ऑपरेशन ब्ल्यू स्टार : जेव्हा 'रॉ'ने हेलिकॉप्टरने भिंद्रनवालेंचं अपहरण करण्याची योजना आखली होती

हरचरण सिंह लौंगोवाल आणि जरनैल सिंह भिंद्रनवाले स्वर्ण मंदिर येथून बाहेर पडताना

फोटो स्रोत, SATPAL DANISH

फोटो कॅप्शन, हरचरण सिंह लौंगोवाल आणि जरनैल सिंह भिंद्रनवाले स्वर्ण मंदिर येथून बाहेर पडताना
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1982 चं वर्ष संपता संपता पंजाबमधली परिस्थिती हाताबाहेर चाललेली पाहून रॉ चे माजी प्रमुख रामनाथ काव यांनी भिंद्रनवाले यांना हेलिकॉप्टरने आधी मेहता चौक गुरुद्वारा आणि नंतर सुवर्ण मंदिरातून उचलण्याच्या योजनेबद्दल विचार करायला सुरुवात केली.

यादरम्यान त्यांनी ब्रिटीश उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या ब्रिटीश गुप्तहेर संस्था MI-6 च्या दोन गुप्तहेरांची भेट घेतली होती.

रॉ चे माजी अतिरिक्त सचिव बी. रमण 'काव बॉईज ऑफ रॉ' या त्यांच्या पुस्तकात लिहितात, "डिसेंबर 1983 मध्ये MI-6 च्या दोन गुप्तहेरांनी सुवर्ण मंदिराची पाहणी केली. यात एक माणूस असा होता ज्याने काव यांची भेट घेतली होती."

यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार 30 वर्षांनी प्रकाशझोतात आल्यानंतर हे कळलं की ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांना MI-6 च्या प्रमुखांमार्फत काव यांनी केलेली विनंती मान्य केली होती. त्यामुळे ब्रिटनच्या एलिट कमांडो फोर्सच्या एका अधिकाऱ्याला दिल्लीला पाठवण्यात आलं होतं.

भिंद्रनवाले यांच्या सभेत ज्येष्ठ पत्रकार शुखवंत सिंह उपस्थित असताना

फोटो स्रोत, SATPAL DANISH

फोटो कॅप्शन, भिंद्रनवाले यांच्या सभेत ज्येष्ठ पत्रकार खुशवंत सिंह उपस्थित असताना

ब्रिटिश सरकारच्या तपास समोर आली तथ्यं

त्याच ब्रिटिश ऑफिसरने भारताला सल्ला दिला होता की काहीही करून शीख कट्टरतावाद्यांना सुवर्ण मंदिराच्या बाहेर काढा.

ब्रिटिश संशोधक आणि पत्रकार फिल मिलर यांनी जानेवारी 2014 ला प्रसिद्ध केलेला ब्लॉग 'रिव्हिल्ड एसएएस अॅडवाईज्ड अमृतसर रेड' मध्ये याच्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान इंदिरा गांधीवर टीका केली होती.

त्यांनी म्हटलं होतं की एका बाजूने त्या श्रीलंकेत ब्रिटिश गुप्तहेर संस्थेच्या हस्तक्षेपाच्या खूप विरोधात होत्या, पण भारतात त्यांना सुवर्ण मंदिर ऑपरेशनसाठी त्यांची मदत घेण्यात काही आक्षेप नव्हता.

ब्रिटिश संसदेत वादंग झाल्यानंतर जानेवारी 2014 मध्ये पंतप्रधान कॅमरून यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तपासानंतर ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री विल्यम हेग यांनी मान्य केलं होते की एका एसएएस अधिकाऱ्याने 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 1984 च्या काळात भारताचा दौरा केला होता आणि भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या काही अधिकाऱ्यांसमवेत सुवर्ण मंदिराचा दौराही केला होता.

ही कागदपत्र पाहिल्याचा लेबर पार्टीचे खासदार टॉम वॉटसन यांचा दावा

फोटो स्रोत, TOM WATSON

फोटो कॅप्शन, ही कागदपत्र पाहिल्याचा लेबर पार्टीचे खासदार टॉम वॉटसन यांचा दावा

तेव्हा बीबीसीनेच ही बातमी देताना म्हटलं होतं की, "ब्रिटिश गुप्तहेर अधिकाऱ्याचा सल्ला होता की सैनिकी कारवाई हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवावा आणि कट्टरतावाद्यांना बाहेर आणण्यासाठी हेलिकॉप्टरने सुरक्षा दलांना मंदिराच्या परिसरात पाठवण्यात यावं म्हणजे कमीत कमी जीवितहानी होईल.

