You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'काय झाडी, काय डोंगार' कविता व्हायरल; कवी सौमित्रला वाटतं त्यामागे हे आहे कारण
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, एकदम ओक्के' हे उद्गार प्रचंड व्हायरल झाले आहेत. या उद्गारांवरून मीम्सना उधाण आलं. कवी-लेखक किशोर कदम उर्फ सौमित्र यावर कवितेच्या माध्यमातून व्यक्त झाले. त्यांची कविता प्रचंड शेअर होते आहे.
कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत कवितेमागची भूमिका विषद केली. बीबीसी मराठीसाठी त्यांनी ही कविता म्हणूनही दाखवली.
सौमित्र म्हणतात, "या कवितेत जे मी म्हटलं आहे, मांडलेलं आहे तेच सगळं लोकांना वाटतं आहे असं मला वाटतं. म्हणून लोकांनी ही कविता खूप आवडली आहे.
"सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, अनेक ग्रुप्सवर लोक एकमेकांना वाचून दाखवत आहेत. चर्चा करत आहेत. शेअर करत आहेत. एखादी गोष्ट लोकांना आवडून जाते. सर्व थरातल्या, सर्व वयातल्या लोकांना आवडते. तशी ही कविता आहे," सौमित्र सांगतात.
"या कवितेची गंमत अशी की ओपन एन्ड आहे. काय व्हॉट्सअप, काय अमकं, काय ढमकं- प्रत्येकजण आपापलं म्हणणं जोडत चालला आहे. गोष्ट कशी वाढते तसं लोक या कवितेत भर घालत आहेत. असं काही होईल याची मला जाणीव नव्हती. मी सहज सुचलं ते लिहिलं. असं हे पसरतं आहे.
"कोणी वैचारिक, कोणी विनोदी, कोणी राजकीय, कोणी सामाजिक पद्धतीने याला पुढे नेत आहे. प्रत्येकजण या कवितेचा कवी झाला आहे. मी त्यांचं कवित्व मान्य करतो. हे या कवितेचं यश आहे," असं सौमित्र यांनी सांगितलं.
"एखादा कलावंत जे काही करतो ती त्याची भूमिकाच असते. मग तो पॉप्युलर सिनेमा करो, किंवा वैचारिक करो, नाटक असो-कविता करो. ही त्याची भूमिका असते. ही माझी भूमिका असं त्याने म्हणण्याची गरज नसते. तो जे काही करतो त्यातून", असं सौमित्र सांगतात.
ते पुढे म्हणतात, "जे काही चाललंय त्याला प्रतिवाद केला की ट्रोल केलं जातं. लोक अस्वस्थ होतात. गप्प बसतात. खूप बोलायचं असतं पण बोलत नाहीत. हे चुकीचं आहे का चांगलं आहे माहिती नाही. हे आधीच्या काळात घडत होतं का आताच घडतंय माहिती नाही. काही वर्षांपूर्वी असं घडत असेल पण तेव्हा मीडिया एवढा स्ट्राँग नव्हता. इतक्या पद्धतीने समाजात पसरलेला नव्हता.
"वर्तमानपत्रं होती, संपादक होते. संपादकांचे विचार होते. त्यांच्या भूमिका होत्या, वार्ताहर होते, त्यांच्या भूमिका होत्या. आता सगळं संभ्रमित झालेलं दिसतं असं दुर्देवाने म्हणावं लागेल," अशी खंत सौमित्र व्यक्त करतात.
सौमित्र यांची कविता
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील
काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष
काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास
काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब
काय मतदार काय कॉन्स्टिट्यूटन्सी काय सत्ता
काय फाइवस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता
काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे
काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं
काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक
काय ढोबळ वैचारिक न् काय आस्वादक
काय चॅनल काय मीडिया काय पेपर
काय शिणिमा काय ष्टोरी काय ठेटर
काय फेसबुक काय वॅाट्सप काय ट्विटर
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर
काय यूपी काय महाराष्ट्र काय बिहार
काय आर्थर काय येरवडा काय तिहार
काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)