राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजकीय चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे राज ठाकरे

आज ( 1 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी जाऊन ही भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार का या चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीनंतर एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलले. ते म्हणाले ही भेट राजकीय नव्हती. केवळ सदिच्छा भेट होती असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपण आलो होतो असं शिंदे यांनी सांगितलं. लवकरच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जात आहे.

गणपती

याआधी देखील झाली होती चर्चा

याआधी, जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे गट हा मनसेत जाणार का अशी चर्चा सुरू होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चार दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं आहे. मनसे नेते आणि एकनाथ शिंदे समर्थकांनी राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेला दुजोरा दिला होता.

यो दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत राज ठाकरे यांनी विचारणा केली. शिंदे यांनी बंडखोरी का केली याचं कारण त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं एका मनसे नेत्याने त्यावेळी सांगितले होते.

याबाबत मनसे नेते बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले होते की, "राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात चर्चा झालीये," पण या दोन नेत्यांमध्ये काय बोलणं झालं याबाबत त्यांनी माहिती नाही.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. राज यांनी शिवसेना सोडल्यानंतरही एकनाथ शिंदे यांचे राज यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत.

याबाबत बीबीसी मराठीने शिंदे समर्थक आमदारांशी चर्चा केली होती. नाव न घेण्याच्या अटीवर शिंदे समर्थक म्हणाले होते की, "एकनाथ शिंदे यांची अनेकांशी चर्चा होतेय. राज ठाकरेंसोबतही चर्चा झाली. पण ही चर्चा राजकीय नव्हती." राज यांनी या बंडाबाबत भूमिका समजावून घेतली.

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेनंतर शिंदे गटाला मनसेत विलीन होण्याचा पर्याय असल्याची चर्चा सुरू झालीये. याचं कारण म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे यांनी बंड केलंय. आणि मनसेदेखील हिंदुत्वाच्या मुद्यावर सातत्याने आक्रमक झालेले दिसत आहेत.

शिंदे गट मनसेत जाणार यावरून सुरू झाली होती चर्चा

ही चर्चा यासाठी सुरू झाली कारण शिवसेनेचा दावा आहे की शिंदे गटाला परिशिष्ठ 10 नुसार कोणत्यातरी इतर पक्षात विलीन व्हावं लागेल. तरच त्यांची आमदारकी टिकेल.

विधानसभेत मनसेचे राजू पाटील एकमेव आमदार आहेत. शिंदे यांना ठाकरे आडनाव राजकारणासाठी फायद्याचं ठरू शकतं. राज ठाकरे बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार अशा भावना अनेकवेळा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत.

एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मनसे, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे

याबाबत बोलताना राज ठाकरे यांच्या जवळचे नेते सांगतात, "शिंदे मनसेत येतील असं वाटत नाही. कारण भाजप तसं होऊ देणार नाही."

ते पुढे म्हणाले, "शिंदे मनसेत आले तर मनसेला नक्कीच फायदा होईल. पण मनसे मोठी झाली तर भाजपला 2024 च्या निवडणुकीत अडचण होईल. भाजपला मनसेलाही मोठं होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे शिंदे मनसेत येतील ही शक्यता दिसत नाही."

शिंदेसेनेतील आमदारांनी याआधीच आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. आम्ही शिवसेनेत आहोत हे स्पष्ट केलंय.

शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न नाही. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडणार नाही."

प्रसारमाध्यमांनी शिंदे गटासमोर मनसेत विलीन होण्याचा पर्याय आहे. हा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला. त्यावर म्हणाले, "ते कोणत्याही पक्षात विलीन होऊ शकतात. त्यांना विलीन व्हावंच लागेल."

राऊत पुढे म्हणाले, "अशा पद्धतीने मनसेला मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर हे ऐतिहासिक असेल."

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंधाबाबत बोलताना महानगरचे संपादक संजय सावंत म्हणाले, "ठाण्यातील महापालिका निवडणुकीत मनसेचं सहकार्य मिळवण्यासाठी शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली होती. ही भेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी झाली होती. मातोश्री या भेटीबाबात पूर्णतः अनभिज्ञ होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)