गुवाहाटी, रॅडिसन ब्ल्यू, प्रत्येक 10 मीटरवर AK-47वाला आणि आसामच्या मंत्र्याची रोज 8.30ची भेट

रॅडिसन ब्ल्यू
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी, गुवाहाटीहून

शिवसेनेचे बंडखोर आमदार रहात असलेल्या गुवहाटीच्या रेडिसन ब्लू हॅाटेलचं एका अभेद्य किल्ल्यात रूपांतर झालंय. चिटपाखरूही फिरकू शकणार नाही अशी सुरक्षा व्यवस्था आत आणि बाहेर तैनात करण्यात आलीये.

आसाम पोलीस, CRPF, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, आसाम पोलिसांचे स्पेशल कमांडो 24 तास जागता पहारा देत आहेत.

केंद्रातील मोदी सरकारने या आमदारांना Y दर्जाची सुरक्षा दिलीये. आमदारांच्या सुरक्षेत कोणतीही चूक शक्य नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गुवाहाटीचे स्थानिक पत्रकार नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "हे हॅाटेल अभेद्य आहे. कोणीच ही सुरक्षा व्यवस्था भेदून आत जाऊ शकत नाही. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची सुरक्षेवर बारीक खास नजर आहे."

हॅाटेलच्या गेटवर आसाम पोलीस आणि CRPF चं कडं तयार करण्यात आलंय. CRPF चे कमांडो गेटच्या दोन्ही बाजूला उभे असतात. तर, गेटच्या आत जवळपास 50 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

मी बुधवारी इथं पोहोचलो तेव्हा फक्त आसाम पोलिसांचे जवान दिसत होते. आता मात्र CRPF आणि आसाम पोलिसांचे कमांडो दिसून येत आहेत.

रॅडिसन ब्ल्यू

गेटवर हॉटेलचे सुरक्षा कर्मचारी आत येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करतात. कोणत्याही गाडीला आत सोडलं जात नाही. आतमधून गाडी नंबर आणि नाव गेटवरच्या माणसाला कळवलं असेल तरच तुम्हाला आत जाण्यास परवानगी मिळते.

या हॅाटेलमध्ये काही एअरलाईन कंपन्यांचे पायलट आणि एअर होस्टेस यांच्या रहाण्याची व्यवस्था आहे. त्यांच्याच गाड्या फक्त थेट आत सोडल्या जातात.

मुंबईहून एखादा आमदार येणार असेल तर पोलीस कर्मचारी हॅाटेलमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला उभे रहातात. जेणेकरून गाडी थेट आतमध्ये जाऊ शकेल.

गाडी आली की मीडियाचे कॅमेरे सरसावतात आणि व्हिजुअल्स घेण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे कोणत्या गाडीत बाहेर पडले तर? याची धास्ती सर्वांनाच असते. एवढ्यातच एक गाडी बाहेर येते. एक रिपोर्टर ओरडतो... ए व्हिज्युअल्स घे ना… कॅमेरामन धावतो आणि गाडीचं शूटिंग करतो. काही गाड्या काळ्या काचांच्या आहेत. त्यामुळे आतलं काही दिसत नाही. आता बसू नको.... प्रत्येक गाडी शूट कर… रिपोर्टर त्याला सांगतो.

रॅडिसन ब्ल्यू

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचं येणं सुरूच आहे. हे आमदार आसाम पोलिसांच्या एस्कॅार्टमध्ये खासगी गाड्यांनी पोहोचतात. एअरपोर्टपासून हॅाटेलपर्यंत पोलिसांच्या दोन गाड्या आमदारांच्या गाडीच्या पाठी आणि पुढे धावत असतात.

नाव न घेण्याच्या अटीवर एकनाथ शिंदे प्रकरण कव्हर करणारे स्थानिक पत्रकार सांगतात, "एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी हॅाटेलमध्येच बुधवारपासून रहातोय."

गेल्या चार दिवसात आसामचे पोलीस महासंचालक, स्पेशल डीजीपी आणि गुवाहाटीचे पोलीस आयुक्त यांच्या गाड्या अनेकदा सुरक्षा ताफ्यात आत-बाहेर झालेल्या मी पाहिल्या आहेत.

चार दिवसानंतर आता काही गाड्या ओळखीच्या झाल्यात. त्यामुळे आता कॅमेरामन गाडी पाहिली की दुसऱ्याला म्हणतो, काय धावतो रे... डीजीपीची गाडी आहे. जाऊदे त्याला.

