गेल्या काही दशकांत LGBTQ समुदायासाठी हिंदी चित्रपटसृष्टी किती बदलली?

माय ब्रदर निखिल चित्रपटातील एक दृश्यं

फोटो स्रोत, ONIR

फोटो कॅप्शन, माय ब्रदर निखिल चित्रपटातील एक दृश्यं
    • Author, वंदना
    • Role, बीबीसीच्या भारतीय भाषांच्या टीव्ही एडिटर

"या चित्रपटातील पात्रं, कथानक आणि घटना काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही जाती, जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबध नाही. असं असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा."

अनेक चित्रपटांमध्ये सुरुवातीला अशी वाक्ये लिहिलेली असतात. याचा अर्थ तुम्ही पुढचे दोन-तीन तास मग यात चित्रपटातील विनोद, रडकथा, कधीकधी तर मृत्यू, जे काही पाहणार आहात, ते सगळं कल्पनात्मक आहे. त्याचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही.

हेच वाक्य 2005 मधील चित्रपट 'माय ब्रदर निखिल' सुरू होण्यापूर्वी पडद्यावर येतं. तुम्हाला ते आठवत नसेल तर यूट्यूबवर जाऊन बघू शकतात. पण, फरक इतकाच आहे की या चित्रपटात वापरण्यात आलेलं हे वाक्य खरं नाहीये.

कारण 'माय ब्रदर निखिल' हा चित्रपट डोमिनिक डिसूजा नामक तरुणाच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होता. ते पात्र काल्पनिक नव्हतं. चित्रपटाच्या गरजांसाठी त्यात बदल करण्यात आला असला तरी, त्या पात्राचा संबंध हाडामांसाच्या एका व्यक्तीशी होता.

गोव्यात राहणारे डोमिनिक समलैंगिक होते आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेले भारतीत पहिले व्यक्ती होते. ही 1989 ची गोष्ट आहे.

माय ब्रदर निखिल चित्रपटातील एक दृश्यं

फोटो स्रोत, onir

व्हॅलेंटाईनच्या दिवशी सकाळी पोलिसांनी अचानक त्यांना अटक केली आणि चाचणीनंतर सेनिटोरियममध्ये पाठवलं. तिथून मग कोर्टानं त्यांना गृहकैदेत पाठवलं.

अनेक महिन्यांनी डोमिनिक नजरकैदेतून सुटले. त्यानंतर त्यांनी एड्सच्या क्षेत्रात खूप काम केलं. पण, 1992 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

'माय ब्रदर निखिल'

जून महिना हा दरवर्षी प्राईड मंथ म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात एलजीबीटीक्यू समुदायाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. 'माय ब्रदर निखिल' हा समलैंगिकतेच्या विषयावरील एक महत्त्वाचा चित्रपट आहे.

पण, दिग्दर्शक ओनिर यांनी हा चित्रपट बनवला तेव्हा तो बनवणं इतकं सोपं नव्हतं. तसंच त्याला सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळवणंही सोपं नव्हतं. 2005च्या या काळात भारतात समलैंगिकतेला गुन्हा समजलं जायचं.

आपलं पुस्तक 'आय अॅम ओनिर अँड आय अॅम गे' मध्ये ओनिर लिहितात, "सेंसर बोर्डाच्या स्क्रीनिंगच्या दिवशी संजय सुरी आणि मी बाहेर वाट पाहत होतो. भीतीपोटी माझे पाय हालत होते. खोलीत शांतता होती. तुमचा चित्रपट आवडला आणि त्याला यू प्रमाणपत्र देत असल्याचं सेंसर बोर्डाच्या सदस्यांनी आम्हाला सांगितलं. पण, हे सगळं काल्पनिक असून सत्य घटनेवर आधारित नाही, अशी सूचना सुरुवातीला टाकावी लागेल, असंही ते म्हणाले.

"त्यामुळे मग हा चित्रपट डोमिनिकच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर आधारित आहे, हे चित्रपटात आम्ही लिहू शकलो नाही. असं असलं तरी मीडिया आणि इतर प्रत्येक ठिकाणी आम्ही ही बाब मान्य केली."

