एकनाथ शिंदे बंड: 'गुवाहाटीच्या डबक्यातून बाहेर पडून महाराष्ट्रातील स्वर्गात यावे' -सामना #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, facebook
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. आधी डबक्यातून बाहेर पडा- सामनातून आवाहन
गुवाहाटीत वास्तव्याला असलेल्या बंडखोर आमदारांना परत महाराष्ट्रात येण्याचे आवाहन सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.
"हिंदुस्तान तोडून बॅरिस्टर जीनांनी पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे.
म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये झाडी-हाटेल वगैरे आहे पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत.
'शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंच्चावनशे एकशे पंचावन्न करण्याची ताकद मऱ्हाटी मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते. 'सामनाच्या अग्रलेखात' ही भूमिका मांडण्यात आली आहे.
"शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या पण गेली 56 वर्षं टिकली ती फक्त सेनाच. गुवाहाटीमध्ये झाडी डोंगर हाटेल मजा घेत जे आमदार बसले आहेत त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व हाटील डोंगर आमदारांवर 11 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं न्यायालयाने सांगितलं आहे. हा एकप्रकारे दिलासाच आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण हे भविष्यात उघड होईलच," असं सामनाने म्हटलं आहे.
2. राज्यात 7231 पदांसाठी पोलीस भरती
पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून, पोलीस भरतीसाठी प्रथम शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाईल.
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयावर आधारित प्रश्न असतील. या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरतील. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
पूर्वी लेखी परीक्षा आधी आणि शारीरिक चाचणी नंतर होत होती़ मात्र, आता शारीरिक चाचणी आधी घेण्यात येणार असून, तिथे पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा होणार आह़े या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलीस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
3. तळोजा परिसरात लिफ्ट कोसळून 4 कामगार मृत्यूमुखी
मंगळवारी संध्याकाळी तळोजा फेस२ सेक्टर 36 मध्ये सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असताना इमारतीचे बांधकाम सामान वर वाहून नेणारी लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात चार मजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे काम हे शिर्के कंपनी करीत आहे. तर मृत्यू झालेले चारही कामगार हे लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. सिडकोच्या माध्यमातून देखील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
बांधकामाचे सामान वर पोहचवणारी लिफ्ट कोसळली, यावेळी दोन कामगार लिफ्ट जवळ उभे होते, व दोन कामगार लिफ्ट खाली येणार अशा ठिकाणी कार मध्ये बसले होते. अचानक ही लिफ्ट कोसळली आणि प्रकाश परसराम पावडे (48), मारुती केनबा आणेवाड (40) राजेंद्र गंगाराम रविदास (22), पंकज भीमराय (26) हे चौघे मृत्युमुखी पडले. तर जवळपास असणारे आलम साकीरे (25), मोहम्मद सज्जत अली (22) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली. सिडकोच्या माध्यमातून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 7 लाख व जखमींना प्रत्येकी 2 लाख देण्याचे निर्देश इमारत बांधकाम करण्याचे कंत्राट घेतलेले कंत्राटदार बी.जी शिर्के यांना दिले आहेत.
4. शापूरजी पालोनजी यांचं निधन
शापूरजी पालनजी उद्योग समुहाचे प्रमुख पालनजी मिस्त्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दक्षिण मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले शापूरजी मिस्त्री आणि सायरस मिस्त्री आणि दोन मुली लैला मिस्त्री आणि अलो मिस्त्री असा परिवार आहे. पालनजी मिस्त्री हे शापुरजी पालनजी ग्रुपचे प्रमुख तसेच टाटा ग्रुपमधील सर्वांत मोठे वैयक्तिक भागदारक होते.शापूरजी पालनजी ग्रुपची स्थापना 1865 साली करण्यात आली होती, 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात शापूरजी पालोनजी समूहाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर अभियांत्रिकी, पायाभूत सेवा, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा आणि वित्तीय सेवा क्षेत्रात या समूहाने विस्तार केला. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार पालोनजी मिस्त्री यांची 13 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असून ते जगभरातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत 143 व्या स्थानावर आहेत. पालोनजी मिस्त्री यांच्याकडे आयरिश नागरिकत्व देखील होते.
5. दीपक हुड्डाचं शतक, भारताचं आयर्लंडवर निर्भेळ विजय
दीपक हुड्डाच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 225 धावांचा डोंगर उभारला. दीपकने 9 चौकार आणि 6 षटकारांसह 57 चेंडूत 104 धावांची मॅरेथॉन खेळी केली. ट्वेन्टी20 प्रकारात भारतासाठी शतक झळकावणारा दीपक केवळ चौथा फलंदाज ठरला. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
संजू सॅमसनने 42 चेंडूत 77 धावांची खेळी करत दीपकला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. आयर्लंडकडून मार्क अडेरने 3 तर जोश लिटील आणि क्रेग यंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडने 221 धावांची मजल मारली. अँडी बलर्बिनीने 60 तर पॉल स्टर्लिंगने 40 आणि हॅरी टेक्टरने 39 धावांची खेळी केली. दीपक हुड्डाला सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघाने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








