You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरे: 'सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं' #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं- आदित्य ठाकरे
"सध्या लोकशाहीची थट्टा सुरू आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"सर्कसमध्ये काहीही होऊ शकते. राज्यात जे सुरू आहे ते घटनाबाह्य आहे. ही लोकशाहीची थट्टा सुरू आहे. मी याकडे जास्त लक्ष देत नाहीये. आमच्याकडून राजकारण कमी झालं, हा आमचा दोष असू शकतो. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते. त्यामुळे हादेखील आमचा दोष असू शकतो. आम्ही लोकांची 24 तास सेवा करत आहोत. आमचं हे काम अजूही सुरू आहे," असं आदित्य म्हणाले.
2. मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या- नुपुर शर्मा
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
त्या म्हणाल्या आहेत की, "याआधी माझी मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले होते. माझ्या जीवाला आणखी धोका वाढला आहे. मला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत," 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. त्यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्सही बजावले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
याआधीही नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीत हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्यावर यावेळी कडक टिप्पणी केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात पसरलेल्या जातीय हिंसाचाराला त्याच जबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली.
3. प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह निधन
प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. भूपिंदर सिंह हे प्रसिद्ध संगीतकार आणि प्रामुख्याने गझल गायक होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन देखील केले आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
भूपिंदर सिंह यांनी गुलजार यांनी लिहिलेल्या अशा अनेक गजलांना आवाज दिला आहे, जे लोक आजही ऐकतात. त्यांनी किसी 'नजर को तेरा इंतजार आज भी है', 'हवा गुजर गयी पत्ते थे कुछ हिले भी नहीं', 'कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता' आणि 'राहों पे नजर रखना' अशा अनेक गजलांना आपला आवाज दिल आहे. त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार आरडी बर्मन यांच्यासोबत भूपिंदर सिंह यांच्या कामालाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 'दिल ढूढता है फिर वही फुर्सत के रात-दिन..' असो किंवा 'घरौंदा' चित्रपटातील 'दो दीवाने शहर में..'हे गाणे असो, भूपिंदर यांनी आपल्या आवाजाने ही गाणी आणखी सुंदर आणि संस्मरणीय बनवली.
4. मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी
राज्याचा प्रशासकीय कामांचा गाडा ज्या मंत्रालयाच्या इमारतीतून हाकला जातो तिथे नागरिकांना प्रवेश करताना पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. काम झाले नाही, वा न होणारे काम प्रशासनाने करावे या हट्टापोटी अनेक जण पाण्याच्या बाटल्यांमधून कीटकनाशक वा रॉकेल घेऊन येतात व ते प्राशन करण्याचा वा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे अशा आत्महत्यांच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळ सध्या पिण्याच्या पाण्याचा बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात येऊन विषप्राशन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गृह विभागाने पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये याविरोधात तीव्र नाराजी उमटत आहे.
मंत्रालयात सर्व सामान्य नागरिकांना आकाशवाणी समोरच्या प्रवेशद्वाराजवळूनच प्रवेश देण्यात येत आहे. हा प्रवेश देताना पोलिसांकडून सर्वांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित नागरिकांकडे आवश्यक ते ओळखपत्र आणि गेट पास असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्याचवेळी पोलिसांकडून सध्या पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मनाई केली जात आहे.
5. कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई द्या- न्यायालय
कोरोना मृतांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या भरपाईवरून सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना धारेवर धरले. कोणत्याही प्रकारचा अधिक विलंब न लावता मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणामध्ये दावा करणाऱ्यांना भरपाई न मिळाल्याबद्दल अथवा ती नाकारण्यात आल्याबद्दल काही तक्रार असेल तर ते याबाबत लवाद निवारण समितीकडे याबाबत दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
लवादाने देखील यावर चार आठवड्यांच्या आत तोडगा काढावा, असे सांगण्यात आले. मध्यंतरी आंध्रप्रदेश सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद कृती दलाच्या (एसडीआरएफ) खात्यावरील रक्कम वैयक्तिक ठेवी खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता.
हाच विषय पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला होता. यावर न्यायालयाने दोनच दिवसांमध्ये ही रक्कम आपत्ती व्यवस्थापनच्या खात्यामध्ये जमा करावी असे निर्देश आंध्र सरकारला दिले आहेत. आम्ही याप्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देत आहोत.
आधीच्या आदेशानुसार देय असणारी रक्कम राज्यांनी कोणत्याही प्रकारचा अधिकचा वेळ न दवडता तातडीने पात्र व्यक्तीला उपलब्ध करून द्यावी. याबाबत पीडितांना काही तक्रार असेल तर त्यांनी संबंधित लवाद निवारण समितीकडे दाद मागावी, असे न्यायालयाने सांगितले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)