ब्रिटिश संसदेत झालेल्या या चर्चेची दखल घेत इंडिया टुडेचे जेष्ठ पत्रकार संदीप उन्नीथन यांनी जानेवारी 2014 मध्ये 'स्नॅच अँड ग्रॅब' या नावाने एक लेख लिहिला. यात त्यांनी म्हटलं की या मोहिमेला ऑपरेशन सनडाऊन असं नाव दिलं गेलं होतं.

या लेखात पुढे म्हटलं होतं, "भिंद्रनवालेंना त्याच्या गुरूनानक निवासातून पकडून हेलिकॉप्टरने बाहेर आणण्याची योजना होती. पण इंदिरा गांधीसमोर ही योजना मांडल्यानंतर त्यांनी याला नकार दिला, कारण यात जास्ती माणसं मारली जातील अशी भीती त्यांना वाटली.

भिंद्रनवाले यांना पकडण्याची जबाबदारी कोणावर सोपवली?

रॉ मध्ये विशेष सचिव या पदावर काम केलेले आणि माजी परराष्ट्र मंत्री स्वर्ण सिंह यांचे जावई जी. बी. एस. सिद्धू यांचं पुस्तक 'द खलिस्तान कॉन्सपिरेसी' नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकात त्यांनी भिंद्रनवालेंना पकडण्याच्या त्या योजनेवर प्रकाश टाकला आहे.

जी.बी.एस सिद्धू यांचे पुस्तक 'द ख़ालिस्तान कॉन्सपिरेसी' चे प्रकाशन झाले.

फोटो स्रोत, GBS Sidhu

फोटो कॅप्शन, जी. बी. एस सिद्धू यांचे पुस्तक 'द खलिस्तान कॉन्सपिरेसी' चे प्रकाशन झाले.

त्या काळात 1951 बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे के. राम टेकचंद नागरानी डिरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटी होते. 1928 साली जन्मलेले नागरानी आता दिल्लीत राहतात, पण तब्येत बिघडली असल्याने ते आता बोलू शकत नाहीत.

दोन वर्षांपूर्वी सिद्धू यांनी आपल्या पुस्तकाच्या कारणाने त्यांच्याशी अनेकदा बातचीत केली होती. सिद्धू म्हणतात, "नागरानींनी मला सांगितलं की डिसेंबर 1983 च्या शेवटी काव यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि भिंद्रनवालेंचं अपहरण करण्यासाठी एसएएफच्या एका हेलिकॉप्टर ऑपरेशनची जबाबदारी दिली."

"भिंद्रनवालेंचं अपहरण सुवर्ण मंदिराच्या गच्चीवरून करायचं होतं कारण रोज संध्याकाळी ते तिथूनच आपला संदेश द्यायचे. यासाठी दोन एमआय हेलिकॉप्टर आणि काही बुलेटप्रुफ गाड्यांची व्यवस्था करायची होती म्हणजे भिंद्रनवालेंना तिथून बाहेर काढून बाजूच्या रस्त्यापर्यंत पोहचवता येईल."

रेहान फजल आणि इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार संदीप उन्नीथन
फोटो कॅप्शन, रेहान फजल आणि इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार संदीप उन्नीथन

सुवर्ण मंदिराच्या आत हेरगिरी

सिद्धू पुढे सांगतात, "मोहिमेची योजना बनवण्याआधी नागरानी यांनी स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या एका कर्मचाऱ्याला सुवर्ण मंदिरात पाठवलं. त्याने काही दिवस तिथे राहून त्या भागाच सविस्तर नकाशा बनवला. या नकाशात मंदिर परिसरात आत येण्याचे आणि बाहेर जाण्याचे रस्ते चिन्हित केले गेले. त्या कर्मचाऱ्याला भिंद्रनवाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवायलाही सांगितलं होतं.

द खलिस्तान कॉन्सपिरेसी किताब

फोटो स्रोत, GBS Sidhu

फोटो कॅप्शन, द खलिस्तान कॉन्सपिरेसी पुस्तक

दोरीवरून उतरवणार होते कमांडो

नागरानींनी सिद्धूंना सांगितलं की ऑपरेशन हेलिकॉप्टरच्या आधी सशस्त्र सीआरपीएफ जवान मंदिराला वेढा घालणार होते म्हणजे ऑपरेशन संपेपर्यंत सामान्य माणसं मंदिरात जाऊ शकणार नाहीत.