एलजीबीटीक्यू यांच्या प्रश्नांवरचे प्रमुख चित्रपट

  • दरमियां- 1997
  • तमन्ना- 1997
  • फायर- 1996
  • माय ब्रदर निखिल- 2005
  • अलीगढ- 2014
  • इक लडकी को देखा तो ऐसा लगा- 2019
  • बधाई दो- 2022

'माय ब्रदर निखिल' हा चित्रपट अशा काळात बनवण्यात आला होता, जेव्हा कलम 377 ही भारतीय दंड संहितेचा भाग होती. याचा अर्थ ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता, ते माहिती असूनही निर्मात्याला त्या व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारावं लागलं.

गोव्यातील ते पात्र समलैंगिक होतं. त्याला एड्सही होता. यामुळे गोव्याच्या प्रतिमेला नुकसान पोहचलं असतं, असं ऑनिर यांच्या पुस्तकात लिहिण्यात आलंय.

समलैंगिकतेवरील चित्रपट

एलजीबीटीक्यू समुदायावर चित्रपट बनवणं हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक वर्षांपासून नाजूक आणि क्लिष्ट मुद्दा राहिलेला आहे.

आज 'बधाई दो', 'चंडीगढ करे आशिकी', 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' असे चित्रपट बनवणं आणि रीलिज करणं सोपं असलं तरी इथपर्यंतचा प्रवास अवघड होता.

या शतकाच्या आधी ना समाज यासाठी तयार होता, ना चित्रपट निर्माते. एलजीबीटीक्यू समुदायाशी संबंधित पात्र अनेकदा पात्र म्हणून नाही तर टोमणे आणि हास्याचा भाग म्हणून दाखवण्यात आले होते. अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये हे दिसून येतं.

बधाई दो चित्रपट

फोटो स्रोत, VINEET JAIN

'शोले' चित्रपटामधील हिटलरच्या काळातील जेलर आणि तुरुंगात कैदेत असणारे जय-वीरू यांच्यासोबतचा कैदी क्रमांक 6 आठवून पाहा.

ती भूमिका अगदी काही मिनिटांचीच आहे आणि त्या पात्राच्या तोंडात तिथं काहीएक वाक्येही नाही. तरी पण कैदी क्रमांक 6 ज्यापद्धतीनं जेलरकडे पाहतो, धर्मेंद्रशी बोलताना त्याचे जे हावभाव असतात त्यावरून तो नेमका कोण आहे हे आपल्या लक्षात येतं.

त्यात त्याच्या कुर्त्यावर 'कैदी नंबर 6' असं लिहिलेलं असतं. जणू काही ते त्याच्या व्यक्तिमत्वाचं निदर्शक आहे. एलजीबीटीक्यू समुदायासाठी 'छक्का' हा शब्द कशापद्धतीनं अपमानकारकरित्या वापरला जातो, हे सगळ्यांनाच माहिती आहे.

असं असलं तरी त्याकाळात एलजीबीटीक्यू समुदायाबाबात जेवढी समज आणि संवेदनशीलता होती, त्याला आजच्या कसोटीवर परखणं पूर्णपणे योग्य ठरणार नाही. पण, ती बाब नाकारताही येणार नाही.

70, 80 आणि 90 च्या दशकातील चित्रपट काढून पाहा आणि त्यात समलैंगिक पात्रांना कसं दबकत दाखवलं ते पाहा, तुम्हाला यातील फरक कळून येईल. त्याकाळी चित्रपटात लेस्बियन पात्र दाखवणं तर कोसो दूर होतं.

1971चा 'बदनाम गली'

इथं 1971 च्या एका चित्रपटाबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. या चित्रपटाला अनेक चित्रपट तज्ञ समलैंगिकतेच्या विषयाला स्पर्श करणारा पहिला हिंदी चित्रपट मानतात.

