन खांब आहेत. त्यांच्याभोवती भावनाही आहेत. त्याचा राजकारणात सेनेला नेहमीच फायदा झाला आहे. त्यामुळे उद्धव या फुटीबद्दल विधान करतात. त्याचा परिणाम कसा होतो हेही आता पहायला हवं.

निवडणुकीचं आव्हान

बंडानंतर गेल्या काही काळात उद्धव ठाकरेंनी एक भूमिका अजून घेतली आहे ती म्हणजे निवडणुकांमध्ये दोन हात करण्याची. हे आव्हान त्यानी या मुलाखतीत पुन्हा एकदा हा बंडखोर गटाला दिलं आहे. 'समोरासमोर दोन हात करु. माझं चुकलं असेल जनता मला धडा देईल, तुमचं चुकलं असेल तर तुम्हाला देईल' असं म्हणत ते निवडणुकीत समोर बोलावताहेत.

पण त्याच वेळेस जी न्यायालयात लढाई चालू आहेत त्याबद्दल ते बंडखोरांना इशारा देतात की तुम्हाला कायद्यानुसार कोणत्या तरी पक्षात सहभागी व्हावंच लागेल. हा एका प्रकारचा माईंड गेम पण आहे कारण बंडखोरांमधले सगळेच शिवसेना सोडून अन्य पक्षात विलीन व्हायला तयार नाही असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे तुम्हाला विलीन व्हावंच लागेल असा कायदेतज्ञांचा हवाला देत या मुलाखतीतून उद्धव पुन्हा अधोरेखित करतात.

इथं प्रश्न वासरदारीचा, शिवसेनेवरच्या आणि बाळासाहेबांच्या हक्कावरचाही आहे. पण केवळ तो हक्क न सांगता त्यामागे काय राजकारण आहे हे सांगायचाही उद्धव प्रयत्न करतात. स्पष्ट विधानं करतात. ती विधानं बंडखोरांपेक्षा शिवसैनिकांसाठी आणि मतदारांसाठी अधिक आहेत.

"त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. सरदार पटेल, सुभाषबाबू तसंच बाळासाहेब ठाकरे त्यांना स्वतःचे म्हणून समोर आणायचे आहेत. आपल्याकडून आदर्श निर्माण झाला नाहीये, त्यामुळे जसा पक्ष फोडताहेत तसेच आदर्शही फोडत आहेत. त्यांना बाळासाहेब हवे आहेत, पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. माझं आव्हान आहे की, हे नातं तोडून दाखवा. माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. माझे वडील का चोरताय?"

त्यांच्या शैलीतल्या वजनदार आणि भावनिक शब्दांची योजना करुन उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत दिली आहे पण अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

राहुल शेवाळे म्हणाले तसे उद्धव खरंच भाजपासोबत युती करायला तयार होते का? त्यांचं आणि नरेंद्र मोदींचं संभाषण काय झालं होतं? महाविकास आघाडी पुढेही राहणार का? शिंदे परत आले तर त्यांना घेणार का? जर धनुष्यबाण चिन्हं गेलं तर उद्धव यांची शिवसेना काय करणार?

बंडखोर उद्धव यांना सांगून बाहेर जात होते तेव्हा उद्धव यांनी त्यांना अडवलं का नाही? पवारांवर झालेल्या आरोपांवर उद्धव बोलतील का? राज ठाकरेंच्या वक्तव्यांवर त्यांचं म्हणणं काय? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. ते संजय राऊत विचारतील का आणि उद्धव ठाकरे त्यावर बोलतील का, हे मुलाखतीच्या दुस-या भागामध्ये समजू शकेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)