मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, 19 जणांचा मृत्यू

पावसाळा सुरू होताच इमारत कोसळण्याची घटना मुंबईतील कुर्ला येथे घडली आहे. कुर्ल्यातील नाईकनगर परिसरात सोमवारी (27 जून) रात्री ही इमारत कोसळली.

अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत.

कुर्ला इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू. यापैकी 18 पुरुष, एक महिला. 14 जण जखमी. यापैकी 4 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू तर 10 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत.

या दुर्घटनेची चौकशी केली जाईल, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.

'मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये मदत केली जाईल आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील,' असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केलं.

या दुर्घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असंही सुभाष देसाई यांनी म्हटलं.

नाईक नगर परिसरातील 4 इमारती एकमेकांना अगदी चिकटून उभ्या आहेत. त्या धोकादायक असल्याची नोटीस पालिकेने यापूर्वीच बजावलेली होती मात्र रहिवाशांनी ती सोडली नव्हती.

कुर्ल्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ही दुर्घटना घडली तिथले शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली.

'नोटीस मिळाल्यावर इमारत मोकळी करा'

घटनेची माहिती मिळताच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली.

मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्तपासणी करण्यात येईल. मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा इमारती खाली कराव्यात. त्यामुळे महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणं मदतीचं ठरेल, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)