रॅडिसन ब्ल्यूच्या गेट बाहेर मीडियाचे प्रतिनिधी सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत असतात. सतत कोणा ना कोणाचं लाईव्ह सुरू असतं. मराठी, बंगाली, आसमिया आणि इंग्रजी वाहिन्याचे पत्रकार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीहून पोहोचले आहेत.

गुवहाटीत खूप गरमी आहे. आद्रता जास्त असल्याने भयंकर धाम येतो. उन्हात उभं रहावत नाहीये. लाईव्ह करताना अंगाला चटके बसतात. त्यामुळे गमछा घेतलाय. खूप फायदा होतो त्याचा या गरमीत.

रॅडिसन ब्ल्यू

मीडियासाठी हॅाटेलतर्फे एक शामियाना उभारण्यात आला आहे. तर मोठ्या छत्र्याही दिल्यात. ही सोय कोणी करून दिली माहिती नाही. पण असहाय्य गरमीत याचा खूप फायदा होतोय.

एक स्थानिक पत्रकार सांगतात, "हॅाटेलमध्ये साध्या कपड्यात पोलीस तैनात आहेत. ते प्रत्येकाच्या हालचालींवर नजर ठेऊन आहेत. हॅाटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काही ठिकाणी जाण्याची परवानगी नाहीये."

रॅडिसन ब्ल्यू हॅाटेलमध्ये 190च्या आसपास खोल्या आहेत. त्यातल्या 70 खोल्या शिवसेना आमदार आणि त्यांच्या संबंधित लोकांसाठी बूक करण्यात आल्यात.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर म्हणतात, "आम्ही आमच्या राहाण्याचा खर्च करू शकतो. एवढाही खर्च आम्ही करू शकत नाही का?"

हॅाटेलच्या मुख्य गेटपासून इमारतीच्या गेटचं अंतर 100 मीटरपेक्षा जास्त आहे. तिथं दर 10 फुटांनी पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यांच्या हातात AK-47 देण्यात आल्या आहेत.

हॉटेलमधील शिवसेना नेत्यांशी फोनवरून चर्चा होतेय. काही फक्त फेसटाईमवर बोलतात. ते सांगतात, "सर्व आमदारांना वरच्या मजल्यावर ठेवण्यात आलंय. एकदा खोलीत गेलं की बाहेर येणं शक्य नाही. लॅाबीमध्ये आसाम पोलिसांचे जवान तैनात आहेत."

रॅडिसन ब्ल्यू

प्रत्येक आमदारामागे एक जवान असतो. आमदार बाहेर पडले की हा जवान त्यांना फॅालो करतो. मिटींगसाठी एका मोठ्या रूममध्ये आणण्यात येत. या आमदारांवर सतत पोलीस पाळत ठेऊन आहेत.

रोज रात्री साधारणतः 8.30 वाजता आसाम सरकारचे एक मंत्री पोहोचतात. स्थानिक पत्रकार सांगतात, "हे मंत्री अशोक सिंघल आहेत. ते रोज हॅाटेलमध्ये येतात. पण शिवसेना आमदारांना भेटतात का नाही याबाबत त्यांनाही माहिती नाही."

आमदार किंवा एकनाथ शिंदे यांच्या हालचालींबाबत कमालीची गुप्ताता पाळण्यात येतेय. चार्टर्ड विमानांची माहिती फक्त अर्धातास आधी ATC ला देण्यात येते, असं स्थानिक पत्रकाराचं म्हणणं आहे.

दुपार झाली की माझी फोनची बॅटरी संपत जाते. पत्रकार म्हटलं की फोनची बॅटरी चार्ज करण्याची व्यवस्था महत्त्वाची. हॅाटेलच्या बाजूला एक दुकान आहे. याला मी माझं घरच समजतो. दिवसातून अनेकवेळा दुकानात जाऊन बसतो.

रॅडिसन ब्ल्यू

अर्णब कुमार या दुकानाचे मालक. त्यांनी आम्हाला दुकानात बसायची आणि फोन, लाईव्ह-यू चार्ज करण्याची परवानगी दिलीये. अर्णब हसतमुख आहेत. ते सांगतात, "तुम्ही एवढ्या लांबून आलात. दिवसभर काम करताय. धावपळ करताय. तुम्ही दुकानात जेव्हा पाहिजे तेव्हा या."

त्याच्या दुकानातील कर्मचारी खूप गप्पा मारतात. त्यांना हे काय सुरू आहे हे जाणून घ्यायला खूप आवडतं.

आसामी लोक मनमिळावू आहेत. मदत करायला नाही म्हणत नाहीत. अर्णब आता अनोळखी राहिलेला नाही. त्याने एकदिवस आग्रहाने जेवायला घातलं. म्हणाला "रोज आप बाहर खाते हो... आज हम आसामी फूड खिलाते है."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)