Sex Drive : 'या' 7 औषधांचा तुमच्या लैंगिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो...

फोटो स्रोत, Getty Images
सेक्सबद्दल बोलायला, वाचायला, ऐकायला कुणाला आवडत नाही? जोडीदारासोबतचं प्रेम व्यक्त करण्याचं सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे लैंगिक संबंध असंही अनेकदा म्हटलं जातं.
लैंगिक संबंध किंवा कामवासना म्हणजे लैंगिक आयुष्यातील सर्वोच्च अनुभव. मात्र, अनेकदा या लैंगिक संबंधांमध्ये अडचणी येतात. कधी अंतर्गत, तर कधी बाहेरील कारणं यास कारणीभूत असू शकतात.
औषधं हे सुद्धा बऱ्याचदा लैंगिक संबंधांमध्ये अडथळा निर्माण करतात.
या बातमीतून आपण लैंगिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या 7 औषधांबद्दल जाणून घेणार आहोत. ही औषधं तुमच्या लैंगिक संबंधांची प्रेरणा कमी करतात. एएनआय या वृत्तसेवा संस्थेनं विशेषवृत्तातून यासंबंधी माहिती दिलीय.
1. वेदनाशामक औषधं (Painkillers)
शरीराच्या एखाद्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेदनाशामक औषधांचं सेवन करतात. मात्र, हीच औषधं तुमच्या लैंगिक संबंधांवरही परिणाम करतात.
स्त्री आणि पुरुषांमधील लैंगिक संबंधांसाठी आवश्यक असलेल्या टेस्टोस्टेरॉन आणि इतर विविध हार्मोन्सची निर्मिती कमी करण्यास वेदनाशामक औषधं कारणीभूत असतात.
2. अँटी-डिप्रेसन्ट (नैराश्यावर मात करण्यासाठीची औषधं)
नैराश्यानं (Depression) ग्रासलेले अनेकजण अँटी-डिप्रेजन्ट औषधं घेतात. मात्र, हीच औषधं कामवसाना-मारक म्हणूनही ओळखली जातात.

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE
या औषधांमुळे लैंगिक संबंधांमधील रस कमी होणं, ऑरगॅझम होण्यास उशीर होणं, वीर्यपतन उशिरा होणं किंवा ऑरगॅझम आणि वीर्यपतनच न होणं अशा अडथळ्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता अधिक असते.
किंबहुना, नपुसंकता येण्याची शक्यताही या औषधांमुळे वाढते.
3. गर्भनिरोधक गोळ्या
जेव्हा स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या किंवा बर्थ कंट्रोल पिल्स घेतात, त्यावेळी या गोळ्या सेक्स हार्मोन्सवर परिणाम करतात आणि या हार्मोन्सची पातळी कमी करतात. याचा परिणाम अर्थातच लैंगिक संबंधांवर होतो.
लैंगिक संबंधांसाठी गर्भनिरोधक गोळ्या कायमच मारक ठरतात.
4. स्टॅटिन्स आणि फायब्रेट
प्रामुख्याने अधिकच्या कोलेस्टेरॉलवर उपचार करण्यासाठी स्टॅटिन्स आणि फायब्रेट ही औषधं वापरली जातात. मात्र, ही औषधं टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि इतर लैंगिक हार्मोन्सच्या उत्पादनात व्यत्यय आणू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
स्टॅटिन्स आणि फायब्रेट्सच्या दुष्परिणामांच्या काही अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की, या दोन्ही प्रकारच्या औषधांमुळे नपुसंकता (Erectile Dysfunction) येऊ शकते.
5. बेंझोडायझेपाइन्स-ट्रँक्विलायझर्स (Benzodiazepines-Tranquilizers)
बेंझोडायझेपाइन्स हे औषधं चिंता, निद्रानाश आणि स्नायूंच्या गाठींवर उपचारासाठी सर्वसाधारणे वापरलं जातं. लैंगिक संबंधांमधील रस, उत्तेजना आणि संवेदना यांच्यावर या औषधाचा परिणाम होतो.
हे औषधांमुळे कमकुवत ऑरगॅझम, वीर्यपतनाची अडचण आणि ताठरतेतील समस्या यांसारखे परिणाम, तसंच टेस्टोस्टेरोन निर्मितीतही अडथळे येऊ शकतात.
6. रक्तदाबावरील औषधं
उच्च रक्तदाबाचे रुग्णही अनेकदा लैंगिक संबंधांमधील अडथळ्यांना सामोरे जाऊ शकतात. कारण रक्तदाबावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे लैंगिक समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते.

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE
या औषधांच्या वापरामुळे पुरुषांमधील लैंगिक इच्छा कमी होत जाते, परिणामी वीर्यपतनावर परिणाम होतो. तसंच, स्त्रियांमध्ये योनीमार्गात कोरडेपणा, संभोगाची इच्छा न होणं आणि कामोत्तेजनेत अडचणी अशा समस्याही उद्भवू शकतात.
7. अँटी-हिस्टामाईन्स
सतत शिंका येणे आणि नाक वाहणे यांसारख्या अॅलर्जी-संबंधित लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे औषधं वापरले जाते. यामुळे वीर्यपतन समस्या किंवा अगदी नपुसंकता येणं अशा समस्यांना पुरुषांना, तर योनीमार्गात कोरडेपणाचा सामना स्त्रियांना करावा लागू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








