You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
द्रौपदी मुर्मू यांच्या गावामध्ये काय आहे परिस्थिती?- ग्राउंड रिपोर्ट
- Author, रवी प्रकाश
- Role, ऊपरबेडा (ओडिशा) बीबीसी
एका आळसावलेल्या दमट उकाड्याच्या दिवशी आम्ही सकाळी-सकाळीच उपरबेडा गावात पोहोचलो तेव्हा तिथे महिला स्वयंपाक करत होत्या.
पुरुष मंडळी शेतात जाण्याची तयारी करत होते. लहान मुलं आंघोळ करून शाळेत जाण्याच्या तयारीत होती. गावातली काही दुकानं उघडली होती. काही अजून बंदच होती. एका काळ्या-पिवळ्या ऑटो रिक्षामध्ये बसून काहीजण शहरात जात होते.
तेवढ्यात टीव्ही, रेडियो आणि इंटरनेटवर देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाल्याची बातमी आली. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर भारताला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळेल.
ऊपरबेडाच्या गावकऱ्यांनाही याचा विशेष आनंद आहे. कारण द्रौपदी मुर्मू याच ऊपरबेडा गावच्या आहेत. याच गावात त्यांचं बालपण गेलं. हे गाव त्यांचं माहेर आहे.
जवळपास 3500 लोकवस्तीचं हे छोटंसं गाव ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यातल्या कुसुमी विभागात येतं. झारखंडच्या सीमेलगत असलेल्या या गावापासून जवळच लोह खनिजाच्या खाणी आहेत. आजूबाजूला नद्या आणि तळी आहेत.
हे गावसुद्धा देशातील इतर खेड्यांप्रमाणेच आहे. या गावातील लोकांच्याही त्यांच्या-त्यांच्या समस्या आणि गरजा आहेत. देशाच्या बहुतांश गावांप्रमाणेच या गावातील लोकांचीही सकाळ पहाटेच्या थोड्या आधी आणि रात्र संध्याकाळनंतर थोड्या वेळात सुरू होते. मात्र, या गावचं वेगळेपण हे की या गावात जन्मलेल्या द्रौपर्दी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत.
रायरंग विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत मुर्मू
मात्र, द्रौपदी मुर्मू चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. त्या रायरंगपूरमधून आमदार आणि ओडिशा सरकारमध्ये मंत्री होत्या. झारखंडच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे.
असं असूनही त्यांचं गाव देशातील इतर खेड्यांप्रमाणेच का आहे? इथले गावकरीसुद्धा वीज, पाणी, रस्ते, कॉलेज, हॉस्पिटल, बँक यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांविषयीच बोलतात.
उपरबेडाचे सरपंच खेलाराम हांसदा याचं उत्तर देताना सांगतात की अजिबात विकास झालेला नाही, असं नाही. द्रौपदी मुर्मू आमदार झाल्यानंतर गावात रस्ते आले. वीज आली.
पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आली. कान्हू नदीवर पूल बनला. जनावरांसाठी हॉस्पिटल सुरू झालं. इतर सरकारी योजना गावात आल्या. मात्र, अजूनही इतर बरीच कामं झालेली नाही.
बीबीसीशी बोलताना खेलाराम हांसदा म्हणाले, "उपरबेडा डिजिटल गाव आहे. पण, इथे त्या सर्व सोयी उपलब्ध नाही ज्या एका डिजिटल गावामध्ये असायला हव्या. इथे बँक असायला हवी. माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक व्हायला हवी. गावातील हॉस्पिटलमध्ये 14 बेडची व्यवस्था हवी."
"हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ हवा. सुविधा वाढवल्या पाहिजे. कारण आम्ही 108 नंबर डायल करून अॅम्ब्युलंसची वाट बघत बसलो तर हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच रुग्ण दगावेल."
20 किमीवर कॉलेज
उपरबेडा गावापासून सर्वात जवळ असलेलं कॉलेज 20 किमी अंतरावर आहे. याचा सर्वात जास्त त्रास उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना होतो.
द्रौपदी मुर्मूच्या शेजारी झिग्गी नायक ग्रॅजुएट आहेत. कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांना सर्वाधिक अवघड वाटतो तो कॉलेजपर्यंतचा प्रवास.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "गावातली मुलं सायकल किंवा बाईकने कॉलेजला जातात. मात्र, मुलींसाठी हे सर्वात अवघड काम आहे. आधी मी सायकलने कॉलेजला जायचे. पण, आता मला गावातून मेनरोडपर्यंत ऑटो आणि तिथून पुढे बसने जावं लागतं. गावातच कॉलेज असतं तर मुलींना ही अडचण आली नसती."
"तसंही हे गाव पाच वॉर्डांचं आहे. गावाची लोकसंख्या इतकी आहे की इथे कॉलेज सुरू करता येईल. कॉलेज झालं तर त्याचा फायदा केवळ उपरबेडाच नाही तर आसपासच्या गावांनाही होईल. द्रौपदी आत्या राष्ट्रपती बनल्यावर हे होईल, अशी मला आशा आहे."
काही भागात आता आली वीज
उपरबेडा गावात खरंतर वीज येऊन आता बरीच वर्षं झाली आहेत. मात्र, गावातला एक भाग आताआतापर्यंत अंधारात होता. एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्या भागात वीज आली.