प्रेम कपूरने 'बदनाम गली' नावाचा चित्रपट बनवला होता. नितीन सेठी, अमर कक्कर आणि नंदिता ठाकूर यांची यात भूमिका होती. त्यावेळी या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीने केली होती. चित्रपटाविषयीची माहिती शोधत असताना मला लेखक मनीष गायकवाड यांचा लेख सापडला. मनीष यांनी या चित्रपटावर बरंच संशोधन केलं आहे.

चित्रपटाविषयी वाचल्यावर लक्षात येतं की, यात समलैंगिकतेचं थेट चित्रण करण्यात आलेलं नव्हतं. पण ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरुणाची कथा समलैंगिकतेच्या विषयाला स्पर्श करून जाते. तीही तेवढाच स्पर्श करून जाते जेवढं स्वातंत्र्य 1971 मधील वातावरणाने चित्रपट निर्मात्याला दिलं असेल.

तमन्ना चित्रपट

फोटो स्रोत, POOJA BHATT

पण त्या काळात असा विषय निवडून चित्रपट बनवणं हे एक आव्हानच असेल.

असाच एक प्रयत्न 1995 मध्ये करण्यात आला होता आणि तो खरोखरच हिंदीतील पहिला समलैंगिक चित्रपट म्हणता येईल. यात समलैंगिकता हा मुद्दा उघडपणे मांडण्यात आला आहे. 'अधुरे' नावाच्या या चित्रपटात इरफान खाननं काम केलं होतं. मात्र सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पास केला नव्हता.

लेखक मनीष गायकवाड यांनी नुकताच या चित्रपटाचा उल्लेख केला, तेव्हापासून या चित्रपटाची प्रिंट कोणाकडे आहे, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

समलैंगिक पात्र फक्त हास्यासाठी?

LGBTQ समुदायाशी संबंधित पात्रांचं कशाप्रकारे प्रदर्शन केलं जातं, याविषयी नेहमीच वादविवाद सुरू आहेत.

2019 मधील 'हाऊसफुल' सारख्या यशस्वी फ्रँचायझी चित्रपटातील हा संवाद पाहा, ज्यामध्ये एक पात्र म्हणतं - 'त्याच्या लिंगाचं टेंडर अजून निघालेलं नाहीये.'

जर तुम्ही गेल्या दोन-तीन दशकांतील सर्वाधिक हिट अँड फील गुड चित्रपट पाहिले, तर त्यात ही समस्या दिसून येते.

या चित्रपटांमध्ये एकतर ही पात्रं खोड्या करण्याचे साधन आहेत किंवा पूर्णपणे नकारात्मक दाखवले आहेत. 'सडक' चित्रपटातील महाराणीच्या (सदाशिव अमरापूरकर) ट्रान्सजेंडर पात्राप्रमाणे. असं असलं तरी याप्रकारच्या नॅरेटिव्हला खंडित करणारे किंवा किमान आव्हान देणारे चित्रपटही आले आहेत.

1997 मध्ये महेश भट्टचा चित्रपट 'तमन्ना' हा चित्रपट, ज्यामध्ये टिकू (परेश रावल) नावाच्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखेला सर्व सामाजिक समजांपासून दूर, भावना असलेल्या सामान्य माणसाच्या रूपात (ज्याला मुलगी आहे) असं दाखवलं आहे. पण ती मुलगी एका ट्रान्सजेंडरला तिची आई किंवा वडील म्हणून स्वीकारू शकेल का? असा या चित्रपटाचा आशय आहे. हा चित्रपटही सत्यकथेवर आधारित होता.

फायर चित्रपट

फोटो स्रोत, DEEPA MEHTA

1997 मध्ये कल्पना लाजमीच्या दरमियान चित्रपटाने आई (किरण खेर) आणि तिचा मुलगा (आरिफ झकेरिया) यांच्यातील भावविश्वावर प्रकाश टाकला. यात आपला मुलगा ट्रान्सजेंडर आहे, असं एका आईला कळतं तेव्हा तिच्या भावविश्वाचा उलगडा केलेला आहे.

