गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास आता ATS करणार

डॉ. गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, डॉ. गोविंद पानसरे

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची सात वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे त्यांच्या घरासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

अद्यापही या हत्येमागे कोण होते याचा छडा लागलेला नाही, यावर पानसरे कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन पानसरेंना न्याय मिळावा अशी मागणी पानसरे कुटुंबीय करत आहे.

कॉ. गोविंद पानसरे हत्येचा तपास महाराष्ट्र CID च्या विशेष तपास पथकाकडून (SIT) काढून, ATS ला देण्यात यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. ती आता मान्य करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणातल्या काही तपास अधिकाऱ्यांची आता एटीएसमध्ये बदली करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत.

या याचिकेवर सुनावणी करताना, बॉम्बे हायकोर्टाने गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 2020 पासून तपासात काय निष्पन्न झालं याचा रिपोर्ट देण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बीबीसीशी बोलताना गोविंद पानसरेंची सून डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, "तपास समाधानकारक नाही. आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे तपास ATS ला देण्यात यावा." तर, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया SIT चे तपास अधिकारी तिरूपती काकडे यांनी दिली आहे. 

कॉ. गोविंद पानसरे यांची फेब्रुवारी 2015 मध्ये कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक झाली असून दोन आरोपी फरार आहेत. 

पानसरे कुटुंबीयांची मागणी काय? 

एप्रिल महिन्यात गोविंद पानसरेंच्या कुटुंबीयांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या होत्या.

1. गोविंद पानसरेंवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर कोण आहेत हे शोधण्यासाठी तपास विशेष पथकाकडून (SIT) काढून तात्काळ महाराष्ट्र ATS ला देण्यात यावा. 

2. गोविंद पानसरेंच्या हत्येचे मास्टरमाईंड शोधण्यासाठी महाराष्ट्र ATS ची एक विशेष टीम गठीत करावी. 

3. कोर्टाने SIT आणि CBI ला या प्रकरणी ATS ला संपूर्ण मदत करण्याचे आदेश द्यावेत.

याबाबत बीबीसीशी बोलताना गोविंद पानसरेंच्या सून डॉ. मेघा पानसरे म्हणाल्या, "आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश आलंय. त्यामुळे आम्ही तपास ATS ला देण्याची मागणी केली आहे." 

डॉ मेघा पानसरे, गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, डॉ मेघा पानसरे, गोविंद पानसरे

गोविंद पानसरेंच्या हत्येला सात वर्षं पूर्ण झाली. तरी, तपासात कोणताही ब्रेक-थ्रू मिळालेला नाही, पानसरेंचे वकील अभय नेवगी यांनी न्यायमूर्ती रेवती ढेरे आणि व्ही. जी. बिश्त खंडपीठाला सुनावणी दरम्यान माहिती दिली.

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कोर्टाने तपास यंत्रणांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर दाभोलकर प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI आणि SIT ने खटला एकत्र सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली होती. मेघा पानसरे पुढे म्हणतात, "हा एका मोठ्या कटाचा भाग असल्यामुळे उच्च न्यायालयाने खटला सुरू झाला तरी तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत."

गौरी लंकेश

फोटो स्रोत, facebook

याचिकेत मागणी करण्यात आलीये की डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही. या हत्येचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे या हत्येमागचे मास्टरमाईंड शोधण्यासाठी तपास ATS ला देण्यात आला पाहिजे.

तर, SIT चे तपास अधिकारी तिरूपती काकडे यांनी या प्रकरणी आता काहीही माहिती देता येणार नाही, असं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी या तपासाबाबत दोन प्रश्न उपस्थित केलेत.

पहिला प्रश्न हा की, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, प्रा. कलबुर्गी ही प्रकरणं एकमेकांशी संबंधित आहेत. यातील आरोपी समान आहेत. आरोपांच्या टार्गेटवर 40 लोक होते. तरी हत्येचा मास्टरमाईंड कोण आहे याचा छडा अद्याप तपास यंत्रणा का लावू शकलेल्या नाहीत.

तर दुसरा प्रश्न असा आहे, डॉ. दाभोलकर प्रकरणातील आरोपी पानसरे हत्याप्रकरणात साक्षीदार म्हणून दाखवण्यात आले. आम्ही आवाज उठवल्यानंतर त्यांना पोलिसांनी आरोपी केलं. तपासात या त्रुटी कशा राहिल्या, असं नेवगी यांनी विचारलं आहे.

हायकोर्टाने काय म्हटलं? 

गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र CID च्या विशेष तपास पथकाला 2020 ते 2022 या दोन वर्षात तपासात काय झालं याचा रिपोर्ट देण्याचे आदेश जारी केले आहेत. बीबीसीशी बोलताना पानसरे कुटुंबाचे वकील अभय नेवगी म्हणाले, "SIT ला येत्या 21 जुलैला गोविंद पानसरे हत्याप्रकरणी रिपोर्ट सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत." 

दरम्यान, कोर्टाने गोविंद पानसरे हत्येचा तपास करणारे अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांची बदली करण्याची परवानगी राज्य सरकारला दिली आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून तिरूपती काकडे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. कोर्टाने पुढे म्हटलं की, तिरूपती काकडे यांच्या जागी नवीन तपास अधिकारी चार आठवड्यात नियुक्त करण्यात यावा. त्यानंतर काकडे यांची बदली करण्यात येऊ शकेल. 

पानसरे हत्येप्रकरणी आतापर्यंत किती आरोपी अटकेत? 

