'मला कधीही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, कारण...'

तणावग्रस्त युवकाचं काल्पनिक चित्र

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE

    • Author, सिमॉन पार्किन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रत्येक व्यक्तीला एखाद्याबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असतेच असं नाही यावर विश्वास ठेवणं काही लोकांना अजूनही जड जातं - पण अलैंगिक अभिमान चळवळ वेगानं जोर पकडत आहे.

मायकेल डे डोर लंडनच्या फक्त मुलांसाठी असलेल्या शाळेत शिकत होता, तो साधारण 14 वर्षांचा होता तेव्हा आपण इतर किशोरवयीन मुलांसारखे नाही आहोत याची त्याला जाणीव झाली.

त्याच्या वर्गातील इतर मुले मुलींविषयी चर्चा करत, शनिवारी-रविवारी एखाद्या मुलीचं चुंबन घेण्याविषयी बोलत किंवा घोळक्याने पोर्न मासिक बघत. मात्र डोरला यापैकी कशातच रस नसे, आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी त्याला काहीच वाटत नसे.

"मला वाटायचं की माझ्यामध्ये काहीशा उशिराने या भावना निर्माण होतील किंवा मी गे असेन," तो सांगतो.

यापैकी कोणताही निष्कर्ष त्याला फारसा योग्य वाटत नव्हता, मात्र, आपल्याला लैंगिक किंवा रोमँटिक आकर्षण का वाटत नाही याचं वर्णन करण्याची वेळ आली तेव्हा डोरला त्याची जाणीव झाली - म्हणजे काहीच नाही याची जाणीव झाली.

"प्रत्येकाच्या आयुष्यात काही ठराविक लोक असतात, ज्यांच्याविषयी आपल्याला अजिबात लैंगिक आकर्षण वाटत नाही. माझ्यासाठी प्रत्येकजण या गटात मोडत होता." एका वर्षानंतर, 15व्या वर्षी डोरने स्वतःचं वर्णन करण्यासाठी एक शब्दप्रयोग शोधून काढला : 'अलैंगिक'.

"पूर्वी अशा प्रकारच्या प्रकरणांचा उल्लेख शास्त्रीय साहित्यामध्ये 'डड' शब्दामध्ये करत असत.

गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकाच्या मध्याच्या सुमाराला डोरने ही बाब उघड केली तेव्हा, एलजीबीटी समाजाप्रमाणे अलैंगिक 'समाज' अस्तित्वातही नव्हता. ग्रंथालयांमध्ये अलैंगिकतेविषयी पुस्तकं नव्हती आणि काही प्रमाणात अभ्यास केलेलं अगदी मोजकं साहित्य शैक्षणिक निबंध म्हणून प्रसिद्ध झालं होतं, त्यामध्ये लैंगिक इच्छा नसल्याचं आढळून आलेले कीटक, उंदीर, आणि मेंढ्या यांच्या काही प्रकरणांचा अभ्यास होता.

अशा प्रकरणांचा उल्लेख साहित्यामध्ये 'डड' शब्दामध्ये करत असत. काही संशोधकांनी, काही व्यक्तींना आयुष्यभर कधीही कोणाविषयीही लैंगिक आकर्षण वाटत नाही, या कल्पनेचा विचार करायला सुरुवात केली होती, पण त्यासाठी अद्याप अधिक औपचारिक आणि कमी अपमानास्पद संज्ञा निर्माण करण्यात आली नव्हती.

'जितक्या व्यक्ती गे तितक्याच अलैंगिक असू शकतात'

"मी माझ्यासाठी स्वतंत्रपणे - किंवा इतरांनी माझ्यावतीनं ही संज्ञा शोधून काढली," डोर सांगतो, तो आता 33 वर्षांचा आहे आणि लंडनमध्ये गणितज्ञ म्हणून काम करतो.

"तेव्हापासून माझ्या असं लक्षात आलं की वास्तविक अनेक लोक स्वतःसाठी संज्ञा शोधतात. बहुतेक त्यांनी ही संज्ञा जीवशास्त्राच्या वर्गात ऐकली असेल - अर्थात पूर्णपणे वेगळ्या अर्थानं, त्यामुळे अमिबाप्रमाणे स्वतःपासून दुसरी व्यक्ती तयार करता येईल का याविषयी विनोद करण्यात येत असत. वापरण्यासाठी तो शब्दप्रयोग योग्य होता असं दिसतं.

"जितक्या व्यक्ती गे आहेत, जवळपास तितक्याच व्यक्ती अलैंगिक असू शकतील.