दुसरीकडे 1996 मध्ये आलेला 'दायरा' ही ट्रान्सव्हेस्टाईट (निर्मल पांडे) आणि बलात्कार पीडितेची कहाणी आहे, जी लिंगधारणेच्या सामाजिक वर्तुळावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

मात्र, सामाजिक स्तरावर सर्वांत मोठा गदारोळ निर्माण झाला तो दीपा मेहता यांच्या 1996 मध्ये आलेल्या 'फायर' या चित्रपटामुळे. या चित्रपटात दोन समलैंगिकांची कथा दाखवण्यात आली होती. तीही दोन स्त्रियांची. समाजातील एक वर्ग या चित्रपटाच्या बाजूने होता, तर दुसरा पूर्णपणे विरोधात होता.

मला आठवतं नाझ फाऊंडेशनच्या अंजली गोपालन यांनी इंडियन एक्स्प्रेसमधील एका लेखात म्हटलं होतं, "पुरुषसत्ताक मानसिकतेला आव्हान देणारं यापेक्षा मोठं काय असू शकतं, जिथं स्त्रिया म्हणतात की त्यांना पुरुषांची गरज नाही. स्वत:ला लेस्बियन समजणाऱ्या स्त्रिया आजही समाजात खालच्या स्तरावर आहेत. या चित्रपटामुळे समलैंगिकतेवर बोलण्यास सगळ्यांना प्रवृत्त केलं."

1996च्या 'फायर' ते 2019 च्या 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' पर्यंतच्या प्रवासाला जवळपास 23 वर्षं लागली. दोन पुरुषांची प्रेमकथा सांगण्यापेक्षा दोन स्त्रियांची प्रेमकथा सांगणे जास्त जोखमीचं आहे. पण 2022 मध्ये कलाकारही ही जोखीम घेत आहेत, लेखक आणि चित्रपट निर्मातेही घेत आहेत.

गझल धालीवालची ट्रान्सवूमन बनण्याची कहाणी

2014 ची गोष्ट आहे. जेव्हा कुर्ता आणि चुडीदार घातलेली एक आत्मविश्वासू मुलगी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' शोमध्ये आली होती. तिचं नाव गझल धालीवाल. माझा जन्म मुलगा म्हणून झाला, असं जेव्हा गझलनं सांगितलं तेव्हा तिथल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आजही मला आठवतात.

गझलने लोकांना तिच्या बालपणीचं चित्रही दाखवलं होतं. ज्यामध्ये ती एक शीख मुलगा आहे, ज्यानं पगडी घातल्याचं दिसत होतं.

याच गझल धालीवालनं दोन महिलांची प्रेमकथा असलेल्या 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटाची कथा लिहिलीय. गझल स्वतः एक ट्रान्सवूमन आहे, म्हणजेच शस्त्रक्रियेनंतर तिचं रूपांतर पुरुषातून स्त्रीमध्ये झालं आहे.

'सत्यमेव जयते'मध्ये ती म्हणाली होती, "मी पाच वर्षांची असताना, मुलगा असतानाही मला मुलगीच वाटत होते. ही भावना वयानुसार वाढत गेली. मला मुलीसारखं व्हायचं होतं. पुरुषाच्या शरीरात मी कैद झाले आहे, असं मला वाटत होतं. पण, माझा आत्मा एका स्त्रीचा होता."

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

गझलने 'इंक टॉक्स' कार्यक्रमात सांगितलं होतं की, "वयाच्या 12 व्या वर्षी तिनं झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. आणि जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष तर नाही केलं, पण हा आयुष्यातील एक तात्पुरता टप्पा आहे, जो निघून जाईल, असं ते मला वारंवार सांगत राहिले."

पटियालासारख्या ठिकाणी मध्यमवर्गीय समाजातील प्रत्येकाला मी मुलगा आहे, पण मला मुलीसारखे जगायचे आहे, हे सांगणं सोपं काम नव्हतं.