स्पेशल फ्रंटियर फोर्स कमांडोंना अगदी खालून उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून दोऱ्यांच्या सहाय्याने जिथे भिंद्रनवाले भाषण द्यायचे तिथे उतरवलं जाणार होतं. त्यांचं भाषण संपतानाची वेळ गाठायची होती. कारण त्यावेळी भिंद्रनवालेंच्या आसपासची सुरक्षा जरा कमजोर व्हायची.

काही कमांडो भिंद्रनवालेंना पकडतील आणि काही त्यांच्या सुरक्षारक्षकांना धरतील अशी योजना होती. भिंद्रनवालेंचे सुरक्षारक्षक कमांडोंना पाहिल्या पाहिल्या गोळ्या झाडायला सुरुवात करतील, असा अंदाज होता. कदाचित कमांडो खाली उतरायच्या आधीच गोळीबार होईल असाही अंदाज होता.

म्हणूनच दुसऱ्या कमांडोच्या तुकडीला दोन गटात विभागायचं होतं. एक गट भिंद्रनवालेंचा मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा रस्ता रोखण्यासाठी आणि दुसरा गट लंगर परिसर आणि गुरूनानक निवासाच्या मधल्या भागात बुलेटप्रुफ वाहनं घेऊन तयार राहायला म्हणजे गच्चीवरच्या कमांडोंनी भिंद्रनवालेंना पकडल्यानंतर त्यांना तातडीने तिथून हलवता येईल.

हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या आणि जमिनीवर असणाऱ्या कमांडोच्या गटांना स्पष्ट आदेश होते की काहीही झालं तर भिंद्रनवाले हरमिंदर साहेबच्या गर्भगृहात पोचता कामा नये. कारण एकदा त्यांनी तिथे आश्रय घेतला तर तिथून वास्तूला नुकसान न पोहचवता त्यांना बाहेर काढणं अशक्य होतं.

सुवर्ण मंदिर

फोटो स्रोत, NARINDER NANU/ Getty Images

फोटो कॅप्शन, सुवर्ण मंदिर

जेव्हा इंदिरा गांधींना योजना सांगितली

1984 च्या एप्रिल महिन्यात काव यांनी नागरानींना सांगितलं की इंदिरा गांधींना या योजनेविषयीची इत्थंभूत माहिती हवी आहे. मग काव आणि नागरानींनी इंदिरा गांधींची भेट घेऊन त्यांना ब्रिफिंग दिलं.

त्या ब्रिफिंगविषयी अधिक माहिती देताना नागरानी यांनी सिद्धू यांना सांगितलं होतं, "सगळं ऐकून घेतल्यावर इंदिरा गांधींनी एक प्रश्न विचारला की या ऑपरेशनमध्ये किती लोक मारले जाऊ शकतात? माझं उत्तर होतं की आपण पाठवलेले दोन्ही हेलिकॉप्टर आपण गमावू शकतो आणि एकूण कमांडोपैकी 20 टक्के कमांडो मारले जाऊ शकतात."

भिंद्रनवाले मााजी राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांच्यासोबत

फोटो स्रोत, GBS Sidhu

फोटो कॅप्शन, भिंद्रनवाले मााजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंह यांच्यासोबत

इंदिरा गांधींचा पुढचा प्रश्न होता की या ऑपरेशनमध्ये किती सामान्य माणसांचा जीव जाऊ शकतो? ज्यावर नागरानींचं उत्तर होतं, "माझ्याकडे याचं उत्तर नाही. हे ऑपरेशन 13 एप्रिल, म्हणजेच बैसाखीच्या आसपास केलं जाणार आहे."

नागरानींनी सिद्धूंना सांगितलं की त्यादिवशी सुवर्ण मंदिरात नक्की किती माणसं असतील याचा अंदाज बांधणं माझ्यासाठी अवघड होतं. "मला त्यांना सांगावं लागलं की त्यादिवशी जितकी माणसं समोर येतील त्यापैकी 20 टक्के लोकांची जीवितहानी होऊ शकते. इंदिरा गांधींनी काही क्षण विचार करून सांगितलं की त्या इतक्या सामान्य माणसांचा जीव पणाला नाही लावू शकत."

ऑपरेशन सनडाऊन तिथेच बासनात गुंडाळलं गेलं. यानंतर तीनच महिन्यांनी सरकारने ऑपरेशन ब्लूस्टार तडीस नेलं ज्यात अधिक सैनिक आणि सामान्य माणसांचा जीव गेला आणि इंदिरा गांधींना याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)