कम्युनिस्ट नेते आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी SIT ने आत्तापर्यंत 12 आरोपींना अटक केलीये. तर, दोन आरोपी अद्यापही फरार आहेत, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित कोल्हापुरातील सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

अटक आरोपींची नावे

समीर गायकवाड 

सांगलीच्या समीर गायकवाडला SIT ने पानसेंच्या हत्येनंतर सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. समीर हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे. SIT ने समीर गायकवाड विरोधात पानसरे हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलंय.

कोल्हापूर कोर्टाने समीर गायकवाडला जामीन मंजूर केलाय. याविरोधात पोलिसांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये. पण इतर प्रकरणात समीर अजूनही जेलमध्येच आहे.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे

साल 2016 मध्ये SIT ने पानसरे खून प्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. विरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती. SIT ने डॉ. तावडे पानसरे हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती दोषारोपपत्रात दिली होती. 

डॉ. तावडेला या प्रकरणी जामीन मिळाला असून याविरोधात पोलिसांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. तावडेचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी

अमित दिगवेकर अमित दिगवेकरला जानेवारी 2019 मध्ये SIT ने अटक केली होती. त्याच्यावर गोविंद पानसरे यांच्या घराची रेकी करण्याचा आरोप आहे. 

अमोल काळे साल 2018 मध्ये पानसरे प्रकरणातील आरोपी अमोल काळेच्या पोलीस कोठडीची मागणी करताना तपास अधिकारी रिमांड अॅप्लिकेशनमध्ये लिहितात, "डॉ. पानसरे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात दोन गावठी बनावटीच्या पिस्तूल वापरण्यात आला. त्यापैकी एकाचा वापर डॉ. दाभोलकर तर दुसऱ्या वापर प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या गुन्ह्यात करण्यात आला."

कर्नाटकमधील विचारवंत गौरी लंकेश हत्याप्रकरणी अमोल काळेला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर SIT ने पानसरे प्रकरणी काळेला अटक केली. 

वासुदेव सुर्यवंशी, भारत कुर्णे 

वासुदेव सुर्यवंशी आणि भारत कुर्णेला बंगळुरू पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केली होती. साल 2018 मध्ये महाराष्ट्र SIT ने या दोन्ही आरोपींना गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केली.

पानसरेंच्या हत्येचा कट रचण्यात दोघांचा समावेश होता असा दावा तपास पथकाने कोर्टात केला होता. या प्रकरणी कोल्हापुर कोर्टाने भरत कुर्णेचा जामीन अर्ज 2020 मध्ये फेटाळला होता. 

कुर्णेच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी पोलिसांनी दावा केला होता की डॉ. तावडेने पानसरेंच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दोन बंदूक कुर्णेकडे नष्ट करण्यासाठी दिल्या होत्या.

सचिन अंदुरे 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात CBI ने अटक केलेल्या सचिन अंदुरेला 2019 मध्ये गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक करण्यात आलीये. कोर्टाने या प्रकरणातून मुक्त करण्याची सचिन अंदुरेची याचिका फेटाळून लावली आहे. 

कोर्टाने त्याचा जामीन अर्ज 2020 मध्ये फेटाळला होता. सरकारी पक्षाचा दावा आहे की अंदुरे पानसरेंच्या हत्येच्या वेळी तिथे उपस्थित होता.

अमित बद्दी, गणेश मिस्किन 

अमित आणि गणेशला महाराष्ट्र ATS ने 2018 मध्ये नालासोपारा शस्त्र जप्ती प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याविरोधात ATS ने दोषारोपपत्र दाखल केलं होतं. कर्नाटक पोलिसांनी 2017 च्या विचारवंत गौरी लंकेश खून प्रकरणी देखील या दोघांना अटक केली होती.

शरद कळसकर 

2019 मध्ये SIT ने पानसरे हत्या प्रकरणी डॉ. दाभोलकर खून प्रकरणातील आरोपी शरद कळसकर अटक केलीये. बेळगावमध्ये गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी ज्या मिटींग झाल्या त्यात कशाळकर उपस्थित असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

पानसरे प्रकरणातील फरार आरोपी 

गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय.

मार्च महिन्यात कोल्हापूर कोर्टात पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी झाली होती. बीबीसीशी बोलताना आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, "कॉ. पानसरेंची हत्या कोणी केली? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे." याचं कारण तपास यंत्रणेने पहिल्यांदा समीर गायकवाड आणि त्यानंतर विनय पवार, अकोलकरने गोळी झाडल्याचा दावा केला. त्यामुळे ही हत्या नेमकी कोणी केली. या प्रश्नाचं उत्तर तपासयंत्रणा अजूनही ठोस देऊ शकलेल्या नाहीत.

महाराष्ट्र ATS ची नालासोपाऱ्यातील कारवाई 

2018 मध्ये महाराष्ट्र ATS ने मुंबई जवळच्या नालासोपारा भागात काही शस्त्र जप्तीची कारवाई केली होती. यात शरद कळसकरच्या घरातून बॉम्ब बनवण्याची कृती असलेल्या दोन चिठ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात एटीएसने वैभव राऊत, सुवन्धा गौंधळेकर, श्रीकांत पांगरकर, अविनाश पवार, लिलाधर, वासुदेव सुर्यवंशी, सुचित रंगास्वामी, भरत कुर्णे, अमोल काळे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किनला अटक केली होती. 

एटीएस अधिकाऱ्यांनी आरोपपत्रात लिहिलंय की, हिंदू धर्म, रुढी, परंपरा यावर टीका करणारे सहित्यिक आणि सामाजिक व्यक्ती यांना लक्ष करून त्यांची रेकी करून त्यांच्यावर हल्ला करण्याचं नियोजन केल्याबद्दल पुरावा प्राप्त झाला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)