चित्रपटांमध्ये काम करण्याच्या इच्छेने गझल मुंबईत आली. तिथं तिनं ट्रान्सजेंडर लोकांवर चित्रपट बनवला. हा चित्रपट बनवताना तिला अनेक ट्रान्स लोक भेटले. त्यापैकी काहींनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली होती.

गझलने हा चित्रपट तिच्या पालकांना दाखवला, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की, तू लिंग बदलाची शस्त्रक्रिया कधी करणार आहेस? गझलनं 'सत्यमेव जयते'मध्येही या गोष्टी शेअर केल्या होत्या.

गझलच्या आई-वडिलांना गझलचे जग समजायला खूप वेळ लागला. पण नंतर गझलचे वडील भजन प्रताप सिंग आणि आई सुकर्णी धालीवाल यांनी स्वतःहून शेजाऱ्यांना सांगायची जबाबदारी घेतली की, ज्याला ते आजवर मुलगा म्हणून ओळखत होते, तो आता मुलगी होत आहे. सगळ्यांना तिला पाठिंबा द्यावा.

गझलसारख्या माणसांच्या खर्‍या पण कधी न सांगितलेल्या कथा आता पडद्यावर येत आहेत.

'मार्गेरिटा विथ ए स्ट्रॉ' मध्ये एका अपंग मुलीच्या लैंगिक इच्छेचा शोध घेण्यात आलाय. तर 2022 च्या 'बधाई दो' मधील सुमी (भूमी पेडणेकर) लेस्बियन आहे आणि कुटुंबापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ती एका समलिंगी पुरुषाशी (राजकुमार राव) लग्न करते.

जेव्हा सुमीची मैत्रीण म्हणते की, लेस्बियन असल्यामुळे सुमीच्या कुटुंबाने तिच्याशी संबंध तोडले आहेत आणि ते तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, तेव्हा क्षणभर निराश झालेली सुमी म्हणते - "कोणीही समजून घेत नाही यार. आम्ही वेगळे आहोत ना. त्यामुळे त्यांना आम्ही विकृत वाटतो."

'शुभ मंगल ज्यादा सावधान'

फोटो स्रोत, ANAND L RAI & BHUSHAN KUMAR

फोटो कॅप्शन, 'शुभ मंगल ज्यादा सावधान'

पण पुढच्याच क्षणी बंडखोर सुमी प्रश्नही विचारते, "पण (इतरांना) समजावूनही का सांगावं लागतं? ते आपल्या आयुष्याचा भाग आहेत. संपूर्ण आयुष्य थोडीच आहेत?"

2021 मध्ये आलेला पहिला व्यावसायिक चित्रपट 'चंदीगढ करे आशिकी' ही गझल धालीवाल सारख्या ट्रान्सवुमनची कथा आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलंय की, एक मॅचो-मॅनसारखा जिम मालक आणि हिरो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती ट्रान्सवुमन आहे हे कसे स्वीकारू शकत नाही. त्याला ट्रान्स म्हणजे काय हेही माहीत नसते.

या चित्रपटात ट्रान्सवूमनची भूमिका करणारी वाणी कपूर म्हणते, "तुला काय प्रॉब्लेम आहे ते माहीत आहे. माझं सत्य ना तुला पचवता येत आहे ना मला ही गोष्ट पूर्ण करता येत आहे."

चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारा हा गोंधळ, घुसमट आणि समस्या काल्पनिक किंवा आभासी समस्या नाहीयेत. तर बदलत्या भारतातील हे खरेखुरे मुद्दे आहेत.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात कार्तिक सिंग (आयुष्मान खुराना) समलिंगी आहे आणि त्याचा एक डायलॉग आहे - "मित्रांनो, शंकर त्रिपाठी (गजराज राव) आजारी आहे, खूप आजारी आहे, त्या आजाराचे नाव आहे होमोफोबिया. आपल्याला आयुष्यात दररोज लढाई लढायची असते. पण कुटुंबासोबत होणारी लढाई ही सगळ्यांत धोकादायक असते."