गावात इलेक्ट्रिशियनचं काम करणारे जगन्नाथ मंडल यांनी बीबीसीशी बोलताना डुंगरीसाई टोले भागात वीज कनेक्शन नव्हतं आणि तिथली जवळपास 35 कुटुंब कंदिलाच्या प्रकाशात रहायची, असं सांगितलं.
वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात घाईघाईत या भागात वीज कनेक्शन दिलं. त्यामुळे या भागात वीज आली असली तर अनेकांची घरं कच्ची आहेत. प्लॅस्टिकच्या छताखाली राहून ते गुजराण करतात.
असं का?
कुसुमीचे प्रखंड विकास अधिकारी (बीडीओ) लाखमन चरण सोरेन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, गावात वीज फार पूर्वीच आली होती. पण, नंतरच्या काळात ज्या वस्त्या वसल्या तिथे वीज नव्हती.
नवीन घरं असल्याने वीजेची व्यवस्था करण्यात वेळ लागला. विकासाचा वेग आणखी वाढावा यासाठी आता आम्ही कामाचा झपाटा वाढवल्याचंही ते म्हणाले.
द्रौपदी मुर्मू यांची शाळा
गावाच्या मध्यभागी असलेल्या उत्क्रमित माध्यमिक शाळेत गेल्या काही दिवसात वर्दळ वाढली आहे. याच शाळेत द्रौपदी मुर्मू यांनी शालेय शिक्षण घेतलं.
इथे अनेक नवीन इमारती बनल्या आहे. मात्र, शाळेच्या मागच्या बाजूला अॅस्बेस्टॉसचं छत असलेल्या खोल्या तशाच आहेत. याच खोल्यांमध्ये द्रौपदी मुर्मू शिकायच्या. त्यावेळी छत कौलारू होतं.
या शाळेचे प्राचार्य मनोरंजन मुर्मू बीबीसीशी बोलताना म्हणाले, "त्यावेळी पहिली ते पाचवीसाठी एक शाळा आणि सहावी आणि सातवीसाठी दुसरी शाळा होती. पुढे दोन्ही शाळांचं विलिनीकरण करून उत्क्रमित शाळा सुरू केली. आता इथे सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. द्रौपदी मुर्मू या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या, याचा आम्हाला अभिमान आहे."
शाळेत सातवीत शिकणारी तनुश्री उरावलाही या गोष्टीचा खूप आनंद आहे की तिच्या सीनिअर द्रौपदी मुर्मू आता राष्ट्रपती होणार आहेत. मात्र, तिला स्वतःला मोठं होऊन भारतीय सैन्यात जायचं आहे.
कौलारू घरात झाला होता जन्म
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ज्या घरात झाला ते घर कौलारू होतं. आता या घराच्या बाहेरच्या बाजूला पिवळ्या रंगाचं पक्कं घर आहे. मात्र, मुर्मू यांचं बालपण ज्या घरात गेलं तो भाग अजूनही तसाच ठेवला आहे. या घरात आता द्रौपदी मुर्मू यांच्या भावाची सून दुलारी टुडू रहातात.
बीबीसीशी बोलताना दुलारी टुडू म्हणाल्या, "द्रौपदी यांच्या आठवणी जपण्यासाठी आम्ही जुनं घर तसंच ठेवलं आहे. त्या इथे येतात तेव्हा जुनं घर बघून त्यांना खूप आनंद होतो. त्यांना 'पखल' (पाण्यापासून बनणारा पदार्थ) खूप आवडतो. राष्ट्रपती झाल्यावर आम्हाला त्यांचं कोडकौतुक करता यावं, यासाठी त्यांनी लवकरात लवकर इकडे यावं, असं आम्हाला वाटतं. त्या राष्ट्रपती बनणार असल्याने आम्हाला आणि आमच्या सगळ्या गावाला आनंद झाला आहे."
'राष्ट्रपती बनतील, असं नव्हतं वाटलं'
द्रौपदी मुर्मू यांना सहावी-सातवीत शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महंतो आता 82 वर्षांचे आहेत. ते सांगतात की द्रौपदी लहानपणापासूनच हुशार होत्या आणि फावल्या वेळेत महापुरुषांची चरित्रं वाचायच्या.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "द्रौपदी वेळेत शाळेत यायची आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची. काही समजलं नसेल तर प्रश्न विचारायची. त्याचवेळी मला वाटलं होतं की ही मुलगी शिकून मोठी अधिकारी होईल. पण, राष्ट्रपती होईल, असं कधी वाटलं नव्हतं. आता तर तिने इतिहासच रचला आहे."
मित्रांच्या अपेक्षा
उपरबेडाच्या गावकऱ्यांना झालेला अत्यानंद आणि काही पायाभूत सोयी-सुविधांच्या मागण्या, यात काहीजण गंभीर मुद्देही मांडतात. गोविंद मांझीसुद्धा त्यापैकीच एक. गोविंद मांझी द्रौपदी यांचे बालमित्र. पहिली ते पाचवीपर्यंत दोघंही सोबत होते.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनतील. याहून अधिक अभिमानाची बाब दुसरी नाही. राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी राज्यघटनेत आदिवासींसाठी स्वतंत्र सरना धर्म कोडची तरतूद करावी आणि आदिवासी भाषांच्या विकासासाठी काम करावं, अशी आमची अपेक्षा आहे."
गावाची मुलगी राष्ट्रपती
उपरबेड्यातील लोकांच्या आशा, आकांक्षा आणि गरजा असताना त्यांच्या गावची मुलगी देशाची राष्ट्रपती होणार आहे, याविषयी सध्या उत्सवाचे वातावरण आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)