लैंगिक संबंध

फोटो स्रोत, Getty Images

कॅनेडियन शिक्षणतज्ज्ञ अँथनी बोगर्ट यांनी 2004मध्ये 'असेक्श्युआलिटी : प्रिव्हेलन्स अँड असोसिएटेड फॅक्टर्स इन अ नॅशनल प्रोबॅबिलिटी सँपल' हा निबंध प्रसिद्ध करेपर्यंत काही लोकांना अजिबात लैंगिक आकर्षण वाटत नाही या कल्पनेचा प्रसार व्हायला सुरुवात झाली नव्हती.

बोगर्ट यांच्या संशोधनामध्ये 1990च्या दशकामधल्या 18,000 ब्रिटीश लोकांचा डाटा संकलित करण्यात आला होता, त्यापैकी 1% लोक अलैंगिक असल्याचा दावा त्यांनी केला होता.

यापैकी सुमारे 70% महिला होत्या. अलैंगिक व्यक्तींची संख्या जवळपास गे व्यक्तींइतकीच असावी अशी शक्यता या संशोधनामध्ये व्यक्त करण्यात आली होती. मात्र, पुरावा असूनही काही लोक अलैंगिक लोकांना गे किंवा बायसेक्श्युअल समजतात.

आनंदी जीवनासाठी लैंगिक संबंध आवश्यक असल्याची कल्पना आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली आहे

केवळ सर्वसामान्यपणे आयुष्य व्यतीत न करणाऱ्यांचा निष्ठूर छळ करणाऱ्या इतिहासाच्याच संदर्भात नाही तर लैंगिक इच्छांवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणाऱ्या कला, मनोरंजन आणि साहित्याच्या संदर्भातदेखील या विषयावरचं मौन समजण्याजोगं आहे.

कुटुंबीय आणि मित्रांची प्रतिक्रिया नेहमी अविश्वासाचीच असते. एका व्यक्तीला कोणीतरी म्हणाले : 'तू काही झाड नाहीस'

लैंगिक भूक नसेल तर...

युरीपिडीस या प्राचीन ग्रीक नाटककारानं मिडीआ या नाटकामध्ये असं लिहिलं होतं की, एखाद्याचं लैंगिक जीवन चांगलं असेल तर "आपल्याकडे सगळं काही आहे, असं आपल्याला वाटतं."

पण त्याबाबतीत गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या असतील तर "तुम्हाला तुमचे सर्वांत चांगले आणि खरे मित्र तुमचा सर्वाधिक द्वेष करत असल्याचं वाटेल." एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक जीवनावरून त्याचे आरोग्य आणि समाधान निश्चित होतं ही कल्पना अज्ञान युगात, ज्ञान युगात आणि अगदी 1960च्या दशकातल्या लैंगिक क्रांतीदरम्यानही प्रचलित होती.

उदाहरणार्थ, 1942मध्ये फिलिप वायलेने लिहिलं की "आपण सर्वजण जे काही करतो आणि असतो आणि स्वप्न पाहतो त्याच्या तीन किंवा चार प्रमुख प्रेरणांपैकी लैंगिक इच्छा ही एक प्रेरणा आहे."

त्यावरून असा अर्थ लावला जातो की, एखाद्या व्यक्तीला लैंगिक भूक नसेल तर त्याच्या आयुष्यात स्वप्नं, कृती आणि कदाचित अगदी त्याचे अस्तित्व यांचाच अभाव असतो. अमेरिकेतल्या नॅशनल रिलीजियस व्होकेशन कॉन्फरन्सच्या 2002च्या वार्षिक अंकातल्या एका लेखामध्ये हा दृष्टीकोन अगदी स्पष्ट करण्यात आला होता.

लैंगिक संबंध

फोटो स्रोत, Getty Images

'अलैंगिक व्यक्तीला तुम्ही काय म्हणता?' असा प्रश्न या लेखाच्या लेखकानं विचारला होता. "उत्तर : त्याला व्यक्ती म्हणू नये. अलैंगिक व्यक्ती अस्तित्वात नसते. लैंगिकता ही देवाची देण असते आणि अशा प्रकारे आपल्या मानवी अस्मितेचा मूलभूत भाग असतो."

त्यामुळे लैंगिकतेबद्दल असणारा संकोच समजण्याजोगा आहे. येल युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी त्यांच्या अलिकडील संशोधनासाठी 169 स्वयंघोषित अलैंगिक व्यक्तींना त्यांच्या अलैंगिक परिचयाच्या प्रगतीबद्दल आणि ही ओळख इतरांसमोर उघड करण्याविषयी एक खुला वृत्तांत लिहायला सांगितलं. यासाठी मुलाखत घेण्यात आलेल्या अनेक व्यक्तींनी असं सांगितले की, जेव्हा त्यांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना याविषयी सांगितलं तेव्हा त्यांचा विश्वास बसला नव्हता.

