खलिस्तान : सिमरनजीत सिंह कोण आहेत? त्यांचं निवडून येणं पंजाबसाठी ‘धोक्याची घंटा’ का आहे?

फोटो स्रोत, @SIMRANJITSADA
पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून शिरोमणि अकाली दलाचे (अमृतसर) अध्यक्ष सिमरनजीत सिंह मान विजयी झाले आहेत. 77 वर्षीय सिमरजीत यांच्या विजयामुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा अकाली दलाच्या राजकारणाला पुनरुज्जीवन मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
2019 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत सिंह मान विजयी झाले होते. मात्र ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले असल्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.
'द हिंदू' या इंग्रजी वर्तमानपत्राने सिमरनजीत सिंह यांच्या विजयाचं विश्लेषण करणारं एक वृत्तही प्रसिद्ध केलं आहे.
कोण आहेत सिमरनजीत सिंह मान?
सिमरनजीत सिंह मान यांची ओळख एक कट्टर शीख नेता अशी आहे. ते नेहमी खलिस्तानच्या समर्थनार्थ बोलतात. खलिस्तान म्हणजे शीख धर्मियांसाठी स्वतंत्र राष्ट्र. गेल्या 23 वर्षांतील सिमरनजीत सिंह यांचा हा पहिला विजय आहे. त्यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा कट्टरतावादी शीख राजकारणाला पुन्हा एकदा चालना मिळू शकते.
पंजाबचं राजकारण जवळून पाहणारे तज्ज्ञ सांगतात की, सिमरनजीत सिंह यांचा विजय पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी आव्हान ठरू शकतो. पंजाबमध्ये आप सरकार सत्तेवर येऊन केवळ तीन महिनेच झाले आहेत. अशावेळी कट्टरतावादी राजकारणाला आळा घालण्यासाठी विकास आणि सुशासनच्या राजकारणावरच लक्ष केंद्रित करायला हवं.
1980च्या दरम्यान आणि 1990च्या सुरुवातीच्या काळात पंजाबमध्ये शीखांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणाऱ्या खलिस्तानी चळवळीचा उदय झाला. त्यानंतर हळूहळू या आंदोलनाला मिळणारं समर्थन कमी व्हायला लागलं.
गेल्या काही दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये खलिस्तानला पाठिंबा देणाऱ्या किरकोळ घटना घडल्या. त्यातूनच ही मागणी आजही कायम असल्याचं चित्र निर्माण केलं जातं.

फोटो स्रोत, SATPAL DANISH
सिमरनजीत सिंह तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. त्यांनी 1994 मध्ये आपला पक्ष स्थापन केला होता. जून 1984 मध्ये त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार विरोधात आयपीएसच्या नोकरीचा राजीनामा दिला होता.
याच काळात त्यांना अनेक प्रकरणांत अटकही करण्यात आली होती. यामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचं प्रकरणही होतं. सिमरनजीत सिंह यांनी पाच वर्षं तुरुंगात शिक्षाही भोगली होती.
संगरूर लोकसभा पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलानं (अमृतसर) अनेक भावनात्मक मुद्दे समोर आणले होते. त्यात त्यांनी शीख कैद्यांची तुरूंगातून सुटका करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
मे महिन्यातच सिमरनजीत सिंह यांनी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या बैठकीत शीख कैद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. सिमरनजीत सिंह यांनी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीत खलिस्तानला समर्थन देणारा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यांचा दावा होता की, 1946 मध्ये हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला होता.
चंदीगढमध्ये इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेसशनचे संचालक डॉ. प्रमोद कुमार यांनी द हिंदूशी बोलताना म्हटलं, "सिमरनजीत सिंह मान यांच्या विजयामुळे कट्टरतावादी अकाली राजकारण पुन्हा एकदा जोर धरत आहे. अकाली राजकारणात धार्मिक (शीख), शेतकरी आणि प्रांतिक दृष्टीकोन बाळगणाऱ्यांची संख्या अधिक आहे. निवडणुकीचे निकाल स्पष्ट आहेत- शिरोमणी अकाली दलाने (अमृतसर) संगरुरच्या तीन विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली आहे."
धोकादायक संकेत
डॉ. कुमार सांगतात की, पंजाबमध्ये सध्या कट्टरतावादाचा जो दबका सूर आहे, त्याला आम आदमी पक्षाचं सरकार सुशासन आणि आपल्या आश्वासनांची पूर्तता करूनच सामोरं जाऊ शकतं.
डॉ. प्रमोद कुमार पुढे म्हणतात, "तुम्ही आतापर्यंत विकास आणि सुशासनाच्या आघाडीवर अपयशी ठरले आहात. कट्टरतावादाला राजकीयदृष्ट्या सामोरं जायचं असेल तर आप सरकारला मुख्य अजेंडा विकास हाच ठेवावा लागेल. त्याचबरोबर पंजाबी अस्मितेचाही विचार करायला हवा. शिरोमणि अकाली दलाच्या राजकारणाचा जोर आता ओसरतोय आणि कट्टरतावादी अकाली राजकारण पुन्हा पाय पसरत आहे. हे धोकादायक आहे.
पंजाबचे माजी डीजीपी शशिकांत यांनी म्हटलं की, मान यांच्या विजयानं खलिस्तानची चळवळ जोर पकडू लागलीये असाही एक संकेत कट्टरतावाद्यांना मिळत आहे. पंजाबमध्ये पाकिस्तानमधून काही काळापासून ड्रोन, पैसे आणि स्फोटकं येत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








