You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Elena Rybakina: एलेना रायबाकिना विम्बल्डन विजेती; ऑन्स जबेरवर केली मात
रशियात जन्मलेल्या पण कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रायबाकिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेरवर 3-6, 6-2, 6-2 अशी मात केली.
डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये अव्वल 20मध्ये नसलेल्या एलेनाने जेतेपद पटकावण्याची किमया साधली.
विम्बल्डन आयोजकांनी यंदा रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घातली. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला. रशियात जन्मलेली एलेना 2018 पर्यंत रशियाचंच प्रतिनिधित्व करत होती मात्र त्यानंतर ती कझाकिस्तानकडून खेळते आहे. कझाकिस्तानतर्फे खेळत असल्याने एलेना यंदा स्पर्धेत खेळता आलं.
ऑन्स जबेरने सेमी फायनलच्या लढतीत तातयाना मारियावर 6-2, 3-6, 6-1 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ग्रँड स्लॅम एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ऑन्स ही पहिलीच आफ्रिका/अरब प्रांतातली महिला खेळाडू ठरली आहे.
अन्य लढतीत एलेना रायबाकिनाशीने सिमोन हालेपला 6-3, 6-3 असं नमवत अंतिम फेरी गाठली होती.
दुखापतीमुळे यंदा पहिल्यांदाच रॉजर फेडरर स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. दुखापत बळावल्याने सेमी फायनलच्या लढतीपूर्वी राफेल नदालने माघार घेतली. दुखापतीमुळे नेहमीप्रमाणे सर्व्हिस करता येणार नाही. नियमित वावरावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मला माघारीचा निर्णय घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत मला लढत जिंकता येणार नाही. 22 ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर असणाऱ्या नदालला जेतेपद पटकावण्याची उत्तम संधी होती पण दुखापतीमुळे त्याला परतावं लागलं.
राफेल नदालने माघार घेतल्याने निक कुर्यिगासला वॉकओव्हर देण्यात आला. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची कुर्यिगासची ही पहिलीच वेळ आहे.
रविवारी संध्याकाळी होणाऱ्या अंतिम मुकाबल्यात कुर्यिगाससमोर 20 ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचं आव्हान असणार आहे. जोकोव्हिचने सेमी फायनलच्या लढतीत ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीवर 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
रविवारी रंगणाऱ्या अंतिम लढतीत कुर्यिगासला नमवत विम्बल्डन स्पर्धेचं सातवं जेतेपद पटकावण्याचा जोकोव्हिचचा निर्धार असेल.
मातृत्वाच्या जबाबदारीनंतरही टेनिसचा ध्यास जपणाऱ्या भारताच्या सानिया मिर्झाला सेमी फायनलच्या लढतीत पराभवाला सामोरं जावं लागलं. सानिया यंदा विम्बल्डन स्पर्धेत मिश्र दुहेरीत मेट पॅव्हिकच्या बरोबरीने खेळत होती. सेमी फायनलच्या लढतीत नील स्कूप्स्की आणि डिसारे क्रॉझॅक जोडीने सानिया-मेट जोडीवर 4-6, 7-5, 6-4 असा विजय मिळवला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)