एका प्रतिसादकाला कोणीतरी असं म्हणालं की : "तू काही झाड नाहीस." दुसऱ्याला एकानं ऐकवलं की, "हा फक्त एक टप्पा आहे" आणि एकदा ते "योग्य व्यक्ती"ला भेटले की त्यांना यापेक्षा वेगळं वाटू लागेल, समलैंगिकांची "तू भिन्नलिंगी व्यक्तीकडेच आकर्षित होशील" अशी समजूत काढण्यासाठी दीर्घ काळापासून हाच युक्तिवाद केला जात होतो आणि त्यामुळे त्यांचं नुकसानही होत होतं.

मुलाखत घेतलेल्यांपैकी एका मुलीनं एका गे गटाला फोन केला, या गटाला अनेक वर्षांपासून त्यांची लैंगिकता अनैतिक किंवा बेकायदेशीर असल्याचं सांगितलं जात होतं, या ठिकाणी तरी आपल्याला समजून घेणारे आणि स्वीकारणारे लोक भेटतील अशी तिला आशा होती. मात्र, तिच्याशी फोनवर बोलणाऱ्या गे व्यक्तीनं "अलैंगिकता अस्तित्वात नसते" असं तिला ऐकवलं, तेव्हा तिचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नव्हता.

लैंगिक संबंध

फोटो स्रोत, Getty Images

हे ब्रह्मचर्य नाही. ही लैंगिक नकारात्मकता नाही. लैंगिक संबंध न ठेवणे ही काही स्वतःहून केलेली निवड नसते.

ब्रह्मचर्य हा स्वतःहून घेतलेला निर्णय असतो, अनेकदा एखादी शपथ घेऊन त्याला पावित्र्य प्रदान केलेलं असतं, आणि लैंगिक बिघाडावर अनेकदा उपचार शक्य असतात, अलैंगिकता या दोन्हीपेक्षा वेगळी असते, ती वास्तवात अंगभूत आणि अचल असते. अलैंगिक लोक हताश किंवा सदोष नसतात.

"हे ब्रह्मचर्य नसते," डोर सांगतो.

"ही लैंगिक नकारात्मकताही नसते. लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत असा काही स्वतःहून घेतलेला निर्णय नसतो. सर्व अलैंगिक - आणि काही बिगर-अलैंगिकांनासुद्धा - हे लागू होतं, पण सर्वांना नाही."

ब्रॉक युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आरोग्यशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक बोगर्ट यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये अलैंगिकतेवर संशोधन करणं सुरू ठेवलं आहे.

त्यांनी लिहिलेलं अंडरस्टँडिंग असेक्श्युआलिटी, हे या विषयाला वाहिलेलं पहिलं पुस्तक 2012मध्ये प्रकाशित झालं होतं. मात्र, आपलं ज्ञान मर्यादित आहे आणि यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे, अशी त्यांची भूमिका आहे. "अलैंगिकतेच्या उगमावर अधिक संशोधन आवश्यक आहे", असं ते म्हणतात.

"अनुवांशिकता, मेंदूच्या सुरुवातीच्या विकासावर परिणाम करणारी जन्मापूर्वीची हार्मोन्स अशा सुरुवातीच्या जीवशास्त्रीय घटकांमुळे अलैंगिकतेवर परिणाम होतो असं काही संशोधनांमधून सूचित करण्यात आलं आहे. इतर लैंगिक अभिमुखतेप्रमाणे (ओरिएन्टेशन) अलैंगिकतेचीदेखील सुरुवातीची जीवशास्त्रीय कारणं असू शकतात किंवा किमान सुरुवातीचे जीवशास्त्रीय पूर्वकल हे कारण असू शकतं."

लैंगिक संबंध

फोटो स्रोत, AVEN

फोटो कॅप्शन, अलैंगिक लोक होमोरोमँटिंक किंवा हेटरोरोमँटिक असू शकतात, त्यांना सम किंवा भिन्नलिंगी व्यक्तीकडून प्रेमाची भूक असते.

हार्मोनच्या कमतरतेमुळे लैंगिक इच्छेचा अभाव असू शकतो असं अलैंगिकतेबद्दल एक गृहीतक आहे. यामुळे अशी समजूत होऊ शकते की, अलैंगिक व्यक्तीची अनिच्छा ही लैंगिकतेच्या पलिकडे असते आणि टेस्टोस्टेरोनच्या कमतरतेमुळे होते त्यामुळे जगण्याच्या इतर क्षेत्रांमध्ये उदासीनता निर्माण होते.