चित्रपटांमध्ये चित्रित केलेल्या कुटुंबांप्रमाणेच वास्तवातील कुटुंब आणि समाज या मुद्द्यावर तितकेच विभागलेले आहेत. शतकानुशतके चालत आलेले कौटुंबिक कलह आणि नव्या युगातील कायदेशीर सत्य, आजही काहीवेळा एकमेकांसमोर येताना दिसतात.

समलैंगिकतेवर कायदा आणि समाजाचा दृष्टिकोन

सहमतीच्या समलैंगिक संबंध म्हणजे गुन्हा नाही हे ठरवणारा भारत हा नेपाळनंतर दक्षिण आशियातील दुसरा देश ठरला आहे. हा निर्णय येऊन जवळपास चार वर्षे झाली असून या बदलाचा परिणामही दिसत आहे.

विविध देशांचे कायदे काय आहेत-

  • भारत - सहमतीने ठेवलेले समलैंगिक संबंध गुन्हा नाही
  • नेपाळ - 2007 मध्ये गुन्ह्याच्या श्रेणीबाहेर
  • चीन - 1997 पासून गुन्हेगारीच्या श्रेणीबाहेर
  • इराण - मृत्यूदंड
  • फ्रान्स, यूएसए, यूके आणि न्यूझीलंड - समलिंगी विवाहाला परवानगी आहे.

'अलीगढ' सारख्या चित्रपटांशी जोडलेले पटकथा लेखक अपूर्व असरानी यांनी 80 आणि 90 च्या दशकातील मुंबईतील समलैंगिक तरुणाची, स्वत:ची कथा अनेकदा शेअर केली आहे.

ते म्हणाले होते, "13 वर्षं आम्ही चुलत भाऊ असल्याचं भासवत एकत्र राहत होतो, जेणेकरून आम्ही भाड्याच्या घरात एकत्र राहू शकलो. शेजाऱ्यांना तुम्ही काय आहात हे कळू नये, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आता आम्ही आमचे नवीन घर घेतले आहे. आता आम्ही जातो आणि आमच्या शेजाऱ्यांना सांगतो की आम्ही पार्टनर आहोत. एलजीबीटीक्यू कुटुंबांना सामान्य कुटुंबाप्रमाणेच समजण्याची वेळ आता आली आहे."

ही गोष्ट 2020 मध्ये अपूर्व असरानी यांनी शेअर केली होती.

ओनिरचं पुस्तक

फोटो स्रोत, ONIR

OTT आणि इंटरनेटच्या आगमनापासून LGBTQ समुदायाच्या समस्या आणि सामाजिक परंपरांसोबतचा त्यांचा संघर्ष याविषयीचे चित्रपट, शॉर्ट फिल्म तयार केल्या जात आहेत. यात कोंकणा सेन शर्माचा 'गीली पुच्ची, 'मेड इन हेवन' किंवा 'शीर कोरमा' यांची नावं सांगता येतील.

अगदी अलीकडेच स्टँड-अप कॉमेडियन स्वाती सचदेवाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिने पहिल्यांदा जगाला सांगितलं की, ती बायसेक्शुयल आहे.

'समानतेबाबत तडजोड नाही'

परंपरा आणि चित्रपटांविषयी आपण बोलत होते, तर आता निर्माता-दिग्दर्शक ओनिर यांच्या वाक्याकडे परत जाऊया. त्या वाक्यापासून हा लेख सुरू झाला होता. ओनिर यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांचा समलिंगी असण्याचा प्रवास आणि एकटेपणाचं वर्णन केले आहे.

त्यांच्या पुस्तकाची टॅगलाइन आहे - 'समानतेबाबत तडजोड नाही'.

पण भावना, सत्य, सामाजिक मर्यादा, परंपरा, समानता आणि कायदा यांच्या या चक्रात अजूनही अनेक पदर, अनेक अपूर्ण पैलू आहेत. अगदी इरफान खानच्या 'अधुरे' चित्रपटाप्रमाणे. आताचे चित्रपट या सगळ्या गुंतागुंतीचा आरसा आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)