You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे- पालापाचोळ्यानंच इतिहास घडवलाय, हे जनतेनं पाहिलं आहे
आम्ही पालापाचोळा आहोत, असं त्यांना वाटत असेल तर ठीक आहे. पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. जनतेनं ते पाहिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
"आमची लढाई सत्तेसाठी नव्हती, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे," असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंची 'सामना'ला दिलेल्या बहुचर्चित मुलाखतीचा पहिला भाग आज (26 जुलै) प्रसिद्ध झाला.
या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांचं नाव एकदाही उद्धव ठाकरेंनी घेतलं नाही. अनेकदा शिंदेंचा उल्लेख त्यांनी 'पालापाचोळा' असा केला. एके ठिकाणी ते 'सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत' असंही म्हणाले.
"राजकीय वादळ आल्याचा आभास निर्माण केला जात आहे. वादळ आलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो उडतोय. तो पालापाचोळा एकदा बसला की खरं दृश्य लोकांसमोर नक्की येणार आहे," असं उद्धव यांनी म्हटलं होतं.
या विधानावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
याआधी देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती तेव्हा ते म्हणाले की बंडखोर लोक माझ्याच वडिलांचे नाव वापरत आहेत. तसेच भविष्यात हे नाव मी त्यांना वापरू देणार नाही असे देखील ते म्हणाले होते.
यावर आता एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं, 'शिवसेनाप्रमुख ही काही तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत आहे."
"आमची हयात शिवसेनेत गेली आम्ही पालापाचोळा नाहीत, शिवसेनाप्रमुख व्हायची आम्हीच काय पण तुम्ही देखील होऊ शकत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख होते. त्यांच्या पायाचा आशीर्वाद जरी मिळाला तरी आम्हाला तो खूप आहे," असे ते म्हणाले.
बंडाच्या काळात त्यांनी एका पत्राद्वारे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यांनी आता पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
शिरसाट यांनी लिहिले होते पत्र
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. संजय शिरसाट हे बंडखोर उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांनी पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
आमदार शिरसाट यांचे पत्र जशाला तसेच या ठिकाणी देत आहोत.
प्रति,
श्री. उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय
पत्र लिहिण्यास कारण की...
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दार गेली अडीच वर्षं शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती.
आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून, निवडून न येणाऱ्या विधानपरिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते.
त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यावर आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाहीत.
मतदारसंघातील कामांसाठी इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलावलं आहे, असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं केलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसीव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.
तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे. हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची ही कधी तसदीही घेतली नाही.
किंबहुना आपल्यापर्यंत पोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती मतदारसंघातील निधी, अधिकारीवर्ग काँग्रेस राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेब ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते.
त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्यायहक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.
हिंदुत्व, अयोध्या, राममंदिर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे आयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वतः फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेला मी आणि माझ्या सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते.
आम्ही विमानात बसणार इतक्या तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितलं की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका, जे गेले आहेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की सीएम साहेबांचा फोन आला होता, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपलं घर गाठले.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच एकही मत फुटलं नव्हतं. मग विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामल्लांचं दर्शन का घेऊ दिलं नाही?
साहेब, जेव्हा मला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते. मतदार संघातली काम करत होते, निधी मिळाल्याची पत्रं नाचवत होते, भूमिपूजन आणि उद्घाटन करत होते, तुमच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते.
त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.
यासर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं, हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे ठेवले होते, आजही आहेत उद्या ही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
काल तुम्ही जे बोललात जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमचा भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.
कळावे, लोभ असावा...
आपलाच,
संजय शिरसाट
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)