यावर अधिक प्रकाश टाकताना बोगर्ट सांगतात की, "माझ्या मते, काही अलैंगिक लोकांमध्ये असामान्य हार्मोन असतील ही शक्यता खुली ठेवावी, पण बहुतांश अलैंगिक लोकांमध्ये असं काही असल्याचा पुरावा मिळाला नाही." "त्याशिवाय, काही अलैंगिक व्यक्तींमध्ये अजूनही एखाद्या प्रकारची लैंगिक इच्छा असू शकते - पण ती इतरांशी निगडीत नसते, इतकंच."

अलैंगिक व्यक्ती हेटरोरोमँटिक, होमोरोमँटिक, अरोमँटिक किंवा बायरोमँटिक असू शकते

डोर सांगतो की यामध्ये प्रचंड विविधता आहे. "अलैंगिकता ही काही बायनरी स्थिती नाही," तो सांगतो.

"हा एक मोठा पट आहे. काही जणांना बहुसंख्य लोकांपेक्षा कमी लैंगिक आकर्षण असेल पण त्यांना ते कधीकधी जाणवत असेल तर ते ग्रे-अलैंगिक किंवा ग्रे-ए असतील."

तसंच आकर्षणाचीही निरनिराळी अभिमुखता असते असं तो सांगतो. अलैंगिक व्यक्ती हेटरोरोमँटिक असू शकते (विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणारी), होमोरोमँटिक (समलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणारी), बायरोमँटिक (दोन्ही लिंगांच्या व्यक्तींच्या प्रेमात पडणारी) किंवा अरोमँटिक (कोणाकडूनच प्रेम आणि जवळिकीची इच्छा नसलेली) असू शकते, हे काही प्रकार आहेत. काहींना शारिरीक जवळिकीचा अ-लैंगिक प्रकार - उदा. गोंजारणे - आवडू शकतो, तर काहींना तो आवडत नाही.

अलैंगिकतेमध्ये येणारे विविध अनुभव सोदाहरण स्पष्ट करून सांगण्यासाठी, सॅन फ्रान्सिस्कोमधील द असेक्श्युअल व्हिजीबिलिटी अँड एज्युकेशन नेटवर्क (अॅव्हेन) या सपोर्ट ग्रुपने 2001मध्ये एक संशोधन केलं, त्यामध्ये असं आढळून आले की अलैंगिक व्यक्तींपैकी 70% व्यक्ती ब्रह्मचारी होत्या, 11% अलैंगिक व्यक्तींनी सांगितले की ते ब्रह्मचारी नाहीत पण सध्या लैंगिकदृष्ट्या निष्क्रीय आहेत, 7% अलैंगिक व्यक्तींनी आपण लैंगिकदृष्ट्या सक्रीय असल्याचं सांगितले; 17% अलैंगिक व्यक्तींनी सांगितलं की त्यांचा लैंगिक संबंधांना 'पूर्णपणे नकार' होता. इतर 38% अलैंगिक व्यक्तींनी सांगितलं की त्यांचा लैंगिक संबंधांना 'काही प्रमाणात नकार' होता, 27% व्यक्तींनी सांगितलं की ते लैंगिक संबंधांप्रति उदासीन होतं, पण 4% लोकांनी असं कबूल केलं की ते लैंगिक संबंधांचा आनंद घेत होते.

स्त्री आणि पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

अशा गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी गटाला समजून घेण्यातील अडचणी बाजूला ठेवून, बोगार्टचे असं म्हणणे आहे की, या अभ्यासामुळे लैंगिक संशोधनाच्या सर्व क्षेत्रांना लाभ होतो. "आपण अलैंगिकता जितकी चांगली समजून घेऊ, तितकी आपल्याला लैंगिकता चांगल्या प्रकारे समजेल," ते सांगतात. "हे अनेक पातळ्यांवर महत्त्वाचं असतं."

"अॅव्हेनच्या वेबसाईटवरील फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स या सदरामध्ये 'मी नेहमीच एकटा असेन का?' हा काहीसा चिंतेच्या स्वरात विचारला जाणारा प्रश्न बरेच काही सांगून जातो

अलैंगिक व्यक्तींचा अभ्यास करण्याची आतुरता असूनही, एक अलैंगिक व्यक्ती म्हणून जगताना कोणती मानवी आव्हानं येऊ शकतात त्याबद्दल बोगार्टला पूर्ण कल्पना आहे.

