उद्धव ठाकरेंसोबत किती खासदार? आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या खासदारांची भूमिका काय?

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केलीये. मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आदेश सर्व खासदारांना द्यावा असंही शेवाळे पुढे म्हणाले.
दुसरीकडे, ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळींनी 'एकनाथ शिंदे आणि आमदार शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर कारवाई करू नये' असं पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. शिवसेना NDA चा घटकपक्ष नाही. काँग्रेसप्रणित यूपीएचा सदस्यही नाही. पण, भाजपविरोधी आघाडीत शिवसेना अग्रेसर दिसून येतेय. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात, की भाजपला शिवसेना संपवायची आहे, तरीही सेना खासदार भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या अशी मागणी करतायत.
शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे किती खासदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेचे 10 ते 12 खासदार फुटणार?
शिवसेनेकडे लोकसभेत 18 खासदार आहेत. 2019 ला भाजपपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने लोकसभेत शिवसेना खासदारांचा सूर भाजप विरोधीच दिसून येतोय.
शिंदे गट वेगळा झाल्यानंतर 10 ते 12 शिवसेना खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर काही खासदारांनी भाजपसोबत जुवळून घ्या अशी इच्छा उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केल्याची माहिती आहे. पण, शिवसेनेचा कोणताही नेता किंवा खासदार यावर बोलण्यास तयार नाही.
खासदार फुटण्याच्या चर्चेबाबत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले, "खासदारांच्या भावना उद्धव ठाकरेंनी जाणून घेतल्या आहेत. यावर सविस्तर चर्चा झालीये. खासदार फुटणार नाहीत." खासदार कुठेही गेले तरी कार्यकर्ते शिवसेनेच्या बाजूनेच आहेत.
सध्या तरी शिवसेनेच्या खासदारांनी आमदारांसारखी थेट बंडाची भूमिका घेतलेली नाही. पण, राहुल शेवाळेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं म्हणत वेगळी भूमिका घेतलीये. राहुल शेवाळे यांच्याशी बीबीसी मराठीचा संपर्क होऊ शकलेला नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत. त्यांचं सामाजिक कार्यात योगदान मोठं आहे. त्यामुळे आपण सर्व शिवसेना खासदारांना त्यांना पाठिंबा देण्याचे आदेश द्यावेत."
राष्ट्रपती निवडणूक18 जुलैला होणार आहे. भाजपकडून द्रौपदी मुर्मू, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा आहेत.
राहुल शेवाळेंच्या पत्राबाबत बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, "खासदार आपलं मत पक्षप्रमुखांना कळवू शकतो. त्यांनी आपलं मत नोंदवलंय. पक्षप्रमुख यावर निर्णय घेतील."
नाव न घेण्याच्या अटीवर एक खासदार सांगतात, "नवीन मुख्यमंत्र्यांनी किती खासदार त्यांच्यासोबत आहेत त्यांची नावं जाहीर करावीत. आम्ही त्यांना तातडीने पाठवून देऊ."
एप्रिल महिन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेचे 14 खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता.
उद्धव ठाकरेंच्या बैठकीत अनुपस्थित खासदार
शिवसेना आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी उपस्थित नव्हते.
श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाल्यानंतर, शिंदे यांच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरले होते.
"आम्ही सांगितलं कार्यकर्त्याचा जीव घुसमटतोय. निधी मिळत नाही याची तक्रार केली. शिवसेनेत गेल्या अडीच वर्षात सत्तेमध्ये आल्यानंतर मोठा असंतोष झाला," असं म्हणत त्यांनी बंडाला पाठिंबा दिला.

फोटो स्रोत, Shrikant Shinde Twitter
दुसरीकडे खासदार भावना गवळी ईडीच्या रडावर आहेत. मनी लॉंड्रिंगप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. भावना गवळींनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हिंदुत्वासाठी हे शिवसैनिक लढत आहेत. त्यांच्यावर कारवाई करू नका, अशी भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे ठाण्याचे खासदार राजन विचारे बाहेरगावी असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. राजन विचारे यांच्याशी बीबीसी मराठीचा संपर्क होऊ शकला नाही.
ठाण्यातील स्थानिक पत्रकार सांगतात, "राजन विचारे गेल्याकाही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. शिंदे यांच्या बंडाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत भूमिका स्पष्ट केली नाही. पण, विचारे शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याने शिंदे गटात जातील."शिवसेनेचे खासदार कोण? आणि त्यांची भूमिका काय?
हिंदुत्व आणि भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर शिवसेना खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आम्ही शिवसेना खासदारांकडून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार आणि प्रवक्ते. नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते. युती तुटल्यानंतर सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. सावंत उद्धव ठाकरेंच्या जवळचे आणि कट्टर शिवसैनिक मानले जातात. ते म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि रहाणार. राष्ट्रपती निवडणुकीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील."ओमराजे निंबाळकर
ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ते उपस्थित होते. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे. पक्षप्रमुख सांगतील तसंच करणार. त्यांच्याच आदेशानुसार राष्ट्रपती निवडणुकीत भूमिका घेणार."
विनायक राऊत
विनायक राऊत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार आहेत. रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जे आमदार खरेदी-विक्रिच्या बाजारात विकले गेले त्यांची चिंता नाही. आम्ही शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न करतोय." मध्यावधि निवडणुका झाल्या तर, शिवसेनेचे 100 आमदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे बंडानंतर 10 जुलैला रत्नागिरीत शिवसेनेचा मेळावा होणार आहे. याला उदय सामंत यांनी येऊ नये असंही राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
गजानन किर्तीकर
मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर गेली अनेक वर्ष शिवसेनेसोबत जोडलेले आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "उद्धव ठाकरेंसोबतच्या खासदारांच्या तीन बैठका झाल्यात. यात श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी अनुपस्थित होते. बाकी सर्व खासदार उपस्थित राहिले. खासदार फुटणार नाहीत. "

