दलाई लामाः नरेंद्र मोदींच्या एका फोन कॉलवर चीन का नाराज झाला?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तिबेटचे निर्वासित धर्मगुरू दलाई लामा यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "आज परमपूज्य दलाई लामा यांना त्यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या. आम्ही त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याची कामना करतो."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दलाई लामांना फोन केलेला चीनला काही आवडलेलं दिसत नाही.

यावर चीन भारताला म्हणतो..

दलाई लामांना भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुभेच्छा दिल्या. यावर चीनची भूमिका काय? असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला विचारण्यात आलं.

तेव्हा चीनचे प्रवक्ते म्हणाले, "14 वे दलाई लामा चीनविरोधी आहेत. त्यांची वृत्ती फुटीरतावादी आहे हे स्वीकारलं पाहिजे. तसेच त्यांनी चीनला तिबेट संबंधित बाबींवर दिलेल्या वचनबद्धतेचं पालन केलं पाहिजे."

चीनचे प्रवक्ते पुढे म्हणतात "भारताने तिबेटशी संबंधित मुद्द्यांचा वापर करून चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये आणि जाणीवपूर्वक पावलं उचलावीत."

चीनच्या या प्रतिक्रियेवर भारतानेही आपलं उत्तर दिलं. भारताने उत्तरादाखल म्हटलंय की, दलाई लामांना भारतात सन्माननीय पाहुण्यांचा दर्जा लाभलाय. ते आदरणीय धर्मगुरू आहेत. भारतात त्यांचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत.

भारताने पुढे म्हटलं..

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "परमपूज्य दलाई लामा यांना धार्मिक, अध्यात्मिक कार्यांचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. भारतातील आणि जगभरातील अनेक अनुयायी दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करतात. पंतप्रधानांनी त्यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाही याच दृष्टीकोनातून पाहायला हव्या."

1959 च्या दरम्यान दलाई लामा तिबेट सोडून भारतात आले. तिबेट सध्या चीनच्या ताब्यात असून चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. दलाई लामा भारतात आल्यापासून ते हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील बौद्ध मठात राहतायत. दलाई लामा फुटीरतावादी नेते आहेत असं चीनच म्हणणं आहे.

भारतात राजाश्रय घेतलेल्या दलाई लामांच्या हालचालींवर चीन बारीक लक्ष ठेऊन असतो. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीही यासंदर्भात भाष्य केलंय.

चीनच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असणाऱ्या विश्लेषकांच्या मते, जर भारत आणि चीन यांच्यात तणाव नसता तर चीनने दलाई लामांबद्दल केलेल वक्तव्य एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती.

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील व्हिजिटिंग प्रोफेसर आणि चीनचे अभ्यासक स्वर्ण सिंह म्हणतात, "चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेली प्रतिक्रिया रुटिनचा भाग असल्याचं वाटत. पण सध्या भारत आणि चीन दरम्यान तणाव वाढलाय. आणि याच तणावामुळे भारताच्या चीन धोरणात बदल झालेला दिसतो."

चीनच्या प्रतिक्रियेवर भारताने ही आपलं उत्तर दिलंय. दलाई लामांचा विषय चीनसाठी दुखरी नस आहे. आणि त्यामुळे दलाई लामांचा विषय आला की चीनने नेहमीच आपली भूमिका मांडली आहे.

भारताचं म्हणणं आहे की, "दलाई लामा हे केवळ तिबेटी लोकांचे नेतेच नाहीत तर तिबेटी लोकांसाठी पूजनीय आहेत. दलाई लामा भारतात असल्याने तिबेट कार्ड भारताचा हुकमी पत्ता आहे. दलाई लामांना पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं आणि नंतर त्याबद्दल ट्विट करणं हा चीनला खास शैलीत दिलेला मॅसेज आहे."

"भारताच्या या मॅसेजमधून असं प्रतीत होत की, चीनसाठी जे मुद्दे संवेदनशील आहेत त्याचा वापर भारत आपल्या मुत्सद्देगिरीत करू शकतो. तिबेटसारखे मुद्दे पुढं आणायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराच भारताने दिलाय."

दलाई लामांची लेह भेट

सध्या लाखो तिबेटी भारतात राहतात. 2010 पासून तिबेटी लोक आणि चीन यांच्यातील चर्चा बंद आहे. जेव्हा चिनी नेते भारतात येतील तेव्हा त्यांनी तिबेटी लोकांशी चर्चा करावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणावा असं तिबेटी लोकांचं म्हणणं आहे.

यावर स्वर्ण सिंह म्हणतात, "तिबेटच्या लोकांना त्यांचे मुद्दे भारताच्या मध्यस्थीने मांडायचे आहेत. पण चीनबद्दलचा भारताचा दृष्टिकोन नेहमीच दोन्ही देशांमधील संबंध कसे आहेत यावर अवलंबून राहिलाय. आणि यामुळे हे मुद्दे समोर येतील की नाही हेही याच संबंधांवर अवलंबून आहे."

"भारत आणि चीनमधील सीमावादामुळे जो तणाव निर्माण झालाय तो गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ 'जैसे थे'च आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडूनही तणाव काही निवळलेला नाही. अशा स्थितीत भारताने चीनबाबतच्या धोरणात ठोस बदल केला असल्याचं दिसतं."

दलाई लामा 14 आणि 15 जुलैला लेहच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते लेहमधील एका बौद्ध मठालाही भेट देतील. दलाई लामा यांच्या लेह भेटीमुळे चीनची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

या भेटीवर स्वर्ण सिंग म्हणतात, "जेव्हाही दलाई लामांची अशी भेट होते किंवा त्यांच्या बाजूने कोणती प्रतिक्रिया येते तेव्हा चीन त्यावर आपला औपचारिक आक्षेप व्यक्त करतो."

मात्र, दलाई लामा यांच्या या भेटीदरम्यान भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव वाढला असून वातावरण बदललेलं दिसतं.

स्वर्ण सिंह यांच्या मते, दलाई लामा यांच्या लेह दौऱ्याबाबत चीनकडून काहीतरी तिखट प्रतिक्रिया दिली जाऊ शकते.

स्वर्ण सिंह म्हणतात, "जम्मू-काश्मीरचं विघटन असो वा लेह-लडाख आणि सीमेरेषेबाबतचा मुद्दा चीनने वेळोवेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलीकडेच जी-20 शिखर परिषदेदरम्यान, काश्मीरमध्ये परिषद आयोजित करण्याचा प्रश्न उद्भवला तेव्हा चीनने उघड विरोध केला."

"लेहमध्ये तिबेटी लोक राहतात, लेहची सीमारेषा चीनला लागून आहे. त्यात आणि लेह भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची पुनर्रचना केल्यानंतर चीनने आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दलाई लामा यांची लेह भेट चीनला चिंतेत टाकणारी आहे."

दलाई लामांच्या बाजूला आंतरराष्ट्रीय वलय तयार झालंय. ते जिथे जातात तिथे त्यांच्या विधानांची चर्चा होते.

अशा परिस्थितीत दलाई लामा यांच्या लेह भेटीमुळे चीन अस्वस्थ होण्याची शक्यता असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.

स्वर्ण सिंह म्हणतात, "दलाई लामा यांच्या लेह भेटीवर चीनकडून नक्कीच काही ना काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)