You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. सोनिया गांधी यांची आज ED चौकशी
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ED कडून चौकशी केली जाणार आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची चौकशी सुरू असून यासंदर्भात ED ने सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह कंपनीशी संबंधित काँग्रेस नेत्यांवर पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती.
त्यानंतर आज सोनिया गांधी यांना दिल्ली येथील ED च्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ED चौकशीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात गुरुवारी सकाळी एक बैठक घेऊन काँग्रेस नेते आपली पुढील दिशा निश्चित करणार असल्याचं वृत्त टीव्ही 9 भारतवर्षने दिलं आहे.
2. आमच्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी हिताचा निर्णय झाला - पंकजा मुंडे
ओबीसी आरक्षणसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मागच्या सरकारने यासंदर्भात दिरंगाई केल्याने लोकांमध्ये अस्वस्थता होती, आमच्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी हिताचा निर्णय झाला, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, "मागील सरकारने ओबीसी आरक्षणात लोकांची दिशाभूल केली होती. पण आता सोन्याचा दिवस उगवला. शब्दांत सांगता येत नाही, तेवढा आनंद मला झाला आहे."
ही बातमी झी 24 तासने दिली.
3. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील एक पत्र जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून जारी करण्यात आलं आहे.
वरील निर्णय केवळ राष्ट्रीय पातळीवर लागू असेल. राज्यपातळीवर हा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं पटेल यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही बातमी लोकमतने दिली.
4. हे घटनाबाह्य 2 लोकांचं सरकार, आदेश घ्यायला दिल्लीत बसलंय - आदित्य ठाकरे
"हे घटनाबाह्य दोन लोकांचं सरकार आहे. आदेश घ्यायला दिल्लीत बसलं आहे. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी हे राजकारण केलं आहे," अशा शब्दांत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबईतील आग्रीपाडा येथे एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
"राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला आज 1 महिना झाला. राग येण्यापेक्षा दुःख वाटतंय. ज्यांना भरभरून दिलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला.
आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, म्हणून ताठ मानेनं उभे आहोत," असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. दूरदर्शन सह्याद्रीवर मराठी कार्यक्रमच दाखवावेत, मनसेची मागणी
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता मराठी भाषेतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांचं हे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांना दिलं.
"दूरदर्शनने 15 ऑगस्ट 1994 रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरू केली, तेव्हा त्याचा उद्देश राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण व्हावे असा होता. परंतु, सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जातात, हे मूळ उद्देशाला धरून नाही," असं या पत्रात म्हटलं आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)