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY
ते पुढे सांगतात, "शिवसेनेतील हे बंड मागच्या दोन बंडांच्या तुलनेत मोठं आहे. पण, बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाने शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहिल." राष्ट्रपती निवडणुकीबाबत किर्तीकर यांची भूमिका राहुल शेवाळेंच्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे.
"द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत. प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी यांच्यावेळी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली होती." "त्यामुळे यावेळी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी आमची भूमिका आहे. यावर पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेतील."
धैर्यशील माने
शिंदे गटाच्या बंडानंतर धैर्यशिल माने यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्याचसोबत उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीलाही ते उपस्थित होते.
शिंदे बंडाबाबत बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "यावर आता काही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पक्ष एकसंध कसा राहिल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत."
श्रीरंग बारणे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटाचं बंड सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. मुंबईतील बैठकांना ते हजर होते.
बीबीसीशी बोलताना सांगतात, "मी शिवसेनेसोबतच आहे."
शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेकडून मेळावे घेणं सुरू झालं होतं. 25 जूनला नवी मुंबईतील खारघर मध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते, "काहींनी शिवसेनेला किड लावण्याचं काम केलंय. इथून पुढच्या काळात जे चुकले असतील त्यांना क्षमा नाही." हेमंत गोडसे
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क केला.
ते म्हणाले, "आम्ही सर्व उद्धव ठाकरेंसोबतच आहोत. आमची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला काही आदेश दिले आहेत. पण, याबाबत मी जास्त काहीच बोलणार नाही."
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत हेमंत गोडसे देखील उपस्थित होते.
राजेंद्र गावित
शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याशी बीबीसी मराठीचा संपर्क होऊ शकला नाही. पण, पालघरचे स्थानिक प्रतिनिधी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "राजेंद्र गावित अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. पुढे काय करायचं याबाबत त्यांनी काहीच ठरवलेलं नाही," अशी माहिती त्यांनी आम्हाला दिलीये.
हेमंत पाटील
शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मी शिवसेनेसोबतच आहे अशी प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले, "मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे." प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी जास्त बोलण्यास नकार दिला.
पण 24 जूनला लोकमत वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले होते, "माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने बळ दिलं. त्यामुळे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कधीच प्रतारणा करू शकत नाही. पक्ष सोडण्याचा विचारही माझ्या मनात कधी येणार नाही." हेमंत पाटीलही महाविकास आघाडीत नाराज होते. त्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली होती.
संजय मंडलिक
कोल्हापुरचे खासदार संजय मंडलिक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण 24 जूलना बंडखोर आमदारांविरोधातील मोर्चात संजय मंडलिक अग्रेसर होते. कोल्हापुरच्या शिवसैनिकांची जी भावना आहे तीच माझी असं मंडलिक म्हणाले होते. ते पुढे म्हणाले होते, "कोल्हापुरातील शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारे आहेत."
संजय जाधव
शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याशी बीबीसी मराठीचा संपर्क होऊ शकलेला नाही.
पण, काही दिवसांपूर्वी लोकमत या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी "मी आजन्म शिवसेनेसोबतच रहाणार. दुसरा कोणताही विचार मनात येणार नाही." अशी प्रतिक्रिया दिली होती. संजय जाधव यांनी देखील यापूर्वी महाविकास आघाडीत त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली होती.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, यवतमाळच्या भावना गवळी, बुलडाण्याचे प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांची भूमिका जाणून घेता आलेली नाही.
राजकीय विश्लेषक काय म्हणतात?
वरिष्ठ राजकीय विश्लेषक दिपक भातूसे सांगतात, "शिवसेना खासदार तात्काळ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेणार नाहीत. एकनाथ शिंदे यांची वाटचाल कशी आहे हे पाहून निर्णय घेतील." शिवसेनेच्या खासदारांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात प्रचंड नाराजी आहे. काही खासदारांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. त्यामुळे येत्या काळात खासदार फुटतील याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना महाविकास आघाडीत लढली तर कोणाला सीट मिळेल, खासदारकी टीकेल का नाही हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची पकड किती मजबूत आहे यावर शिवसेना खासदार निर्णय घेतील असं राजकीय जाणकार सांगतात.
वरिष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "एकनाथ शिंदे गटासमोर मोठी कायदेशीर लढाई आहे. त्याचं पुढे काय होतं. हे स्पष्ट झाल्याशिवाय शिवसेना खासदार काही निर्णय घेणार नाहीत." याचं कारण, ही कायदेशीर लढाई त्यांनाही लढावी लागेल. त्यामुळे खासदारांमध्ये नाराजी असली तरी, तात्काळ शिवसेना खासदार फुटणार नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