"अतिशय लैंगिक असणाऱ्या या जगात कसं वावरायचं हा सर्वांत मोठा प्रश्न अलैंगिक व्यक्तींना भेडसावत असतो," ते सांगतात.

"त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागू शकतं किंवा निदान काही प्रमाणात तरी या लैंगिक जगापासून तुटल्यासारखं वाटतं. तसंच त्यांना प्रेम करणारी व्यक्ती भेटणंही अवघड असतं, कारण काही अलैंगिक व्यक्ती प्रेमात पडू शकतात आणि दुसऱ्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध न ठेवताच प्रेमसंबंध ठेवण्याची त्यांची इच्छा असते."

लैंगिक संबंध

फोटो स्रोत, Getty Images

डोरला 2009मध्ये त्याच्या विद्यापीठातले काही विद्यार्थी अॅव्हेनचे सदस्य असल्याचं दिसल्यावर त्याला त्यांना भेटायची इच्छा झाली, त्यानंतर तो अॅव्हेनचा सदस्य झाला. "त्यापूर्वी, मी लैंगिक संबंध आणि प्रेमसंबंधांचा विषय टाळायचो," तो सांगतो.

डोरला अलैंगिकता दिसून येण्याचं महत्त्व जाणवल्यानंतर त्यामध्ये बदल झाला. "आपणच अलैंगिकतेविषयी बोलणार नसू तर ती अस्तित्वातच नाही असं लोक गृहीत धरतील किंवा अलैंगिक लोक चुकीचे आहेत असं त्यांना वाटेल," तो म्हणतो.

पुढील वर्षी डोर लंडनमध्ये पहिल्यांदा प्राईड मार्चला गेला, त्यानंतर त्यानं आपण अलैंगिक असल्याचं आई-वडिलांना सांगितलं. "मला वाटतं, यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या," तो सांगतो. "बहुतेक पहिल्यांदाच."

दोन वर्षांनंतर डोरनं लंडनमध्ये अलैंगिकतेवर पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात मदत केली.

गेल्या दशकभरात अॅव्हेनची सातत्यानं वाढ होत आहे, 2003मध्ये या संस्थेचे 391 सदस्य होते ते 2016मध्ये वाढून 82,979 इतके झाले आहेत. या गटाची सक्रियतदेखील वाढल्याचं दिसत आहे.

आता अनेक कॅम्पस प्राईड गटांमध्ये अलैंगिकतेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अचूक संख्येचा प्रश्न येतो तेव्हा चांगल्या डाटाचा अजूनही अभाव आहे. मात्र, याबाबतीत स्पष्टता लवकरच मिळू शकते. यूकेच्या 2021च्या जनगणनेसाठी ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटीस्टिक्स सध्या प्रश्नांच्या यादीमध्ये लैंगिक अभिमुखतेसाठी 'अलैंगिकता' या पर्यायाचा समावेश करण्याचा विचार करत आहे.

तणावग्रस्त युवकाचं काल्पनिक चित्र

फोटो स्रोत, REBECCA HENDIN / BBC THREE

"अलैंगिक समुदायाच्या दृष्टीनं अशा पर्यायाचा समावेश करण्याच्या शक्यतेचं महत्त्व अवर्णनीय आहे," डोर सांगतो.

"अनेक वर्षें अलैंगिकता आहे की नाही याबद्दलच लोक वाद घालत होते आणि आमच्याकडे ठोस डाटा फारसा नव्हता. बोगर्टच्या 1% आकडेवारीमध्येसुद्धा अनेक अस्वीकृती जोडलेल्या होत्या, आणि प्रत्यक्षातली आकडेवारी यापेक्षा जास्त असल्याचं मानलं जातं. यूकेची जनगणना हा आमचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा डाटासेट असेल. यामुळे अलैंगिकतेला समाजाच्या पटलावर स्थान मिळेल."

प्रचलनाच्याही पलिकडे, डोर आणि त्याच्यासारख्या इतरांच्या दृष्टीनं, अलैंगिक लोकांची इच्छापूर्ती होत नाही किंवा ते इतरांपेक्षा अपूर्ण असतात ही समजूत खोडून काढणं महत्त्वाचं आहे.

"काही लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी फार उत्तम गोष्टीला मुकतो आहोत, पण आमच्यासमोर त्याऐवजी दुसरे काहीतरी पर्याय नेहमीच असतात," डोर सांगतो.

"आमच्यापैकी बहुसंख्यांसाठी, हा केवळ आमचा एक गुणधर्म आहे. यानं आम्ही पछाडलेलो नसतो."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)