You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्मार्टवॉचनं फास्टटॅग स्कॅन करून तुमच्या अकाउंटमधले पैसे चोरता येतात?
सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा केला जात आहे की, टोल भरण्यासाठी वाहनावर असलेला फास्टटॅगचा स्टिकर स्कॅन करून तुमच्या अकाउंटमधून पैसे काढले जातात.
हा व्हीडिओ व्हॉट्स अप, ट्विटर, फेसबुकवर खूप शेअर केला जात आहे. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण हा व्हीडिओ शेअर करत आहेत.
पण फास्टटॅगच्या माध्यमातून खरंच तुमच्या अकाउंट चोरले जाऊ शकतात का? या दाव्यात काही तथ्य आहे का?
या व्हीडिओमध्ये एक मुलगा दिसतो. तो कार स्वच्छ करत होता आणि हे करत असतानाच तो मनगटावरच्या घड्याळानं फास्टटॅगचं स्टिकर स्कॅन करतो.
कार पुसल्यानंतर तो मुलगा तसाच निघून जायला लागला तेव्हा कार मालकानं त्याला परत बोलावलं आणि विचारलं, " तू गाडी पुसलीस का? तू पैशांबद्दल विचारलं नाहीस?"
त्यानंतर त्या मालकानं मुलाला हातातलं घड्याळ दाखवायला सांगितलं तेव्हा तो मुलगा पळून जायला लागला. गाडीत बसलेल्या दुसऱ्या व्यक्तिनं त्या मुलाचा पाठलाग गेला. पण तो मुलगा निसटून गेला. पाठलाग करणारा माणूस परत गाडीत येऊन बसला. मग ड्रायव्हिंग सीटवर बसलेली व्यक्ती फास्ट टॅग स्कॅमबद्दल सांगते.
व्हीडिओमध्ये हे घटनाक्रम दिसतात. या व्हीडिओमध्ये नेमकं काय आहे?
कारमध्ये बसलेली व्यक्ती असा दावा करते की, सिग्नलवर गाड्या साफ करणाऱ्या किंवा भीक मागणाऱ्या मुलांना अशापद्धतीचे स्मार्टवॉच दिले जातात. त्यांना फास्टटॅग बारकोड स्कॅन करायला शिकवलं जातं आणि अशापद्धतीनं तुमच्या पेटीएम फास्टटॅग अकाउंटमधून पैसे चोरले जातात. हा आता नवीन पद्धतीचा घोटाळा आहे.
व्हीडिओमधली व्यक्ती हिंदीमध्ये बोलत आहे. या व्हीडिओमध्ये जे सांगितलं जातंय ते खरं आहे की नाही याची शहानिशा न करता अनेकजण हा व्हीडिओ शेअर करत आहेत.
काही जण तर 'माझ्याही फास्टटॅग अकांउटमधून पैसे गेले आहेत. आता आम्ही काय करावं?' अशा पोस्ट करत आहेत.
आता या व्हीडिओमध्ये केलेले दावे खरे आहेत की नाही हे जाणून घेण्याआधी आपण मुळात फास्टटॅग म्हणजे काय आहे हे जाणून घेऊया.
फास्टटॅग म्हणजे काय?
फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी - RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं.
रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो.
हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.
15 फेब्रुवारी 2021 पासून फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला होता. फास्टटॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार होता.
लोकांना सहजपणे फास्टॅग विकत घेता यावा यासाठी बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी केंद्र उभारण्यात आली होती.
हे फास्टटॅग बँक अकांउट तसंच तुमच्या डिजिटल वॉलेट्ससोबत जोडलेले असतात.
सध्या जवळपास 90 टक्के गाड्या फास्टटॅगच्या माध्यमातूनच टोल भरत आहेत. त्यामुळे फास्टटॅग स्कॅमबद्दल असा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्यानंतर लोक काळजी व्यक्त करत आहेत.
'त्या' व्हीडिओची वस्तुस्थिती
फास्टटॅगची सर्व्हिस प्रोव्हाइडर पेटीएम (Paytm) कंपनीने याबद्दल ट्वीट केलं आहे आणि या दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हीडिओ 'फेक' असल्याचं म्हणत फेटाळून लावला आहे.
"स्मार्टवॉचचा वापर करून फास्टटॅगमधले पैसे चोरले जातात असा दावा करणारा व्हीडिओ पेटीएम फास्टटॅगबद्दल खोटी माहिती पसरवणारा आहे. NETC च्या नियमांनुसार केवळ अधिकृत मर्चंटच फास्टटॅगचा बारकोड स्कॅन करू शकतात."
केवळ पेटीएमनेच नाही तर सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीनेही याप्रकरणी निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
"स्मार्टवॉचसारख्या उपकरणांचा वापर करून फास्टटॅगचा बारकोड स्कॅन होतो असा दावा करणारा व्हीडिओ व्हायरल होत आहे. पण हा व्हीडिओ फेक आहे. अशाप्रकारे व्यवहार शक्य नाहीयेत. प्रत्येक टोल नाक्याला एक युनिक कोड दिलेला असतो, असं पीआयबीने ट्विटरवर म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्रालय आणि सायबर डिपार्टमेंटने या व्हीडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)नं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हीडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी हा व्हीडिओ 'खोटा' आणि 'तथ्यहीन' असल्याचं म्हटलं. ओपन इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत असंही NPCIनं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)